जिल्हा - सिंधुदुर्ग

श्रेणी  -  सोपी

दुर्गप्रकार- गिरीदुर्ग

हनुमंतगड

महाराष्ट्रात हनुमंतगड नावाचे दोन किल्ले आहेत. एक जुन्नर तालुक्यात निमगिरी-हनुमंतगड या दुर्गजोडीतील हनुमंतगड तर दुसरा दोडामार्ग तालुक्यात बांदाजवळ फुकेरी गावात असलेला हनुमंतगड. निसर्गाचे भरभरून वरदान लाभलेल्या या फुकेरी गावाला एकदा तरी मुक्कामी भेट दयायला हवी. सह्याद्रीच्या अर्ध्या माथ्यावर असलेला फुकेरी गाव चारही बाजुंनी घनदाट जंगल असलेल्या डोंगरांनी वेढला असुन गावामागील डोंगरावर हनुमंतगड आहे. चारही बाजुस डोंगर असल्याने येथील वातावरण हवेशीर व आल्हाददायक असते. सावंतवाडी-बांदा-फुकेरी हे अंतर ३१ कि.मी.असुन बांदा फुकेरी हे अंतर १६ कि.मी. आहे. बांद्यापासून किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या फुकेरी गावापर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर दाट जंगल असल्याने शिवाय या रस्त्याला काही ठिकाणी फाटे असल्याने थोडी चौकशी करतच जावे. फुकेरी गावातील पाराकडून एक कच्चा रस्ता मागील डोंगरावर जातो. या वाटेने पाच मिनिटे चालल्यावर घरे संपुन एक लहानशी खिंड येते. या खिंडीतून डावीकडे जाणारी पायवाट आपल्याला थेट गडाच्या दरवाजात नेते. वाटेचा हा फाटा सहजपणे लक्षात येत नसल्याने शक्यतो गावातील कुणाला या फाट्यापर्यंत सोबत घ्यावे. पुढील वाट मात्र मळलेली आहे. या वाटेने शेवटच्या टप्प्यातील उभा चढ चढुन आल्यावर किल्ल्याच्या दोन सोंडा जोडणारी तटबंदी दिसते. तटबंदीकडे जाण्याआधी एक वाट येथुन तटबंदीच्या खालील बाजूस जाताना दिसते. या वाटेने झाडीत शिरून पाच मिनटे खाली उतरत गेल्यावर झाडीत पडलेल्या दोन तोफा दिसतात. या तोफा पहाण्यासाठी गावातील माहीतगार माणूस सोबत असायला हवा. ३०-३५ वर्षापुर्वी गडावरील ५ तोफा गावात आणताना त्यातील ३ घरंगळत दरीत पडल्याचे वयस्कर गावकरी सांगतात. यातील दोन तोफा दिसतात तर एक तोफ मातीत गाडल्याने दिसत नाही. उर्वरित सहा फुटी दोन तोफा आपल्याला गावातील वाटेवर उलट पुरलेल्या पहायला मिळतात. तोफा पाहिल्यावर मूळ वाटेवर येऊन तटबंदीच्या दिशेने निघावे. या तटबंदीच्या टोकाला गडाचा दक्षिणमुखी चौकोनी लहान दरवाजा आहे. दरवाजावरील चौकट थोडी भग्न झालेली असुन आतील बाजुस पहारेकऱ्यासाठी देवड्या पहायला मिळतात. किल्ल्याची हि तटबंदी घळीच्या तोंडाशी बांधली असुन तिचा वापर पाणी अडविण्यासाठी तसेच तटबंदी म्हणुन करण्यात आला आहे. पायथ्यापासुन इथवर येण्यास अर्धा तास पुरेसा होतो. गडाला फेरी मारताना अशा प्रकारे तटबंदीने पाणी अडवलेले एकुण पाच बंधारे पहायला मिळतात. हे या गडाचे वैशिष्ट म्हणावे लागेल. किल्ल्याची समुद्रसपाटीपासून उंची २३१० फुट असुन किल्ल्याचे पठार दक्षिणोत्तर २६ एकरवर पसरलेले आहे. दरवाजाच्या उजव्या बाजुस असलेल्या पठारावर कडेने फेरी मारण्यास सुरुवात केल्यावर तटबंदीच्या आधारे बांधलेले तीन बंधारे, एक साच पाण्याचा तलाव व एक कोरडे पडलेले टाके तसेच काही ठिकाणी तुटलेली तटबंदी पहायला मिळते. पठाराचे टोक भक्कम तटबंदीने बंदीस्त केलेले आहे. दरवाजाच्या डाव्या बाजुस असलेल्या पठारावर तटबंदीच्या आधारे बांधलेले दोन बंधारे पाहुन पुढे आल्यावर पुर्वेकडे असलेला किल्ल्याचा उध्वस्त उत्तराभिमुख महादरवाजा पहायला मिळतो. महादरवाजात दोन दरवाजे काटकोनात बांधलेले असुन या दोन दरवाजा मधील भागात रणमंडळाची रचना केलेली असावी असे एकुण उध्वस्त बांधकामावरून दिसते. या दरवाजाच्या बांधकामात एकुण तीन बुरुज असुन आतील दरवाजात दोन्ही बाजुस ढिगाऱ्यात गाडलेल्या पहारेकऱ्याच्या देवड्या पहायला मिळतात. दरीच्या काठावर एका बुरुजाचे व दरवाजासमोरील भागात काही वास्तुंचे अवशेष दिसतात. किल्ल्याच्या कड्याकडील काही भागात मोठया प्रमाणात तटबंदी व बुरुज शिल्लक असुन टेकडावरून वाहुन आलेल्या मातीने फांजीच्या वरपर्यंतचा भाग मातीने भरला आहे. गडाच्या मध्यभागी असलेल्या टेकडावर जंगल वाढलेले असुन या जंगलात मोठया प्रमाणात वास्तु अवशेष दिसतात. टेकडीवरून खाली उतरत प्रवेश केलेल्या ठिकाणी आल्यावर आपली गडफेरी पुर्ण होते. संपुर्ण गडफेरीस दोन तास लागतात. गडावरून सावंतवाडी, दोडामार्ग परीसर व गोव्यापर्यंतचा प्रदेश नजरेस पडतो. हनुमंतगडाच्या घेऱ्यात चौकुळ, असनिये, घारपी, झोळंबे,खडपडे, कुंभवडे या गावांचा समावेश होतो. फोंड सावंत दुसरा इ.स.१७०९मध्ये गादीवर आल्यावर १७०९-१७३८ दरम्यान त्याने काही किल्ले बांधल्याचा उल्लेख सावंतवाडी संस्थानाचा इतिहास या पुस्तकात येतो. या फोंड सावंतांनीच हनुमंतगडाची निर्मिती केल्याचे मानले जाते.हनुमंतगडाचा इतिहास हा वाडीच्या सावंताभोवती फिरतो. सावंतांच्या गृहकलहात श्रीराम सावंत याने हनुमंतगड ताब्यात घेतला व जैतोबा यास किल्लेदार नेमले. फोंड सावंतानी हनुमंतगडावर हल्ला केला असता त्यांचा पराभव व त्यांना पळ काढावा लागला. इ.स.१८०८ मध्ये निपाणीकर निंबाळकर यांचे सरदार आपाजी सुबराव घाटगे यांनी हनुमंतगड ताब्यात घेतला असता सावंतांचे सरदार चंद्रीबा सुभेदार यांनी किल्ल्याला वेढा दिला. किल्ल्याच्या मदतीला आलेल्या आपाजी सुबराव घाटगे यांचा चंद्रोबा सुभेदार यांनी फुकेरी घाटात पराभव केला व त्यांना पार निपाणीपर्यंत मागे फिरवत हनुमंतगड ताब्यात घेतला. सन १८३२ मध्ये हनुमंतगड सावंतांच्या ताब्यात असता गडासाठी ३००० रुपये खर्चाची नेमणुक होती. इ.स १८३८ मध्ये आत्मो चौकेकर यांनी आपल्या साथिदारांबरोबर इंग्रजाविरुद्ध बंड करुन १९ डिसेंबर १८३८ रोजी हनुमंतगड ताब्यात घेतला परंतु फितुरीमुळे हे बंड फसले. इंग्रजांनी हणुमंतगड ताब्यात घेऊन पुन्हा बंड होऊ नये यासाठी गडाची तटबंदी व दरवाजा उध्वस्त केला. गावामध्ये सुंदर असे मंदिरसंकुल असुन तेथे आपली राहण्याची सोय होते. गावातील पाराजवळ असलेल्या दुकानात आल्यावर सूचना दिल्यास आपली नाश्त्याची व जेवणाची सोय होऊ शकते पण त्यासाठी पुरेसा वेळ देणे आवश्यक आहे. पिण्याच्या पाण्यासाठी पाराजवळ हातपंप तसेच नळाची सोय आहे. एकंदरीत गावात राहण्याची व जेवणाची चांगली सोय होते.---------------सुरेश निंबाळकर