जिल्हा - बेळगाव

श्रेणी  -  सोपी

दुर्गप्रकार- भुईकोट

भाषावार प्रांतरचना करताना स्वराज्यात असणारा बेळगाव हा मराठी बहुभाषिक प्रांत कर्नाटक राज्याला जोडला गेला. एकेकाळी स्वराज्यात असलेल्या या किल्ल्यांना मी महाराष्ट्रातील किल्ले समजतो व त्यांचा उल्लेख महाराष्ट्रातील किल्ले म्हणुन करत आहे. बेळगाव जिल्ह्यात असलेला असाच एक सुंदर दुर्ग म्हणजे मुद्कावी किल्ला. मुदकावी गाव हे किल्ल्याच्या आत वसलेले असुन हा किल्ला बेळगावपासुन १०७ कि.मी.वर तर रामदुर्ग या तालुक्याच्या ठिकाणापासुन १० कि.मी.अंतरावर आहे. रामदुर्गवरून मुदकावी गावाकडे जाताना एक लहानसा घाट पार केल्यावर दुरूनच संपुर्ण मुदकावी किल्ला नजरेस पडतो. संपुर्ण तटबंदीयुक्त किल्ला व आतील बालेकिल्ला असे संपुर्ण किल्ल्याचे चित्र एका नजरेत सहसा कोठे पहायला मिळत नसल्याने येथुन छायाचित्र घेण्याचा मोह आवरता येत नाही. मुख्य मार्गावरून डावीकडे मुद्कावी गावात वळल्यावर डावीकडे किल्ल्याच्या तटबंदीत दोन बुरुजामध्ये नव्याने बांधलेली मंदिराची कमान दिसुन येते. किल्ल्याचा येथे असलेला दरवाजा पाडुन गावकऱ्यांनी मुर्तींनी सजलेली नवीन सुंदर कमान उभारली आहे पण त्यासाठी दरवाजा पाडला याची हळहळ मात्र वाटत राहते. किल्ल्याचे बांधकाम बाहेरील कोट व आतील बालेकिल्ला असे दोन भागात केलेले असुन संपुर्ण किल्ला साधारण ३८ एकरवर पसरलेला आहे. किल्ल्याच्या बाहेरील तटबंदीत एकुण २० बुरुज असुन यातील काही बुरुज गोलाकार तर काही चौकोनी आहेत. गोलाकार बुरुजावर तोफांसाठी व बंदुकीसाठी झरोके असुन चौकोनी बुरुजांवर केवळ बंदुकीसाठी जंग्या आहेत. या तटबंदीत दोन लहान व दोन मोठे असे एकुण चार दरवाजे असुन दक्षिणेकडील तटबंदीत एकही दरवाजा नाही. किल्ल्याचा आकार खूप मोठा असुन संपुर्ण किल्ला फिरायचा असल्यास ५-६ तास तरी हवेत. पण इतका वेळ भटकंती करूनही तटबंदी व बुरुज वगळता फारसे काही दिसुन येत नसल्याने आपण गडाच्या ठराविक भागाची भटकंती करून संपुर्ण किल्ला पहाणे हे सर्वात उत्तम. आपण गडात प्रवेश करतो त्या कमानीच्या ठिकाणी पुर्वी असलेला दरवाजा पुर्वाभिमुख असुन त्याशेजारील बुरुज चौकोनी आहेत. हे दोन्ही बुरुज आजही शिल्लक आहेत. आपण कमानीतुन गडात प्रवेश न करता सरळ पुढे गेल्यावर गडात प्रवेश करण्यासाठी पडझड झालेला दुसरा लहान दरवाजा पहायला मिळतो. या दरवाजापासुन काही अंतरावर गडाच्या उत्तरपुर्व टोकावर गोलाकार आकाराचा मोठा बुरुज आहे. या बुरुजावर चढण्यासाठी तटावर न जाता तळातून पायऱ्या बांधलेल्या आहेत. बुरुजाच्या वरील बाजुस तोफेसाठी चौथरा असुन मारा करण्यासाठी झरोके व जंग्या बांधलेल्या आहेत. किल्ल्याच्या चार टोकावर असलेले चार व मध्यभागी दोन असे सहा गोलाकार बुरुजावर हे एकसमान बांधकाम आहे. हा बुरुज पाहुन कमानीजवळ यावे व किल्ल्यात प्रवेश करावा. कमानीतून आत शिरल्यावर सरळ रस्त्याने पुढे गेल्यावर आपण बालेकिल्ल्याच्या दक्षिणपुर्व बुरुजाजवळ पोहोचतो. हा बुरुज गडावरील सर्वात अवशेष संपन्न व महत्वाची वास्तु आहे. किल्ल्यावरील हा सर्वात उंच बुरुज असुन या बुरुजावर दोन मोठे शरभ कोरलेले आहेत. तटबंदीची उंची साधारण २५ फुट असुन संपुर्ण तटबंदीत बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या बांधल्या आहेत. रस्त्याने सरळ पुढे गेल्यावर डावीकडे दोन चौकोनी बुरुजामध्ये बांधलेला गडाचा पुर्वाभिमुख दरवाजा दिसतो. दरवाजाच्या बाहेरील बाजुस दगडी कट्टे बांधलेले असुन दरवाजावर कोणतेही कोरीवकाम दिसुन येत नाही. किल्ल्याच्या आतील भागात मोठया प्रमाणात बाभळीची झाडे वाढलेली असुन इतक्या सुंदर किल्ल्याची आतील अवस्था पाहुन वाईट वाटते. बाभळीच्या या काटेरी झुडुपातून वाट काढतच या बुरुजाकडे जावे लागते. किल्ल्यावर भटकंती करताना आम्ही नेहमी मोठ्या आकाराचा अडकित्ता सोबत ठेवतो त्यामुळे अशी झुडपे छाटत वाट काढणे काही प्रमाणात सोपे जाते. या बुरुजावर जाण्यासाठी तटालगत पायऱ्या बांधलेल्या असुन वरील बाजुस लहान बंदीस्त दरवाजा आहे. या दरवाजातून आपण बुरुजावर पोहोचतो. बुरुजाच्या मध्यभागी तोफेसाठी गोलाकार बांधीव उंचवटा असुन त्यावर झेंडा रोवण्याची जागा आहे. किल्ल्यावरील हे सर्वात उंच ठिकाण असुन या बुरुजावरून संपुर्ण बालेकिल्ला तसेच बाहेरील किल्ल्याचा परीसर व तटबंदी असे सर्व अवशेष दिसत असल्याने आपल्या दुर्गभेटीत या बुरुजाची भटकंती आवर्जून करावी. बालेकिल्ल्याच्या पुर्व बाजुस बाहेरील तटबंदीच्या आत मुद्कावी गाव वसले आहे तर दक्षिणेकडील तटबंदीजवळ शाळा आहे. बालेकिल्ला मुख्य किल्ल्याच्या मध्यभागी साधारण २.५ एकरवर पसरलेला असुन बालेकिल्ल्याच्या तटबंदीत एकुण ९ बुरूज आहेत. यातील पुर्व बाजुच्या टोकावर असलेले दोन बुरुज गोलाकार आकाराचे असुन उर्वरीत ७ बुरुज चौकोनी आकाराचे आहेत. उत्तरेच्या तटबंदीत बालेकिल्ल्याला अजुन एक लहान दरवाजा असुन या तटबंदीत तीन ठिकाणी वर चढण्यासाठी पायऱ्या आहेत. बालेकिल्ल्याच्या संपुर्ण तटबंदीला फांजी असुन दोन ठिकाणी तटबंदी वरील बाजुस ढासळली असल्याने फांजीवरून संपुर्ण गडास फेरी मारता येत नाही. बुरुजाच्या दुसऱ्या बाजुस असलेल्या तटावर उतरण्यासाठी वेगळा बंदीस्त पायरीमार्ग असुन यातून खाली उतरल्यावर बुरुजाच्या आत असलेले कोठार पहायला मिळते. बुरुज पाहुन झाल्यावर पुन्हा दरवाजाकडे यावे व पुन्हा झाडीतुन सरळ जाणाऱ्या वाटेने बालेकिल्ल्याच्या पश्चिम तटबंदीकडे जावे. वाटेचा पुढील भाग खडकाळ असल्याने येथे फारशी झाडी नाही. बालेकिल्ल्याच्या पश्चिमोत्तर भागात कातळात खोदलेली खूप मोठी पायऱ्यांची विहीर आहे. विहिरीत आजही पाणी आहे पण वापर नसल्याने पिण्यायोग्य नाही. विहिरीच्या काठावर उंच चौथरा उभारून त्यावर पाणी खेचण्याची सोय केली आहे. गडाच्या सर्व भागात पाणीपुरवठा करण्यासाठी उंचावर हि मोट बांधली आहे. विहिरी शेजारी चौथऱ्यावर एक उध्वस्त मंदीर असुन या मंदिरासोर १५ फुट उंच अखंड दगडात कोरलेली दीपमाळ आहे. गावकऱ्यांनी दक्षिण तटाजवळ नव्याने एक लहान मंदीर बांधले आहे. जे आहे ते मंदीर दुरुस्त न करता नवीन मंदीर बांधणे यातील हुशारी कळून येत नाही. शिवाय आत येण्यासाठी नीट वाटही बनवलेली नाही. आत काटेरी बाभळीची झाडी भयानक वाढलेली असुन इतर काही अवशेष असले तरी दिसत नाही. मंदीर पाहुन बाहेर आल्यावर आपली बालेकिल्ल्याची फेरी पूर्ण होते. येथुन सरळ पुढे चालत गेल्यावर आपण किल्ल्याच्या उत्तरेस असलेल्या तटबंदी जवळ पोहोचतो. तटबंदीजवळ असलेल्या शिवमंदिराचा व विष्णुमंदिराचा गावकऱ्यांनी नवीन पध्दतीने (सिमेंट) जीर्णोद्धार केलेला आहे. शिवमंदिराच्या आवारात दोन घुमटी बांधुन त्यात प्राचीन नागशिल्प व गणेशमुर्ती ठेवलेली आहे. तटबंदीच्या पुढील भागात गडाचा दोन बुरुजात बांधलेला उत्तराभिमुख दरवाजा असुन बुरुजाच्या भिंतीत बुरुजावर जाण्यासाठी जिना बांधलेला आहे. यातून बुरुजाच्या वरील भागात जाता येते. हे दोन बुरुज व दरवाजा मुख्य तटबंदीपासुन थोडे बाहेरील बाजुस बांधलेले असुन आतील बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत. दरवाजा शेजारील तटबंदी फोडुन गडात गाडीरस्ता नेलेला आहे. या दरवाजाबाहेर तटबंदीला लागून भलामोठा बांधीव तलाव आहे. या तलावाच्या काठावर दगडी घाट बांधलेला असुन भिंत घालुन तलावाचे पाणी अडविले आहे. तटबंदीचा एक चौकोनी भाग या तलावात बांधलेला आहे. दरवाजा पाहुन उजवीकडून म्हणजे तलावाच्या दिशेने असलेल्या तटबंदीवरून आपल्या पुढील गडफेरीस निघावे. तलावात बांधलेल्या तटबंदीजवळ आले असता येथुन तलावात उतरण्यासाठी एक कमानीदार दरवाजा व त्यात पायरीमार्ग पहायला मिळतो. येथुन पुढे तटाच्या कडेने आपण बाहेरील तटबंदीत असलेल्या गडाच्या पश्चिमोत्तर बुरुजाजवळ पोहोचतो. या बुरुजाची रचना आपण सुरवातीला पाहिलेल्या बुरुजासारखी आहे. तटबंदीच्या काठाने थोडे पुढे गेल्यावर थोडीफार पडझड झालेली तटबंदी व त्यात असलेला दरवाजा पहायला मिळतो. किल्ल्याच्या बाहेरील तटबंदीची काही ठिकाणी पडझड झालेली असुन या तटबंदीवर फांजी बांधलेली पहायला मिळते. येथुन मागे फिरून शरभ असलेल्या बुरूजाजवळ आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते. हि गडफेरी करण्यासाठी आपल्याला दीड तास लागतो. आज मुदकावी गावाच्या नावाने ओळखला जाणाऱ्या या किल्ल्याला इतिहासात वेगळेच नाव असावे. मुदकावी नावाने या किल्ल्याचा कोणताही इतिहास दिसुन येत नाही. शिवकाळात व नंतरही बहुतांशी काळ हा किल्ला मराठ्यांच्याच ताब्यात होता. गाववाले नेहमीप्रमाणे हा शिवाजी राजाचा किल्ला असल्याची माहीती देतात पण यापुढे काही माहिती मिळत नाही. रामदुर्ग किल्ल्याशी असलेली याची जवळीक पहाता मुदकावी किल्ल्याचा इतिहास रामदुर्ग संस्थानाशी निगडीत असावा.--------सुरेश निंबाळकर

मुडकावी