जिल्हा - सिंधुदुर्ग 
श्रेणी  -  सोपी   
दुर्गप्रकार - सागरी किल्ला

कोकणातील बऱ्याच गावांचा उल्लेख आपण इतिहासात किवा शिवकाळात वाचलेला असतो पण तेथे एखादा किल्ला असावा हे आपल्या खिजगणतीतही नसते. खारेपाटण व राजापुर हि मुंबई - गोवा महामार्गावर असलेली अशीच दोन शहरे. इतिहासकाळात महत्त्वाचे स्थान असलेले खारेपाटण हे इ.स. १८१८ ते इ.स. १८७५ पर्यंत देवगड तालुक्याचे मुख्यालय होते. खारेपाटणला किल्ला आहे याची माहिती खुद्द खारेपाटणवासीयांना नाही तिथे इतरांची गोष्ट सोडाच. मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गावर सिंधुदुर्ग जिल्हा व रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर वाघोटण नदीच्या दक्षिणतीरावर खारेपाटण हे इतिहासप्रसिद्ध गाव आहे. मुंबई खारेपाटण हे अंतर ४०६ कि.मी. आहे तर राजापुर खारेपाटण हे अंतर २० कि.मी.आहे. महामार्गापासून दोन कि.मी. अंतरावर वाघोटण नदीच्या तीरावर असलेल्या लहानशा टेकडीवर किल्ल्याचे अवशेष आजही काळाशी झुंजत ठामपणे उभे आहेत. छोट्याशा टेकडीवर वसलेल्या या किल्ल्याला उताराच्या बाजूने खाडीचे व जमिनीच्या बाजूने खंदकाचे संरक्षण होते. मुंबई - गोवा महामार्गावरुन खारेपाटण गावात जाणाऱ्या रस्त्याने सरळ गेल्यावर सुरवातीला एस.टी स्टॅड व पुढे बाजारपेठ लागते. किल्ला म्हणून विचारल्यास अनेकांना किल्ला माहित नसल्याने दुर्गामातेचे मंदिर म्हणून विचारावे. बाजारपेठेतूनच किल्ल्याकडे जाणाऱ्या तीन वाटा आहेत. किल्ल्यावरील दुर्गामाता मंदिराचे बांधकाम चालु असल्याने तेथवर सामानाची ने-आण करण्यासाठी कच्चा रस्ता बांधलेला असुन तो थेट किल्ल्याच्या वरील भागात जातो. दुसरी वाट बाजारपेठेतून खाडीकडे जाताना दुकानांच्या रांगामधुन पायऱ्यानी किल्ल्यात असलेल्या खारेपाटण प्राथमिक शाळेकडे जाते व तिसरी वाट बाजारपेठेच्या टोकाला असलेल्या नदीकाठच्या धक्क्याकडून पायऱ्यांनी वर चढते. हि वाट सर्वात सोयीची असुन या वाटेने संपुर्ण किल्ला पहाता येतो. किल्ल्याच्या खालच्या भागातील उतारावर शासकिय विश्रामधाम आहे. येथुन पायऱ्या चढायला लागल्यावर सुरवातीलाच भिंतीलगत असलेले चुन्याच्या घाण्याचे चाक दिसते. ते पाहुन पायऱ्या चढुन डावीकडे वळल्यावर विश्रामधामच्या खालील बाजुस काही प्रमाणात शिल्लक असलेला एक बुरुज पहायला मिळतो. येथुन विश्रामधामच्या मागील बाजुने आपण एका घराच्या अंगणातून शाळेकडे येतो. गावातून शाळेकडे येणारा रस्ता इथपर्यंत येतो. इथुन समोरच बालेकिल्ल्याच्या तटबंदीचे अवशेष दिसतात. इथे असणारा किल्ल्याचा पुर्वाभिमुख दरवाजा पुर्णपणे उध्वस्त झालेला असुन केवळ पाच फुट उंचीची तटबंदी व फांजी शिल्लक राहिली आहे. किल्ल्याचा आकार लंबआयताकृती असुन किल्ल्याचे क्षेत्रफळ साधारण अडीच एकर आहे. किल्ल्याच्या तटबंदीत एकुण आठ बुरुज असुन चारही बाजुंना असलेली तटबंदी मातीच्या ढिगाऱ्यात गाडली गेली आहे. काही ठिकाणी हि तटबंदी ढासळली असली तरी या ढिगाऱ्यावरून संपुर्ण किल्ल्याला फेरी मारता येते. किल्ल्याचे तीन कोपऱ्यावरील बुरुज कसेबसे उभे असुन आपण प्रवेश केलेला कोपऱ्यावरचा बुरुज नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. किल्ल्याच्या तटावरून फेरी मारताना किल्ल्याच्या पुर्व व उत्तर बाजूस असलेला खंदक दिसतो तर पश्चिमेस खोल भाग असुन तेथे व दक्षिणेस वाघोटण खाडीचे सरंक्षण आहे. पुर्व बाजुच्या खंदकाबाहेर एक लहान व एक मोठा असे दोन समाधी चौथरे दिसतात. किल्ल्याच्या वरील भागात दुर्गामातेचे नव्याने बांधलेले मंदिर असुन या मंदिराच्या बांधकामासाठी तटबंदी फोडुन व खंदक बुजवुन आत रस्ता आणला आहे. येथे पुर्वी असणारे मंदिर शिवाजी महाराजांनी बांधल्याचे सांगण्यात येते. मंदिरात देवीचा तांदळा व नवीन मूर्ती आहे. मंदिराच्या बांधकामात येथे असलेले मूळ वास्तू अवशेष नष्ट झाले असुन मंदिरासमोरील झाडाखाली एक जुनी दीपमाळ दिसते. मंदिराच्या आसपास मोठया प्रमाणात उद्ध्वस्त वास्तूंचे चौथरे दिसुन येतात. मंदिराच्या समोरील बाजुस असलेल्या बुरुजामध्ये एक लहान दरवाजा असुन या दरवाजातून बाहेरील खंदकात उतरता येते. हा खंदक झाडी आणि गवताने भरलेला आहे. किल्ल्याच्या मध्यभागी एक ७० ते ८० फुट खोल भली मोठी पायऱ्यांची विहीर असुन असुन हि विहीर आपल्याला कोल्हापूर प्रांतातील किल्ल्यावरील विहिरींची आठवण करून देते. सध्या कोरड्या पडलेल्या ह्या विहिरीत मोठया प्रमाणात झाडी माजली असुन यातील पायऱ्यांनी विहिरीच्या आत उतरता येते. विहीर पाहुन बाहेर आल्यावर आपली गडफेरी पुर्ण होते. किल्ल्याच्या बुरुजावरून संपुर्ण बालेकिल्ला,खारेपाटण शहर व दूरवर पसरलेले वाघोटण खाडीचे पात्र नजरेस पडते. संपुर्ण किल्ला फिरण्यास दोन तास पुरेसे होतात. १८५० च्या सुमारास किल्ल्याचे तट व बुरुज पाडून त्याचे घडीव दगड वापरुन नदीच्या काठावर लोकांना उतरण्यासाठी एक धक्का बांधण्यात आल्याची नोंद आहे. खारेपाटणमध्ये काळ भैरव मंदिर व कपिलेश्वर मंदिर आहे. यातील कपिलेश्वर मंदिरात असलेली प्राचीन सूर्यनारायण मुर्ती व विष्णुमुर्ती आवर्जुन पहावी अशी आहे. इ.स. ८ व्या शतकात दक्षिण कोकणात शिलाहारांचे राज्य होते. त्याकाळी बलिपत्तन नावाने ओळखले जाणारे खारेपाटण गाव हे शिलाहार राजाची राजधानी होती. खारेपाटण गाव वाघोटन खाडी किनाऱ्यावर वसलेले असुन प्राचिन काळी व्यापारी जहाजे विजयदुर्गाजवळ वाघोटन खाडीत शिरत व तेथून बलिपत्तन गावापर्यंत येत. येथे जहाजातून माल उतरवून तो बावडा, फोंडाघाट मार्गे देशावर पाठविला जात असे. शिलाहार राजा संणपुल्ल याचा पुत्र धम्मियरने इ. स ७८५ ते ८२० मध्ये बलिपत्तन शहर वसवून त्याला लागून असलेल्या टेकडीवर या प्राचिन बंदराचे व राजधानीचे रक्षण करण्यासाठी खारेपाटणचा किल्ला बांधला. मुस्लीम शासनकाळात हा किल्ला आदिलशहाच्या ताब्यात होता. इ.स १६६० मध्ये शिवाजी महाराजांनी तळकोकण घेतल्यावर राजापूर पाठोपाठ खारेपाटण किल्ला जिंकून घेतला. राजापूर येथे अटक करण्यात आलेल्या इंग्रज अधिकारी गिफर्ड यास खारेपाटण किल्ल्यातील अंधार कोठडीत ठेवण्यात आले. इ.स.१७१३ मधे बाळाजी विश्वनाथ यांच्या मध्यस्थीने कान्होजी आंग्रे आणि छत्रपती शाहू महाराज यांच्यात झालेल्या सलोख्यात इतर १६ किल्ल्यांबरोबर खारेपाटणचा किल्ला कान्होजीं आंग्रेकडे राहीला. पुढे तुळाजी आंग्रे आणि पेशवे यांचे बिनसल्यावर पेशव्यानी इंग्रजांची मदत घेऊन आंग्य्रांचा मुलुख जिंकला. १८ डिसेंबर १७५५ रोजी तुळाजी आंग्रे यांच्याकडे असलेला खारेपाटण किल्ला मराठा- इंग्रज संयुक्त फौजांनी जिंकून घेतला व खारेपाटण पेशव्यांकडे आले. इ.स १८१८ मधे मध्ये मराठे व इंग्रज लढाईत हा किल्ला मोठया प्रमाणावर उध्वस्त झाला व इंग्रजांच्या ताब्यात गेला. ८ व्या शतकापासून १८ व्या शतकापर्यंत जवळजवळ १००० वर्षाचा इतिहास असलेला हा किल्ला आज मात्र केवळ अवशेष रूपाने शिल्लक आहे. इतिहासाचा साक्षिदार असलेला हा किल्ला इतिहास जमा होण्यापुर्वी एकदा तरी त्याला भेट दयायला हवी.------------सुरेश निंबाळकर

खारेपाटण