​​​​​​​​​​​जिल्हा - पुणे 
श्रेणी  - मध्यम   
दुर्गप्रकार - गिरीदुर्ग

महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातील इतिहास प्रसिद्ध दुर्गजोडी म्हणजे लोहगड-विसापुर. मावळ तालुक्यात लोणावळ्याच्या पूर्वेस व मळवली रेल्वे स्थानकाच्या दक्षिणेस हा किल्ला असून तो समुद्रसपाटीपासून ३०३८ फूट तर पायथ्यापासून १२०० फुट उंचीवर आहे. पुणे – मुंबई मार्गावरील भाजे हे प्राचीन बौद्ध लेण्यांसाठी प्रसिद्ध असलेले गाव याच्या पायथ्याशी आहे. कोकण व देश यांमधील परिसरावर नजर ठेवण्यासाठी या दुर्गजोडीची निर्मीती करण्यात आली. किल्ले विसापूर म्हणजे पवन मावळच्या संरक्षक दुर्गचौकडीपैकी एक. या चौकडीमध्ये आकाराने सर्वात मोठा आणि सर्वात उंच असा विसापूर किल्ला चहूबाजूंनी कातळकडय़ांचे नैसर्गिक संरक्षण असलेला पुराणपुरुष आहे. ह्या गडावर दोन लहानशी टेकाडे आहेत ज्यामुळे हा गड लोहगडापेक्षा काकणभर उंच भासतो. किल्ल्यावरचे प्रशस्त पठार आणि अखंड तटबंदी हीच खरी या किल्ल्याची ओळख आहे. मुंबई-पुणे लोहमार्गावर मळवली या रेल्वे स्थानकावर उतरून भाजे गावात यावे. भाजे गावातून या गडावर जाण्यासाठी दोन वाटा आहेत. एक गडाखालील भाजे लेणी पाहात शेजारच्या ओढय़ाच्या कडेने वर जाणारी तर दुसरी लोहगड-विसापूर दरम्यानच्या गायमुख खिंडीतून विसापूरला वळसा मारत वर येणारी. यातील भाजे लेण्यांकडून येणारी वाट थोडी साहसाची तर कोकण दरवाज्याकडून म्हणजेच लोहगडकडून येणारी वाट सोपी पण लांबची. उत्तरेकडील वाट दिल्ली दरवाज्याने तर दक्षिणेकडील कोकण दरवाज्यातून गडावर शिरते असे या वाटांचे उल्लेख आहेत. हे दिल्ली व कोकण दरवाजे आज जरी येथे दिसत नसले तरी त्यांच्या खुणा मात्र ओळखू येतात. ब्रिटिशांनी हा किल्ला जिंकल्यावर तोफानी हे दोनही दरवाजे उध्वस्त केले. यातील दिल्ली दरवाजाने गडात शिरलो की वाटेत खोदीव टाक्या, कोठीवजा चौकीच्या जागा आणि खडकातील पायरी मार्ग लागतो. या पायऱ्यांनी किल्ल्यावर जाताना सहा फूट उंचीचा कोरीव हनुमान आणि कोठीवरील गणेशाला वंदन करतच आपला गडात प्रवेश होतो. या मुर्तीच्या बाजूलाच दोन गुहा आहेत. यात ३० ते ४० जणांची रहाण्याची सोय होते. मात्र पावसाळ्यात या गुहेत पाणी साठते. भलेमोठे सपाटीचे पठार आणि मधोमध बालेकिल्ल्याची दोन छोटीशी टेकाडे अशी या गडाची रचना आहे. गडावर आल्यावर समोरच डाव्या हाताला सदर लागते. या सदरेशेजारीच एक भलीमोठी तोफ पडलेली आहे. गडावर आणखी दोन तोफा वायव्य बुरुजावर आहेत. विसापूरच्या या तोफेविषयी चिं.ग. गोगटे यांच्या १८९६ मधील महाराष्ट्रातील किल्ले या पुस्तकातील उल्लेख असा आहे कि सुमारे १० फूट लांबीच्या या तोफेवर इंग्लडमधील टय़ुडर नामक राजघराण्याचे राजचिन्ह असलेले गुलाबाचे फूल आणि मुकुट आहे. ER ही इंग्रजी अक्षरे कोरलेली आहेत. इंग्रजांच्या जहाजावर कान्होजी आंग्रेनी छापा टाकून वरील तोफ हस्तगत केली व ती पेशव्यांना दिली. इ.स.१८१८ नंतर किल्ला सोडताना ब्रिटिशानी या तोफेच्या कानात खिळे मारून ती निकामी करून टाकलेली आहे. सदरेच्या मागे गडावरील बालेकिल्ल्याची टेकडी आहे पण किल्लेदाराच्या वाडय़ाचे आणि शिबंदीच्या काही घरटय़ांचे अवशेष व गणेशाची एक सुंदर मूर्ती सोडली तर हा बालेकिल्ला फक्त नावापुरताच आहे.बालेकिल्ल्याला स्वतंत्र अशी संरक्षण रचना नाही. या बालेकिल्ल्याच्या भोवतीने गडावर सर्वत्र सपाटीची जागा आहे. या सपाटीवरून उत्तर-पूर्व-दक्षिण आणि पश्चिम अशा दिशेने गडप्रदक्षिणा सुरू करावी. सुरुवातीलाच महादेवाचे एक छोटेखानी मंदिर लागते. या मंदिरासमोरच्या दीपमाळेवर गणेशासह काही शिल्पं आहेत. यापुढे एक मोठा तलाव आणि त्याच्या काठावर मारुतीचे मंदिर येते. विसापूरवर फक्त हनुमानाच्या अशा सहा मुर्ती आहेत. मारुती मंदिराकडून उत्तरेकडच्या तटावर यावे. वाटेत एका वीरपुरुषाची प्रतिमा असलेली घुमटी लागते. या उत्तरेकडील तटावर एकदोन ठिकाणी काही आकृत्या-शिल्पंही कोरलेली आहेत. हा तट जिथे संपतो त्या ईशान्येकडील बुरुजावर एक गोल चौथरा बांधलेला आहे. त्याच्या बाजूने चर खोदलेला आहे. एखादे दगडी चाक फिरवण्यासाठीची ही रचना सर्व दिशांना तोफ फिरवण्यासाठी केली आहे. या बुरुजाच्या अलीकडे टेहळणीसाठी पुन्हा एक स्वतंत्र बुरुज बांधलेला आहे. उत्तर दिशा सोडून पुढे पूर्व दिशेने दक्षिणेकडे जाऊ लागलो, की वाटेत आणखी एक खोदलेला तलाव दिसतो. या गडावर चारही दिशांना असे छोटे-मोठे तलाव खोदून पाण्याची उत्तम सोय केलेली आहे. दक्षिण बाजूस गडाचा दुसरा कोकण दरवाजा येऊन मिळतो. येथील दक्षिणेकडच्या तटाला भगदाडे पडलेली दिसतात. या दरवाजातून आत आलो की, लगेच काही खोदीव कोठय़ा आणि टाक्या लागतात. या गुहा बहुदा शिबंदीसाठी अथवा कोठारासाठी वापरत असावेत. यातील काही टाक्यांवर ब्राह्मी लिपीत लेख कोरलेले आहेत. हे कोरीव शिलालेख या गडाचे प्राचीनत्व सिद्ध करतात. खरेतर ज्या गडाच्या पोटात लेणी तो गड नि:संशय दोन-एक हजार वर्षांपूर्वीचा मानावा. ऐन बोरघाटाजवळ गडाची योजना, पोटातील भाजे लेणी, गडावरील खोदकामे, त्यावरील ब्राह्मी लिपीतील लेख या साऱ्यांमुळे लोहगड-विसापूरचा इतिहास प्राचीन काळापर्यंत निश्चितपणे जातो. पण गडाला आजचे जे रूप दिसते ते मराठेशाहीतील आहे. लोहगडामुळेच हा गड मजबूत केलेला असावा. किल्ल्यासमीप दुसरा पर्वत असू नये, असल्यास तो त्याच्या आहारी आणावा. ते शक्य न झाल्यास त्यास तटबंदी घालून मजबूत करावा. शिवरायांच्या आज्ञापत्रातील हा नियमच विसापूरच्या दुर्गारोहणास कारणीभूत ठरला असावा. गडावरील हे अभेद्य बांधकाम गडाच्या पश्चिम तटरुपात आहे. विसापूरला उत्तर, पूर्व आणि दक्षिण या तीनही दिशांना तुटलेले खोल कडे आहेत. तेव्हा गड राखायचा असेल तर तो खरा पश्चिमेकडूनच. तेव्हा दिल्ली दरवाज्यापसून ते थेट लोहगड-विसापूर दरम्यानच्या खिंडीपर्यंत तब्बल एक किलोमीटर लांबीचा आणि आठ ते दहा फूट रूंदीचा असा तट घालण्यात आलेला आहे. कोरीव चिऱ्यातील बांधकाम, रेखीव रचना, तटावरील रुंद रस्ता, जागोजागी तटात चढण्या-उतरण्यासाठी ठेवलेले जिने, आतील व्यक्ती बाहेर दिसणार नाही अशी तटाची उंची, अर्धवर्तुळाकार बुरूज, या तटबुरुजांना बंदुका-तोफांच्या माऱ्यासाठी जागोजागी ठेवलेल्या जंग्या, तटावरील देवतांची शिल्पे व प्रतिके, तटाच्या आतील शिबंदीची घरे, पाण्याच्या टाक्या, दारूगोळ्याची कोठारे, तटाच्या पोटातील खोल्या अगदी शौचकूपांची रचनादेखील या तटबंदीत पहाता येतात. साऱ्या महाराष्ट्रातील डोंगरी किल्ल्यात विसापुर या गिरीदुर्गाची तटबंदी विशेष आहे. ती बांधण्यासाठी लागलेला दगड किल्ल्यावर खोदलेल्या टाक्यांमधूनच मिळवला आहे. या पश्चिम भागात टेकडीलगत या अशा अनेक टाक्या खोदलेल्या दिसतात. यातील एका टाक्याच्या भिंतीवर मारुतीचे एक भव्य शिल्पही कोरलेले आहे. एका ठिकाणी एकात एक गुंफलेल्या सात टाक्यांचा समूह आहे. गडावरील या टाक्या खोदूनच जलसंचय केला आणि दगडही मिळवला. बांधकामासाठी लागणारा चुना मळण्यासाठी लावलेली घाणी आजही इथे या पश्चिम तटाशेजारी त्याच्या चाकासह उभी आहे. शेजारीच दोन मोठी दगडी जातीही दिसतात यापैकी एक जाते तुटलेले आहे. हा तट आणि त्याचे हे वैभव पाहत पुन्हा वायव्येकडील शेवटच्या बुरुजावर यावे. यावरील दुसरी भली मोठी तोफ विसापूरच्या सामर्थ्यांचा परिचय करून देत असते. सह्याद्रीचे शिलेदारांनी अलीकडेच या बुरुजाच्या जमिनीखाली गाडल्या गेलेल्या गुप्त दरवाजाला मोकळा श्वास मिळवून दिला तसेच अपार कष्टांनी पाच फूट जमिनीखाली गाडली गेलेली तोफ बाहेर काढली. १८१८ नंतर विसापूरवर दोन तोफा असल्याची नोंद होती व आता त्यामध्ये तिस-या तोफेची नोंद झाली आहे. या बुरुजावरूनच थोडय़ा वेळापूर्वी पाहिलेला पश्चिमेकडचा सारा तट एका नजरेत येतो. महाराष्ट्रात एवढे गडकोट, पण विसापूरच्या या तटाची सर कुणालाही नाही. माथ्यावरून शेजारचा लोहगड फारच सुरेख दिसतो. जरा दूरवर दक्षिणेकडे तुंग, तिकोना व पवना धरण दिसते. किल्ल्याचा विस्तार खूप मोठा आहे. संपूर्ण गड फिरण्यास दोन तास लागतात. वेळेचे व्यवस्थित नियोजन केल्यास लोहगड व विसापूर ही दुर्गजोडी एका दिवसात बघता येईल. दक्षिणेकडील कोकण दरवाज्याने गडावरून उतरताना ढासळलेल्या तटबंदीतून एक दगडांनी भरलेला तीव्र उतार विसापूरची कातळिभत संपवून खालच्या गायमुख खिंडीत घेऊन जातो. दगडांवरची ती उतरण थोडय़ाच वेळात खिंडीच्या पदरातल्या दाट झाडीत घेऊन जाते. या वाटेवर दगडात खोदलेले पाण्याचे एक मोठे टाके असून त्यावर ब्राह्मी लिपीतील एक शिलालेख कोरलेला आढळून येतो. दाट झाडीतून थोडय़ाच वेळात किल्ल्याची ती पायवाट उतरून आपण लोहगड आणि विसापूर या दरम्यानच्या गायमुख खिंडीत पोहोचतो. गायमुख खिंडीत कापला नावाची जागा आहे. इथे एका दगडी चौथऱ्यावर घोडा, उंट, हत्ती व इतर काही अशा नऊ प्राण्यांची शिल्पे दिसतात. त्याच्या बाजूला हनुमानाची मुर्ती आहे. ह्याच्या काही अंतरावर टहाळदेव नावाचा शेंदूर फासलेला दगड आहे. येथुन लोहगडला जाता येते. पूर्वीपासूनच दुर्लक्षित असलेल्या या किल्ल्याचा पूर्ण इतिहास ज्ञात नाही पण गडाचा इतिहास शोधता तो थेट सातवाहन काळात जातो. किल्ल्याच्या परिसरात भाजे व बेडसे या बौध्द्कालीन लेणी आहेत, त्यामुळे किल्ल्याची निर्मिती त्या काळात किंवा त्याही पूर्वी झालेली असावी. इ.स. १६५७ मध्ये शिवाजी महाराजांनी लोहगड,विसापूर हा प्रदेश स्वराज्यात सामील करून घेतला. शिवकालात हा किल्ला इसागड या नावानेही ओळखला जात होता. याचा प्राचीन स्वतंत्र इतिहास फारसा ज्ञात नाही. परंतु लोहगडाच्या इतिहासातच तो सामावलेला असावा. १६६५ च्या पुरंदरच्या तहात हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. त्यानंतर आग्रा भेट व स्वराज्याला स्थिर करण्याच्या धामधुमीत पाच वर्ष गेली. सन १६७० मधे शिवाजी महाराजांनी गेलेले सगळे किल्ले परत जिंकुन घेतले. शंभाजी राजांच्या मृत्यूनंतर हा किल्ला पुन्हा मुघलांकडे गेला. १६८२ मध्ये मराठ्याचा आणि मोगलांचा शिवाशिवीचा खेळ चालूच होता. मराठे इ.स. १६८२ सालच्या ऑक्टोबर महिन्यात पुण्याच्या उत्तर बाजूला स्वारीसाठी गेले. डिसेंबरच्या पहिल्या आठवडात शहाबुद्दीन चाकणमध्ये होता. मराठे लोहगडाच्या बाजूला आल्याचे समजल्यावर तो तेथे पोहचला. तेथे त्याने केलेल्या चकमकीत ६० माणसांची कत्तल झाली. तेथून मराठे विसापूर किल्ल्यावर गेल्याचे समजले म्हणून तो तेथे पोहचेपर्यंत मराठे कुसापुर गावाजवळ पोहचले. म्हणजेच सन १६८२ सालच्या मराठे आणि मोघलांच्या लढाईत मराठ्यांनी हा किल्ला जिंकला. या लढाईत मराठ्यांची मोठी जीवितहानी झाली. सन १७१३ मधे कान्होजी आंग्रेने तो जिंकला. सन १७२० च्या आसपास शिवाजी राजांच्या मृत्यूनंतर पेशवे बाळाजी विश्वनाथ ह्यांनी कान्होजी आंग्रेशी मसलत करुन राजमाची सोडून इतर सर्व किल्ले शाहू महाराजांना द्यायला सांगितले व कान्होजी आंग्रे यांनी मान्य केले. याच काळात पेशवे बाळाजी विश्वनाथ यांनी या किल्ल्याचे बांधकाम केल्याचे ओझरते उल्लेख आढळतात. हे बांधकाम म्हणजे विसापुर किल्ल्याची आजही सुस्थितीत दिसणारी तटबंदी आहे. पेशवाईत या किल्ल्याचा उपयोग तुरूंगासाठी करण्याचा विचार होता. ४ मार्च १८१८ मध्ये कर्नल प्रॉथरने हा किल्ला जिंकून इंग्रजांच्या ताब्यात आणला आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी मराठे लोहगड सोडून निघून गेले. भाजे गावातून गायमुख खिंडीमार्गे विसापूर किल्ल्यावर अथवा लोहगडला जाण्यास दोन तास लागतात.

विसापुर