चंद्रगड

जिल्हा - रायगड

श्रेणी  -  मध्यम

दुर्गप्रकार- गिरीदुर्ग

सह्याद्रीच्या डोंगररागेतील घनदाट जंगलात जावळीचा प्रदेश वसला आहे. या जावळीच्या प्रदेशात असलेली गावे आजही दुर्गम असुन या गावामध्ये जाणारे मार्गही तितकेच दुर्गम आहेत. जावळीच्या या खोऱ्यात सह्याद्रीच्या येन पायथ्याशी वसलेले ढवळे हे असेच दुर्गम गाव. या गावाच्या नावाने गावामागे सह्याद्रीच्या माथ्यावर वसलेला एक दुर्गम गड म्हणजे ढवळगड उर्फ चंद्रगड उर्फ गहनगड. चंद्रगड या नावाने जास्त प्रसिद्ध असलेल्या या गडास भेट देण्यासाठी आपल्याला अर्थात पायथ्याचे ढवळे गाव गाठावे लागते. रायगड जिल्ह्यामधील पोलादपूर तालुक्यात असलेल्या या गावात जाण्यासाठी पोलादपुर- कापडेफाटा -उमरठ-ढवळे असा गाडीमार्ग आहे. मुंबई-पोलादपूर हे अंतर १८५ कि.मी.असुन पोलादपूर- महाबळेश्वरला मार्गावर ६ कि.मी.वर कापडे फाटा आहे. या फाट्यावरून १० कि.मी.वर तानाजी मालुसरे यांची समाधी असलेले उमरठ गाव असुन त्यापुढे कच्च्या रस्त्याने ७ कि.मी. अंतरावर ढवळे गाव आहे. ढवळे गावात जाण्यापुर्वी सर्वप्रथम उमरठ गावात जाऊन तानाजी मालुसरे व शेलारमामा यांची समाधी व स्मारकाचे दर्शन घेता येते. स्मारकासमोर असलेल्या एका दुकनदाराकडे मराठा तलवार व पट्टा पहायला मिळतात. पोलादपुर येथुन उमरठ येथे येण्यासाठी दिवसाला ४ बस आहेत तर ढवळे गावात जाण्यासाठी २ बस आहेत. यातील एक बस वस्तीची आहे. दुरवरून दिसणारा चंद्रगड ढवळे गावापाठील टेकडीमागे असल्याने गावात गेल्यावर मात्र नजरेस पडत नाही. ढवळे गावात रस्ता जेथे संपतो तेथे समोरच शाळा व विठ्ठल मंदीर आहे. शाळेच्या खालील बाजुस काही अंतरावर पाण्याचा हातपंप आहे. गावात रहायचे असल्यास येथे रहाण्याची व गावात जेवणाची देखील सोय होते. ढवळे घाटाच्या भटकंतीचे सध्या व्यापारीकरण झाले असल्याने गावात वाटाड्याचे व जेवणाचे अव्वाच्या सव्वा पैसे सांगीतले जातात त्यामुळे नंतरचा वाद टाळण्यासाठी ते आधीच ठरवून घेणे. गावाच्या पूर्वेकडे चंद्रगड किल्ला दक्षिणोत्तर पसरलेला असुन वाटेचा सुरवातीचा टप्पा वगळता वाट चांगलीच मळलेली असुन चुकण्याची शक्यता नाही. पण मुख्य वाटेला लागण्यापूर्वी असलेली वाट चांगली समजून घ्यावी अन्यथा कुणाला तिथपर्यंत सोबत घ्यावे. गडावरील पाणी उपसा नसल्याने तितकेसे पिण्यायोग्य नाही त्यामुळे गावतुनच पुरेसे पाणी भरून घ्यावे. गावातील मंदिरामागून किल्ल्याकडे जाणारी वाट आहे. गावापुढे दहा मिनिटांच्या चालीवर एक ओहोळ पार करून शेलारवाडी नावाची लहानशी कोळीवस्ती आहे. या वस्तीतुन थोडे पुढे आल्यावर टेकडीमागे असलेला किल्ल्याचा डोंगर दिसायला सुरवात होते. वाडीतुन टेकडीला वळसा घालत काही शेते पार केल्यानंतर हि वाट उजवीकडे जंगलात घुसते. इथवर गावकऱ्यांचा वावर असल्याने या वाटेवर अनेक फाटे आहेत पण जंगलात शिरल्यावर मात्र एकच ठळक वाट गडावर जाते. या वाटेने अर्ध्या तासात आपल्याला ओढा असलेली खिंड लागते. या खिंडीला म्हसोबाची खिंड म्हणतात. हा ओढा पार करून समोरील टेकडीवरून खऱ्या अर्थाने गडचढाईला सुरवात होते. येथे गावकऱ्यांनी चंद्रगड दर्शन असा फलक लावलेला आहे. या चढावावर काही प्रमाणात घसारा असून अर्ध्या तासाचा उभा चढ असणारी हि वाट चांगलीच थकवणारी आहे. वाट चांगली मळलेली असुन दिशादर्शक बाणाऐवजी झाडांवर ॐ नम: शिवायच्या पाटया लावलेल्या आहेत. या वाटेने अर्ध्या तासात आपण झाडावर झेंडा रोवलेल्या लहानशा सपाटीवर येतो. या ठिकाणी गवतात लपलेला लहान चौथरा असुन येथे गडाचे मेट आहे. स्थानिक लोक याला झाड्याची चौकी म्हणजेच झडतीची जागा म्हणुनच ओळखतात. येथुन गडावर जाण्यासाठी कातळातील मार्ग सुरु होतो. या वाटेवर काही ठिकाणी कातळात लहान-लहान पायऱ्या कोरलेल्या आहेत. या वाटेने गडाच्या धारेवरून आपण गडात प्रवेश करतो. येथुन गडाचा डोंगर व समोरचा डोंगर यामध्ये असलेला म्हसोबा खिंडीचा माथा पहायला मिळती. या शेवटच्या टप्प्यात एक छोटा कातळटप्पा पार करून आपण गडावर पोहोचतो. येथे गवतात लपलेले तटबंदीचे विखुरलेले दगड व काही लहान चौथरे दिसतात. या ठिकाणी कधीकाळी दरवाजा असावा पण आज त्याच्या काहीही खुणा दिसत नाही. समोर गडमाथ्याकडे पहिले असता कडयाच्या टोकावर कातळात कोरलेली दरवाजाची चौकट दिसते. या भागात काहीही सपाटी नसुन केवळ डोंगराची धार आहे. या धारेवरून माथ्याकडे जाताना कातळात अर्धवट कोरलेला खड्डा असुन त्यापुढे एक चौकोनी खळगा आहे. या खळग्यात एक सुंदर घडीव शिवलिंग असुन काठावर कोरीव नंदी आहे. या दोन्ही गोष्टी बहुदा खळग्यातुन काढलेल्या दगडातच घडवलेल्या असाव्यात. ढवळेश्वर महादेव म्हणुन ओळखले जाणारे हे शिवस्थान परिसरातील लोकांचे श्रद्धास्थान असुन महाशिवरात्रीला येथे लोकांची मोठी गर्दी असते. या काळात गडावर येणारी वाट देखील दुरुस्त केली जाते. य्रेथून पुढे जाताना धारेच्या डाव्या बाजुस डोंगर उतारावर कातळात कोरलेली एकुण पाच टाकी दिसुन येतात. यातील तीन टाकी सुरवातीला असुन दोन टाकी पुढे काही अंतरावर आहेत. सुरवातीच्या तीन टाक्यापैकी दोन टाक्यात पाणी असुन तिसरे कोरडे पडले आहे तर काही अंतरावर असलेली दोन टाकी उतारावर वाहुन आलेल्या मातीने भरलेली आहेत. या टाक्याकडे उतरणारी वाट अत्यंत धोकादायक असुन सोबत दोरी असल्यास दोरी बांधुन या टाक्याकडे जाता येते. येथुन पुढील पायवाटेने पायऱ्यांचा चढ चढत आपण कातळातील दरवाजाने गडमाथ्यावर प्रवेश करतो. ढवळे गावातून इथवर येण्यासाठी २ तास लागतात. गडाचा हा सर्वोच्च भाग समुद्रसपाटीपासून ३००० फुट उंचावर असुन गडावर दिसणारी थोडीफार सपाटी याच भागात आहे. माथ्यावर प्रवेश केल्यावर आपल्याला आयताकृती आकाराचे पाण्याचे टाके दिसुन येते. यात पाणी असले तरी ते पिण्यायोग्य नाही. येथे तटावर भगवा झेंडा रोवलेला असुन टाक्यामागील उंचवट्यावर एक पडीक चौथरा आहे. या चौथऱ्यावर असेले शिवलिंग व इतर अवशेष पहाता हा चौथरा मंदिराचा असावा. गावकरी या ठिकाणी जननी देवीचे मंदीर असल्याचे सांगतात. या भागातील गडाची तटबंदी आजही बऱ्यापैकी शिल्लक असुन त्यात मारगिरी करण्यासाठी जंग्या आहेत. येथुन पायवाटेने गडाच्या उत्तर टोकाकडे जाताना उजवीकडे एका मोठ्या वाड्याचे अवशेष पहायला मिळतात. गडाच्या उत्तर टोकावर एक लहान दरवाजा असुन यातुन खाली उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. यातून खाली उतरल्यावर दरीच्या टोकावर कातळात कोरलेले एक टाके असुन दरीचे टोक तटबंदीने बंदीस्त केलेले आहे. या टाक्याच्या पुढील भागात कातळात कोरलेली एक गुहा असुन या गुहेतुन ढवळे नदीचे पात्र तसेच ढवळे घाटावर नजर ठेवता येते. गुहा पाहुन परत आल्यावर पायऱ्या न चढता दरवाजाच्या उजवीकडून थोडे पुढे गेल्यावर ३ टाकी पहायला मिळतात. यातील दोन टाकी कोरडी तर एकात शेवाळलेले पाणी आहे. हि टाकी पाहुन माथ्यावर आल्यावर आपले दुर्गदर्शन पुरे होते. संपुर्ण गडफेरीस अर्धा तास पुरेसा होतो. गडावर एकुण १० टाकी आहेत पण एकातही पिण्यायोग्य पाणी नाही. हि टाकी पाण्यापेक्षा जास्त बांधकामाचे दगड काढण्यासाठी खोदली गेली असावी. गडमाथ्यावरून मंगळगड,रायरेश्वर, कोळेश्वरची पठारे, महादेवाचा मुऱ्हा, महाबळेश्वर, ढवळे घाट असा दूरवरचा प्रदेश नजरेस पडतो. जावळीचे जंगल म्हणजे नक्की काय हे चंद्रगडला भेट दिल्यावरच जाणवते. महाबळेश्वर डोंगररांगेतील घनदाट जंगलात जावळीचे खोरे वसले आहे. जावळीच्या या खोऱ्यावर पिढीजात राज्य करणाऱ्या मोरे घराण्याला चंद्रराव हि पदवी होती. या चंद्ररावांनी पोलादपूर येथुन महाबळेश्वरच्या मढीमहाल म्हणजे आजचे आर्थरसीटला जाणाऱ्या पुरातन ढवळेघाटावर नजर ठेवण्यासाठी जावळीच्या खोऱ्यात हा किल्ला बांधला व त्याला चंद्रगड नाव ठेवले असावे. काही इतिहासकारांच्या मते गड ताब्यात आल्यावर शिवाजीमहाराजांनी गडाचे ढवळगड नाव बदलून चंद्रगड हे नाव ठेवले. जावळीतील चंद्रराव मरण पावल्याने या गादीसाठी मोऱ्यामधे तंटा उभा राहीला पण शिवाजीराजांनी यशवंतराव मोरे यासाठी मध्यस्ती करुन त्यास चंद्रराव बनवले. शिवाजीराजांनी केलेली मदत विसरुन या चंद्ररावाने आदिलशाहीशी सलोखा वाढवला. महाराजांनी समजावूनही मोरे शत्रुत्वाने वागू लागले. महाराजांच्या राज्यातील काही गुन्हेगार पळून चंद्रराव मोऱ्याच्या आश्रयाला गेले. महाराजांनी त्यांची मागणी केली असता चंद्रराव मोऱ्यांनी ‘जावळीस येणार असाल तर यावे. दारू-गोळा मौजूद आहे. येता जावळी, जाता गोवळी! असे उद्धट उत्तर पाठवले. जानेवारी १६५६ मध्ये महाराजांनी जावळीवर हल्ला करून जावळी ताब्यात घेतली. यावेळी कांगोरीगड, ढवळगड, रायरी हे किल्लेही महाराजांच्या ताब्यात आले. चंद्रगडाची दुरुस्ती करुन त्याचे नाव गहनगड ठेवण्यात आले. संभाजी महाराजांच्या हत्येनंतर रायगड ताब्यात घेण्यासाठी आलेल्या जुल्फीकारखानाने मार्च १६८९ मध्ये रायगडच्या आजूबाजूचे किल्ले व प्रदेश ताब्यात घेतला. त्यावेळी चंद्रगड मोगलांच्या ताब्यात गेला. इ.स १६९० मध्ये छ. राजाराम महाराजांचे अमात्य रामचंद्रपंत यांनी चंद्रगड जिंकून घेतला. इ.स १८१८ मध्ये कनेल प्रौर्थर या इंग्रज अधिकाऱ्याने या भागातील किल्ले ताब्यात घेतले.-------------सुरेश निंबाळकर