रत्नागिरी जिल्ह्यातील सुवर्णदुर्ग किल्ल्याजवळ किनाऱ्याला लागुनच हा छोटा भुईकोट उभा आहे. त्यापासुन काही मीटरवरच कनकदुर्ग नावाचा आणखी एक भुईकोट आहे. सुवर्णगडाच्या संरक्षणासाठी हर्णे गावाच्या समुद्रकिनार्यावर गोवा किल्ला, कनकदुर्ग आणि फत्तेगड हे तीन उपदुर्ग बांधण्यात आले. त्यापैकी गोवा किल्ला व कनकदुर्ग यांचे काही अवशेष आज शाबूत आहेत. परंतु फत्तेगडच्या उंचवट्यावर कोळी बांधवानी आपली घरे बांधली आहेत त्यामुळे किल्लेपणाचे कोणतेही अवशेष त्यावर आढळत नाही. फत्तेगडाची समुद्राकडील भिंत(तटबंदी) व कनकदुर्ग आणि फत्तेगड यांच्या मधील दगडी पुल सोडल्यास कोणतेही अवशेष नाहीत.या किल्ल्याचे क्षेत्रफळ साधारणपणे ३ एकर असावे. फत्तेगडाची उभारणी खर्यातखान याने केली व त्याची निर्मिती शिवकालानंतरची असावी असे मानतात.तर काहीजण शिवाजीचा नातु शाहु ह्याने हे दोन्ही कोट बांधल्याचे मानतात. कान्होजी आंग्रे - मानाजी आंग्रे यांनंतर सुवर्णगड ,गोवा किल्ला, कनकदुर्ग आणि फत्तेगड या किल्ल्यांचा ताबा तुळाजी आंग्रे यांच्याकडे गेला. पेशवे आणि तुळाजी आंग्रे यांच्यात वितुष्ट आल्यावर , पेशवे व इंग्रज यांच्या संयुक्त सैन्याने तुळाजी आंग्रे यांच्या विरुध्द मोहीम उघडली. त्यावेळी कमांडर जेम्स याने हे किल्ले जिंकून पेशव्यांच्या हवाली केले. इ.स. १८१७ मध्ये इंग्रजांनी हे किल्ले पेशव्यांकडून जिंकून घेतले.मुंबईहून दापोली मार्गे मुरुड हर्णेला जाता येते.हर्णेमधून कनकदुर्गाकडे जाणारा सरळ रस्ता आहे. कनकदुर्गाच्या अलिकडेच काही मीटरवर रस्त्याच्या उजव्या बाजूस फत्तेगड लागतो. सन १८६२ मधल्या एका संदर्भात ह्या दोन्ही किल्ल्यांची वाताहत झाल्याचे म्हटले आहे. -----------------------------सुरेश निंबाळकर

फत्तेगड 

जिल्हा -रत्नागिरी  
श्रेणी  - सोपी 
दुर्गप्रकार- सागरी किल्ला