अर्जुनगड 

महाराष्ट्र व गुजरातच्या सीमावर्ती भागात शिवकाळात व पेशवाईत बांधले गेलेले अनेक किल्ले आहेत. यात पेशवाई काळात चिमाजीआप्पांनी बांधलेला अर्जुनगड नावाचा किल्ला आहे. किल्ल्याच्या दक्षिण दिशेने वाहणारी कोलक नदी व तिच्या आसपासच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती झाली असावी. एकेकाळी स्वराज्यात असणारा हा प्रदेश भाषावार प्रांत रचना करताना व इतर काही कारणामुळे गुजरात राज्यात सामील झाला. कधीकाळी हा किल्ला स्वराज्यात असल्याने मी या किल्ल्याचा उल्लेख महाराष्ट्रातील किल्ले या सदराखाली करत आहे. या किल्ल्याचे बांधकाम पुर्णपणे मराठा शैलीत असल्याचे जाणवते. पोर्तुगीजांच्या दमण शहराच्या सरहद्दीवर असलेला हा किल्ला दमणच्या संरक्षणासाठी धोक्याची घंटा होती त्यामुळे लवकरच पोर्तुगिजांनी या किल्ल्याचा ताबा घेतला पण तो परत मराठयांच्या ताब्यात गेला. अर्जुनगड किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला रेल्वेने वापी-सुरत मार्गावरील बगवाडा स्थानक गाठावे लागते. बगवाडा हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव असुन रस्त्याने मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वापीहुन ६ कि.मी. अंतरावर आहे. रेल्वे स्थानक अथवा महामार्गावरून १० मिनिटे चालत आपण किल्ल्याच्या पायथ्याला पोहोचतो. बगवाडा स्थानक व बगवाडा टोलनाका येथुन सहजपणे दिसणारा हा किल्ला १२५ फुट उंचीच्या टेकडीवर बांधलेला आहे. किल्ला म्हणुन स्थानिकांना या वास्तुबद्दल आत्मीयता नसली तरी गडावर असलेल्या महालक्ष्मी देवळामुळे गावकऱ्यांचा गडावर वावर असतो. त्यामुळे गडावर जाण्यासाठी त्यांनी पायऱ्या बांधलेल्या आहेत. टेकडीच्या अर्ध्या पायऱ्या चढल्यावर आपल्याला वाटेच्या दोन्ही बाजुस दोन बुरुज पहायला मिळतात. पायऱ्याची हि वाट येथे असलेली तटबंदी पार करत बालेकिल्ल्याच्या दिशेने जाते. या बुरुजांचे व तटबंदीचे काम पहाता येथे असलेला दरवाजा पुर्णपणे नष्ट झाला असावा किंवा हे बांधकाम अर्धवट सोडुन दिले असावे असे वाटते. या वाटेने किल्ल्याच्या वरील भागात असलेल्या बुरुजाला वळसा घालत आपण बालेकिल्ल्याच्या पुर्वाभिमुख प्रवेशव्दाराजवळ पोहोचतो. दरवाजाची कमान पुर्णपणे नष्ट झाली असुन आतील दोन्ही बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत. आयताकृती आकाराचा हा किल्ला अर्धा एकर परिसरावर पसरलेला असुन बालेकिल्ल्याच्या तटबंदीत चार व खालील तटबंदीत दोन असे सहा बुरुज किल्ल्याला आहेत. किल्ल्याच्या मध्यभागी नव्याने बांधलेले महालक्ष्मी मंदिर असुन या मंदिराशेजारी दगडात बांधलेले चौकोनी आकाराचे पाण्याचे मोठे टाके आहे. टाक्यातील पाणी पिण्यायोग्य असुन गडावर पिण्यासाठी हेच पाणी वापरले जाते. गडावर मंदीर असल्याने गडाची उत्तम निगा राखलेली आहे. किल्ल्याची तटबंदी व बुरुज आजही सुस्थितीत असुन फांजीवरून संपुर्ण तटाला फेरी मारता येते. तटबंदीमध्ये बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या ठेवलेल्या आहेत. तटावरून फिरताना किल्ल्याच्या दक्षिण दिशेला तटाखाली खडकात खोदलेले पाण्याचे टाके व पुर्वेला मुंबई अहमदाबाद महामार्ग पहायला मिळतो. संपुर्ण किल्ला फिरण्यास अर्धा तास पुरेसा होतो. या किल्ल्याचा इतिहास आपल्याला पेशवाई काळात आढळतो. बारभाईंच्या कारस्थानाने रघुनाथरावास पेशवेपदावरून दुर केल्यावर आपसात झालेल्या युध्दात शके १६९८ अधिक भाद्रपद शु॥ १२ च्या सुमारास अर्जुनगड व इंद्रगड किल्ला रघुनाथराव पेशव्यांच्या ताब्यात आला व तेथुन त्यांनी गोव्याच्या पोर्तुगीजांशी संधान साधले. दमणच्या पोर्तुगीजांनी हे दोन्ही किल्ले त्यांच्या ताब्यात देण्याच्या अटीवर दोनशे गोरे सैनिक व तीनशें स्थानिक सैनिक व सोबत आठ दहा तोफा देण्याचे कबुल केले. परंतु रघुनाथरावांचा त्यांच्यावर विश्वास नसल्याने किल्ल्याचा ताबा त्यांनी सोडला नाही. याशिवाय पेशव्यांचें कारकुन खंडो मुकुंद वसुलीसाठी बडोद्याला गायकवाडांकडे जाताना कल्याणहून येथे आल्यावर त्यांची मांडवीपर्यंत प्रवासाची व्यवस्था करण्यासाठी कळविल्याचे पत्र वाचनात येते.--------सुरेश निंबाळकर

जिल्हा - वापी 

श्रेणी  -  सोपी 

दुर्गप्रकार- गिरीदुर्ग