पूर्वीचे शुर्पारक म्हणजे आताचे सोपारा व वाच्छाईपूर म्हणजे आताचे वसई ही जागतिक दर्जाची व्यापारी बंदरे होती. सा-या जगाशी येथून दळणवळण चाले. या बंदरांचे महत्त्व ओळखून पोतृगीजांनी येथली सारी किनारपट्टी व येथले पाणकोट तसेच भुईकोट आपल्या ताब्यात घेतले. पोर्तुगीजांचा अंमल येथे सुरू होताच. या लुटारूंनी येथे प्रचंड हैदोस घालण्यास सुरुवात केली. हिंदुंचा छळ, अत्याचार, गुलामगिरी, धर्मपरिवर्तन याला ऊत आला. पुण्यात पेशव्यांच्या कानी पोर्तुगीजांच्या या दहशतीचा माहिती जात होता. शेवटी या प्रकरणाचा कायमचा निकाल लावण्यासाठी श्रीमंत बाजीराव पेशव्यांनी आपले कनिष्ठ बंधू नरवीर चिमाजी आप्पा यांना प्रचंड सैन्य सामग्रीसह पोर्तुगीजांचे पारिपत्य करण्यासाठी वसईला पाठवले. चिमाजी आप्पांनी दोन वर्षाच्या मोहिमेत नुसती किनारपट्टीच नाही तर गिरीदुर्ग, स्थलदुर्गासोबतच म्हणजे छोटेमोठे पाणकोट, भुईकोट जिंकून घेत उत्तर कोकणचा सारा प्रदेश भयमुक्त केला. असाच एक भुईकोट आताच्या पालघर जिल्ह्यातील शिरगाव येथे शिरगाव याच नावाने पेशवे व मराठय़ांच्या पराक्रमाची व गतवैभवाची साक्ष देत आजही ठामपणे उभा आहे. पालघर स्टेशन ते शिरगाव हे अंतर सात कि.मी. एवढे आहे. किल्ल्याच्या तीनही अंगाला कोळी समुदायाची वस्ती आहे. किल्ल्यापाठी पश्चिम दिशेला अथांग अरबी समुद्र पसरलेला असुन पूर्वी सागराचे पाणी या किल्ल्याच्या तटबंदीला लागत असे पण जसजशी मानव वस्ती वाढत गेली तसतसा सागर पाठी सरकत गेला. किल्ल्याचे प्रवेशद्वार पूर्वाभिमुखी असून अतिशय सुंदर व सुबक आहे. एकामागोमाग एक असे दोन दरवाजे भक्कम बुरुजांच्या आधारे उभारलेले पाहण्यास मिळतात. या दोन प्रवेशद्वारांच्या मध्ये पहारेकर्यांससाठी देवड्या आहेत. दोन प्रवेशद्वारांमधील भागात पूर्वीच्याकाळी दोन मजले असावेत. या ठिकाणी वाश्यांसाठी केलेल्या खाचा, भिंतीतील नक्षीदार कोनाडे नजरेस पडतात. दोन्ही दरवाज्यावरील दुसऱ्या मजल्यांवर सुंदर दालने निर्माण करून सहा भव्य खिडक्या ठेवलेल्या आहेत. या बुरुजाच्या माथ्यावर सुंदर घुमट बांधलेले आहेत. पहिल्या दरवाजातून किल्ल्यात प्रवेश करून काटकोनातील दुसरा दरवाजा ओलांडून आपण किल्ल्याच्या मध्यभागी येतो. दरवाजाच्या उजव्या तटावर शिल्प कोरलेले आढळतात. दुसर्याड प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर उजवीकडील भिंतीच्या तळाच्या दगडावर पुसट झालेल्या आकृत्या कोरलेल्या दिसतात; तसेच एका दगडावर १७१४ हे साल कोरलेले दिसते. किल्ल्याच्या पूर्नबांधणीत हे जुन्या काळातील दगड किल्ल्याच्या भिंतीच्या पायात गेले असावेत. प्रवेशद्वाराच्या डाव्या हाताला पाण्यासाठी बांधलेला मोठा हौद आहे. आतील परिसर तसा मोकळा आहे पण भव्य तटबंदीलगत व तटबंदीखाली अनेक वास्तू पाहण्यास मिळतात. त्यात चोर दरवाजा, घोडय़ांच्या पागा, धान्य साठवण्याची दालने,बंदीखाना म्हणजे कारागृहही पाहण्यास मिळते. किल्ल्याच्या भव्य तटबंदीवरून फेरफटका मारतांना दुरवर पसरलेला सागर डोळ्यांत भरतो. उत्तर दिशेस जरा दुरवर असणा-या सातपाटी बंदराचे तसेच नारळ व सुरूच्या बनांचे सुंदर दृष्य पाहण्यास मिळते. या किल्ल्याला एकूण पाच भव्य बुरूज आहेत. चार टोकाला अष्टकोनी बुरुज असून, पाचवा बुरुज प्रवेशद्वाराजवळ असून तो अर्धगोलाकार आहे. तट व बुरूज आजही चांगल्या अवस्थेत आहेत. किल्ला साधारण २०० फूट लांब व १५० फूट रुंद इतक्याच आकाराचा आहे. या किल्ल्याच्या तटबंदीची उंची अंदाजे तीस ते बत्तीस फूट इतकी उंच तर रुंदी आठ ते दहा फूट एवढी आहे. या तटावर चढण्या-उतरण्यासाठी प्रशस्त दगडी जिने आहेत. या किल्ल्याच्या बुरुजांवर असणा-या घुमटांमुळे या किल्ल्याला राजवाडय़ाचे स्वरूप आलेले आहे. हा भुईकोट चांगला दोन मजली उंच आहे. पश्चिम व उत्तर दिशेच्या तटाच्या आत बरीच दालने पाहण्यास मिळतात. उजव्या बाजूस असणा-या बुरुजाच्या तटावर एक तोफ गतवैभवाची साक्ष देत पडलेली आहे. किल्ल्याच्या पश्चिमेकडील तटबंदीत आणखी एक दरवाजा आहे. त्याच्या उजव्या बाजूस तटबंदीत दुमजली खोल्या असून वरच्या मजल्यावर जाण्यासाठी आत मधूनच काढलेला जिना आहे. चोर दरवाज्याच्या उजव्या बाजूस धान्य कोठाराचे अवशेष आहेत. किल्ल्याचे सर्व भाग, बुरुज, तटबंदी, फांजी, जंग्या, जिने, कोठ्या, हौद इत्यादी एकाच ठिकाणी या शिरगावाच्या दुर्गात पाहाता येतात. याशिवाय इतर किल्ल्यांवर न आढळणारे टेहाळणीचे मनोरे व रावणमाड नावाचे दुर्मिळ झाड हे या किल्ल्याचे प्रमुख आकर्षण आहे. रावणमाड या झाडाच्या प्रत्येक फांदीला दोन फांद्या फुटलेल्या आहेत. त्यामुळे हे ताडाचे झाड एखाद्या डेरेदार वृक्षाप्रमाणे दिसते.अशी अजून काही झाडे किल्ल्याच्या बाहेर आहेत. या छोटय़ा किल्ल्याचा इतिहास मात्र रक्तरंजित असून भव्य, दिव्य आहे. महाराष्ट्राला साडेसातशे कि.मी. लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे. ऐतिहासिक काळी या किनारपट्टीवर ८४ बंदरे अस्तित्वात होती. या बंदरातून बोटींमार्फत सा-या जगभर व्यापार चाले. या व्यापारी मालाच्या संरक्षणासाठी, टेहळणीसाठी, जकातीसाठी व आरमारी संरक्षणासाठी तसेच येथील जनतेच्या संरक्षणासाठी सातवाहनांच्या कालापासून प्रत्येक राज्याच्या राजवटीत ठिकठिकाणी भुईकोट व पाणकोट किल्ल्यांची निर्मिती केली गेली. पोतृगिजांनी बांधलेल्या शिरगावच्या किल्ल्यावर छत्रपती संभाजीराजांनी इतर किल्ल्यांच्या बरोबरच हल्ला चढवला होता पण तो त्यावेळी ताब्यात घेता आला नाही. वसईत पोर्तुगीजांच्या वाढत्या क्रूर अत्याचारांची दखल घेऊन वसई पोर्तुगीजांपासून मुक्त करण्यासाठी पुण्याहून श्रीमंत पेशवे चिमाजी आप्पा सैन्यानिशी वसईत येऊन दाखल झाले, त्यावेळी चिमाजी आप्पांनी नुसती वसईच मुक्त केली नाही तर चिवट पोर्तुगीजांच्या वसईला वेढा घालून तलासरीपासून ते वर्सोवा-मढपर्यंतचा मुलुख जिंकून उत्तर कोकणातुन पोर्तुगीजांचे समुळ उच्चाटन केले. पोर्तुगीजांच्या ताब्यातील या शिरगाव किल्ल्यावर चिमाजी आप्पांनी १७ नोव्हेंबर १७३७ला मल्हारराव हरिदास यांना किल्ला ताब्यात घेण्यासाठी पाठवले. एक, दोन दिवस नाही तर डिसेंबर संपत आला तरी शिरगावचा किल्ला फत्ते होत नव्हता. शेवटी मराठय़ांनी २८ डिसेंबरला १७३७ ला शिरगावचा वेढा उठवला. पण लगेचच नव्या कुमकेनिशी नव्या दमाने मराठय़ांनी सन १७३९च्या सुरुवातीला जानेवारीमध्ये शिरगावचा वेढा करकचून आवळला. वेढा जबर आवळून धरल्यामुळे पोर्तुगीजांचा दमच निघाला. २२ जानेवारी १७३९ला पोर्तुगीजांनी मराठय़ांसमोर शरणागती पत्करून शिरगावचा किल्ला मराठय़ांच्या हवाली केला. या युद्धात पराजय होऊन हाती लागलेल्या पोर्तुगीजाना मराठय़ांनी कैद करून बंदिवासात पाठवून दिले. या मोहिमेमुळे शिरगावसह संपूर्ण उत्तर कोकण सन १७३९ मध्ये मराठय़ांच्या ताब्यात आले. १७७२ मध्ये शिरगाव किल्ल्याची दुरुस्ती करण्यात आली. पेशवाईच्या अस्तानंतर इतर गडांप्रमाणे १८१८ मध्ये हा शिरगावचा भुईकोट न लढताच इंग्रजांच्या ताब्यात गेला. तर असा हा छोटेखानी असलेला पण ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेला व नारळाच्या, सुरूच्या बनात लपलेला कोट सागराच्या किनारी भन्नाट वारा आपल्या अंगावर घेत गतवैभवाची साक्ष देत आजही उभा आहे.

जंजिरे शिरगाव

जिल्हा - पालघर 
श्रेणी  - सोपी 
दुर्गप्रकार - सागरी किल्ला