सोंडाई

​​​​​​जिल्हा - रायगड 
श्रेणी  - कठीण   
दुर्गप्रकार - गिरीदुर्ग 

मुंबई -पुणे मार्गावरील कर्जत हे भटक्यांचे आवडते गाव आहे. या गावाच्या आजूबाजूच्या असलेल्या राजमाची, पेठ, सोनगिर, पेब, भिवगड, ढाक आणि भिमाशंकर या किल्ल्यांवर भटकून अनेक जणांनी आपल्या भटकंतीची सुरवात केलेली आहे. कर्जत-चौक रस्त्यावरून दिसणाऱ्या माथेरानच्या डोंगरासमोरील टेकडीवर सोंडाई देवीचे स्थान म्हणजेच सोंडाई किल्ला. रायगड जिल्ह्यातील कर्जतजवळ उभ्या असणा-या सोंडाईला येण्यासाठी पनवेलवरून चौक गाव सोयीचं. चौक-कर्जत रस्त्यात बोरगाव फाट्यावरून आत गेल्यावर मोरबे धरणाच्या जलाशयाच्या बाजूने जाणारा रस्ता सोंडाईवाडीपाशी संपतो. सोंडेवाडी व वावर्ले ही दोन किल्ल्याच्या पायथ्याची गावे आहेत. यातील सोंडेवाडी गाव वावर्ले गावापेक्षा उंचीवर वसलेले आहे. स्थानिकांच्या भाषेत सोंडाईगडाला ‘सोंडाई देवीचा डोंगर असे म्हटले जाते. त्यामुळेच गडावर जायचे आहे असे म्हणण्यापेक्षा सोंडाई देवीच्या दर्शनाला जायचे आहे असे म्हटले की स्थानिकांना पटकन समजते. आपल्याला वाट दाखवायला देखील ते तयार होतात. सोंडेवाडीतूनच गड चढायला सुरुवात होते. गावातून मळलेली वाट किल्ल्यावर जाते पण या वाटेवरूनच एक वाट चांगेवाडीला जाते. ही डाव्या बाजूची वाट टाळून उजव्या बाजूच्या वाटेने चालत आपण १५ मिनिटात एका पठारावर येतो. या वाटेला एका ठिकाणी वावर्ले गावातून येणारी वाट येऊन मिळते. येथुन उजव्या बाजूला निमुळत्या होत गेलेल्या डोंगराच्या माथ्यावर झेंडा फडकताना दिसतो. सोंडाईगडाला जाण्यासाठी हीच खूण पुरेशी ठरते. पुढे वाटेत कातळात खोदलेल्या काही पायऱ्या लागतात. किल्ल्याचा डोंगर प्रथंम उजव्या बाजूला व नंतर डाव्या बाजूला ठेवत आपण डोंगरसोंडेवरून दुसऱ्या पठारावर पोहोचतो. या ठिकाणी पोहोचण्यासाठी सोंडेवाडीतून पाऊण तास लागतो. येथे कातळात खोदलेली दोन पाण्याची जोडटाकं आहेत. या टाक्यांत १२ महीने पाणी असते. उन्हाळ्यात मात्र टाक्यातील पाणी काढण्यासाठी दोरी लागते. या ठिकाणाहून सोंडाईच्या शेजारील गव्हारी नावाचा सोंडाईपेक्षा उंच डोंगर दिसतो. या डोंगरावर मुख्य डोंगरापासून वेगळा उभा असलेला खडक आपले लक्ष वेधून घेतो. पठाराच्या वरच्या बाजूस कातळात खोदलेल्या पायऱ्या आहेत. त्या चढून गेल्यावर डाव्या बाजूस एक सुकलेल टाक आहे तर उजव्या बाजूला गड माथ्यावर जाण्यासाठी लोखंडी शिडीची सोय आहे. या ठिकाणी कातळटप्पा चढण्यासाठी कातळात व्यवस्थित खोबणी बनवलेल्या आहेत. थोडंसं साहस करायचं असेल आणि झेपणार असेल तर त्यांचा वापर करून नाहीतर शिडीने हा १५ फूटी कातळकडा सहज चढता येतो. या प्रस्तरारोहणात या किल्ल्याचं प्राचीनत्व पटवणा-या कातळकोरीव पाय-या आपल्याला सुखावून सोडतात. कातळकडा चढून वर आल्यावर एक लेणी सदृश्य खोदकाम आढळते. उजव्या बाजूस २ पाण्याची टाकी आहेत. त्यातील पहिल टाक मोठ असून त्यात २ दगडी खांब कोरलेले आहेत. या खांबटाक्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. दुसर टाक लहान आहे यातील पाणी पिण्यायोग्य आहे. गडमाथा फारच छोटासा आहे. येथे एका झाडाखाली दोन दगडात कोरलेल्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत. त्यापैकी एक मूर्ती सोंडाई देवीची आहे. सोंडाईदेवीची दगडी मूर्ती म्हणजेच तांदळा असून ती रात्रंदिवस उघडयावरच ऊन, वारा, पाऊस या सा-या अडचणींविरुद्ध तोंड देत कशीबशी उभी आहे. उघडयावरच गावकरी या देवीची मनोभावे पूजा करतात . या देवीच्या समोर माथा टेकवून घ्यायचा. तटबंदी, बुरुज यासारखे किल्ल्यावर कोणतेही अवशेष नाहीत पण येथील निसर्ग सौंदर्यामूळे हा ट्रेक आल्हाददायक व किल्ल्यावरील १५ फूटाच्या कातळ टप्प्यामूळे थरारक होतो. माथ्यावरून पश्चिमेला दिसतो तो इरशाळगड आणि शेजारीच माथेरानचं विस्तीर्ण पठार! गडमाथ्यावरून मोरबे धरण, वावर्ले धरण व आजूबाजूचा विस्तिर्ण परिसर दिसतो. या किल्ल्याचा विस्तार पहाता याचा उपयोग टेहळणीसाठी होत असावा.