साल्हेरजवळच्या सेलबारी-डोलबारीच्या उत्तुंग रांगा पुर्वेकडे पसरत जातात अन् मालेगावच्या उत्तरेला तुरळक पसरलेल्या गाळणा टेकड्यांच्या रुपाने भेटतात. अशाच एका विखुरलेल्या टेकडीवर कंक्राळे किल्ला उभा आहे. गाळणा गडाचा सोबती म्हणून ओळखला जाणारा कंक्राळा किल्ला नाशिक जिल्ह्यात मालेगाव तालुक्यात आहे. मालेगावहुन २० कि.मी. अंतरावर कंक्राळा गाव आहे. मालेगावहुन तेथे जाण्यास एस.टी. तसेच खाजगी गाडीची सोय आहे. स्वतःच्या खाजगी वाहनाने प्रवास करून गाळणा व कंकराळा हे दोन्ही किल्ले एका दिवसात नीटपणे पाहुन होतात. गाळणा ते कंकराळा हे अंतर करंजगव्हाण मार्गे साधारणपणे ३० कि.मी.आहे. करंजगव्हाण गावापासून १० कि.मी अंतरावर कंक्राळा हे गडपायथ्याचे गाव आहे. कंकराळे गावाकडून जाताना गडाच्या पश्चिम घळीतुन वर जायची सोपी वाट आहे तर दुसरी वाट उत्तरेकडून गरबड गावातुन थोडीशी अडचणीची आहे. कंक्राळा गावातून किल्ल्याचे सुंदर दर्शन होते. हा किल्ला समुद्रसपाटीपासून २१०० फुट व पायथ्यापासून साधारण ५०० फुट उंचीवर वसलेला आहे. स्वतःचे खाजगी वाहन असेल तर गडाच्या अगदी पायथ्या पर्यंत कच्या रस्त्याने गाडी नेता येते व ४ कि.मी.चालायचे श्रम वाचतात. पायथ्याला पाच-सहा घरांची आदिवासी वस्ती आहे. कंक्राळ्याच्या डोंगरांमुळे किल्ल्याच्या मध्ये एक खिंड झाली आहे. डोंगरमाथ्याकडे उभ्या कातळावर पांढरा चुना फासलेला दिसतो त्या दिशेने किल्ल्याकडे मोर्चा वळवायचा. गडापर्यंतचा रस्ता ठळक नसला तरी चुकत नाही. या उजाड मैदानातून कंक्राळा गडाच्या पायथ्याशी आपण पोहोचतो. वस्तीपासून खिंड गाठण्यास अर्धा तास लागतो. खिंडीत पोहोचताच एक दगडी तटबंदी असलेली भिंत आपल्या समोर येते. ही तटबंदी डावीकडच्या टेकडीवर सलग जाऊन त्याबाजूला एक गोलाकार मोठा बुरूजही दिसतो. माथ्यावर असलेल्या दोन टेकड्यांमधून खाली उतरलेली एक घळ दिसते. या घळीतून किल्ल्यावर चढायचा मार्ग आहे. या घळीतून पडलेल्या दगडांमधून नागमोडी वळणं घेत वर चढायचं. गडाचा बराचसा उतार कातळाचा असून चढाई मार्गात सिताफळ, डाळिंब आणि बरीच काटेरी झाडे आहेत. उजवीकडच्या उभ्या कातळकड्यात काही गुंफा कोरलेल्या दिसून येतात. ही पाण्याची टाकी असून त्यात बारमाही पाणी आढळतं. या टाक्यांपर्यंत जाण्यासाठी कातळातच मार्ग खोदलेला आहे. इथंच एक खुरटं असं चिंचेचं झाड दिसतं. झाडावर एक भगवा ध्वज देखील फडकत असतो. जवळच कातळाला पांढरा रंग फासलेला आहे. या ठिकाणी पीरबाबाचं ठिकाण असल्याचं गावकरी मानतात. किल्ल्याच्या उजवीकडील व डावीकडील भाग थोडा उंचावलेला असल्यानं त्यामध्ये खोलगट भाग तयार झालेला आहे. इथं दगडी तटबंदी बांधलेली आहे. इथून थोडं पुढे सरकलं की तटबंदी असलेल्या प्रवेशद्वाराचे अवशेष दिसतात. इथं उजव्या रांगेत काही पाण्याचे टाके आढळतात. काही कोरडी तर काही मातीने भरलेली. त्यानंतर एक घराचं जोतं आणि त्याच्या वरच्या बाजूला म्हणजे उजवीकडील उंचवट्यावर वाड्याचे अवशेष दिसतात. वाड्याचे अवशेष पाहून गडाच्या पुर्व बाजूने निघत गोल फिरायचं. उजव्या बाजूला वर गेल्यावर महादेवाची पिंड, सोबत नंदी आणि शेंदूर फासलेली हनुमान मुर्ती दिसून येते. महादेवाची पिंड आणि नंदी सुबक आहेत. किल्ल्यावर बहुधा शंकराचे मंदिर असावे. पुर्व बाजूकडे खाली उतरून दरीच्या काठावर जाताच समोर भल्यामोठ्या पिण्याच्या पाण्याच्या ५ टाक्या खोदलेल्या दिसुन येतात पण टाक्यांतलं पाणी पिण्यायोग्य नाही. यातल्या दोन टाक्याचे आकारमान बरेच मोठे आहे. डाव्या बाजूस गेल्यावर किल्ल्याची पडलेली तटबंदी दिसून येते. गडफेरी तशीच चालू ठेवत पुन्हा खोलगट भागाकडे म्हणजे खिंडीत परतायचं. आता डावीकडील उंचवट्याच्या भोवतालची तटबंदी बघत प्रदक्षिणा मारायची. याच्या वरच्या भागात काही जोती आढळतात. या गडावरची तटबंदी, बुरूज, पाण्याच्या टाक्यांची रांग, घरांचे अवशेष, विखुरलेली जोती असा सर्व पसारा बघून इथं पुर्वी नक्कीच चांगला राबता असणार यात शंका नाही. गडाच्या दक्षिणेला मोसम नदी व उत्तरेकडून बोरी नदी वाहताना दिसते. उत्तरेला बोरी नदीच्या पलिकडे काही अंतरावर असलेला गाळणा किल्लाही दिसतो. सर्व किल्ल्याचा फेरफटका मारण्यास एक तास पुरतो. इतिहासात कंक्राळ्याची पानं फारशी सापडत नाहीत पण इ.स. १८५८ साली जनरल पेनीनें आपणांवर हल्ला करण्याकरतां दबा धरून बसलेल्या माथेफिरू मुसलमानांचा येथें पराजय केला अशी नोंद आढळते तसेच १८६२ मध्यें हा किल्ला बहुतेक पडून गेल्याचा दाखला आहे. ---------------------------- सुरेश निंबाळकर

जिल्हा - नाशिक 
श्रेणी  - मध्यम   
दुर्गप्रकार - गिरीदुर्ग

कंकराळा