जिल्हा - ठाणे 
श्रेणी  - सोपी 
दुर्गप्रकार - सागरी  किल्ला

घोडबंदर किल्ल्यासाठी आपल्याला बोरीवली किंवा ठाणे स्थानकावर बस पकडुन घोडबंदर गावात यावे लागते.याच वाटेवर आपल्याला नाना शंकरशेठ यांनी बांधलेले शंकराचे जुने मंदिर आहे.येथुन किल्ल्यावर जायला १० मिनिटे लागतात.घोडबंदर किल्ला आता आपल्याला दोन भागात पाहावा लागतो.एक म्हणजे एमटीडीसीने बांधलेला पर्यटक निवासाकाडचा भाग आणि दुसरा गावातील वस्तीतुन मार्ग काढत जावा लागणारा भाग.प्राचीनकाळी कल्याण हे महत्वचे बंदर म्हणून प्रसिध्द होते. अरबी समुद्रातून उल्हास खाडी मार्गे कल्याण बंदरात जहाजांची येजा चालत असे. या जलमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी वसईचा किल्ला, धारावी किल्ला, घोडबंदर किल्ला, गायमुख किल्ला, नागलाबंदर किल्ला, दुर्गाडी किल्ला अशी किल्ल्यांची माळच वेगवेगळ्या राज्यकर्त्यांनी बांधली होती.सह्याद्रीची एक सोंड उल्हास खाडीजवळ उतरते, तिचे टोक घोड्यासारखे दिसते. त्यामुळे ह्या बंदराला घोडबंदर असे नाव पडले. सह्याद्रीच्या ह्या सोंडेवरच घोडबंदर किल्ला बांधण्यात आला आहे. इ.स १६७२ मध्ये शिवकाळात घोडबंदर किल्ला पोर्तुगिजांच्या ताब्यात होता. शिवाजी महाराजांनी स्वत: ह्या किल्ल्यावर हल्ला केला, पण त्यांना किल्ला जिंकता आला नाही. चिमाजी आप्पांच्या वसई मोहीमेत इ.स १७३७ मध्ये घोडबंदर किल्ला मराठ्यांनी पोर्तुगिजांकडून जिंकून घेतला, त्यावेळी पोर्तुगिजांची २५० माणसे मारल्याची व ७ गलबते ताब्यात घेतल्याची नोंद आहे. वसईच्या मोहीमेचा एक भाग म्हणून नागलाबंदर, घोडबंदर, धारावी किल्ला हे किल्ले जिंकून वसईच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. १८१८ मध्ये हा गड इंग्रजांनी जिंकून घेतला.गडाच्या पहिल्या भागात आपल्याला एमटीडीसीने ब्रिटीश गवर्नरने बांधलेल्या बंगल्याचे पर्यटक निवासात रुपांतर केलेले दिसते.या बाजूस एक बुरुज आणि थोडीशी तटबंदी आहे.तर दुसऱ्या भागात गडाच्या पायर्या चढून आपण भग्न प्रवेशद्वारातून गडात प्रवेश करतो, समोरच अनेक छोटी दालने असलेली एक कमानींची इमारत दिसते. पुढे गडाच्या सपाटीवर उंच भिंतीचे सभागृह लागते. त्याच्यापुढे थोड्या उंचीवर एक भक्कम चिरेबंदी दगडी बांधणीचा बुरुज दिसतो. या बुरुजातील वैशिष्टपुर्ण पायऱ्यावरून आपला प्रवेश थेट बालेकिल्ल्यात होतो.बुरुजाला असलेल्या पायऱ्यानी वर गेल्यावर कडी, कोयंडे किंवा बिजाग्रींची गरज नसलेला वैशिष्ट्यपूर्ण दरवाजा लागतो. बुरुजाच्या माथ्यापर्यंत असलेल्या खाचांमधून हा दरवाजा वर खाली सरकवून उघड बंद करता येत असे.अशीच रचना वसईच्या बालेकिल्ल्यास देखील आहे.या शिवाय इतर अवशेषात आपल्याला पाण्याचा हौद,उध्वस्त वेदीची जागा, कोसळलेली तटबंदी दिसून येते. ह्या बुरुजाच्या माथ्यावरुन उल्हासखाडी व आजूबाजूचा दूरवरचा प्रदेश दृष्टीक्षेपात येतो.संपूर्ण किल्ला फिरण्यास एक तास पुरेसा आहे. ---------------------सुरेश निंबाळकर

घोडबंदर