सर्जेकोट

सिंधुदुर्ग जिल्ह्याला सिंधुदुर्ग हि ओळख या किल्ल्यामुळेच मिळाली आहे. असे म्हणतात कि मालवणला जाऊन सिंधुदुर्ग न पहाता येणे म्हणजे देवळात जाऊन देवदर्शन न करता येणे. त्यामुळे येथे येणारे पर्यटक आवर्जुन सिंधुदुर्ग किल्ला पहायला जातात. पण देवळात जाताना नंदीचे अथवा कासवाचे दर्शन करावे हा संकेत मात्र विसरतात. असेच काहीसे सिंधुदुर्ग किल्ल्याच्या आसपास असलेल्या किल्ल्याबाबत घडते. शिवाजी महाराजांनी सिंधुदूर्ग किल्ला बांधताना त्याच्या रक्षणासाठी आसपासच्या परिसरात पद्मगड, राजकोट, सर्जेकोट या उपदुर्गांची साखळी निर्माण केली. सिंधुदुर्ग किल्ल्यावर पर्यटक जात असले तरी या दुय्यम किल्ल्याकडे कोणी फिरकत नसल्याने दुर्लक्षित झालेले हे किल्ले आज ओस पडले आहेत. मालवण हे जरी बंदर असले तरी ते खुल्या समुद्रात असल्याने पावसाळ्यात तितके सोयीचे नव्हते. सहयाद्रीत उगम पावणारी गड नदी कोकणात कालावल खाडी म्हणुन ओळखली जाते. या कालावल खाडीच्या मुखाशी असलेल्या भुशिरामुळे पाणी वळुन खाडीत शिरते त्यामुळे या ठिकाणी पाण्याच्या प्रवाहाचा वेग कमी असतो व लाटाही कमी प्रमाणात उसळतात. यासाठी पावसाळ्यात मराठ्यांचे आरमार कालावल खाडीत नांगरून ठेवले जात असे. या आरमाराच्या मदतीसाठी व सुरक्षेसाठी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या उत्तरेस २.५ मैल अंतरावर असलेल्या कालावल खाडीच्या मुखाशी सर्जेकोटाची निर्मिती करण्यात आली. सर्जेकोटला भेट देण्यासाठी मालवणपासुन ४ कि.मी.अंतरावर मालवण आचरा रोडवर असलेले कोळंब गाठावे. गावातुन समुद्रावरील धक्क्यावर जाताना धक्क्याच्या थोडे अलीकडे एक रस्ता डावीकडे जातो. या रस्त्याच्या टोकाला सर्जेकोट किल्ल्याचा लहानसा कमानीदार दरवाजा आहे. दरवाजाच्या आत दोन्ही बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्याचा चौथरा असुन वाटेच्या उजवीकडे काही अंतरावर बुजत आलेले पाण्याचे लहान टाके आहे. वाटेने सरळ पुढे आल्यावर तटबंदीत डाव्या बाजुला खाली उतरत जाणारा मार्ग दिसतो. हा मार्ग तळात बंद झाल्याने या वास्तुचा नक्की बोध होत नाही. आपण प्रवेश केलेल्या दरवाजाच्या डाव्या बाजुला तीन घरे असुन सर्जेकोट त्यांच्या खाजगी मालकीचा असल्याने त्यांनी बनवलेल्या नारळाच्या बागेने आतील वास्तु भुईसपाट झाल्या आहेत. यातील एका घराच्या आवारात विहीर असुन या विहिरीचे पाणी आजही वापरात आहे. साधारण चौकोनी आकाराचा हा किल्ला २ एकर परिसरावर पसरलेला असुन किल्ल्याचे बालेकिल्ला व बाहेरील किल्ला असे दोन भाग पडले आहेत. एका बाजुस समुद्र व तीन बाजुस जमीन अशी या किल्ल्याची रचना असुन किल्ल्याच्या एका टोकाला बालेकिल्ला आहे. किल्ल्याच्या तटबंदीत एकुण दहा बुरुज असुन यातील चार बुरुज बालेकिल्ल्याच्या तटबंदीत व तीन बुरुज समुद्राच्या दिशेने आहेत. दहा बुरुजातील एक बुरुज चौकोनी असुन मुळ बुरुज ढासळल्याने हा कदाचित नंतर बांधला गेला असावा. तीन बाजुस समुद्र व एका बाजुस जमीन अशी या किल्ल्याची रचना असुन किल्ल्याला तीन बाजुंनी १० फुट रुंद व १० फूट खोल खंदक असल्याचे वाचनात येते पण आज केवळ बालेकिल्ल्याच्या तटाबाहेरील बाजूस या आकाराचा खंदक पहायला मिळतो. किल्ल्याचे बांधकाम घडीव चिऱ्यात केले असुन हे बांधकाम सांधण्यासाठी कोणत्याही प्रकारचे मिश्रण वापरलेले नाही. किल्ल्याचे दोन बुरुज व काही तटबंदी वगळता बाहेरील सर्व बांधकाम आजही सुस्थितीत आहे. किल्ल्यातील घराच्या आवारातुन बालेकिल्ल्यात जाण्याची वाट असुन तटबंदीतील हा मार्ग अतिशय चिंचोळा असल्याने या ठिकाणी दरवाजा असावा असे वाटत नाही. बालेकिल्ल्याच्या आतील परीसर अतिशय लहान असुन त्यात विहीर, तुळशी वृंदावन व घराचे जोते पहायला मिळते. तटबंदीच्या आत एक शौचकूप असुन तटावर जाण्यासाठी जिना आहे. जिन्याने वर चढुन तटावर फेरी मारता येते. बालेकिल्ल्यात मोठया प्रमाणात काटेरी झाडी वाढलेली असली तरी बुरुज तटबंदी सुस्थितीत आहेत. किल्ल्याच्या संपुर्ण तटबंदीत बंदुकीच्या माऱ्यासाठी जंग्या असुन बुरुजावर तोफांचा मारा करण्यासाठी मोठमोठे झरोके आहेत. संपुर्ण किल्ला आतबाहेर पहाण्यासाठी एक तास पुरेसा होतो. सर्जेकोट किल्ल्याची बांधणी सिंधुदुर्गबरोबर इ.स.१६६४ ते १६६७ च्या दरम्यान केली गेली. इ.स.१७६३ साली पोर्तुगीजांनी सिंधुदुर्गवर हल्ला केला असता जवळच्या एका लहान दुर्गावर मराठ्यांचे २०० लोक व सहा तोफा असल्याचा उल्लेख येतो. हा दुर्ग बहुदा राजकोट अथवा सर्जेकोट असावा. इंग्रज व करवीरकर यांच्यात झालेल्या १ ऑक्टोबर १८१२ च्या तहानुसार सर्जेकोट व सिंधुदुर्ग किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. इ.स.१८६२ साली इंग्रजांनी केलेल्या किल्ल्याच्या पाहणीत रूंडी गावाच्या हद्दीतील सर्जेकोट किल्ल्याला तिन्ही बाजुस खंदक असुन किल्ल्याची तटबंदी मोडकळीस आल्याचे नमूद केले आहे.------------------सुरेश निंबाळकर

जिल्हा - सिंधुदुर्ग

श्रेणी  -  सोपी

दुर्गप्रकार- सागरीदुर्ग