इंद्राई

जिल्हा - नाशिक

श्रेणी  -  मध्यम

दुर्गप्रकार- गिरीदुर्ग

नाशिक जिल्ह्यात सह्याद्रीच्या सेलबारी-डोलबारी, त्र्यंबक-अंजनेरी, अजंठा-सातमाळा या उपरांगेवर ६५ पेक्षा जास्त किल्ले असल्याने दुर्गभुमी म्हणुन ओळखला जाणारा हा जिल्हा मोठया प्रमाणात प्राचीन मंदिरे व लेणी-गुंफा यांचा वारसा लाभल्याने देवभुमी म्हणुन देखील ओळखला जातो. या देवभुमीत चक्क देवाधिदेव इंद्रदेव यांच्या नावाने ओळखला जाणारा एक किल्ला म्हणजे किल्ले इंद्राई. चांदवड तालुक्यात अजंठा-सातमाळ डोंगररांगेवर असलेला इंद्राई हा एक महत्वाचा किल्ला. प्राचीन काळापासुन उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना चांदवड हा एक महत्वाचा घाटमार्ग होता. त्यामुळे या घाटमार्गावर नजर ठेवण्यासाठी त्याच्या एका बाजुस चांदवडचा किल्ला तर दुसऱ्या बाजुस इंद्राई किल्ला बांधला गेला. घाटमार्गावर असलेले इंद्राई किल्ल्याचे स्थान पहाता त्याचे महत्व लक्षात येते. वडबारे व राजधेरवाडी ही इंद्राई किल्ल्याच्या पायथ्याची गावे असुन वडबारे गावाच्या पुढे राजधेरवाडी आहे. बहुतांशी दुर्गप्रेमी राजधेर व इंद्राई हि भटकंती एकत्र करत असल्याने राजधेरवाडी या गावात मुक्काम करून तेथुनच गडावर चढाई करतात. असे असले तरी वडबारे गाव व राजधेरवाडी या दोन गावामध्ये असलेली अहिल्यादेवी वस्ती येथुन गडाच्या पायऱ्यापर्यंत जाण्यासाठी सर्वात जवळचा व सोप्पा मार्ग आहे. या वाटेने गेल्यास आपला गडावर जाण्याचा पाउण तासाचा व उतरण्याचा अर्धा तास इतका वेळ वाचतो पण अहिल्यादेवी वस्तीपर्यंत जाण्यासाठी खाजगी वाहन सोबत असायला हवे अन्यथा वडबारे गाव किंवा राजधेरवाडी येथुन अहिल्यादेवी वस्तीपर्यंत पायी जावे लागते. इंद्राई किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले वडबारे व राजधेरवाडी हि गावे चांदवड या तालुक्याच्या ठिकाणापासुन अनुक्रमे ६ व १० कि.मी.अंतरावर असुन नाशिक शहरापासुन ७० कि.मी. अंतरावर आहे. राजधेरवाडी हे गाव राजधेर व इंद्राई किल्ल्याच्या कुशीत वसलेले असुन राजधेरवाडीत प्रवेश करताना उजव्या बाजुस राजधेर किल्ला व डाव्या बाजुस इंद्राई किल्ला नजरेस पडतो. गावातून एक कच्चा रस्ता इंद्राई किल्ल्याच्या डोंगराकडे जातो. येथुन गुराढोरांच्या मळलेल्या वाटेने सुमारे अर्धा तास चढाइ केल्यावर एक पठार लागते. येथून इंद्राई किल्ल्याच्या कातळ भिंतीखालुन डाव्या टोकाला येण्यास साधारण १ तास लागतो. या टोकावरच वडबारे गाव व अहील्यावस्ती येथुन येणारी वाट मिळते. या ठिकाणी चिंचेचे झाड असुन येथे गोलाकार घुमट असलेले दगडी बांधकामातील पुरातन मंदीर आहे. या मंदिराला स्थानिक लोक सतीचे मंदीर म्हणुन ओळखतात. मंदिरात नव्याने एक भग्न मुर्ती ठेवलेली असुन मंदिरासमोरील भागात दिवा लावण्याची सोय असलेले एक समाधीशिळा पहायला मिळते. मंदिराशेजारी झाडीने भरलेली एक दगडी बांधकामातील विहीर असुन मंदिराच्या समोरील भागात काही अंतरावर बुजलेले लहानसे तळे आहे. या तळ्याच्या आसपास काही कोरीव दगड पहायला मिळतात. येथुन खाली उतरत गेलेली डोंगरसोंड खालील भागात दोन दिशांना विभागली असुन काहीशी डावीकडे वळुन पुन्हा सरळ उतरत जाणारी सोंड खाली अहील्या वस्तीमध्ये उतरते तर उजवीकडे वळलेली सोंड थेट वडबारे गावाच्या दिशेने जाते. अहील्यादेवी वस्तीतील गुरे या पठारावर चरण्यासाठी येत असल्याने हि वाट पुर्णपणे मळलेली आहे. आपण फक्त किल्ला नजरेसमोर ठेवुन वाटचाल करायची. राजधेरवाडीतून मंदिरापर्यंत येण्यासाठी अडीच ते तीन तास तर अहील्यावस्तीतून दीड ते दोन तास लागतात. मंदिराकडून वर किल्ल्याकडे पाहीले असता किल्ल्याच्या खाली असलेल्या टेकडावर भगवा फडकताना दिसतो. मंदिरापासुन अर्ध्या तासाच्या चढाई करून टेकडीवर आल्यावर येथील सपाटीवर काही प्रमाणात बांधकामाचे अवशेष दिसुन येतात. या ठिकाणी उघडयावरच मारुतीरायाची मुर्ती असुन हे ठिकाण म्हणजे किल्ल्याखालील बंदीस्त मेट असावे. बारकाईने पाहिल्यास या ठिकाणी आपल्याला बांधीव पायऱ्या, तटबंदी व बुरुजाचा गोलाकार पाया दिसुन येतो. येथुन किल्ल्याकडे पाहीले असता समोरच उभा कातळ खोदुन त्याची खिंड बनवुन त्यात कोरलेल्या पायऱ्या नजरेस पडतात. पायऱ्यांच्या सुरवातीस असलेला दरवाजा व त्याच्या आसपासचे बांधकाम ब्रिटीश काळात सुरुंग लावुन तोडलेले आहे. पण आसपासच्या गावातील गुरे चरण्यासाठी किल्ल्यावर जात असल्याने गुराख्यांनी या ठिकाणी पायऱ्यापर्यंत दगड रचुन वाट बनवली आहे. या पायऱ्यांच्या खालील बाजुस कातळात कोरलेल्या दोन गुहा असुन एक पाण्याचे टाके आहे. या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य असुन या भागात असलेल्या शिबंदीसाठी हि सोय असावी. आजपर्यंत मी वाचलेल्या पुस्तकातुन किंवा इतर माहीतीमधुन किल्ल्यावर जाण्यासाठी हा एकमेव दरवाजा (मार्ग ) असल्याची माहिती होती पण प्रत्यक्षात मात्र किल्ल्यावर जाण्यासाठी अजुन दोन दरवाजे होते. यातील एक दरवाजा किल्ला वापरत असताना काही कारणास्तव दगडांनी बंदीस्त करण्यात आला आहे तर दुसरा मार्ग (दरवाजा) मात्र कोणीही वापरत नसल्याने दगडमाती कोसळुन बंद होण्याच्या मार्गावर आहे. आम्ही त्या दुसऱ्या मार्गाने किल्ल्यावर जाऊन येताना समोर दिसत असलेल्या पायरीमार्गाने खाली उतरल्याने त्याप्रमाणेच किल्ल्याचे वर्णन केले आहे. समोर दिसत असलेल्या पायऱ्यांच्या खालील बाजूने कड्याला लागुन असलेल्या पायवाटेने १० मिनिटे चालत गेल्यावर आपल्याला कातळात एका सलग रांगेत कोरलेल्या १५-१६ गुहा पहायला मिळतात. यातील काही गुहा ढासळलेल्या आहेत व दोन गुहा प्रशस्त असुन त्यात गावकरी आपली गुरे बांधतात. या गुहांशेजारी पाण्याची टाकी असुन एका गुहेत व्यालाचे शिल्प कोरलेले आहे. एका मोठया गुहेत घोडे बांधण्यासाठी कातळात खुंट कोरलेले असुन पुढील भाग दगडी बांधकामानी बंदीस्त केलेला आहे. या गुहाकडे जाताना वर किल्ल्याकडे पाहीले असता दगडी बांधकामाने बंदीस्त केलेली घळ नजरेस पडते. हा झाला किल्ल्यावर जाण्याचा जुना बंद केलेला मार्ग. या घळीशेजारी कातळात कोरलेला Z आकारातील पायरीमार्ग आहे. घळीच्या बंद केलेल्या दिशेने वर आल्यावर उजवीकडे कातळात दगडमाती पडुन अर्धवट बुजलेला उत्तराभिमुख दरवाजा नजरेस पडतो. या दरवाजातुन वाकुन आत शिरल्यावर दरवाजाच्या उजवीकडे वरील बाजुस कातळात कोरलेली पहारेकऱ्याची देवडी नजरेस पडते. या ठिकाणी पायऱ्यांवर मोठया प्रमाणात दगडमाती साठलेली आहे.याच्या वरील बाजुस कातळात कोरलेला दुसराउत्तराभिमुख दरवाजा असुन येथे देखील पहारेकऱ्यासाठी कातळात लहानशी बैठक कोरलेली आहे.येथे कातळात एक लहान गोलाकार खिडकी कोरलेली असुन त्या खिडकीतुन खालील दरवाजावर तसेच दरवाजाच्या खालील भागात असलेल्या पाण्याच्या टाक्यावर नजर ठेवता येते. येथुन १०-१२ पायऱ्या चढुन आपण कातळात कोरलेल्या तिसऱ्या पुर्वाभिमुख दरवाजापाशी पोहोचतो. येथुन पुढील घळीवजा मार्ग पुर्णपणे कातळात कोरून काढलेला असुन खालील बाजुने दगडांनी बांधुन काढला आहे. या फरसबंद वाटेखाली पाणी जाण्याचा मार्ग ठेवण्यात आला आहे पण त्याची निगराणी नसल्याने या वाटेवर दगडमाती जमा झालेली आहे. वाटेच्या शेवटी गडावर प्रवेश करताना असलेला दरवाजा पुर्णपणे नष्ट झाला असुन त्याची केवळ तळातील चौकट शिल्लक आहे. दरवाजाच्या आतील बाजुस लहानशा गुहेच्या तोंडावर विटांचे बांधकाम केलेले मंदीर पहायला मिळते व येथून आपला गडावर प्रवेश होतो. या वाटेच्या पुढील बाजुस काही अंतरावर बंद केलेल्या घळीच्या तोंडाकडे जाणारी वाट आहे पण या वाटेवर मोठया प्रमाणात झाडी वाढलेली आहे. चार दरवाजांची साखळी पार करून आपण गडाच्या दुसऱ्या टप्प्यावर असलेल्या प्रशस्त पठारावर पोहोचतो. यातील पहिला टप्पा म्हणजे आपण सुरवातीला पाहिलेल्या पायरीमार्गाने गडावर आल्यावर सुरवातीस खालील बाजुस लागणारे पठार. त्या मार्गाने आपण खाली उतरणार असल्याने डावीकडे वळुन बालेकिल्ल्याच्या दिशेने चालण्यास सुरवात करावी. किल्ल्यावर मोठया प्रमाणात अवशेष असल्याने जाताना कड्याच्या डावीकडून व येताना उजवीकडून म्हणजे राजधेर किल्ल्याच्या बाजूने आल्यास सर्व अवशेष पाहुन होतात. पठाराच्या या सपाटीवर मोठया प्रमाणात घरांचे चौथरे व इतर अनेक कोरीव अवशेष पहायला मिळतात. पठाराच्या टोकाला एका मोठया वाड्याचे अवशेष असुन या वाड्यातील हमामखान्याची इमारत आजही आपले अस्तित्व टिकवुन आहे. या इमारतीच्या उजवीकडील टेकाडात उताराच्या बाजूने आपल्याला ५-६ पाण्याची टाकी पहायला मिळतात.या टाक्यांच्या पुढील बाजुस खांबावर तोललेल्या तीन गुहा आहेत. या गुहांकडून समोर उभा असलेला साडेतीन रोडग्यांचा डोंगर दिसतो. हा डोंगर व इंद्राई किल्ला याच्या बेचक्यातच खाली जुने इंद्राई गाव वसले होते पण नंतर ते तेथून आसपासच्या गावात स्थलांतरित झाले. येथुन या गावात असलेले प्राचीन मंदिर व काही वास्तु नजरेस पडतात. या गुहा पाहुन कातळावर कोरलेल्या काही पायऱ्या चढुन आपण टेकडीच्या वरील भागात येतो. येथे टेकडीच्या कातळात एका सलग रांगेत कोरलेल्या २०-२२ लेणीवजा गुहा आहेत. मध्यभागी दरवाजा व शेजारी दोन खिडक्या अशी रचना असलेल्या या गुहा आतील बाजुने दरवाजाने एकमेकास जोडलेल्या आहेत. गुहांच्या बाहेरील दालनात असलेल्या खांबावर नक्षीकाम केलेले आहे. पावसाळा वगळता यातील काही लेण्यात रहाता येणे शक्य आहे. यातील शेवटच्या गुहेत पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. या लेणी समूहाच्या पुढील भागात खांबावर तोललेली अजुन एक प्रचंड मोठी गुहा असुन या गुहेत मोठया प्रमाणात चिखल साठलेला आहे. या गुहेच्या वरील बाजुस कातळात कोरलेली पाण्याची दोन कोरडी टाकी असुन येथुन पायऱ्या चढुन गुहा समूहाच्या वरील भागात गेल्यावर आपण पुन्हा सपाटीवर येतो. येथे समोरचा कातळात कोरलेला व दरीच्या काठाने दगडी बांधकामाने बंदिस्त केलेला प्रचंड मोठा तलाव आहे. या तलावाकडे जाताना कातळात एका सरळ रेषेत कोरलेले ३०-३२ खळगे पहायला मिळतात.तलावात पाणी जास्त झाल्यावर ते चरातुन बाहेर निघावे यासाठी हा चर खोदण्यात आला असावा जो काही कारणास्तव अर्धवट राहिला असावा. तलावाच्या काठावर कातळात एक लहान गुहा कोरलेली असुन काही अंतरावर दुसऱ्या मोठया गुहेत शिवमंदिर कोरलेले आहे. द्वारमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी या गुहामंदिराची रचना असुन सभामंडपामधील खांबावर नक्षीकाम केलेले आहे. गाभाऱ्यात शिवलिंग असुन द्वारमंडपात दगडी नंदी आहे. गाभाऱ्याच्या बाहेर असलेल्या एका कोनाड्यात गणपतीची तर दुसऱ्या कोनाड्यात भैरवाची मुर्ती आहे. या मंदिरात ५-६ माणसे सहजपणे राहु शकतात. मंदिराच्या डावीकडुन वरील भागात असलेल्या टेकडावर चढून आल्यावर आपण माचीच्या सर्वात उंच भागात पोहोचतो. येथे कातळात कोरलेला अजुन एक तलाव असुन या तलावात उतरण्यासाठी कातळातच पायऱ्या कोरलेल्या आहेत. येथे समोरच एका मंदिराचा चौथरा व त्यावरील अवशेष पहायला मिळतात. तलावाकडून वरील टेकडीच्या दिशेने जाणारी वाट आपल्याला गडाच्या सर्वोच्च भागात असलेल्या बालेकिल्ल्यावर घेऊन जाते. बालेकिल्ल्यावर मोठया प्रमाणात जंगल व निवडुंगाचे रान वाढले असुन त्यातून कोणतेही अवशेष दिसुन येत नाहीत. किल्ल्याचा हा माथा समुद्रसपाटीपासुन ४४०८ फुट उंचावर असुन इंद्राईची माची पुर्वपश्चिम साधारण ६० एकरवर पसरलेली आहे. गडमाथ्यावरुन देवळा-सटाण्यापर्यंतचा प्रदेश तसेच चांदवड,कांचन-मांचन, मांगीतुंगी, न्हावीगड, कोळधेर, राजधेर, धोडप, साल्हेर, चौल्हेर हे किल्ले नजरेस पडतात. बालेकिल्ल्यातुन खाली आल्यावर पुन्हा मंदिराच्या अवशेषापासून सुरवात करावी. या वाटेने सरळ जाताना डावीकडे एक मोठा बंदिस्त उंच चौथरा दिसुन येतो. हा चौथरा म्हणजे किल्ल्याची सदर असावी. याच्या खालील बाजुच्या टप्प्यावर आल्यावर सपाटीवर कातळात खोदलेली दोन टाकी दिसतात. या टाक्याच्या खालील बाजुस सपाटीवरच अजुन एक मातीने बुजलेले टाके आहे. या भागात मोठया प्रमाणात सपाटी असुन कातळावर एका रेषेत समांतर बांधकामाच्या खुणा व कातळातील खळगे दिसतात. मध्ययुगीन काळात इंद्राई किल्ल्यावर बाजारपेठ असल्याचे स्थानिक लोक सांगतात कदाचित या बाजारपेठेच्याच खुणा असाव्यात. येथुन सरळ वाटेने पुढे न जाता डावीकडे कड्याच्या दिशेने खाली उतरावे व कड्याच्या काठानेच पुढे निघावे. साधारण १० मिनिटे चालत आल्यावर आपल्याला खाली उतरत जाणाऱ्या कातळात कोरलेल्या पायऱ्या दिसतात. या पायऱ्याच्या वरील बाजुस ५-६ गुहांचा कातळात कोरलेला समूह असुन या गुहांकडे जाणारी वाटदेखील कातळात कोरलेली आहे. या गुहा वापरात नसल्याने काही गुहांमध्ये पाणी साठले आहे. या गुहा जमिनीच्या खालील भागात असुन एका गुहेत दगडी बांधकाम केलेले आहे. गुहा पाहुन सरळ खाली आल्यावर आपण किल्ला पाहण्यास सुरवात केलेल्या पठारावर येतो. येथुन सरळ खाली उतरत गेल्यावर खालील टप्प्यावर आपल्याला घरांचे अवशेष व त्याशेजारी कातळात कोरलेले बांधीव मध्यम आकाराचे टाके दिसुन येते. येथुन डाव्या बाजूने खाली उतरत जाताना कातळात कोरलेल्या पायऱ्या लागतात. या पायऱ्या उतरून आपण किल्ल्याच्या दरवाजात पोहोचतो. पुर्वाभिमुख असलेला हा दरवाजा आज पूर्णपणे ढासळला असुन याची केवळ चौकट शिल्लक आहे. दरवाजाच्या आतील बाजुस दगडी बांधकामातील पहारेकऱ्याची देवडी आहे. दरवाजाच्या बाहेरील बाजुस डावीकडे भिंतीवर कातळात कोरलेला ९ ओळींचा पर्शियन भाषेतील शिलालेख आहे. उघडयावर असल्याने याची मोठया प्रमाणात झीज झाली आहे. या शिलालेखाचे वाचन झाले असुन यात शहाजहान बादशहाचा सरदार अलावर्दीखान तुर्कमान याने इ.स.१६३६ला हा किल्ला व सोबत दोन महीन्यात चांदवड,राजधेर, कोळधेर,कांचना, मंचना,रवळ्या,जवळ्या,मार्कड्या,अहीवंतगड,अचलागड, रामसेज किल्ले जिंकल्याचा उल्लेख आहे. दरवाजातून खाली उतरत जाणारा साधारण १५० पायऱ्यांचा हा मार्ग पुर्णपणे कातळात कोरून काढलेला आहे. या मार्गावर काही ठिकाणी बांधकामाच्या खुणा दिसुन येतात. येथुन १०० पायऱ्या उतरून गेल्यावर हा मार्ग काटकोनात डावीकडे वळतो. या वळणावर कातळभिंतीत पहारेकऱ्यासाठी लहानशी गुहा कोरलेली आहे. या वाटेवर गोलाकार कमळाचे फुल कोरलेला एक सुंदर दगड पडलेला आहे. हा येथे कोठून आला? पायऱ्या उतरून खाली मारुतीच्या मुर्तीकडे आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते. पायथ्यापासुन सुरवात केल्यानंतर संपुर्ण गडमाथा फिरून पायथ्याशी परत येण्यास ७ तास लागतात. प्राचीन काळापासुन उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना चांदवड हा एक महत्वाचा घाटमार्ग होता. त्यामुळे या घाटमार्गावर नजर ठेवण्यासाठी चांदवड व इंद्राई किल्ला बांधला गेला व त्याच्या सरंक्षकफळीत राजधेर, कोळधेर व मेसणा या किल्ल्यांची निर्मिती केली गेली. गडाचा कातळात कोरलेला मार्ग, गुहा व गडावरील खांबटाकी गडाच्या प्राचीनतेची साक्ष देतात. या किल्ल्याची निर्मिती बहुदा सातवाहन काळात झाली असावी. किल्ल्यावरील अवशेष पहाता हा या भागातील महत्वाचा किल्ला असावा तसेच या किल्ल्यावर मोठया प्रमाणात वस्ती असावी. निजामशहाचा किल्लेदार गंभीरराव याच्या ताब्यात असलेला हा किल्ला शहाजहान बादशहाचा सरदार अलावर्दीखान याने ५० हजारांच्या मोबदल्यात १७ मार्च १६३६ रोजी ताब्यात घेतला. शिवकाळात या किल्ल्याचे कोणतेच उल्लेख येत नसल्याने हा बहुदा मोगलांच्याच ताब्यात असावा. त्यानंतर १५ एप्रिल १८१८ रोजी चांदवड किल्ला जिंकल्यावर कॅप्टन म्याकडॉवेल याने इंद्राई किल्ला ताब्यात घेतला. -------सुरेश निंबाळकर टीप- किल्ल्याच्या आसपासच्या गावातील लोक त्यांची निरूपयोगी जनावरे किल्ल्यावर सोडून देतात. वर चारा-पाणी असल्याने काही दिवस जगुन हि जनावरे मरतात पण बरेच दिवस माणसांचा सहवास नसल्याने हि जनावरे आक्रमक देखील होतात. त्यामुळे किल्ल्यावर फिरताना त्यांचे लक्ष विचलित होईल असे करू नये.