वैराटगड 

कृष्णा नदी तीरावर वसलेल्या वाई शहराला प्राचीन इतिहास लाभलेला आहे. प्राचीनकाळी विराटनगरी म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या आजच्या वाई शहराचा कवींद्र परमानंद यांच्या शिवभारत या संस्कृत काव्यग्रंथात वैराटनगरी म्हणुन उल्लेख येतो. वाई परिसरातील डोंगररांगेवर पांडवगड, वैराटगड, कमळगड, केंजळगड, चंदन-वंदन यासारखे किल्ले वसलेले असुन दोन दिवसाची सवड काढल्यास व सोबत खाजगी वाहन असल्यास यातील चार पाच किल्ले सहजपणे पाहुन होतात. यातील वाई शहराचा म्हणजे वैराटनगरीचा पाठीराखा असलेला गड म्हणजे वैराटगड. सातारा जिल्ह्यातील वाई प्रांतात असलेल्या या किल्ल्याला भेट देण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम मुंबई- बंगळुर महामार्गावर पुण्यापासुन ८६ कि.मी. अंतरावर असलेले पाचवड गाठावे लागते. वैराटगडावर असलेल्या महादेव मंदिरात परीसरातील भाविकांचा वावर असल्याने गडाच्या पायथ्याशी असलेल्या व्याहाळी, म्हसवे, सरताळे, व्याजवाडी अशा अनेक गावातुन गडावर जाण्यासाठी वाटा आहेत. गडावर जाणारी जवळची व सोपी वाट व्याजवाडीतील मालुसरे वाडीमधुन जाते. पाचवडहुन कडेगावमार्गे व्याजवाडी हे अंतर ८ कि.मी.असुन येथुन गडावर जाण्यासाठी दोन वाटा आहेत. यातील डोंगराच्या नाकाडावरून वर जाणारी वाट निसरडी असुन मालुसरे वाडीतील मारुती मंदिराजवळून जाणारी वाट सोयीची आहे. वाट चांगली मळलेली असुन या वाटेने गडावर जाण्यासाठी १ तास पुरेसा होतो. गावामागील डोंगरावर साधारण अर्धा तास चढून गेल्यावर कातळात कोरलेल्या काही पायऱ्या लागतात. येथुन सरळ जाणारी वाट म्हसव गावाकडे जाते तर डावीकडील वाट गडावर जाते. या ठिकाणी दिशादर्शक बाण रंगवलेला आहे. या वाटेने अर्ध्या तासात आपण गडाजवळ असलेल्या बांधीव वाटेवर येतो व गडाच्या तटाबुरुजांचे दर्शन होते. या वाटेवर जाण्याआधी डावीकडे झाडीत एक उध्वस्त चौथरा पहायला मिळतो. आपण प्रवेश केलेल्या ठिकाणी उजवीकडे गडाच्या दरवाजाकडे जाणाऱ्या पायऱ्या असुन डावीकडे गडावर येणारा मुख्य बांधीव मार्ग आहे. गडावर येणाऱ्या बहुतांशी वाटा या मार्गावरच एकत्र येतात. आपण प्रथम डावीकडे जाऊन या वाटेवरील अवशेष पाहुन घ्यावे. गडावर येणारा हा मार्ग चांगलाच प्रशस्त असुन त्या वाटेवर गडाच्या कातळात पाच लहानमोठी टाकी कोरलेली आहेत. यातील तीन टाकी गुहाटाकी असुन यातील एका टाक्यातील पाणी गडावर पिण्यासाठी वापरले जाते. यातील चार टाक्यात बारमाही पाणी असते. टाकी पाहुन मागे फिरावे व पायऱ्यांनी गड चढण्यास सुरवात करावी. कडयाच्या काठावर असलेल्या १५-२० पायऱ्या चढुन गेल्यावर आपल्याला गडाच्या दुसऱ्या बाजुने वर येणारी वाट दिसते. या वाटेने ५-६ पायऱ्या खाली उतरल्यावर कातळात कोरलेली लहान गुहा पहायला मिळते. या गुहेच्या पुढील भागात पत्र्याच्या निवाऱ्यात लक्ष्मीमाता मंदीर असुन या मंदिरात शेंदुर फासलेल्या तांदळा स्वरूपातील मुर्ती आहेत. येथुन गडावर जाणारा वळणदार पायऱ्यांचा मार्ग तटावरून माराच्या टप्प्यात असुन काही प्रमाणात बांधीव तर काही ठिकाणी कातळात कोरलेला आहे. या वाटेने २५-३० पायऱ्या चढुन आपण दोन बुरुजात असलेल्या गडाच्या उत्तराभिमुख दरवाजातुन गडावर प्रवेश करतो. दरवाजाची कमान नष्ट झाली असुन केवळ दगडी चौकट व आतील दोन्ही बाजुच्या देवड्या शिल्लक आहेत. वैराटगड समुद्रसपाटीपासून ३८५० फुट उंचावर असुन त्रिकोणी आकाराचा गडमाथा पुर्वपश्चिम ९ एकरवर पसरलेला आहे. गडाचे पश्चिमेकडील टोक म्हणजे लांबलचक सोंड असुन या सोंडेचे टोक बुरुजाने बंदीस्त केले आहे. गडात प्रवेश केल्यावर उजवीकडे दिसणाऱ्या या सोंडेच्या दिशेने आपल्या गडफेरीस सुरवात करायची. या वाटेच्या सुरवातीस मारुतीचे मंदीर असुन या मंदिरात नव्याने स्थापन केलेली मुर्ती असुन मुळ झीज झालेली मुर्ती मंदिराबाहेर एका चौथऱ्यावर ठेवलेली आहे. मंदिराच्या पुढील भागात काही वास्तुंचे अवशेष असुन एक सुकलेले तळे आहे. येथील पायवाटेने सरळ गेल्यावर आपण गडाचा मुख्य भाग पार करून सोंडेवरील भागात येतो. सोंडेचा हा भाग तटबंदी बांधुन गडापासून काहीसा वेगळा करण्यात आला आहे. या भागात काही तुरळक अवशेष पहायला मिळतात. सोंडेवरील भागातील तटबंदी आजही शिल्लक असुन यात बंदुकीच्या माऱ्यासाठी असलेल्या जंग्या पहायला मिळतात. या सोंडेवर असलेली दगडी खाचेची वरील बाजु तटबंदीने बंदीस्त करून या खाचेतुन गडाबाहेर पडण्यासाठी लहानसा मार्ग ठेवला आहे. हा मार्ग गडाचा चोरदरवाजा म्हणुन ओळखला जातो. म्हसव गावातुन येणारी एक वाट या चोर दरवाजातून वर येते. सोंडेच्या टोकावरील बुरुजावर एक घडीव दगड असुन त्यावर काही अक्षरे कोरली आहेत. सोंडेचा हा भाग सुरुंगाने समोरील डोंगरापासून वेगळा करण्यात आला आहे. येथुन मागे फिरल्यावर तटाच्या दुसऱ्या बाजुने गडाच्या मुख्य भागाकडे यावे. या वाटेने जाताना आपल्याला तटातील पाणी जाण्याच्या जागा तसेच एका चौथऱ्यावर सफेद रंगाने रंगवलेला वेताळाचा दगड पहायला मिळतो. गडाच्या मुख्य भागाची तटबंदी चांगलीच रुंद असुन काही प्रमाणात मातीत गाडली गेली आहे. या तटबंदीत एक शौचकुप तसेच तटाला लागुन असलेला एक कोरडा तलाव पहायला मिळतो. या भागात असलेल्या अनेक वास्तुंचे चौथरे पहात आपण पाण्याने भरलेल्या कातळात कोरलेल्या चौकोनी आकाराच्या तलावाजवळ पोहोचतो. या तलावाच्या उजव्या बाजुस असलेल्या तटबंदीच्या बुरुजावर भगवा झेंडा फडकताना दिसतो. या भागात असलेली तटबंदी आजही बऱ्यापैकी शिल्लक आहे. बुरूजासमोर वैराटेश्वरचे लहानसे मंदीर असुन त्यासमोर नव्याने चौथरा उभारून पत्र्याचे छप्पर घातले आहे. या मंदिराच्या भिंतीला टेकून एक विरगळ ठेवलेली असुन आवारात नंदी व तुळशी वृंदावन आहे. वैराटेश्वर मंदिराशेजारी असलेल्या लहान मंदिरात दुसरी विरगळ असुन एक घडीव मुर्ती आहे. येथील तटाला लागुन एक मठ व धर्मशाळा बांधलेली असुन या मठात गगनगिरी महाराजांचे शिष्य राहतात. त्यांच्याकडे ४-५ जणांची जेवणाची सोय होते. गडावरील मारुती मंदिरात व धर्मशाळेत १०-१२ जणांची राहण्याची सोय होते. तटावरून तसेच पुढे आल्यावर अजुन एक शौचकुप पहायला मिळते. तटावरून खाली उतरून दरवाजाच्या दिशेने निघाल्यास वाटेच्या उजव्या बाजुस एक कोरडा पडलेला तलाव तर डावीकडे पाण्याने भरलेले गोलाकार तळे दिसते. येथुन दरवाजात आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते. तटावरून फिरताना पांडवगड, केंजळगड, चंदन-वंदन, नांदगिरी हे किल्ले तर जरंडेश्वर मांढरदेव, खंबाटकी या डोंगररांगा नजरेस पडतात. संपुर्ण गडफेरीस एक तास पुरेसा होतो. चालुक्र्यांच्या पाडावानंतर पन्हाळा-कोल्हापुर भागावर शिलाहारांचे राज्य होते. शिलाहार राजा भोज दुसरा याने बाराव्या शतकाच्या उत्तरार्धात ११७८ ते ११९३ दरम्यान हा किल्ला बांधला असल्याचे इतिहासकार मानतात. शिवकाळात या किल्ल्याचे फारसे उल्लेख येत नसले तरी शिवरायांनी सन १६७३ मध्ये आदिलशाहीकडून वाई प्रांत जिंकला त्यात पांडवगड सोबत वैराटगड देखील देखील स्वराज्यात सामील झाला असावा. किल्ल्याचे उल्लेख येत नसले वाईच्या रक्षणासाठी लष्करी तळ म्हणुन किल्ल्याचा वापर होत असावा. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर आलेल्या मोगल वावटळीत सन १६९९ मध्ये हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. या काळातच गडाचे सर्जागड झालेले नामकरण फारसे रुळले नाही. पुढे १८१८ मध्ये किल्ला इंग्रजांनी ताब्यात घेतला.------------सुरेश निंबाळकर

जिल्हा - सातारा

श्रेणी  -  मध्यम

दुर्गप्रकार- गिरीदुर्ग