जिल्हा - पालघर

श्रेणी  -  सोपी
दुर्गप्रकार- गिरीदुर्ग

बल्लाळगड

महाराष्ट्र गुजरात सीमेवर असलेलेल्या काजळी गावाच्या पाठीमागील लहानशा टेकडीवर बल्लाळगड हा टेहळणीचा गढीवजा किल्ला आहे. किल्ला इतका लहान आहे कि देशावर गावागावातुन दिसणारे जुने वाडे याच्या पेक्षा कैकपटीने मोठे ठरावे. पूर्वीच्या ठाणे व आता नव्याने झालेल्या पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यात असलेला हा किल्ला मुंबई-अहमदाबाद या महामार्गाला लागुनच उभा आहे. मुंबईपासून १५० कि.मी.अंतरावर असलेला हा किल्ला डहाणु पासुन ४२ कि.मी.वर तर तलासरी या तालुक्याच्या ठिकाणा पासुन १२ कि.मी.वर आहे. काजळी हे गाव महामार्गाच्या वळणावर आतील बाजूस असल्याने गावात जाणारा फाटा सहजपणे कळून येत नाही. फाट्यावरून ५ मिनिटात आपण गावातील शाळेजवळ पोहोचतो. या शाळेसमोरूनच गडावर जाणारी पायवाट आहे. बल्लाळगडाची समुद्रसपाटीपासून उंची ३१५ फुट असुन पायथ्याच्या काजळी गावापासून हि उंची फक्त ९० फुट असल्याने उभा चढ चढुन १५ मिनीटात आपण गडावर पोहोचतो. गडावर पिण्याचे पाणी नसल्याने शाळेसमोर असलेल्या हातपंपावरून पाणी भरून घ्यावे. माथ्याच्या अलिकडे एका झाडाखाली दगडात कोरलेली घोड्यावर बसलेल्या वनदेवतेची मुर्ती पहायला मिळते. मुर्तीच्या वरील बाजूस कोरलेल्या सुर्यचंद्र प्रतीमामुळे या मूर्तीला वीरगळ समजले जाते. पण मुर्तीवरील कोरीवकाम पहाता हि मुर्ती अलीकडील काळात घडवलेली आहे. उत्तर कोकणात फिरताना अनेक घडीव दगडांच्या अगदी पादुकांच्या देखील वरील बाजुस असे सुर्यचंद्र कोरलेले पहायला मिळतात. हि मुर्ती पाहुन पुढे आल्यावर समोरच बलाळगडाची तटबंदी व त्यात असलेले दोन बुरुज दिसतात. या तटबंदीच्या अलीकडे तटबंदीला समांतर अशी एक कोसळलेली भिंत दिसुन येते. या भिंतीचे नेमके प्रयोजन लक्षात येत नाही. बल्लाळगडाचा किल्ला चार बुरुज व तटबंदीने संरक्षित केलेला असुन या तटबंदीत दोन उध्वस्त दरवाजे आहेत. तटबंदीची उंची बाहेरील बाजुने साधारण १५ फुट असुन रुंदी ६ ते ८ फुट आहे. तटामध्ये बंदुकीच्या मारगीरीसाठी जंग्या ठेवलेल्या दिसुन येतात. तटबंदीसाठी मोठमोठे ओबडधोबड दगड वापरले असुन किल्ल्याची एकुण बांधणी व रचना पहाता सध्या अस्तित्वात असलेला हा किल्ला पोर्तुगीजांनी बांधल्याचे दिसुन येते. तटबंदीच्या आतील भागात दोन हौद असुन एका हौदाचा वापर पाण्यासाठी व दुसऱ्याचा वापर साठवणुकीसाठी होत असावा. याशिवाय आतील भागात दोन वास्तुचे चौथरे दिसुन येतात. अर्ध्या तासात संपुर्ण किल्ला फिरून १५ मिनिटात खाली उतरता येते. १४ व्या शतकात गुजरातच्या सुलतानाच्या ताब्यातील हा परीसर पोर्तुगीजांच्या ताब्यात आल्यावर जमीनीच्या बाजुने असलेल्या किल्ल्यांच्या साखळीत व दमण ते वसई या प्रांताच्या मध्यभागी त्यांनी हा किल्ला बांधला असावा. नंतर काही काळ हा परीसर रामनगरच्या कोळी राजांच्या ताब्यात होता. इ.स.१६७७ मध्ये मोरोपंत पिंगळे यांनी रामनगरच्या कोळी राजाच्या ताब्यात असलेला हा भाग स्वराज्याला जोडला. इ.स. १६८३ पासून पुढील ६६ वर्ष हा किल्ला पोर्तुगिज आणि रामनगरकर यांच्या ताब्यात होता. चिमाजीअप्पाच्या वसई मोहिमेत इ.स.१७३९ मध्ये कृष्णाजी महादेव चासकर यांनी हा परीसर जिंकला व बल्लाळगड मराठयांच्या ताब्यात आला. इ.स. १७५४ मधे हा किल्ला परत रामनगरच्या कोळी राजाकडे गेला. इ.स. १८०२ मधे झालेल्या तहात हा प्रांत पेशव्यांकडे आला. इ.स. १८१७ मधे इंग्रज अधिकारी गोगार्ड याच्या तुकडीने बल्लाळगड ताब्यात घेतला.---------सुरेश निंबाळकर