पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरी रेल्वेवर असलेल्या विरार या रेल्वे स्टेशनापासून अर्नाळा गाव अंदाजे १० कि.मी. असून तेथे जाण्यास एस. टी.व रिक्षाची सोय आहे. अर्नाळा गावात पोचले की जवळच असलेल्या अर्नाळा बंदरातून छोट्या होडक्यातून अर्नाळा किल्ला ज्या बेटावर आहे तेथे पोहोचता येते. ह्या होड्या सकाळी ६.०० ते दुपारी १२.३० व संध्याकाळी ४.०० ते ७.०० या वेळेतच आपल्याला किल्ल्यावर घेऊन जातात. या बेटावर होडीसाठी धक्का नाही त्यामुळे दोनही बाजुस समुद्राच्या पाण्यात उतरुन चालतच किनाऱ्यावर यावे लागते. अर्नाळा बेटाच्या वायव्येस हा जलदुर्ग आहे. उत्तर कोंकणातील वैतरणा नदी या किल्ल्याजवळ समुद्रास मिळते त्यामुळे येथून खाडीच्या सर्व प्रदेशावर या जलदुर्गावरून नजर ठेवता येत असे. वसई उत्तर कोकणातील सर्वात बलाढ्य जलदुर्ग असेल तर अर्नाळा हा त्याच्या खालोखाल गणला जातो. बोटीने दहा मिनिटांत अर्नाळा बेटावर उतरल्यानंतर किल्ल्याकडे पाहिले असता डाव्या बाजूला असणारा किल्ल्यापासून संपूर्ण सुटा असा एक गोल हनुमंत बुरूज आपले लक्ष वेधून घेतो तर उजव्या हाताला मुख्य किल्ला आहे. दोन्ही ठिकाणी पोहोचण्यासाठी बोट थांबते तिथून पाच ते सात मिनिटे चालावे लागते. किल्ल्यापासून स्वतंत्र असा हा भक्कम बुरूज ’हनुमंत बुरूज’ म्हणून ओळखला जातो. आधी हनुमंत बुरूज पाहून मग मुख्य किल्ल्याकडे जाणे सोयीचे ठरते. या बुरुजाला एकच लहानसा दरवाजा आहे परंतु तो आता वाळुत खूपच गाडला गेला आहे. त्यामुळे अगदी रांगत त्यात शिरावे लागते त्यातून वर चढण्याची वाटही आता बंद झाली आहे. त्यामुळे बुरुजावर एका बाजूने उगवलेल्या वटवृक्षाच्या पारंब्यांना लोंबकळतच काय ते बुरुजावर चढता येते. या बुरुजासमोरच्या छोट्याशा मंदिरात वेताळाची एक प्राचीन मुर्ती आहे. किल्ल्याबाहेर एकाकी किंवा नुसता बुरुज बांधण्याची पद्धत खरेतर पोर्तुगीजांची पण अर्नाळा किल्ल्याजवळ असलेल्या एकाकी बुरुजाची दुरुस्ती व डागडुजी मराठ्यांनीही केली हे त्याच्या बांधकामातून दिसून येते. आपल्याजवळ तोफा, बंदुका व दारुगोळा असेल तर असा एकाकी बुरुज एखाद्या छोट्या किल्ल्याप्रमाणे कामगिरी बजावू शकतो असा अनुभव पोर्तुगीजांशी लढताना मराठ्यांना आलाच होता. त्यामुळे अशा बुरुजाचे महत्त्व ओळखून या बुरुजाची डागडुजी करण्यात आली. पेशवाईच्या काळात मराठ्यांनी स्वत:हून एकाकी बुरुज बांधल्याचे दिसत नाही. तोफा व दारुगोळ्याच्या बाबतीत असलेले परावलंबित्व हे त्याचे एक कारण असु शकते. अर्नाळा किल्ल्याची दोन वैशिष्ट्ये ठळकपणे जाणवतात. पहिले वैशिष्ट्य म्हणजे किल्ल्याबाहेर किल्ल्याच्या दक्षिणेस असलेला एकाकी बुरुज व दुसरे म्हणजे महाद्वारावरील घुमट. अर्नाळा किल्ल्याचे प्रवेशद्वार समुद्रकिनाऱ्यालगतच आहे. अर्नाळा किल्ला चौकोनी असून तीस ते पस्तीस फुट उंचीची एखादी बैलगाडी सहज जाऊ शकेल इतपत रुंद व मजबूत तटबंदी याचे संरक्षण करते. किल्ल्याचे क्षेत्रफळ सुमारे ४ हेक्टर असून तटबंदीमध्ये असलेले एकूण दहा बुरूज आजही ठामपणे उभे आहेत. या बुरुजांमधे खोल्याही केलेल्या आहेत. त्यात जाण्यासाठी पायऱ्याचा मार्ग आहे. यातील नऊ बुरुज गोलाकार आकारात असुन एक बुरुज चौकोनी आकाराचा आहे. यशवंत बुरुज, भवानी बुरुज, गणेश बुरुज, वेताळ बुरुज अशी या बुरुजांची नावे असुन गणेश बुरुज हा किल्ल्यातील महत्त्वाचा बुरूज आहे. या बुरुजात एक प्रवेशद्वार असुन बुरुजाच्या खाली सैनिकांच्या राहण्याची सोय केलेली आहे. या गणेश बुरुजामध्येच एकापुढे एक असे तीन दरवाजे आहेत. किल्ल्याला एकूण तीन दरवाजे असले तरी मुख्य प्रवेशद्वार उत्तरेकडे आहे. या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दोन बुलंद बुरूज उभे आहेत. या दरवाजाच्या कमानीवर फुलांच्या वेलबुट्टीचे अत्यंत सुंदर नक्षीकाम असून दोन्ही बाजूला सोंडेत फुलांच्या माळा घेतलेले हत्ती व व्याल पशुची प्रतिमा कोरलेली आहे. किल्ल्याचे स्थापत्य पूर्णत: मराठा शैलीचे आहे आणि कमानीच्या वरील भागात किल्ल्याची माहिती देणारा थोरल्या बाजीराव पेशव्यांचा शिलालेख कोरलेला आहे. प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर असलेल्या घुमटात अप्रतिम नक्षीकाम केलेले असुन आत पहारेकऱ्याच्या देवडय़ा आहेत. या दरवाजाच्या आत दुसरा दरवाजा असून येथुन आपला गडात प्रवेश होतो. तटावर जाण्यासाठी प्रवेशदाराशेजारीच प्रशस्त पायऱ्या आहेत आणि एक चोरवाट आहे. मुख्य प्रवेशद्वाराच्या वर असणाऱ्या उंचवटावर बसले असता संपूर्ण किल्ल्याचा आतील भाग नजरेस पडतो. हा उंचवटा हीच किल्ल्याची ढालकाठीची म्हणजेच झेंड्याची जागा आहे. तटबंदीमधे जागोजाग बंदुका व तोफांच्या मारगिरीसाठी जंग्या केलेल्या आहेत शिवाय किल्ल्याच्या तटात सैनिकांच्या राहण्याच्या खोल्या तसेच शौचकुप बनविलेले आढळतात. किल्ल्यात व त्याच्या बाहेरही आंबा, ताड, माड व चिंचेची झाडे लावलेली दिसतात. किल्ल्याच्या मजबूत तटबंदीवरुन किल्ला फिरताना तटबंदीवरुन दूरपर्यंतचा प्रदेश पाहायला मिळतो. किल्ल्याच्या आत त्र्यंबकेश्वर व भवानी माता यांची मंदिरे आहेत. त्र्यंबकेश्वर महादेवाच्या मंदिरासमोरच सुबक बांधणीचे एक अष्टकोनी तळे आहे. तळ्यात उतरायला दगडी पायऱ्या आहेत. तळ्यातले पाणी हिरवे आणि अस्वच्छ असले तरी तळ्याची बांधणी अत्यंक सुबक आहे. ह्या मंदिराजवळच पूर्वेकडील तटात एक छोटे मंदिर आहे. त्यात नित्यानंद महाराजांच्या पादुका पाहता येतात. तसेच किल्ल्यात एक दर्गा आणि दोन कबरींची थडगीही आहेत. किल्ल्यात सदर,वाडे, कोठारे अशा बांधकामांचे अवशेषही ठिकठिकाणी दिसून येतात. याशिवाय किल्ल्यात गोड पाण्याच्या पाच-सहा विहिरीसुद्धा आहेत. किल्ल्यात अलीकडेच तटाला लागून एक दत्तमंदीर बांधण्यात आले आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाने किल्ल्याच्या पडझड झालेल्या भागाचे डागडुजीचे काम सुरू केले आहे. किल्ल्याच्या सभोवार तीन-चार हजार कोळी समाजाची वस्ती आहे. कोळी समाजाचा मासेमारी हा मुख्य धंदा परंतु बेटावर शेतीही बऱ्याच प्रमाणात आहे. किल्ल्याच्या मुख्य दरवाजाने जातांना बाहेरच्या बाजूला कालिकामातेचे मंदिर आहे. मंदिराच्या आवारातच एक विरगळ व एक तोफ दिसून येते. संपूर्ण किल्ला बघण्यास साधारण दोन तास ते अडीच तासाचा अवधी पुरेसा होतो. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २६ मे इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. चारही बाजूंनी पाण्याने वेढलेले अर्नाळा हे बेट जेव्हा गुजरातचा सुलतान महमूद बेगडा याच्या ताब्यात होते त्यावेळी त्याने या बेटावर इ.स. १५१६ मध्ये एक गढीवजा छोटासा किल्ला बांधला. ही गढी सारसेनिक शैलीच्या कमानींनी युक्त होती अशी पोर्तुगीज दप्तरात नोंद आहे. वसईतील इतिहास अभ्यासक आणि किल्ले वसई मोहीमचे प्रमुख श्रीदत्त राऊत यांच्या म्हणण्यानुसार मात्र या किल्ल्याचे बांधकाम पूर्णत: मराठय़ांनीच केले आहे. महमूद बेगडा नावाचा कोणी सुलतान गुजरातेत अस्तिवातच नव्हता़. मलिक तुघाण नावाचा गुजरातचा सुभेदार होता त्याने समुद्री वाहतुकीच्या देखरेखीसाठी आणि जकात वसुलीसाठी अर्नाळा बेटाचा वापर केला होता. पोर्तुंगीजांनी १५३० साली हा किल्ला जिंकला व नंतर यावर नवीन बांधकाम केले परंतु १६व्या शतकातील पोर्तुगीजांच्या नकाशात या बेटावरील टेहळणीचा एकमेव बुरुज दाखवण्यात आला आहे याचाच अर्थ पोर्तुगीजांचे येथे जुजबी ठाणे होते. इंग्रजी साधनांमधे ह्या बेटाला काऊज आयलॅण्ड म्हणजे गाईंचे बेट असे म्हटले आहे. सुमारे २०० वर्षांच्या पोर्तुंगीज सत्तेनंतर हा किल्ला १७३७ मध्ये मराठ्यांच्या ताब्यात आला व पहिल्या बाजीरावाने खऱ्या अर्थाने या किल्ल्याची बांधणी केली. किल्ला थोरल्या बाजीरावाच्या आज्ञेनेच बांधला गेला हे सिद्ध करणारा अस्सल पुरावा म्हणजे मुख्य दरवाजावरच एक शिलालेख आहे. बाजीराव अमात्य मुख्य सुमति आज्ञापिले शंकरा पाश्चात्यासी वधुनि सिंधु उदरी बांधा त्वरे जंजिरा अशा देवनागरी लिपीतील शिलालेखाच्या ओळींतून बाजीराव पेशव्यानीच किल्ल्याचे बांधकाम करण्याचे आदेश आगाशी या ठिकाणचे सुभेदार शंकराजी केशव फडके यांना दिल्याचे स्पष्ट होते. तसेच या शिलालेखात बाजी तुळाजी या किल्ल्याच्या स्थापत्य विशारदच्या नावाचा उल्लेख मिळतो. २३ मे १७३७ रोजी या कोटाचे काम पूर्ण झाल्याचा शिलालेखात उल्लेख आहे. शनिवारवाडय़ाचे दगड घडविणाऱ्या माणकोजी पाथरवट याचाही या किल्ल्याच्या बांधणीत सहभाग असल्याने किल्ल्याची बांधणी काहीशी शनिवारवाडय़ासारखी झाली असे काही अभ्यासकांचे मत आहे. किल्ल्याच्या बांधकामासाठी आलेल्या खर्चाच्या नोंदी पेशवे दप्तरांत आहेत. इ.स.१७७२ मध्ये अर्नाळा किल्ल्यास मराठयांचे मोठे नौदल असल्याचे संदर्भ मिळतात. इंग्रजांनी १७८१ मधे हा किल्ला जिंकायचा प्रयत्न केला पण किल्ल्यातील सैन्याने तो प्रयत्न परतवून लावला. नंतर सन १८१८ मधे आतील सैन्याच्या प्रचंड प्रतिकारा नंतरच इंग्रजांना हा किल्ला जिंकता आला आणि इतर किल्ल्यांप्रमाणे हा किल्ला देखील इंग्रजांच्या ताब्यात गेला. ---------------------सुरेश निंबाळकर

जिल्हा - पालघर 
श्रेणी  - सोपी 
दुर्गप्रकार - जलदुर्ग

अर्नाळा किल्ला