बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यात रोहीणखेड नावाचे एक लहानसे खेडेगाव आहे. निजामशाही काळात रोहिणाबाद नावाने या गावाचा प्रथम उल्लेख येत असला तरी गावात असलेले प्राचीन उध्वस्त शिवमंदीर व अलीकडील काळात शेतात व घराच्या उत्खननात सापडलेल्या प्राचीन मुर्ती हे गाव त्या पुर्वीपासुन म्हणजे आठव्या नवव्या शतकापासुन अस्तित्त्वात असल्याचे दाखले देतात. रोहीणखेड गाव बुलढाणापासुन २३ कि.मी. अंतरावर असुन मोताळा या तालुक्याच्या ठिकाणापासुन १२ कि.मी. अंतरावर आहे. बुलढाणा मोताळा महामार्गावर असलेल्या वाघजळ येथे रोहीणखेड फाटा आहे. वाघजळ रोहीणखेड हे अंतर ७ कि.मी.आहे. अजिंठा पर्वत रांगांच्या पश्चिमेस नळगंगा आणि जलगंगा नदीच्या संगमावर रोहीणखेड वसले असुन संपुर्ण गावाला नदीने विळखा घातला आहे. उर्वरित एक बाजु तटबंदी बांधुन सुरक्षित करण्यात आली असावी कारण याच बाजुला किल्ल्याचा शिल्लक दरवाजा आहे. वाढत्या लोकवस्तीने या नगरदुर्गाचा घास घेतला असुन आज हा किल्ला एक बुरुज व दरवाजा या अवशेष रुपात शिल्लक आहे. मुख्य रस्त्यावर उतरून गावात जाताना सर्वप्रथम डावीकडे एक दगडात बांधलेली प्राचीन मशीद दिसते. मशिदीचे आवार तटबंदीने बंदिस्त असुन या तटबंदीत बाहेरील बाजूस ओवऱ्या आहेत. या तटबंदीच्या प्रवेश दारावर एक पर्शियन शिलालेख असुन त्यात हि मशीद इ.स.१४३७ मध्ये खुदावंतखान महमदवी याने बांधल्याचा उल्लेख आहे. मशिदीच्या तटबंदीच्या दरवाजावर कोरीव काम केलेले असुन समोरच एक कबर दिसुन येते. मशिदीच्या आवारात कारंजे असुन मशिदीच्या वरील भागात मध्यभागी घुमट व चार टोकाला चार मिनार आहेत. तटबंदीवर जाण्यासाठी पायऱ्या असुन तटबंदी सुस्थितीत असल्याने त्यावर फेरी मारता येते. मशीदीच्या मागील बाजुस दोन खोल्या असुन यातील एका खोलीला तळघर आहे. मशीदीच्या आतील भागात मोठया प्रमाणात कोरीकाम केलेले असुन पर्शियन भाषेत कुराणातील आयत कोरलेल्या आहेत. याशिवाय काही आयत अशा लिहिल्या आहेत ज्या केवळ पाणी लावुन ओले केल्यावरच दिसण्यात येतात. मध्ययुगीन कालखंडात बांधण्यात आलेली ही मशीद बांधकाम शैलीचा उत्कृष्ट नमुना आहे. सध्या ही मशीद पुरातत्व खात्याच्या अख्यत्यारीत आहे. मस्जीद पाहुन गावात जाताना नदीच्या काठावर किल्ल्याचा शिल्लक असलेला एकमेव बुरुज नजरेस पडतो. हा बुरुज आतील बाजुने पुर्णपणे ढासळलेला असुन बुरुजा समोरील घराच्या आवारात काही तटबंदीचे अवशेष व एक अर्धवट कमान दिसते. हे पाहुन सरळ रस्त्याने गावाच्या दुसऱ्या टोकाला गेल्यावर तेथे किल्ल्याचा दरवाजा दिसुन येतो. दरवाजाचा खालील भाग दगडांनी बांधलेला असुन वरील भाग विटांनी बांधला आहे. यात बंदुकीच्या मारगीरीसाठी जंग्या दिसुन येतात. सध्या किल्ल्याचे इतकेच अवशेष शिल्लक आहेत. दरवाजासमोर मारुतीचे मंदिर असुन या मंदिराच्या आवारात गावात उत्खननात सापडलेल्या प्राचीन मुर्ती ठेवलेल्या आहेत. यातील ब्रह्मदेवाची व गणेशाची मुर्ती आवर्जुन पहावी अशी आहे. येथुन नदी ओलांडुन पलीकडे गेल्यावर गावाबाहेर असलेले महादेवाचे प्राचीन मंदिर पहायला मिळते. जीर्णोद्धार केलेल्या या मंदिराचे आवार तटबंदीने बंदीस्त केले असुन मंदिराच्या स्तंभावर कोरीव काम केलेले आहे. मंदिराच्या आवारात मोठया प्रमाणात कोरीव शिल्पे पडलेली असुन गाभाऱ्यात मोठे शिवलिंग आहे. मशीद, किल्ला व मंदिर पहाण्यास दिड तास पुरेसा होतो. रोहिणखेड येथे दोन मोठय़ा लढाया झाल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो. सन १४३७च्या सुमारास खानदेशचा सुलतान नजिरखान याने त्याचा जावई अल्लाउद्दीन शहा (बहामनी दुसरा) याच्यावर स्वारी केली असता त्याच्या सैन्याबरोबर रोहीणखेड येथे लढाई झाली. सन १५९०च्या सुमारास अहमदनगरचा बु-हाण निजामशहा व खानदेश सुलतान अलिखान याचा सरदार जमालखान (महमदवी) यांचे येथे युद्ध झाल्याची नोंद आहे.----------------सुरेश निंबाळकर

रोहीणखेड

जिल्हा - बुलढाणा  
श्रेणी  -  सोपी
दुर्गप्रकार- भुईकोट