सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात पळशी गावाजवळ कोळदुर्ग हा प्राचीन दुर्ग आहे. स्थानिक लोक या दुर्गाला कुळदुर्ग किंवा राजवाडा या नावांनी ओळखतात. गडावर अलीकडे सापडलेल्या एका शिलालेखामुळे हा किल्ला साधारण ९०० वर्षापासून अस्तित्वात आहे पण शिवकाळात मात्र या किल्ल्याचे कोणतेच उल्लेख आढळत नाहीत. कोळदुर्गाजवळ असलेले निसर्गरम्य शुकाचारी मंदीर या भागात प्रसिध्द असुन त्याच्याजवळ असलेला कोळदुर्ग मात्र तितकाच अपरीचीत आहे. खानापुर या तालुक्याच्या ठिकाणाहुन भिवघाट ओलांडुन सांगोला-विटा मार्गावर १२ कि.मी.अंतरावर पळशी गाव आहे. या पळशी गावातुन बाणूरगड म्हणजे भूपाळगडाकडे जाताना शुकाचारी मंदिराकडे उतरणाऱ्या पायऱ्यांच्या वाटेआधी साधारण १.५ कि.मी. अलीकडे एक कच्चा रस्ता कोळदुर्गावर जातो. कोळदुर्गावर गडसंवर्धन करणाऱ्या बा रायगड या दुर्गप्रेमी संस्थेने या ठिकाणी दिशादर्शक फलक लावलेला आहे. खाजगी वाहन असल्यास या रस्त्याने थेट किल्ल्याच्या तटबंदीजवळ जाता येते. पठारावर असलेली रचीव दगडांची हि तटबंदी दरीच्या दिशेने गेलेली असुन या तटबंदीत उध्वस्त झालेले सात बुरुज पहायला मिळतात. हि तटबंदी फोडुन रस्ता आत नेला आहे. किल्ल्यात सध्या मोठया प्रमाणात शेती केली जात असुन नव्याने बांधलेली दोन घरे किल्ल्यावर आहेत. मुख्य डोंगराच्या सपाटीवर अंदाजे १०० एकरात पसरलेला हा दुर्ग साधारण त्रिकोणी आकाराचा असुन दोन बाजुला दरी तर उर्वरित बाजुस पठार अशी याची रचना आहे. दरीच्या बाजुने तुरळक तटबंदी तर पठाराच्या दिशेने भक्कम तटबंदी व बुरुज बांधुन किल्ला बंदीस्त केलेला आहे. किल्ल्यावर प्रवेश केल्यावर समोरच एक घर असुन एका बाजुला शेती तर दुसऱ्या बाजुस दूरवर पसरलेल्या दगडांच्या राशी पहायला मिळतात. या घराच्या पुढील बाजुस बा रायगड या दुर्गप्रेमी संस्थेने या किल्ल्याचे सवंर्धन करताना सापडलेले मंदिराचे कोरीव दगड, वीरगळ, सतीशिळा हे अवशेष एकत्र करून एका दगडी चौथऱ्यावर मांडुन ठेवले आहेत. या ठिकाणी त्यांनी लावलेला किल्ल्याचा नकाशा व माहिती देणारा फलक यामुळे किल्ला पहाणे सोपे जाते. किल्ल्याच्या उतारावर बांध घालुन पाणी अडविल्याच्या खुणा दिसुन येतात पण सध्या हा बांध फोडुन त्या तलावाच्या जागी आता शेती केली जाते. किल्ल्याच्या पुर्व तटावरून फेरी मारताना खाली दरीत दगडी बांध घालुन पाणी अडविल्याचे दिसुन येते. सध्या हा बंधारा फुटलेला असुन त्याच्या बांधकामात घडीव चिरे तसेच कोरीव दगड वापरलेले दिसुन येतात. गड फिरताना जागोजागी विखुरलेले अवशेष तर काही ठिकाणी घराचे चौथरे पहायला मिळतात. गडावरील प्राचीन मंदिराचे व इतर वास्तुचे कोरीव दगड आसपासच्या गावकऱ्यांनी त्यांच्या गावात नेऊन तेथील वास्तु बांधण्यास त्याचा वापर केला आहे. किल्ल्यावरुन उत्तरेला भूपाळ गडावरील मंदिर दिसते. किल्ल्याचा घेर फ़ार मोठा असल्याने संपुर्ण किल्ला फिरण्यास दोन तास लागतात पण ठळक असे कोणतेही अवशेष नजरेस पडत नाहीत. किल्ल्यातील चौथऱ्यावर अलीकडेच सापडलेला सुमारे ८५० वर्षांपूर्वीचा चालुक्यकालीन कन्नड लिपितील भग्न शिलालेख आहे. हा शिलालेख १७ ओळीचा असून काही अक्षरे पुसट झाली आहेत. या शिलालेखाचा सुरूवातीचा भाग भग्न झाला असुन शिलालेखाच्या उर्वरित भागात मध्यभागी एका आसनस्थ साधूची मूर्ती व बाजूला चंद्रकोर आहे. शिलालेखात सुरूवातीच्या भागात एका जैन मुनींचे वर्णन असुन या वर्णनात ते पर्वतासारखे श्रेष्ठ, कामदेवावर विजय मिळवलेले, कुलीन, विद्वान आणि जगद्वंद्य असल्याचे म्हटले आहे. शिलालेखात काळाचा उल्लेख नसला तरी त्यात चालुक्य राजा जगदेकमल्ल याच्या नावाचा उल्लेख आहे. हा राजा इ.स. ११३८ ते ११५० दरम्यान राज्य करीत होता. सदर राजाचा मांडलिक असणाऱया बिज्जल कलचुरीच्या एका सामंताने या जैन मुनींना दान दिल्याचा उल्लेख या शिलालेखात आहे. यावरून किल्ल्याचे आयुष्य साधारण ९०० वर्षे मागे जाते. सांगली जिल्हा गॅझेटीयर मधील नोंदीनुसार हा किल्ला एका कोळी राजाने बांधला असुन त्याने या किल्ल्यावरून पन्हाळ्याच्या राजा भोज विरुद्ध बंड केले होते. खाजगी वहान सोबत असल्यास एका दिवसात कोळदुर्ग, भूपाळगड, पळशीचे सिध्देश्वर मंदिर आणी शुकाचारी मंदिर ही ठिकाणे सहजपणे फिरता येतात. ----------सुरेश निंबाळकर

कोळदुर्ग

जिल्हा - सांगली

श्रेणी  -  सोपी

दुर्गप्रकार- गिरीदुर्ग