नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुका हा भाग पुर्वी बागलाण म्हणून ओळखला जात असे. आजही अनेकजण याचा उल्लेख बागलाण असाच करतात. याच सटाणा तालुक्यात अजमेरा हा तसा अपरिचित किल्ला. समुद्रसपाटीपासून या किल्ल्याची उंची २७०० फुट तर पायथ्यापासुन साधारण १००० फुट आहे. सटाणा शहराजवळ २१ कि.मी.च्या परिघात कऱ्हागड, बिष्टा, दुन्धा व अजमेरा हे चार टेहळणीचे किल्ले आहेत. दुंधेश्वर डोंगररांगेवर असलेल्या या चार किल्ल्यांचा वापर चौकीचे किल्ले म्हणून केला गेला. खाजगी वहानाने दोन दिवसात कऱ्हा, बिष्टा, अजमेरा, दुंधा हे चार किल्ले आणि देवळाणे गावातील जोगेश्वर मंदिर व्यवस्थित पाहाता येते. सटाणा पासून ८ कि.मी.वर किल्ल्याच्या पायथ्याचे अजमेर सौंदाणे हे गाव आहे. अजमेर सौंदाणे गावातून रस्ता पहाडेश्वर मंदिराकडे जातो. हे अंतर ४ किमी आहे. पहाडेश्वर मंदिर हा अजमेरा किल्ल्याचा पायथा आहे. पहाडेश्वर मंदिर व त्याच्या आजूबाजूचा प्रदेश अतिशय सुंदर आहे. पहाडेश्वराचे दर्शन घेऊन व गडावर पाण्याची सोय नसल्याने येथुन पाणी घेऊनच गडाकडे निघावे. शक्य झाल्यास अजमेरा किल्ला गाईड घेऊनच पाहावा कारण गडावर जाण्यास ठळक अशी वाट नाही. पहाडेश्वर मंदिराला लागुन असलेल्या डोंगर सोंडेवरूनच किल्ल्यावर जाणारी वाट सुरू होते. या वाटेवर दोन ठिकाणी मुरुमाचा घसारा आहे. या वाटेने अर्ध्या तासात आपण माचीसारख्या टप्प्यावर पोहोचतो. येथे वाटेतच एका दगडावर कोरलेले शिवलिंग आहे. समोर एक डोंगर असुन त्याच्या अर्ध्या उंचीवरील गुहेत आदिवासींचा डोंगरदेव आहे. हि वाट पुढे जाताना दिसते पण या वाटेने न जाता डोंगराच्या वरील बाजुस देखील एक पायवाट दिसते त्या वाटेकडे वळावे. डाव्या बाजूला अजमेरा किल्ल्याचा डोंगर आणि उजव्या बाजूला डोंगरदेवाचा डोंगर ठेउन हि पायवाट वरवर जात रहाते. या वाटेने साधारण अर्ध्या ते पाऊण तासात आपण किल्ल्याच्या उध्वस्त दरवाजापाशी पोहोचतो. गडाचा दरवाजा आजमितीस अस्तित्वात नसुन या ठिकाणी उजव्या बाजूला उध्वस्त गोल बुरुजाचे आणि तटबंदीचे अवशेष पाहायला मिळतात. येथुन गडप्रवेश करून थोडे पुढे गेल्यावर गडाचा आटोपशीर गडमाथा नजरेस पडतो. प्रवेश केला त्याच्या समोरच टोकाला उंचावर झेंडा लावलेला दिसतो. हाच झेंडा आपल्याला गडाखालुन दिसत असतो. झेंड्याच्या दिशेने चालायला सुरुवात केल्यावर उजव्या बाजूला एक उंचवटा दिसतो त्या ठिकाणी एका भल्यामोठ्या वाड्याचे व सदरेचे उध्वस्त अवशेष आहेत तर डाव्या बाजूला पावसाळी तलाव आहे. या पायवाटेने पुढे गेल्यावर उजव्या बाजूला उघड्यावरच महादेवाची पिंड आणि नंदी आहे. महादेवाचे दर्शन घेऊन पुढे गेल्यावर उजव्या बाजूला दुसरा कोरडा पडलेला तलाव आहे. तलाव पाहून पुढे चालत गेल्यावर डाव्या बाजुला दोन पाण्याची टाकी दिसतात त्यातील एक टाके बुजलेले असून दुसरे टाके पाण्याने भरलेले आहे पण पाणी मात्र पिण्यायोग्य नाही. टाके पाहून गडाच्या टोकावरील उंचवट्यावर असलेल्या झेंड्यापाशी पोहोचावे. येथे आपली गडफेरी पुर्ण होते. अजमेरा गडाचा गडमाथा लहान असल्याने गड पाहाण्यासाठी अर्धा तास पुरतो पण पायथ्यापासुन गडावर येण्यास दिड तास लागतो. माथ्यावरुन साल्हेर, सालोटा, मुल्हेर, मोरागड, रतनगड, तांबोळ्या, मांगी-तुंगीचे सुळके, बिष्ठा, डेरमाळ, पिसोळ, कऱ्हा तसेच दुंधागड दिसतात. या किल्ल्यांचा आकार व रचना पाहाता यावर फारच थोडी शिबंदी रहात असावी असे वाटते. हा किल्ल्याचा डोंगर सुटा उभा असल्यामुळे या किल्ल्यावरुन आजूबाजूचा विस्तृत प्रदेश दिसतो त्यामुळे या किल्ल्यांचा उपयोग टेहाळणीसाठी करण्यात आला असावा. किल्ल्यांबद्दल इतिहास धुंडाळला असता फारशी माहिती मिळत नाही. १९८५ साली नाशिकला वैनतेय गिर्यारोहण – गिरिभ्रमण या संस्थेने केलेल्या भ्रमंती आणि कागदपत्रांच्या आधारे अशा बऱ्याचश्या किल्ल्यांची माहिती लोकांसमोर आणली व एका शोध मोहिमेत अजमेरा गडाचे स्थान निश्चित केले. अजमेर गडापासून पाच कि.मी. अंतरावरील देवळाणे गावात प्राचीन असे शिवमंदिर असुन हे मंदिर व या शिवमंदिरावरील शिल्पे प्रेक्षणीय आहेत. --------------------सुरेश निंबाळकर

अजमेरा किल्ला

जिल्हा - नाशिक 
श्रेणी  - मध्यम   
दुर्गप्रकार - गिरीदुर्ग