जिल्हा - अकोला

श्रेणी  -  कठीण

दुर्गप्रकार- गिरीदुर्ग

महाराष्ट्राच्या पूर्वेकडे असलेला निसर्गसंपन्न प्रदेश म्हणजे विदर्भ. प्राचीन परंपरा लाभलेल्या या प्रदेशात अनेक बलाढय़ राजसत्ता नांदल्या व त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी तसेच बलाढ्य दुर्ग उभारले. नरनाळा व गाविलगड हे गोंड राजसत्तेने उभारलेले असेच दोन बलाढ्य दुर्ग. घनदाट जंगलात डोंगरमाथ्यावर असलेले हे गिरीदुर्ग आकाराने तसेच प्रचंड आहेत. यातील नरनाळा किल्ला विदर्भातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा एक भाग असल्याने यावर वनखाते व पुरातत्व विभाग यांच्यामार्फत मर्यादीत भागातच प्रवेश दिला जातो. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात असलेला नरनाळा किल्ला तीन किल्ल्यांचा समुह म्हणजेच दुर्गत्रिकुट आहे. या त्रिकुटातील एक किल्ला म्हणजे तेलीयागड. तेलीयागडास भेट देण्यासाठी आपल्याला नरनाळा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले शहानुर गाव गाठावे लागते. अकोला शहरापासुन अकोट हे तालुक्याचे ठिकाण ४७ कि.मी. अंतरावर असुन अकोट ते शहानुर हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव २२ कि.मी. अंतरावर आहे. नरनाळा किल्ल्याच्या महाकाली दरवाजावर उभे राहुन पहिले असता नरनाळा डोंगराच्या उजवीकडील डोंगर म्हणजे जाफराबादचा किल्ला तर डावीकडील डोंगर म्हणजे तेलीयागड आहे. चिंचोळ्या आकाराचा तेलीयागड किल्ल्याचा डोंगर दक्षिणोत्तर पसरलेला असुन एका खिंडीने नरनाळा किल्ल्यापासून वेगळा झालेला आहे. नरनाळा किल्ल्याच्या दक्षिण टोकावर असलेला बुरुज तेलिया बुरुज म्हणुन ओळखला जातो. या बुरुजाकडूनच तेलियागडावर जाण्यासाठी वाट असुन या वाटेने जाताना प्रस्तरारोहण करावे लागते. तेलियागडाची वाट नरनाळा किल्ल्यावरून जात असल्याने व नरनाळा किल्ल्यावर मर्यादीत वेळेसाठी प्रवेश दिला जात असल्याने या वेळेत तेलीया गडावर जाऊन येणे शक्य होत नाही. त्यामुळे इच्छा असूनही हा किल्ला फिरता येत नाही. किल्ल्यावर जाता येत नसले तरी तेलीयागडाचे दर्शन आपल्याला तेलीया बुरुजावरून घेता येते. तेलीया बुरुजावरून तेलीयागडाची समोर असलेली तटबंदी व बुरुज पाहता येतात. सद्यस्थितीत केवळ इतका भाग पाहुन आपल्याला त्यावरच समाधान मानावे लागते. तेलीयागड नरनाळा किल्ल्याचा भाग असल्याने नरनाळा किल्ल्याचा इतिहास तेलीयागडाशी संबधीत आहे.---------------------सुरेश निंबाळकर

तेलीयागड