मुंबई - पणजी महामार्गाच्या पश्चिमेकडे असलेल्या रोहे येथे जाण्यासाठी महामार्गावरील नागोठेणे तसेच कोलाड येथून फाटे आहेत. तसेच रोहे हे कोकण रेल्वेवरील महत्त्वाचे रेल्वे स्थानकही आहे.रोहे एस.टी. स्थानकावरून घोसाळगडाला जाण्यासाठी एस.टी.बसेसची सोय आहे. घोसाळगड उर्फ विरगड हा किल्ला एका छोट्याशा टेकडीवर रेवदंडा व साळवे ह्या दोन खाड्यांच्यामधे चारही बाजुंना लहान मोठय़ा डोंगरांनी वेढलेला असुन मोक्याच्या ठिकाणी वसलेला आहे. समुद्र सपाटीपासून २६० मीटर व पायथ्यापासून साधारण २०० मीटर उंच असलेल्या घोसाळगडाचा आकार दूरुन शिवलिंगासारखा भासतो. पायथ्याशी घोसाळे नावाचे गाव आहे ज्यावरून ह्याला घोसाळगड हे नाव पडले. उत्तर दक्षिण पसरलेला हा गड घोसाळे गावाच्या पश्चिमेकडे आहे. गावातूनच गडावर जाणारा रस्ता आहे. रस्ता संपल्यावर पायऱ्यांचा मार्ग केलेला आहे.पायऱ्यांच्या मार्गावर भवानी मातेचे मंदिर असून त्यात भवानी मातेची पुरातन मुर्ती आहे.त्यापुढे गणपतीची स्वयंभु गणेशमुर्ती असणारे प्रशस्त मंदिर आहे. येथुन पंधरावीस मिनिटांमधे आपण गडाच्या तटबंदीजवळ येवून पोहोचतो. समोरच कातळात कोरलेल्या दहाबारा पायऱ्या दिसतात. यातील काही पायऱ्या तोफांच्या मार्या्मुळे उध्वस्त झालेल्या आहेत. या पायऱ्यांवरुन वर पोहोचल्यावर मधेच काही चांगल्या पायऱ्या लागतात. या पायऱ्या आपल्याला दरवाजा पर्यंत घेऊन जातात. मात्र येथिल प्रवेशव्दार पुर्णत: नष्ट झालेले आहे. तटातून आत गेल्यावर डावीकडे एक पाण्याचे टाकं दिसते. तिथेच खालच्या बाजूस तटातून खाली उतरण्यासाठी ‘‘चोर दरवाजा’’ आहे. तटावरुन किल्ल्यावर प्रवेश करण्यापूर्वी मुख्य दरवाजाचे ढासळलेले चिरे दिसतात. दोन दगडांवर शरभमूर्ती कोरलेल्या दिसतात. वर पोहचल्यावर आपला थेट घोसाळगड माचीवर प्रवेश होतो. येथून पुढे गेल्यावर गडाचे दोन भाग पडतात. उजवीकडे किल्ल्याची माची तर दुसरा बालेकिल्ल्याकडील. अरुंद असलेल्या डोंगर सोंडेवर तटबंदी बांधून ही माची तयार केलेली आहे. तटबंदीवर चढण्यासाठी पायऱ्या आहेत. या तटबंदीमधे त्याकाळातील शौचकूप पहायला मिळतात.शेवटच्या टोकाला बुरुज आहे, इथून घोसाळगड बालेकिल्ल्याचे दर्शन होते, माची पाहून पडझड झालेल्या दरवाजापाशी परतायचे आणि डावीकडची बालेकिल्ल्याची वाट धरायची. थोडासा उंचवटा पार केला की आपण बालेकिल्ल्याच्या कड्यापाशी पोहचतो. येथून थोडे वर दारूगोळ्याचे कोठार म्हणून जागा आहे. पण वर जाणारी मुख्य वाट मागच्या बाजूने आहे. तत्पूर्वी डावीकडे काही जमिनीत खोदलेली पाण्याची टाकी दिसतात. या बाजूने बालेकिल्ल्याच्या डोंगराला वळसा देखील घेता येतो. उजवीकडच्या वाटेवर देखिल खालच्या बाजूस एक पाण्याचे टाके आहे. आपण मात्र थोडेसे वर जाऊन कडा डाव्या हाताला ठेवून पुढे निघायचे. वाटेत कड्यात खोदलेल्या काही गुहा आढळतात.या गुहांच्यासमोरच एका दगडावर कोरलेले शिवलिंग आहे.बाजुला एके ठिकाणी दरीमध्ये एक खांबटाके खोदलेले आहे. यासाठी थोडे खाली उतरुन जावे लागते. ते पाहून पुन्हा मुख्य वाटेला लागायचे. थोड्याच वेळात आपण बालेकिल्ल्याच्या मागील बाजूस पोहोचतो. इथेच एक तोफ उघड्यावर पडलेली दिसते. या तोफेच्या समोरुन एक वाट बालेकिल्ल्यावर जाते. वाट निसरडी असल्याने जरा जपूनच जावे लागते. बालेकिल्ल्याच्या उंचवटय़ावर पाण्याच्या कोरीव टाक्या, घरांचे अवशेष, माथ्यावर किल्लेदाराचा वाडा असल्याच्या खुणा आढळतात. बालेकिल्ल्या वरुन संपूर्ण परिसर नजरेस पडतो. गडाच्या माथ्यावरून तळागडाचे दर्शन होते. कुडे मांदाडच्या खाडीचे द्रश्य आपल्याला खिळवून ठेवते. बालेकिल्ल्याला घोसाळगड माचीवरुन प्रदक्षिणा देखील मारता येते. संपुर्ण गड फिरण्यास तीन तास लागतात. असा हा महत्त्वाचा किल्ला दुर्लक्षीत आहे.हा गड नक्की कधी बांधला गेला ते पुराव्याअभावी सांगता येत नाही पण शिवपूर्वकाळात अस्तित्वात असलेला हा किल्ला ताम्हण घाटमार्गे होणार्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी बांधला असावा. जंजिरा, तळगड, घोसाळगड, ताम्हणघाट, घनगड असा तो व्यापारी मार्ग होता. या मार्गे कोकणातील बंदरावर उतरणारा माल घाटमाथ्यावर नेला जात असे. १६व्या शतकात हा किल्ला निजामशाहच्या ताब्यात होता. इस १६४८ मध्ये शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी हा किल्ला जिंकून घेतला. ‘‘रघुनाथ बल्लाळ (कोरडे) सबनीस सात पाच हजार मावळे खळक पाइचे घेऊन राजापुरीवर चालिले त्यांनी जाऊन राजापुरी पावेतो तळे, घोसाळे कुल देश मारुन सरद दरियाकिनारा मोकळा केला’’ असा उल्लेख सभासद बखरीत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड जिंकून घेतल्यावर त्याचे नाव बदलून ‘वीरगड’ असे ठेवले. मिर्झाराजे जयसिंग यांच्याबरोबर केलेल्या तहाप्रमाणे शिवरायांनी जे १२ किल्ले स्वत:कडे ठेवले त्यात ‘ घोसाळगड’ हा किल्ला होता, त्यावरुन या गडाचे तत्कालीन महत्व लक्षात येते. इ.स १६५९ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज प्रतापगडाच्या समर प्रसंगात अडकलेले पाहून जंजिर्यायच्या सिद्धीने घोसाळगडाला वेढा दिला होता पण महाराजांनी अफजल खानाचा वध केल्याची बातमी ऐकून सिद्दी वेढा उठवून निघून गेला. ह्याचे स्थान लक्षात घेता जंजी-याच्या सिद्दीने हा गड त्याच्या ताब्यात ठेवण्याचा बराच यत्न केलेला दिसतो. शिवाजीराजाच्या मृत्यूनंतर कधीतरी हा किल्ला सिद्दीकडे गेला. त्यानंतर सन १७३५ मधे बाजीरावाने हा जिंकून पुन्हा मराठ्यांकडे आणला. सन १८१८ मधे शेवटच्या इंग्रज-मराठा युद्धात कर्नल प्रॉथरने रायगड घेण्याआधी हा किल्ला काबीज केला. --------------------सुरेश निंबाळकर

जिल्हा - रायगड 
श्रेणी  - मध्यम   
दुर्गप्रकार - गिरीदुर्ग 

घोसाळगड