जिल्हा - बेळगाव 
श्रेणी  - सोपी   
दुर्गप्रकार - गिरीदुर्ग

बेळगाव सीमाभागात पारगड, सामानगड, वल्लभगड, राजहंसगड यासारखे गिरीदुर्ग तर बेळगावचा भुईकोट हे महत्वाचे गडकोट आहेत. शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारे हे गडकोट आजही भक्कमपणे उभे आहेत. गोव्याकडील पोर्तुगीज व कोकणातील जंजिऱ्याच्या सिद्दीला लगाम घालण्यासाठी शिवाजी महाराजांनी सीमावर्ती भागातील या किल्ल्यांचा उपयोग केला. एका गडावरून दुसरा गड नजरेस पडत असल्याने एका गडावरून दुसऱ्या गडावर संदेश देणे शक्य होत असे. या सर्व गडामध्ये येळ्ळूर गावानजीकच्या राजहंसगडाचा उल्लेख करावा लागेल. बेळगाव जिल्ह्यातील येल्लुर गावी असलेल्या या किल्ल्याला येल्लुरगड असेही म्हणतात. येल्लुर गावापासुन गड साधारण ७ कि.मी.अंतरावर आहे तर राजहंसगड हे गडाच्या पायथ्याचे गाव ५.कि.मी.वर आहे. या गावातुन गडावर चालत जाण्यास अर्धा तास लागतो. राजहंसगड गावापासून गडावर जाण्यासाठी पक्का रस्ता असल्याने गाडीने थेट गडाच्या दरवाजापर्यंत जाता येते. चिंचोळ्या आकाराचा हा गड उत्तर-दक्षिण पसरलेला असुन गडाची समुद्रसपाटीपासुन उंची २५०० फुट आहे. गडाची लांबी रुंदी ६४० x १६०फुट असुन गडाचे एकूण क्षेत्रफळ अडीच एकर आहे. वाहनतळावरून गडाकडे निघाल्यावर गडाच्या भक्कम तटबंदीसह दोन रुबाबदार ३० फुट उंचीचे बुरुज आपले स्वागत करतात. गडाचा मुख्य दरवाजा या बुरूजाआड लपला आहे. गोमुखी बांधणीच्या या दरवाजातून आपला थेट गडात प्रवेश होतो. गडाच्या दरवाजाच्या आत दोनही बाजुला पहारेकऱ्यासाठी देवड्या बांधलेल्या आहेत. दरवाजातून गडावर प्रवेश केल्यावर समोरच शिवमंदिर दिसून येते. या शिवमंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम चालु आहे. मंदिर जरी नव्याने बांधले असले तरी मंदिरातील शिवलिंग व नंदीची मुर्ती मात्र पुरातन आहेत. या शिवमंदिराच्या दोनही बाजुस दोन पुरातन घुमटी दिसुन येतात. गडाचा परिसर कमी असल्याने एका नजरेत संपुर्ण गड द्रुष्टीस पडतो. मंदिराच्या उजव्या बाजुस कातळात खोदलेले खुप मोठे व खोल कोरडे टाके नजरेस पडते. गडाचा कातळ सछीद्र असल्याने त्यात पाणी रहाणे शक्य नाही. हे टाके खोदुन यातील दगड गडाच्या बांधकामासाठी वापरला असावा. मंदिराच्या डाव्या बाजुस पाण्याचा एक खोल बांधीव हौद असुन आजही त्यात भरपुर पाणी दिसते पण हे पाणी पिण्यायोग्य नाही. याशिवाय या भागात इतरही बरेच अवशेष व एका वाड्याचा पाया दिसून येतो. गडाला एकुण तेरा बुरुज असुन असुन यातील दोन बुरुज उध्वस्त झालेले आहेत व यातुनच गाडीरस्ता गडावर आलेला आहे. गडाच्या उत्तर टोकाच्या बुरुजाखाली एका घुमटीत गडदेवतेची स्थापना केलेली दिसते. तटबंदीवरून संपुर्ण गडाला फेरी मारता येते. हि फेरी मारताना ठिकठिकाणी तटबंदीवर चढण्याकरता पायऱ्या दिसतात याशिवाय तटबंदीत एकुण पाच शौचालय व दोन कोठारे दिसून येतात. गडाला पुर्वपश्चिम असे दोन दरवाजे असुन पूर्वेला महादरवाजा तर पश्चिमेला चोरदरवाजा आहे. गेल्या काही वर्षात या गडाचा कायापालट घडविला जात आहे. गडाच्या मूळ वास्तूला कोणत्याही प्रकारचा धक्का न लावता गडावर बऱ्याच सुधारणा करण्यात आल्या. गडाच्या बुरुजांची डागडुजीही करण्यात आली आहे. गडावर येण्यासाठी पक्का मार्ग असल्याने गडावर येणाऱ्याची संख्याही जास्त आहे. गडाच्या इतिहासात डोकावले असता गडाबाबत विशेष नोंदी आढळत नाही. गडाच्या दरवाजावर कोणतीही द्वारशिल्पे नसल्याने गडाच्या बांधकामाचा काळ व राजवट निश्चित करता येत नाही. गडावरून खुप लांबवरचा प्रदेश नजरेस पडतो. आकाराने लहान असलेल्या या किल्ल्याचा उपयोग केवळ टेहळणीसाठी केला जात असावा. सीमालढ्याचे केंद्रस्थान मानल्या गेलेल्या येळ्ळूर गावानजीक असलेल्या राजहंसगडाचे सर्वांना नेहमीच आकर्षण राहिले आहे. ------------------------सुरेश निंबाळकर

राजहंसगड