मुनवल्ली

किल्ल्यावर झालेले खाजगी आक्रमण हा प्रश्न केवळ महाराष्ट्रात नसुन महाराष्ट्राच्या आसपास असलेल्या किल्ल्यांची देखील हीच अवस्था दिसुन येते. स्वराज्यात असणारा मराठी बेळगाव भाषावार प्रांतरचना करताना मात्र कर्नाटक राज्याला जोडला गेला. बेळगाव जिल्ह्यात असणारे हे किल्ले एकेकाळी स्वराज्याचा भाग असल्याने या किल्ल्यांना मी महाराष्ट्रातील किल्ले समजतो व त्यांचा उल्लेख महाराष्ट्रातील किल्ले म्हणुन करत आहे. बेळगाव जिल्ह्यातील ३५ पेक्षा जास्त गढीकोटांची माहीती मी दुर्गभरारी या संकेतस्थळावर देण्याचा प्रयत्न केला आहे. बेळगाव जिल्ह्यात बहुतांशी किल्ले हे भुईकोट अथवा गढी प्रकारातील असुन उंच गिरीदुर्ग फार कमी आहेत. खाजगी वाहन सोबत असल्यास दिवसाला येथील ५-६ कोट सहजपणे पहाता येतात. दक्षिणेकडील या प्रांतात दुर्ग उभारणीत मराठयांचा देखील मोठया प्रमाणात सहभाग आहे. बेळगाव जिल्ह्यात असलेले मनोल्ली उर्फ मुनवल्ली हे लहान शहर महाराष्ट्रात तसे फारसे कुणाला माहीत नाही पण मराठा साम्राज्य ज्यावेळी तुंगभद्रा कावेरी पर्यंत पसरले होते त्यावेळी मनोली मराठा साम्राज्याचा एक भाग होते. मनोली गाव मराठयांनी मलप्रभा नदीतीरावर वसवलेले असुन गावाच्या रक्षणासाठी मलप्रभा नदीकाठी भुईकोट बांधला. हा भुईकोट म्हणजे मनोल्ली उर्फ मुनवल्ली किल्ला. या किल्ल्यात मराठयांच्या घोडयांच्या पागा होत्या. मुनवल्ली शहर बेळगावपासुन ८० कि.मी.वर असुन सौंदत्ती या तालुक्याच्या शहरापासुन १७ कि.मी. अंतरावर आहे. सौंदत्तीकडून मुनवल्ली गावात प्रवेश करताना मलप्रभा नदीच्या पुलावरून आपल्याला मुनवल्ली किल्ल्याची तटबंदी व बुरुज पहायला मिळतात. पुल पार केल्यावर लगेचच उजवीकडे एक रस्ता नदीकाठाने पुढे जाताना दिसतो. या रस्त्याच्या शेवटी एक शाळा असुन तेथुनच किल्ल्यावर जाण्याची वाट आहे. शाळेकडे पोहोचल्यावर समोरच किल्ल्याचा पश्चिमाभिमुख मुख्य दरवाजा दिसतो. किल्ल्याचा दरवाजा सुस्थितीत असुन त्याची लाकडी दारे तुटलेल्या अवस्थेत आहेत. दरवाजाच्या उजवीकडे तटात लहान दिंडी दरवाजा आहे पण तो आता दगड रचुन बंद करण्यात आला आहे. तटबंदी बाहेर खोल खंदक खोदलेला असुन या खंदकात मोठया प्रमाणात झाडी वाढलेली आहे. संपुर्ण तटबंदीवर बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या बांधल्या असुन बुरुजावर नक्षीदार चर्या बांधल्या आहेत. किल्ल्याचा परिसर ८ एकरवर पसरलेला असुन चौकोनी आकाराच्या या किल्ल्यात चार टोकाला चार बुरुज व उत्तर व दक्षिण तटाला मध्यभागी एक बुरुज आहे. किल्ल्याच्या पश्चिम तटबंदीत बाहेर जाण्यासाठी दुसरा दरवाजा असुन दक्षिण तटात देखील चोरदरवाजा आहे. संपुर्ण किल्ल्यात शेती केली जात असुन बालेकिल्ला,हनुमान मंदीर, विहीर, उडचादेवी मंदीर असे मर्यादीत अवशेष शिल्लक आहेत. दरवाजातुन आत गेल्यावर डावीकडे सध्या या जागेचे मालक असलेले शकीरअप्पा यांचा बंगला आहे. येथुन बालेकिल्ल्याचे दोन बुरुज नजरेस पडतात. बालेकील्ल्याजवळ आल्यावर उजवीकडील वाट उडचादेवी मंदिराकडे जाते तर डावीकडील वाट मारुती मंदिराकडे जाते. उडचादेवीचे मंदीर तटबंदी जवळ बांधलेले असुन मंदिराच्या आवारात काही कोरीव शिल्प व नागशिल्पे ठेवलेली आहेत. उडचादेवी मंदिरात कन्नड भाषेत कोरलेला शिलालेख पहायला मिळतो. उडचादेवी मंदीर पाहुन मारुती मंदिराकडे जाताना डावीकडे एक मोठी विहीर पहायला मिळते. विहिरीच्या काठावर कोरीव खांब व शिल्प असुन विहिरीच्या आतील भागात शिवमंदिर आहे. विहिरीची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली असुन मंदिरात जाणे देखील धोकादायक आहे. विहीर पाहुन आपण मारुती मंदिरात पोहोचतो. एका घडीव नक्षीदार चौथऱ्यावर उभारलेले हे मंदीर दगडात कोरीवकाम करून सजवलेले आहे. मंदिरातील मारुतीची मुर्ती वेगळ्याच धाटणीची असुन मंदिरावरील नक्षीकाम अप्रतिम आहे. या मंदिराच्या आवारात देखील काही नागशिल्प आहेत. मंदिरामागे असलेल्या पुर्व तटबंदीत गडाचा दुसरा दरवाजा आहे. हा दरवाजा वापरात नसुन दगड रचुन बंद करण्यात आला आहे. दरवाजाच्या आतील बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या बांधल्या आहेत. येथे समोरच गडाचा बालेकिल्ला असुन त्याचा दरवाजा देखील दगडांनी बंद करण्यात आला आहे. बालेकिल्ल्याची तटबंदी एका ठिकाणी ढासळली असुन तेथुन आत जाता येते पण आत वाढलेल्या दाट झाडीमुळे एक लहान कोरडी विहीर वगळता इतर काहीही पहाता येत नाही. बालेकिल्ल्याचा एकुण परिसर अर्धा एकर असुन तटबंदीत ५ बुरुज आहेत. या सर्व बुरुजावर खोल्या बांधलेल्या असुन बंदुक डागण्यासाठी मारगीरीच्या जंग्या आहेत. किल्ल्याच्या बाहेरील तटबंदीत असलेल्या ६ बुरुजापैकी ३ बुरुज चांगल्या अवस्थेत असुन या बुरुजांच्या आत कोठार तर बाहेरील बाजुस नक्षीदार सज्जे आहेत. देखभाल नसल्याने तटावर मोठ्या प्रमाणात झुडपे वाढत आहेत. शेतीमुळे आतील इतर अवशेष पुर्णपणे नष्ट झाले आहेत. प्रवेश केलेल्या मुख्य दरवाजात आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते. किल्ला पाहण्यास एक तास पुरेसा होतो. शिवकाळात आदिलशहाच्या अंमलाखाली असलेला हा भाग मराठयांच्या ताब्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजानी १६७४ मध्ये दक्षिण मोहिम हाती घेतली या वेळेस जिवाजी शिंदे यांच्याकडे या भागाची जबाबदारी होती. हा भाग ताब्यात घेतल्यावर त्यांनी तोरगळ येथे मुक्काम केला. पण तेथील हवामान व चारा घोड्यांसाठी पोषक नाही हे पाहुन कसबा शिदोगी तर्फेतील खेडें मौजे मनाली हे पागेसाठी निवडले. त्यावेळी नवलगुंदकर देसाई यांच्या ताब्यात असलेला हा गाव घेताना त्यांना मोबदल्यात दुसरे गाव देण्यात आले. जिवाजी शिंदे यांनी यावेळी मुनोल्ली गाव वसवून मलप्रभा नदीकाठी मुनवल्ली भुईकोट बांधला. जिवाजी शिंदे यांना तीनशे स्वारांची मनसब होती. महाराजांच्या मृत्यूनंतर हा भाग मोगलांकडे गेला पण १७०७ ला औरंगजेबच्या मृत्यूनंतर हा किल्ला मराठय़ांच्या ताब्यात आला. किल्ल्याचा पुढचा इतिहास सावनुरचा नवाब, पेशवे,करवीरकर,पटवर्धन, हैदर-टिपु व शेवटी इंग्रज यांच्याशी निगडीत आहे. -------सुरेश निंबाळकर

जिल्हा - बेळगाव

श्रेणी  -  सोपी

दुर्गप्रकार- भुईकोट