विशाळगड हा किल्ला कोल्हापूरच्या वायव्येस ७५ कि.मी. अंतरावर वसलेला आहे. सह्याद्री पर्वतरांग आणि कोकण यांच्या सीमेवर तसेच आंबा घाट आणि अनुस्कुरा घाट यांना वेगळ्या करणाऱ्या डोंगरावर किल्ले विशाळगड उभा आहे. घाटमाथा आणि कोकण यांच्या सीमेवर असणा-या या गडाने नेहमीच पहारेक-यांची भूमिका बजावली. विशाळगडाची उभारणी इ.स.१०५८ मध्ये शिलाहार राजा मारसिंह याने केली तर काही इतिहासकारांच्या मते शिलाहार राजा भोज दुसरा याने ह्या किल्ल्याचे बांधकाम केले. कोल्हापूरचे शिलाहार हे या भागात अधिक प्रभावी होते. यातील वर उल्लेख केलेला दुसरा भोज प्रारंभी चालुक्यांचा सामंत होता. तो स्वतःला महामंडलेश्वर म्हणवीत असे. याचवेळी चालुक्यांची सत्ता दुबळी होत चालली होती व ती सत्ता आपल्या ताब्यात ठेवण्याची ते अखेरची धडपड करीत होते. या परिस्थितीचा फायदा घेऊन सह्याद्रीच्या शिखरावर राजा भोजने जागोजागी गड उभारले व या गडांच्या आश्रयाने आपले स्वतःचे सामर्थ्य वाढवले. चालुक्यांच्या सामंतशाहीची झूल झुगारून देऊन राजधिराजे व पश्चिम चक्रवर्ती ही बिरूदे त्याने धारण केली. विशाळगड व कोल्हापूर हा भाग रठ्ठे महारठ्ठे यांच्या ताब्यात होता. इ. स. ९७३ पर्यंत राष्ट्रकूटांची येथे सत्ता चालू होती. त्यांना जिंकून चालुक्य, नंतर शिलाहार, यादव, मराठे, पालेगार, अदिलशहा, शिवछत्रपती असे अनेक राजे व त्यांचे काल या गडाने पाहिलेत. इ.स. ११९०च्या सुमारास दुसरा राजा भोज याने आपली राजधानी कोल्हापूरहून पन्हाळ्यावर हलविली. त्यानंतर त्याने घाटमार्गाचे रक्षण करण्यासाठी अनेक किल्ले बांधले. त्यापैकी एक किल्ला होता, किशागिला. नंतर हा किल्ला यादवांच्या हाती गेला. यादवांचा अस्त झाल्यावर दक्षिणेत बहामनींची सत्ता उदयाला आली. इ.स. १४५३ मध्ये बहामनी सेनापती मलिक उतुजार किल्ले घेण्यासाठी कोकणात उतरला. त्याने शिर्क्यांचा प्रचितगड ताब्यात घेतला व शिर्क्यांना धर्मांतराची अट घातली. पण शिर्क्यांनी मलिक उतुजारला उलट अट घातली की प्रथम माझा शत्रु खेळणा किल्ल्याचा शंकरराव मोरे याला प्रथम मुसलमान करा नंतरच मी मुसलमान होऊन सुलतानाची चाकरी करीन. एवढेच सांगून शिर्के थांबले नाहीत तर त्यांनी खेळणा किल्ल्यापर्यंतची वाट दाखवण्याचे वचन दिले. या अमिषाला भुललेल्या मलिक उत्तुजारने शिर्क्यांच्या सल्ल्याप्रमाणे जाण्याचे ठरविले पण प्रारंभीच काही दक्षिणी व हबशी सैनिकांनी पहाडी जंगलात शिरण्याचे नाकारले. उरलेल्या फौजेला घेऊन मलिक सह्याद्रीच्या अंतरंगात शिरला. वचन दिल्याप्रमाणे शिर्क्यांनी पहिले दोन दिवस रुंद व चांगल्या वाटेने सैन्याला नेले. तिसऱ्या दिवशी मात्र शिर्क्यांनी त्यांना घनदाट अरण्यात नेले. मैदानी मुलुखात आयुष्य गेलेल्या मुसलमान सैनिकांची सह्याद्रीच्या वाटांनी दमछाक केली. या सैन्याला शिर्क्यांनी अशा ठिकाणी आणले की तिथे तिनही बाजूंनी उत्तुंग डोंगर व चौथ्या बाजूस खाडी होती. तेथून पुढे जाण्यास मार्ग नव्हता व परत फिरण्यासाठी पुन्हा ती खडतर परतीची वाट कापण्याचे सैन्यात त्राण नव्हते. त्यातच मलिक उत्तुजार आजारी पडून त्यास रक्ताची हगवण लागली. त्यामुळे त्याला सैन्याला हुकूमही देता येईना. अशा परिस्थितीत सैन्य असतांना शिर्क्यांनी खेळण्याच्या मोऱ्याशी संधान बांधले व मलिकच्या सैन्यावर अचानक छापा घातला. त्यावेळी झालेल्या कत्तलीत मलिक उत्तुजारसह सर्व लोक मारले गेले. या प्रसंगाचे फेरिस्ताने केलेले तपशिलवार वर्णन------बहमनी सुलतान अल्लाउद्दिन अहमदशहा इ.स.सन १४३५ साली गादीवर आला. अहमदशहा याने १ सप्टेंबर १४३६ रोजी मुख्य वजीर दिलावर खान याला संगमेश्वरच्या मोहिमेवर पाठवले. रायरीचा अधिपती शिर्के यांच्याशी थोड्याफार चकमकी आणि वाटाघाटी नंतर दिलावरखानाने मोहिम आटोपती घेतली. त्याने त्या बदल्यात रायरीच्या शिर्के व जावळीच्या मो-यांकडुन अगणित संपत्ती व संगमेश्वर अधिपतीची कन्या घेतली. ही अगणित संपत्ती व मो-यांची कन्या त्याने अल्लाउद्दीन अहमदशहा याला अर्पण केली. मो-यांच्या त्या कन्येशी सुलतानाने विवाह केला व तिचे नाव ‘जेब-चेहरा’अथवा परी चेहरा ठेवले. अल्लाउद्दिन अहमद्शहा याचा आधी एक विवाह खानदेशच्या फारुखी घराण्यातील मलीक नासीरखान याची कन्या ‘आगा जैनब हिच्याशी इ.स. १४२९ साली झाला होता. संगमेश्वरच्या मो-यांची कन्या अल्लाउद्दिन अहमदशहाच्या महालात आल्यावर आगा जैनब हिने आपल्या बापाकडे म्हणजे मलिक नासीरखानाकडे अल्लाउद्दिन अहमदशहा विरुद्ध तक्रार केली. मुलीची तक्रार ऐकुन नासीरखानाने आपल्या जावयाच्या राज्यावर आक्रमण केले. हे कळताच अहमदशहाने आपल सरदार मलिक उत्तुज्जार याला प्रतिकारार्थ पाठवले. मलिक उत्तुज्जार याने नासीर खानाचा पराभव करुन ७० हत्ती व अगणित संपत्ती लळिंग या नासीरखानाच्या राज्यातुन हस्तगत केली. या सर्व घटना फेरिश्ता या फारसी इतिहासकाराने त्याच्या बुरहाने मसीर या ग्रंथात नोंदवुन ठेवल्या आहेत. फेरिश्ताच्या कथनानुसार दिलावर खानाची कोकणातील मोहिम जरी यशस्वी झाली असली तरी त्या प्रांतातल्या कटकटी संपल्या नव्हत्या. सन १४४७ मध्ये खलफ हसन मलीक उत तुज्जार याला कोकणच्या मोहीमेवर अल्लाउद्दिन बहमनीने रवाना केले. त्याने चाकण येथे आपली छावणी केली होती. तो चाकण येथुन मावळांत शिरुन कोकणात उतरला. कोकणचा संकिसर (संगमेश्वर) त्याने जिंकुन घेण्याचा मनसुबा केला. कोकणच्या किनारपट्टीवरील संकिसरचा किल्ला अतिशय मजबुत समजला जाई. किल्ल्याच्या आजुबाजुला घनदाट वने व असंख्य अशा खिंडी होत्या. किल्ल्याच्या आश्रयाने अनेक काफर हिंदु राहत असत. ते किल्ल्याची मजबुती आणि परीसरातील भौगोलिक परिस्थिती आणि वातावरण यांचा फायदा घेवुन जलमार्गाने व खुश्किच्या मार्गाने प्रवास करणा-या मुस्लिम यात्रेकरुना लुटत असत ह्या मोहिमेचे वर्णन करताना फेरीस्ता म्हणतो – किल्ले खेळणा किल्ला जिंकुन घेण्याच्या उद्देशाने मलिक उत तुज्जार याने कोकणची स्वारी केली. कोकणात उतरल्यावर वाटेतील शिर्के नावाच्या काफराच्या ताब्यातील किल्ल्याला त्याने वेढा दिला आणि तो किल्ला त्याने जिंकुन घेतला. शिर्क्यांच्या ताब्यातील हा किल्ला म्हणजे किल्ले रायरी व शिवकाळातील शिवरायांची राजधानी दुर्गराज रायगड. फेरिश्ता पुढे लिहितो कि त्या (शिवी) शिर्क्याला त्याने कैद केले. त्याला खलफ हसनने सांगीतले कि, एक तर मुसलमानी धर्माचा स्वीकार तरी कर नाहीतर तुला ठार मारणे मला भाग पडेल.ह्यावर त्या लबाड काफराने मोठ्या नम्रतेचा आव आणुन मलिक उत तुज्जार ह्याला सांगीले कि माझ्यामध्ये आणि किल्ले खेळण्याच्या शंकरराय मोरे ह्याच्यामध्ये वंशपरंपरागत वैर आहे. शंकररायाच्या अमलाखाली किल्ले खेळण्याचा आसमंत आहे. मी जर इस्लाम धर्म स्विकारला आणि माझा शत्रु शंकरराय हा हिंदु राहुन आपली सत्ता उपभोगत राहीला तर तुम्ही ह्या प्रदेशातुन माघारी गेल्यावर धर्मांतराच्या कारणावरुन शंकरराय माझी ह्या भागात तिरस्कारपुर्वक अवहेलना करील आणि माझे बिरादरीचे लोक आणि माझी प्रजा कदाचीत बंडास प्रवृत्त होईल. ह्याचा परीणाम असा होईल कि माझ्या वाडवडिलांपासुन ताब्यात असलेला प्रदेश माझ्या हातातुन जाईल. आत्ता मी मुसलमान धर्म स्विकारण्याची कबुली आपणास दिलेलीच आहे. ह्यापुढे ह्या प्रदेशात हिंदुधर्मियांचे संरक्षण करणे आणि मुर्तीपुजकांची मिजास चालु देणे म्हणजे मला अपमानास्पद आहे. म्हणुन माझा प्रतिस्पर्धी शंकरराय ह्याला आपण प्रथम वठणीवर आणा आणि त्याच्या ताब्यातील प्रदेश माझ्या स्वाधीन करा. माझ्या सहाय्याने हि गोष्ट साध्य करणे तुम्हाला कठीण नाही. आपण जर असे केलेत तर ख-या धर्माच्या तत्वांचा मी स्विकार केला आहे असे मी जाहीर करेन. सुलतानांच्या सेवकांमध्ये मीही सामील होइन. सुलतानाच्या खजिन्यात प्रतीवर्षी मी खंडणी भरेन. ह्या भागातील जे वतनदार सुलतानाशी बेइमानीने वागतील त्यांना मी वठणीवर आणीन. मी सुलतानाचा निष्ठावंत पाईक होईन. ह्यावर मलीक उत तुज्जारने शंकीत होऊन विचारले कि माझ्या असे कानावर असे आले आहे कि शंकररायाच्या खेळण्याचा मार्ग घनदाट जंगलाचा आहे. ह्यावर शिर्के म्हणाला कि मी ह्या भागाचा माहीतगार आहे मी ह्या घनदाट अरण्यातुन मार्ग दाखवण्यासाठी सातत्याने आघाडीवर राहीन. माझ्यासारखा कर्तबगार आणि विश्वासु असताना मार्ग शोधण्यासाठी येणाऱ्या अडचणी आणि जंगलात होणारी चुकामुक आणि त्यामुळे होणारे हाल आपल्या वाट्यास येणार नाहीत. तुमच्या फौजेला मी अशा मार्गाने खेळण्याच्या पायथ्यासी घेऊन जाईन कि तुम्हाला कोणत्याही प्रकारचा उपद्रव होणार नाही. आणि विनासायास खेळणा किल्ला जिंकण्याची तुमची मनीषा आपोआप पुर्ण होईल. मलिक उत तुज्जार ह्याला शिर्के ह्याच्या कौटिल्यनीतीची सुतराम कल्पना आली नाही. त्याचा उत्साह आणि निष्ठा ह्याची मलिक उत तुज्जारने प्रशंसा केली शिर्के ह्याच्या वचनावर विसंबुन मलिक उत तुज्जारने हिजरी ८५७ ( सन १४५३) मध्ये खेळण्याची मोहीम हाती घेतली. फेरिश्ता पुढे लिहितो कि त्या (शिवी) काफराच्या गोड बोलण्यावर खलफ हसन फसला. त्याने आपल्या हरोळीच्या पथकाबरोबर मार्गदर्शक म्हणुन शिर्के ह्यांना घेतले आणि संगमेश्वर किल्ल्याच्या रोखाने मार्ग आक्रमण करण्यास सुरुवात केली. खलफ हसनच्या फौजी अधिकाऱ्यांनी ह्या घनदाट अरण्यातील मार्गाने शाही फौजेने जाण्याचा धोका खलफ हसनच्या नजरेस आणुन दिला. विजयोन्माद चढलेल्या खलफ हसनने त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष्य केले. त्याच्या दैवानेच त्याला तो निर्णय घेऊ दिला होता. शिर्के ह्याच्या गोड बोलण्याने भारावलेल्या खलफ हसनच्या हातुन फौजेच्या बंदोबस्तास आवश्यक असणा-या गोष्टीत चुका घडु लागल्या. त्याच्या फौजी सल्लागारांनी दिलेल्या सल्ल्यांचा त्याच्या मनावर काहीही परिणाम होत नव्ह्ता. अखेर त्या (शिवी) आणि काळतोंड्या काफराने त्यांना अशा मार्गावर आणले की जेथे सह्यगीरीचा भयंकर उभा चढ आणि जीव धास्तावणारा उतार ह्याखेरीज पुढे जाण्यास पर्याय नव्हता. रस्ता तर इतका कठीण होता कि आसमंतातील मराठ्यांशिवाय त्या मार्गावर प्रत्यक्ष सैतानाचीही दैन्यावस्था झाली असती. कसेबसे मार्ग आक्रमीत ते एका ठिकाणी येऊन पोहोचले. त्या भागाभोवताली गगनाला गवसणी घालणा-या उत्तुंग पर्वतरांगानी आपली मस्तकरुपी शिखरे उंचावली होती. तर दुस-या बाजुस पृथ्वीचा भेद करणा-या पातळाचा वेध घेणा-या असुर्यस्पर्श अशा अतिशय खोल द-या होत्या. त्या डोंगरधारा आणि त्यांचा उतार घनदाट वृक्षवेलींनी अच्छादलेला होता. घनदाट वृक्षांच्या बुंध्यातुन आणि त्यांना वेढणा-या वेलींच्या जाळ्यामुळे मार्ग काढणे कठीण जात होते. त्या जागेच्या एका बाजुला तो प्रदेश वेढुन टाकणारी खाडी होती. अशा भयानक जागी जवळ जवळ ते तीस चाळीस हजार पायदळ व घोडदळ युद्धाच्या तयारीने जमा झाले होते. ह्या परीस्थीतीत आणखी एक दुर्घटना घडली. खल्फ हसन याला रक्ताची हगवन लागली. त्याला जडलेल्या या असाध्य आजारांमुळे त्याला पुढे कुच करता येईना. प्रकृती अस्वास्थ्यामुळे सैन्यास तो हुकुम देण्यास व सैन्यात शिस्त राखण्यास असमर्थ ठरला. सैन्यातले लोक दिवसभर प्रवास करुन थकुन विसावा घेण्यास जागा मिळेल तेथे पडत. कारण जवळ जवळ तंबु ठोकता येतील अशी मोकळी जागा तेथे सापडत नव्हती. ह्याप्रमाणे थकुन भागुन मुसलमानी फौज विश्रांती घेत पडले असता एक दिवसी विश्वासघातकी शिर्का शंकररायाकडे गेला. कोकणावर आक्रमण करण्यास आलेल्या सर्व बहमनी फौजेस मी असहाय्य गलितगात्र अवस्थेत तुझ्या जबड्यात आणुन सोडले आहे. शंकरराय मोठी फौज घेऊन निघाला. आपणावर एकाएकी कोणीकडुन हल्ला होईल ह्याची बहमनी फौजेस बिलकुल धास्ती नव्हती. सा-या दिवसाच्या श्रमाने ते श्रांत होते. अस्या ह्या पराधीन व दुर्बल अवस्थेत खेळण्याच्या शंकरराय मोरे ह्याच्या फौजेने तुंबळ रण माजवुन सात हजार मुसलमान सैन्य कापुन काढले. त्यावेळी जोराचा वारा सुटलेला असल्यामुळे मुसलमानी सैन्याच्या किंकाळ्या देखिल एकमेकांस ऐकु आल्या नाहीत. मदीना, करबला, नजफ येथील मोठमोठ्या पाचशे सय्यदांसह खुद्द मलिक उत तुज्जार ह्या लढाईत मारला गेला. त्याबरोबर जे दक्षीणी व हबसी कामगार आपल्या दोन हजार लोकासह बरोबर होते त्यांची देखिल हीच अवस्था झाली. उजाडण्यापुर्वीच त्या रणयज्ञात शेवटची आहुती देऊन त्या अरण्यातुन शंकरराय मोरे आपल्या लोकांसह वर्तमान माघारे किल्ले खेळण्यावर निघोन गेला. हे झाले फेरीश्ता याचे निवेदन. सन १५७० ते १६११ ह्या अवधीत निजामशहा व आदिलशहाच्या पदरी होता. सबब या वर्णनात अतिशयोक्ती व आरोप निश्चितच मराठ्यांच्या विरोधात आहेत. इतर इतिहासकार व फेरिश्ता याच्या निवेदनात एक मुलभुत फरक असा कि इतर इतिहासकार सांगतात कि किल्ले खेळण्याच्या पायथ्याशी झालेल्या या युद्धात रायरीचा शंकरराय शिर्के यांचाही हात होता. खेळण्याच्या शंकरराय मोरे यांनी मलिक उत तुजारची आघाडी कापुन काढली तर रायरीच्या शंकरराय शिर्के यांनी शत्रुसैन्याची पिछाडी मारली. परकीय आक्रमकांच्या विरोधात दोन मराठा घराण्यांनी एकत्र येऊन दिलेला हा लढा हिंदु इतिहासात एकमेवाद्वितीयच. काही मुस्लिमधार्जीण्या इतिहासकारांच्या मते किल्ले खेळण्याच्या पायथ्याचा हा रणसंग्राम म्हणजे विश्वासघात आहे. त्यांना जे वाटेल ते वाटो आम्हाला किल्ले खेळण्याच्या आसमंतात झालेल्या या दुस-या धर्मयुद्धाचा अभिमान आहे. हो दुसरे धर्मयुद्ध ! कारण याच किल्ले खेळण्यावर द्वापार युगात श्रीकृष्णाने मौर्य कुलोत्पन्न मुचकुंद ऋषींच्या हातुन परकिय आक्रमक कालयवन ठार मारला होता आणि त्याच मुचकुंद ऋषींचा वंशज असलेल्या खेळण्याच्या शंकरराय मो-यानी यवन असलेल्या मलिक उत तुजारची आहुती रणयज्ञात दिली. खलफ हसन मलिक उत तुज्जार याचा गनिमी काव्याच्या सहाय्याने धुव्वा उडवणा-या किल्ले खेळण्याच्या शंकरराय मोरे आणि किल्ले रायरीच्या शंकरराय शिर्के यांना आमचा मानाचा मुजरा. १४६९ साली बहामनी सुलतानाने बब्कीरे त्याचा सेनापती मलिक रेहान याला खेळणा किल्ला घेण्यासाठी पाठविले. सहावेळा प्रयत्न करुनही त्याला हा किल्ला घेता आला नाही. सातव्या प्रयत्नात ९ महिन्याच्या निकराच्या प्रयत्नाने त्याला हा किल्ला घेता आला. या मलिक रेहानच्या नावाचा दर्गा या किल्ल्यावर आहे. त्यातील फारशी शिलालेखात वरील उल्लेख आढळतो. यानंतर जवळजवळ पावणेदोनशे वर्ष हा किल्ला बहामनी आदिलशाही या मुस्लीम सत्तांकडे होता. २८ नोव्हेंबर १६५९ रोजी शिवाजी महाराजांनी पन्हाळा घेतला. त्याच वेळेस खेळणा किल्ला जिंकून घेतला व त्याचे नाव विशाळगड ठेवले. या गडाच्या टेकडीवरील दगडात पाण्याचे सहा कोरीव टाके व चार गुहा आहेत. त्यातील एका गुहेत विशाल देवी असून त्यावरूनही गडाला विशालगड असे नाव दिले गेले असे काही मंडळींचे मत आहे. ३ मार्च १६६० ला सिद्दी जौहारने पन्हाळ्याला वेढा घातला. त्याचवेळी जसवंतराव दळवी व शृंगारपूरचे सूर्यराव सूर्वे विशाळगडाला वेढा घालून बसले होते. १३ जुलै १६६० रोजी कडाक्याच्या पावसात पन्हाळ्याच्या वेढ्यातून बाहेर पडून विशाळगडाकडे जाताना महाराजांनी हा वेढा फोडून काढला व महाराज विशाळगडावर सुखरुप पोहोचले. त्याआधी पावनखिंडीत ३०० निवडक मावळ्यांसह बाजीप्रभूनीं सिद्दीचे सैन्य रोखून धरले व आपल्या प्राणांची आहूती दिली. शिवरायांनी विशाळगडाच्या मजबूतीकरीता ५००० होन खर्च केल्याचा उल्लेख आहे. शिवाजी महाराजानंतर छत्रपती संभाजी राजांनी खूप वेळा विशाळगडाला भेटी दिल्या. वास्तव्य केले आणि या गडाची डागडुजीही करून घेतली. १६८६ मध्ये शिर्क्यांचे बंड मोडून काढण्यासाठी संभाजी महाराजांनी कविकलशांना पाठविले परंतू पराभूत होऊन त्याने विशाळगडाचा आसरा घेतला. इ.स. १६८९ मध्ये संभाजी महाराज विशाळगडावरुन रायगडाकडे जातांना संगमेश्वर येथे तुळापूरी पकडले गेले व त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर राजाराम महाराजांच्या काळात विशाळगड मराठ्यांच्या हालचालींचे प्रमुख केंद्र होता. रामचंद्रपंत अमात्यांनी विशाळगडास आपले मुख्य ठिकाण केल्यामुळे त्यास राजधानीचा दर्जा प्राप्त झाला. १७०१ साली राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या तृतीय पत्नी अंबिकाबाई विशाळगडावर सती गेल्या. डिसेंबर १७०१ मध्ये औरंगजेब स्वत: मोठ्या फौजेनिशी विशाळगड घेण्यासाठी आला. पण विशाळगडाचे किल्लेदार परशुराम पंतप्रतिनिधी यांनी तब्बल सहा महिने किल्ला लढवून ६ जून १७०२ रोजी अभयदान व स्वराज्य कार्यासाठी २ लाख रुपये घेऊन किल्ल्याचा ताबा औरंगजेबाला दिला. त्याने विशाळगडाचे नाव बदलून सरवरलना असे ठेवले. विशाळगड जिंकून पन्हाळ्याला परत जातांना औरंगजेबाच्या सैन्याला सह्याद्रीने झूंजवले. तब्बल ३७ दिवसांनी पन्हाळ्याला पोहोचेपर्यंत मुघल सैन्याचे अपरिमित हाल व नुकसान झाले. त्याची वर्णने मुघल इतिहासकारांनी लिहिलेली आहेत. इ.स. १७०७ मध्ये ताराराणीने विशाळगड पुन्हा जिंकून घेतला. पुढे विशाळगड करवीरकरांच्या ताब्यात गेला. त्यांनी तो पंतप्रतिनीधींना दिला. कोल्हापूरच्या छत्रपतींचे पंतप्रधान पंतप्रतिनिधी हे विशाळगड येथे रहात होते व ते विशाळगडचे जहागीरदार होते. त्यानंतर ते मलकापूर येथे राहावयास गेले. १८४४ साली इंग्रजांनी विशाळगड जिंकून त्यावरील बांधकामे पाडून टाकली. शिवकालीन इतिहासामधे विशाळगडाला महत्त्वाचे स्थान मिळालेले आहे. इतिहासामधे विशाळगड, खेळणा, खिलगिला, खिलकिला, सक्करलाना अशी वेगवेगळी नावे या किल्ल्याला मिळालेली आहेत. देश आणि कोकण यांना जोडणाऱ्या आंबा घाटाजवळ असलेला विशाळगड सह्रयाद्रीच्या मुख्य रांगेला लागूनच आहे. शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर येथुन गजापूर मार्गे थेट विशाळगड्याच्या पायथ्यापर्यंत खाजगी वाहनाने जाता येथे अथवा आंबा येथून विशाळगडावर जाण्यासाठी वेगळा घाट रस्ता आहे. कोल्हापूरामधून या मार्गे कर्नाटक परीवहन मंडळाच्या दिवसातून चार बसेस विशाळगडा पर्यंत जातात. मलकापुरातून गजापूरमार्गे देखील एस.टी.मंडळाच्या काही बसेस विशाळगडावर जातात. विशाळगड समुद्र सपाटीपासून ३३०० फुट उंचीवर वसला आहे. माथ्याचा परीसर १ किमी लांबी व ३५० मीटर रुंदी इतका असुन ह्या गडावर जायला आंबे घाट किंवा कोकणातून चिरबेट मार्गे काळ दरवाजा असे दोन मार्ग आहेत. विशाळगडा समोरील वाहने थांबणाऱ्या ठिकाणापासुन दिसणारा मुंढा दरवाजा हा गडावर जाण्याचा पूर्वीचा मूळ मार्ग पण आता मात्र वेगळा मार्ग आहे. वहानतळावर उतरल्यावर, वहानतळ व विशाळगड मध्ये एक दरी दिसते. पूर्वी या दरीत उतरुनच विशाळगडावर जावे लागत असे. परंतू आता या दरीवर लोखंडी पूल बांधलेला आहे. या पूलावरुन विशाळगडाच्या पायथ्याशी पोहोचल्यावर दोन वाटा दिसतात. समोरची खड्या चढणीची शिडीची वाट तर उजव्या बाजूची पायऱ्याची फिरुन जाणारी कमी चढणीची वाट. आपण वर जाताना शिडीच्या वाटेने जाऊन उतरताना पायऱ्याच्या वाटेने उतरावे म्हणजे किल्ल्यावरील सर्व ठिकाणे पाहून होतात. शिडीने चढताना ढासळलेला बुरूज दिसतात. शिडीच्या वाटेने चढल्यावर दर्ग्याच्या अलीकडे डाव्या हाताला एक पायऱ्याची वाट खाली उतरते. या वाटेने गेल्यावर दोन रस्ते फुटतात. उजव्या बाजूची नव्या पायऱ्याची वाट भगवंतेश्वर मंदिर, राजवाडा, टकमक टोक येथे जाते. तर डाव्या हाताची जूनी फरसबंदी वाट अमृतेश्वर मंदिर व बाजीप्रभुंची समाधी येथे जाते. आपण डाव्या बाजूच्या वाटेने गेल्यावर ५ मिनिटातच अमृतेश्वर मंदिरापाशी पोहोचतो. अमृतेश्वर हे शंकराचे देवालय. अमृतराव प्रतिनिधी यांनी इ. स. १७५१ ते १७६२ मध्ये बांधले. देवालयासमोर पाण्याची छोटी कुंडे आहेत. मंदिरा समोरील कड्यावरुन पडणारे पाणी कुंड बांधून अडवलेले आहे. मंदिरात पंचाननाची मुर्ती आहे. मंदिरावरुन तसेच पुढे जाऊन पाताळदरीत खाली उतरावे. या ठिकाणी एक ओढा आहे. या ओढ्याच्या पलिकडे उघड्यावर नवीन सर्व्हे नं. ८ मध्ये बाजीप्रभू देशपांडे यांची समाधी असून जवळच त्यांचे बंधू फुलाजी यांचे वृंदावन आहे. या समाध्या पाहून उजव्या बाजूच्या टेकडीवर असलेले हनुमान मंदिर पाहावे. मंदिर पाहून पून्हा दर्ग्यापाशी दोन रस्ते फुटतात त्या ठिकाणी यावे. तेथून उजव्या बाजूच्या सिमेंटने बांधलेल्या पायऱ्याच्या वाटेने ५ मिनिटात आपण भगवंतेश्वर मंदिरापाशी येतो. या ठिकाणी भगवंतेश्वर मंदिर, विठ्ठलाचे मंदिर व नविन बांधलेले गणपतीचे मंदिर अशी तीन मंदिरे आहेत. मंदिरासमोर चौकोनी पाण्याची विहिर आहे. श्री हर्डिकर हे मंदिराची देखभाल पाहातात. त्यांचे घर मंदिराच्या बाजूस आहे. या मंदिरात रहाण्याची व्यवस्था होऊ शकते. भगवंतेश्वर मंदिरातील कासव पाहाण्यासारखे आहे. या कासवापुढील देव्हाऱ्याकडील पायरीवर मोडी लिपीमध्ये शिलालेख कोरलेला आहे. त्यावरील ‘आबाजी जाधव शके १७०१ विशाळगड ही अक्षरे वाचता येतात. मंदिरात ब्रम्हदेवाची मुर्ती आहे. प्रदक्षिणा मार्गावर भिंतीत दिवे लावण्यासाठी केलेले कोनाडे आहेत. विठ्ठल मंदिराच्या लाकडी दरवाजावर व महिरीपीवर केलेले कोरीव काम पाहाण्यासारखे आहे. मंदिर पाहून जवळच असलेल्या पंतप्रतिनिधींच्या वाड्याकडे जाताना वाटेत एक मोठी चौकोनी पायऱ्याची विहिर लागते. राजवाड्याचे प्रवेशद्वार उध्वस्त झालेले आहे. प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूच्या भिंतीत एक छोटेसे भूयार आहे. या भूयारातून (उंची ३ फूट) रांगत जाता येते. भूयाराचे दुसरे तोंड चौकोनी विहिरी जवळ आहे. राजवाड्याची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे. राजवाड्याच्या दक्षिण दिशेला असलेल्या दरवाजातून बाहेर पडल्यावर समोरच एक मोठी गोल विहिर आहे. विहिरीत उतरण्यासाठी कमान असलेला दिंडी दरवाजासारखा छोटा दरवाजा आहे. या विहिरीत महादेवाचे मंदिर आहे. राजवाड्याच्या मागच्या बाजूस एक कोरडी विहिर आहे. या विहिरीवरुन पुढे चालत गेल्यावर ५ मिनिटात आपण टकमक टोकापाशी पोहोचतो. हे सर्व पाहून पुन्हा दर्ग्यापाशी यावे. दर्ग्याची इमारत जुनी असुन इ. स. १६३९ मध्ये राजापूर येथील एक धार्मिक व्यापारी कोर्डूशेठ बल्लार यांनी विशाळगड संस्थानकडे एक मोठी देणगी देऊन या जुन्या इमारतीचा जीर्णोध्दार करविला. येथे दुकानांची व हॉटेलांची गर्दी झाली आहे. त्यामुळे वाट विचारतच मुंढा दरवाजापाशी यावे. या दरवाजाचा एक बुरुज व कमान शाबूत आहे. दरवाजाच्या बाजूने एक वाट वर चढत टेकडीवर जाते त्यास रणमंडळ टेकडी म्हणतात. येथे रणमंडल नावाची एक आयताकृती वास्तु दिसते. येथेच खालच्या बाजूस एक ८ फुटी तोफ पडलेली आहे. ती पाहून पायरी वाटेने गड उतरण्यास सुरुवात करावी. वाटेत एका चौथऱ्यावर दगडात कोरलेली दोन पावले दिसतात, ती राजाराम महाराजांची तृतीय पत्नी अंबिकाबाई यांची समाधी आहे. गडावर भुपाल तळे, अर्धचंद्र तळे, गौरी तळे व पासल तळे पाण्याची सोय करतात. गौरी टाक्याशेजारी एक तुळशी वृंदावन आहे. त्याला सतीचे वृंदावन म्हणतात. राजाराम महाराजांची तृतीय पत्नी अंबिकाबाई ही राजारामच्या मृत्यूनंतर इथे सती गेली होती. उत्तरेकडे एक दारुकोठार आहे. याशिवाय गडावर घोड्याच्या टापा, मुचकुंदाच्या गुहा, सती, तास टेकडी इत्यादी ठिकाणे पाहाण्यासारखी आहेत. विशाळगड आणि त्याचा परिसर मुक्तपणे पहाण्यासाठी पुर्ण दिवसाचा वेळ हाताशी असायला हवा. येथे जेवणाची तसेच रहाण्याचीही व्यवस्था होऊ शकते. अनेक महत्त्वाच्या ऐतिहासिक प्रसंगांचा साक्षी असलेला आणि राजधानीचा दर्जा लाभलेल्या या किल्ल्याची आजची अवस्था मात्र उद्वीग्न करणारी आहे. मलिक रेहानच्या दर्ग्याला येणार्या हिंदू मुस्लिम भक्तांनी या परिसराचा उकीरडा केलेला आहे.

विशाळगड

जिल्हा - कोल्हापूर   
श्रेणी  - मध्यम   
दुर्गप्रकार - गिरीदुर्ग