महाराष्ट्रातील आठ घळी समर्थांच्या घळी म्हणुन ओळखल्या जातात. हेळवाकची घळ, तारळे (तोंडोशी)घळ, मोरघळ, सज्जनगडची रामघळ, चाफळची रामघळ, चंद्रगिरीची घळ, जरंडेश्वराची घळ आणि शिवथरघळ. समर्थांचा बहुतांशी मुक्काम व दासबोधाचे लिखाण शिवथरघळ येथे झाल्याने दासबोधाची जननी म्हणुन शिवथरघळ प्रसिद्ध आहे. समर्थांनी सांगितलेला व कल्याण स्वामींनी लिहलेला ७७५१ ओव्या, २०० समास व २० दशके असलेला दासबोध ग्रंथ हया घळीतच रचला गेला. समर्थांनी या घळीला सुंदरमठ हे नाव दिले होते. या घळीचे वर्णन करताना समर्थ म्हणतात- गिरीचे मस्तकी गंगा| तेथुनी चालली बळे |धबाबा लोटल्या धारा | धबाबा तोय आदळे ||१|| गर्जती मेघ तो सिंधू|ध्वनी कल्लोळ उठला|कडयासी आदळे धारा|वात आवर्त होतसे ||२|| सुंदर मुर्ती सुंदर गुण | सुंदर कीर्ती सुंदर लक्षण सुंदरमठी देवे आपण | वास केला || सुंदर पाहोन वास केला |दास सन्निध ठेवला |अवघा प्रांतची पावन केला |कृपा कटाक्षे || दरे कपारी दाते धुकटे |पाहो जाता भयची वाटे |ऐसे स्थळी वैभव दाटे | देणे रघुनाथाचे || श्लोकामध्ये वर्णन केल्याप्रमाणे नितांत सुंदर अशा या शिवथरघळला भेट देण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला रायगड जिल्ह्यातील महाड शहर गाठावे लागते. शिवथरघळ महाडपासून साधारण ३५ कि.मी. अंतरावर आहे. मुंबई- गोवा महामार्गावर महाडच्या पुढे सावित्री नदीवरील पुल पार केल्यावर डावीकडे भोरकडे जाणारा वरंध घाटाचा फाटा लागतो. या रस्त्याने भोरच्या दिशेला जातांना डावीकडे शिवथरघळ अशी पाटी लावली आहे. बसच्या शेवटच्या थांब्यापासून शिवथरघळपर्यंत चालत जाण्यास १० मिनिटे लागतात. सह्यादीच्या पर्वतरांगामध्ये छोट्याशा डोंगरावर वाघजई दरीच्या कुशीत हे ठिकाण आहे. काळ नदीचा उगम याच परिसरात होतो. पुढे ही नदी सावित्री नदीला जाऊन मिळते. तिच्या काठावर कुंभे कसबे, व आंबे अशा तीन शिवथर वस्त्या आहेत. सह्यादीच्या कुशीत घनदाट झाडांनी शिवथर परिसर वेढला आहे. शिवथरघळचे सुशोभिकरण करण्यात आले असुन पर्यटकांना चढण्यास सोपं जावं यासाठी पायऱ्या बांधण्यात आल्या आहेत. पायऱ्यांना दोन्ही बाजूला लोखंडी कठडे बांधले आहेत. पायऱ्या चढून गेल्यावर समोरच 'शिवथर घळ सुंदरमठ सेवा समिती'ची इमारत लागते. या इमारतीमध्ये पर्यटकांच्या राहण्याची सोय केली जाते. इमारतीहून पुढे गेल्यावर सरळ जाणारा रस्ता थेट घळीपाशी घेऊन जातो. घळीचा आकार ५०-६० माणसे बसू शकतील इतका मोठा आहे. घळीत समर्थ रामदास स्वामी आणि कल्याण स्वामींची मुर्ती आहे. या घळीच्या समोरच सुंदर धबधबा आहे. घळीच्या वरच्या भागात डोंगरसपाटीवर चंदराव मोरेंच्या वाड्याचे भग्नावशेष पाहायला मिळतात. इथल्या डोंगर सपाटीवरून रायगड, राजगड, तोरणा आणि प्रतापगडाचं दर्शन होतं. जावळी प्रांतात असलेली शिवथरघळ व आजुबाजूचा सर्व परिसर विजापूर दरबाराचे वतनदार असलेल्या मोऱ्यांच्या ताब्यात होता. विजापुर दरबारातून त्यांना चंद्रराव हा किताब होता. घनदाट जंगलात असलेल्या जावळीच्या प्रदेशामुळे मोरे स्वराज्याला पर्यायाने महाराजांना मानायला तयार नव्हते. यामुळे इ.स.१६४८ मध्ये शिवरायांनी जावळीवर हल्ला केला व हा परिसर आपल्या ताब्यात घेतला. यावेळी मुरारबाजी देशपांडे सारखी महत्वाची माणसे स्वराज्यात सामील झाली. इ.स.१६४९ दरम्यान समर्थ रामदास या घळीत वास्तव्यास आले ते इ.स.१६६०पर्यंत म्हणजे जवळपास १०-११ वर्षे या ठिकाणी राहत होते. दासबोधाचा जन्म याच घळीत झाला. इ.स.१६७६ मध्ये दक्षिणदिग्विजयासाठी जातांना छत्रपती शिवाजी महाराज या घळीत समर्थांचा आशीर्वाद घेण्यासाठी आल्याचे सांगीतले जाते. रामदास स्वामी घळ सोडून गेल्यानंतर तिचे महत्व कमी होत गेले व ती लोकांच्या विस्मरणात गेली. इ.स.१७४१ साली दिवाकर गोसाविचे नातू दिवाकर ह्याने घळीत राहून ज्ञानेश्वर माऊलीच्या अमृतानुभवाची प्रत केली होती असा उल्लेख कागदोपत्री सापडतो. त्यानंतर १९३० साली श्री शंकर कृष्ण देव ह्यांनी हि घळ शोधून काढली. समर्थ सेवा मंडळ स्थापन झाल्यानंतर समर्थ रामदासस्वामी दासबोध सांगत आहेत व कल्याण स्वामी लिहून घेत आहेत अशा प्रकारची मूर्तीची स्थापना श्रीधर स्वामींच्या हस्ते माघ शुद्ध अष्टमी शके १८८१ (१९६०) या दिवशी करण्यात आली. ----------------सुरेश निंबाळकर

जिल्हा - रायगड

श्रेणी  -  सोपी

प्रकार- घळ 

शिवथरघळ