सभासद बखरीतील उल्लेखानुसार हा किल्ला शिवरायांनी वसविलेल्या १११ किल्ल्याच्या यादीत आहे पण प्राचीन काळात महिपाल नावाच्या राजाने हा गड बांधला व त्याचेच नाव गडाला मिळाले असे गावकरी सांगतात. महिपाल गडाखालील प्राचीन वैजनाथ मंदिर त्यांच्या विधानाला बळकटी देते व हा गड प्राचिन असल्याची ग्वाही देते. गडाची ऊंची समुद्रसपाटीपासून ३२२० फुट आहे. महिपालगड कोल्हापूर जिल्हयात असला तरी तिथे जाण्यासाठी बेळगाव गाठावे लागते. बेळगाव मधून शिनोळी फाट्यामार्गे पाउण तासात आपण १२ कि.मी. अंतरावरील कोल्हापूर हद्दीतील देवरवाडी या गडपायथ्याच्या गावात पोहचतो. देवरवाडीतून ३ कि.मी.वर वैजनाथ मंदिर व पुढे ३ कि.मी.वर महिपालगड वसला आहे. देवरवाडी या गावातूनच गडाच्या चढणीला सुरवात होते. अर्धा चढ चढुन आपण प्राचीन वैजनाथ व आरोग्य भवानी मंदिर परिसरात पोहचतो. वैजनाथचे मंदिर एक पुरातन तिर्थक्षेत्र म्हणुन नावाजलेले आहे. श्री गुरुचरित्राच्या १४ व्या अध्यायात या स्थानाचा उल्लेख दक्षिण महाक्षेत्र असा आला आहे. मुख्य मंदिर ११ व्या शतकातील असुन प्रवेशद्वारावर एक शिलालेख आहे. मंदिरासमोर नंदी असुन गाभाऱ्यात शिवलिंग आहे. वैजनाथ मंदिराला जोडूनच अष्टभूजा आरोग्य भवानीचे मंदिर आहे. दोन्ही मंदिरे हेमाडपंथी शैलीत असुन मंदिरातील खांब सुंदर व सुबक आहेत. मंदिराच्या मागे पाण्याचे घडीव दगडाने बांधलेले कुंड असुन या कुंडाच्या आतील भिंतीवर अनेक शिल्पे कोरलेली आहेत. वैजनाथाचे दर्शन करुन मंदिराच्या मागील डांबरी वाटेने आपल्याला महिपालगडावर जाता येते. या वाटेने जाताना डाव्या बाजूच्या डोंगरातील कातळामध्ये प्राचीन गुंफा व भुयारे आहेत. या गुहेत एकूण तिन उपगुहा असुन त्यातील समोरील गुहेत १० ते १५ फुट आत जाऊन गुहा संपते तिथे चौकोनी आकाराची खोली आहे. डावीकडच्या गुहेमधे प्रवेश केल्यावर डाव्या बाजूस आजून एक छोटी गुहा आहे. पुढे ही गुहेतील वाट समोरून दिसणा-या गुहेच्या मागच्या भागात घेऊन जाते. तिथे एक ध्यान गुंफा असुन एक शिवलिंग व त्रिशुळ तिथे आहे. गुहेची उंची ४ ते ५ फुट असून आत जाताना प्रखर विजेरी आवश्यक आहे कारण या भुयारातून पाणी भरलेले असुन आत लहान आकाराची वटवाघुळे आहेत. या गुहेतुन बाहेर पडल्यावर उजव्या बाजूच्या गुहेमधे खाली उतरत जाणा-या पाय-या असून ४० पाय-या उतरून गेल्यावर डावीकडे पाण्याची विहीर आहे. या कातळावरील पठारावर भारतीय सैन्यदलाचा नियमित युध्द सराव चालू असतो. पठाराच्या उजव्या बाजूने जाणाऱ्या डांबरी वाटेने आपण गडावरील वस्तीवर पोहचतो. हा गाडीरस्ता किल्ल्यातून गेलेला असुन गडावर वरपर्यंत गाडी जाते. गडावरील वस्ती सुरु होण्यापुर्वी आपणास उध्वस्त तटंबदी प्रवेशद्वाराचे अवशेष व शिळा दिसतात. पुढे शिवरायांचा आश्वारुढ पुतळा दिसतो व येथून पुढे गडाची मुख्य तटबंदी सुरु होते. वस्तीच्या मधून जाणाऱ्या वाटेने पुढे गेल्यावर गणेशाचे शिल्प असणारे बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार लागते. दरवाजाच्या दोन्ही बाजूस उभारलेल्या तटबंदीने हा भाग माचीपासून वेगळा केलेला आहे. दरवाजातून आत प्रवेश करताच समोरील बाजूस कातळात खोदलेली प्रचंड विहिर लागते. तिची लांबी ७० फूट व रुंदी ५० फूट आहे. टाके खोल असून वरून पाणी काढण्याच्या ठिकाणाहुन आत डोकावून पाहिले असता तळाचा अंदाज येत नाही. सामानगडावरील टाक्यासारखेच हे टाके असुन या विहिरीत उतरण्यासाठी दगडात कोरलेल्या पायऱ्या आहेत. या विहिरीमागे अंबाबाई मंदिर असुन उजव्या हाताने पुढे गेल्यावर आपल्याला अलीकडेच संवर्धन केल्याने सुस्थितीत असणारा निशाण बुरुज लागतो. त्यावर चढण्यासाठी पायऱ्या असुन बुरुजाशेजारी श्री महादेवाचे मंदिर आहे. या तटबंदीवरून सरळ पुढे गडाचे दुसऱ्या टोकावर गेल्यावर तटातून खाली उतरणारी वाट दिसते. या वाटेने पुढे गेल्यावर जांभ्या दगडात खोदून काढलेली कोठारे दिसतात. परत मागे फिरल्यावर आपणास ढासळलेला दरवाजा दिसतो पण त्याचे बुरुज मात्र ठामपणे उभे आहेत. गडावर काही घरासमोर आपल्याला ढोणी म्हणजेच इतिहास काळातील पाणी भरुन ठेवण्याची दगडी भांडी दिसतात. आल्या वाटेने परत जाताना आपल्याला अजून एक उध्वस्त बुरुज दिसतो. या बुरुजाशेजारी आपल्याला दगडात खोदलेला एक खंदक दिसून येतो. या बुरुजावरून नजर फिरविली असता गडाचा पुर्ण पसारा नजरेस पडतो व गडाची ढासळलेली तटबंदी व उध्वस्त बुरुज नजरेस पडतात. या शिवाय गडाच्या उत्तर भागात पिण्याच्या पाण्याची एक विहीर दिसून येते. गडातून बाहेर पडताना तटबंदी बारकाईने पहिली असता गडातील सांडपाणी वाहून गडाबाहेर टाकणारी पाईपची तोंडे नजरेस पडतात. महिपालगड हे पुर्ण गावच गडावर वसलेले असुन वस्तीने गड व्यापून टाकला आहे. गडावर काही बुरुज आणी तुरळक ठिकाणी तटबंदी शिल्लक आहे. तटावरच गवताच्या गंज्या, जनावराचे गोठे बांधल्यामुळे गडाची अवस्था फार बिकट झाली आहे. गड पाहाण्यासाठी अंदाजे २ तास लागतात. -------------------------सुरेश निंबाळकर

महीपालगड

जिल्हा - कोल्हापुर 
श्रेणी  - सोपी   
दुर्गप्रकार - गिरीदुर्ग