​​​​​​​जिल्हा - रायगड 
श्रेणी  - मध्यम   
दुर्गप्रकार - गिरीदुर्ग 

सुधागड पुण्यातून कोकणात उतरणाऱ्या सवाष्णी घाटाचा पहारेकरी. अतिशय प्रशस्त असे पठार असलेला हा एक प्राचीन किल्ला आहे. या परिसरात अस्तित्वात असणारी ठाणाळे लेणी ही २२०० वर्षांपूर्वीची आहेत. यावरून असे अनुमान निघते की सुधागड हा देखील तितकाच जुना किल्ला आहे.पुराणात भृगु ऋषींनी येथे वास्तव्य केल्याचे अनेक उल्लेख आढळतात. याच ऋषींनी भोराई देवीची स्थापना या डोंगरावर केली म्हणून या देवीला "भृगुअंबा, भोरांबा, भोराई" अशी नावे आहेत. श्री भोराई देवीच्या पुरातन मंदिराची भोरच्या पंत सचिवांनी पुनर्बांधणी केली व याच देवीला त्यांनी आपली कुलदैवत म्हणून मानले. पंत सचिवांनी या मंदिराचे सभागृह इ.स. १७५० मध्ये बांधून पूर्ण केले. एखाद्या मोठ्या सत्तेखाली या गडाची मूळ जडणघडण झाली असुन ह्या किल्ल्याने शिलाहार, यादव, बहमनी, मुघल व नंतर मराठा अशा राजसत्ता पाहिल्या. इ.स. १६४८ साली हा किल्ला स्वराज्यात सामील झाला. या गडाबाबत्त असा उल्लेख आढळतो की ‘साखरदऱ्यात मालवजी नाईक कारके यांनी माळ लाविली. सरदार मालोजी भोसले यांच्या हाताखाली जाधव आणि सरनाईक हे प्रथम किल्ल्यावर चढले. या धारकऱ्यांना उभे करून त्यांचे पाठीवर हैबतराव चढले. त्यास संभाजीराव पुढे जाऊन माथा गेले. पंचविसाने पुढे जाऊन गस्त मारिली. बोकडसिलेचा पहारा मारला. पुढे भोराईच्या टप्प्यावरी गेले तो सदरेतून किल्लेदार व लोक धावत आले. हाणहाण झाली त्यासमयी किल्लेदार कामास आले. उपरांतिक जाऊन सदर काबीज केली. शिवरायांनी या गडाचे भोरपगडावरून सुधागड असे नामकरण केले. नारो मुकुंद यांनी शिवरायांना सुधागडला हिंदवी स्वराज्याची राजधानी करावी असे सुचविले होते त्यासाठी सुधागडची पाहणी झाली पण महाराजांनी रायगडाची राजधानी म्हणुन निवड केली. गडाच्या पायथ्याशी असलेल्या पाच्छापूर या गावातच संभाजी महाराज व औरंगजेबाचा बंडखोर मुलगा अकबर याची भेट झाली होती. पाच्छापूर हे पातशाहपूर या नावाचा अपभ्रंश आहे. राजांच्या अष्टप्रधान मंडळात असलेल्यांपैकी अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी चिटणीस त्याचा मुलगा आवजी बल्लाळ आणि हिरोजी फर्जंद या सर्वांना भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी संभाजीराजांनी सुधागड परिसरात असणाऱ्या परली गावात हत्तीच्या पायी दिले. पंत सचिव हे पद मूळ सुरनीस म्हणून ओळखले जायचे. सुरनीस हा शब्द फारसी असून त्याचा अर्थ छत्रपतींनी दिलेल्या सनदा, वराती, हुकुमनामे यावर 'सुर सुद बार' असे शेरे मारणारा. राज्यव्यवस्थेत या कामाच्या प्रमुखालाच सुरनीस असे म्हणू लागले. राजाअभिषेकावेळी पंत सचिव असे नाव देऊन त्या पदावर अण्णाजी दत्तो यांची नेमणूक केली. पंत सचिवांना वर्षाल पाच हजार होन असा पगार असे. छत्रपती संभाजी महाराजांनी गादीवर आल्यावर त्यांच्या विरुद्ध कट कारस्थाने केली म्हणून अण्णाजींचे सचिवपद काढून कैदेत ठेवले व नंतर मुक्त करून त्यांची पुन्हा सचिवपदी नेमणूक झाली. त्यानंतर रामचंद्र नीलकंठ हे पंतसचिव झाले. छत्रपती राजाराम महाराजांनी भोरप्या गडावरील सबनीस नारोमुकुंद यांच्या मुलाला शंकरजी नारायण याला पंतसचिव केले. शंकरजी नारायण याने पुढील काळात अतुलनीय पराक्रम करून मोगली सैन्यापासून राज्याचा बचाव केला. इ.स. १७१४ च्या सुमारास छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना सचिवपद वंशपरंपरेने दिले. त्यानंतर त्यांचे वंशज परंपरेने त्या पदावर बसत होते. इंग्रजी अमदानीत पंत सचिवांना संस्थानिक म्हणून मान्यता मिळाली. भोर संस्थानाचे ते राजे झाले. आजही भोर मध्ये पंत सचिवांचे घराणे चालू आहे. पुणे-रायगडच्या सीमेलगत असलेल्या सुधागडचे मूळ नाव भोरपगड. हा किल्ला पाली गावापासून फक्त १० किमीवर आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री शिवछत्रपतींचा पदस्पर्श या गडाला झाला आणि याचे नाव सुधागड ठेवले गेले. सुधागड समुद्रसपाटीपासून साधारणः १८०० फुट उंचीवर असुन दाट झाडीमध्ये लपलेला गड विस्ताराने बराच मोठा आहे. गडावर जाण्यासाठी तीन प्रमुख वाटा आहेत. १.पालीहून नाडसूर/धोंडसे गावी पोहचून आपल्याला येथून दगडी पायऱ्यांच्या मार्गाने गडावर पोचता येते. इथली वाट झाडीतून असल्यामुळे सुखद आहे, पण येथून चढण्यास अंदाजे २.५ ते ३ तास लागतात. २.तेलबैला जवळून उतरणारा सवाष्णीचा घाट हा आपल्याला याच मार्गावर घेऊन येतो. येथून आपण गडाच्या गोमुखी पद्धतीच्या महादरवाजातून प्रवेश करत थेट भोराई देवीच्या मंदिरात पोचतो. ३.पालीपासून भिरा कडे जाणाऱ्या हमरस्त्यावर ८ किमी वर पाच्छापूर गाव आहे. येथून पुढे ठाकूरवाडी अथवा दर्यागाव वसलेले आहे. येथून एका सोप्या पायवाटेने गडावर २ तासात आपण पोचतो. सर्वसाधारण गडमित्रांना गडावर जाण्यास हा योग्य मार्ग आहे. ठाकूरवाडीतून वर जाताना मध्ये लोखंडी शिडी लागते. पाच्छापूर गावातूनही एक वाट वर येते. या दोन्ही वाटा एका घळीपाशी मिळतात. येथे महाकाय चिलखती बुरुज आपले स्वागत करतात. या घळीतून वर गेल्यावर आपण एका पडक्या दरवाजातून जातो हाच पाच्छापूर कडील दरवाजा. येथून आपण १५ मिनिटे चढल्यावर गडमाथ्यावर पोचतो. सुधागडाचे पठाराचे तीन विभाग होतात. पहिला विभाग म्हणजे वाड्यासमोरील पश्चिमेकडील पठार. या परिसरात मोठ्या प्रमाणात वास्तूंचे अवशेष दिसतात कारण जमीन समतोल असून येथेच तलाव आणि मोठी टाकी आहेत. दुसरा विभाग म्हणजे भोराई देवीचे मंदिर आणि टकमक टोकापर्यंत असलेला परिसर. हा निमुळता असून येथे ४ विशाल कोठारांचे अवशेष आहेत. तर तिसरा भाग म्हणजे पूर्वेकडील परिसर. इकडे एक विशाल बुरुज असून वाढलेल्या जंगलात काही अवशेष आढळून येतात. पाच्छापूर मार्गे चढून गेल्यावर आपण पठारावर पोचतो. येथे तलाव डाव्या बाजूस ठेवून तेलबैला समोर ठेवून सरळ चालू लागलो की १० मिनिटात एका वाड्यात पोचतो. सुधागड किल्ल्यावर असणारा पंत सचिवांचा सरकारवाडा हा इ.स. १७०५ साली बांधलेला आहे. चौसोपी आकाराच्या या मजबूत व भव्य वाड्याची अर्धीच बाजू राहिली होती तथापि श्री भोराई देवस्थान विश्वस्त मंडळाने याची पुनर्बांधणी केली. वाड्याला दोन दरवाजे असून ऐसपैस व्हरांडा आहे. दोन बंद खोल्या आणि एक माडी आहे. या वाड्यात ५० जणांची राहण्याची सोय होते. वाड्याच्या बाजूस एका छोट्या घरात रहाणारी वयस्कर मामी पूर्ण वाड्यात शेण सारवण्याचे आणि वाडा स्वच्छ ठेवण्याचे काम करते. या वाड्यासमोर नव्याने बांधलेली एक धर्मशाळा आहे. पाच्छापूर कडून वाड्याकडे जाताना डाव्या बाजूचा परिसरात मोठ्या प्रमाणात वास्तूंचे अवशेष आणि जोती दिसतात. वाड्याच्या आवारातून बाहेर पडून सरळ चालत गेलो कि टोकावरून आपल्याला सरसगड आणि वातावरण स्वच्छ असेल तर कर्नाळा दिसतो. या पठारावर मोठा तलाव आहे. या तसेच टोकावरून फिरत आपण पाच्छापूर कडे उतरणाऱ्या वाटेकडे गेलो की दगडी पायऱ्या दिसतात. सुधागडावरील मुख्य प्रवेशद्वार म्हणजे महादरवाजा. हा म्हणजे रायगडावरील महादरवाजाची प्रतिकृती जणू. दोन भव्य बुरुजांनी संरक्षित प्रवेशद्वारावर २ सुंदर कोरलेले शरभ आणि बरेच नक्षीकाम. या महादरवाजामध्ये बंदुकसाठी व बाणांसाठी जंग्या आहेत. बुरुजावर उभे राहून पुढील घळीतून येणारा शत्रू सहज टप्प्यात येतो. दरवाजात २ देवड्या आहेत. तसेच चौकटीत खाली पाणी वाहून जायला वाट केली आहे. या महादरवाजा खालील बाजुस अजुन दोन दरवाजांचे अवशेष आढळून येतात. हा परिसर विस्तीर्ण असून येथे तटबंदीच्या बाजूने फिरता येते. डावीकडील बाजूने फिरत गेल्यास आपण झाडाझुडपातून भोराईच्या पठाराकडे येतो. तसेच उजवीकडील वाट बंद असून ती पूर्व बुरुजाकडे जाऊन मिळते. महादरवाजातून खाली उतरलो की अजून दोन दरवाजे पार करून आपण पुढची वाट उतरतो. इथे खूप पडझड झाली असून एक दरवाजा जवळ जवळ नष्ट झाला आहे. या मार्गावर आपल्याला दोन ठिकाणी सातवाहन कालीन दगडात कोरलेली पाण्याची टाकी आढळतात. यातील एका टाक्यावर सैनिकाचे प्रतिक कोरलेले आहे ते तानाजी टाके आणि दुसरे हनुमान टाके. या टाक्यांमधील पाणी स्वच्छ आणि थंडगार आहे. ह्या टाक्याखाली एक मोडकळीला आलेले शिवमंदिर व कासारपेठ मारुती आहे. सुधागड किल्ल्याला आजही पंचक्रोशीत भोराईचा डोंगर म्हणूनच ओळखतात. वाड्यापासून झाडीतून जाणाऱ्या वाटेने आपण भोराईच्या देवळापाशी येतो. यामध्ये २५ जणांची राहण्याची सोय होते. मंदिराच्या आवारात एक दीपमाळ असून त्यावर एक हत्ती कोरला आहे, जणू त्याने आपल्या पाठीवर ती दीपमाळ धरून ठेवली आहे. तसेच मंदिराच्या आवारात जवळ जवळ ३५ वीरगळी आहेत. वाड्याच्या मागील बाजूस एक शिवमंदिर आहे. येथे आपल्याला अनेक देवतांच्या मूर्ती दिसतात. या मंदिराच्या आसपास जंगलात काही अवशेष आढळून येतात. तसेच मंदिराच्या आणि वाड्याच्या मध्ये एक चौकोनी आकाराची विहीर आहे. भोराई मंदिराकडून टकमक टोकाकडे जाताना चार विशाल कोठारे दिसतात. चारही कोठारे समान आकाराची असून त्यांच्यातले अंतरही सारखे आहे. अंदाजे ५ मी रुंद आणि २३ मी लांब अशी ही कोठारे सर्व बाजूने बंद आहेत, फक्त एका बाजूने द्वार आहे. तर बाहेरील चौथरा १२ मी रुंद आणि ४० मी लांब आहे. दोन कोठारांमधील अंतर अंदाजे ७ मी आहे. सुधागड दर्यागावातून चढताना उजव्या बाजूस एक कड्याचे टोक दिसते. हे रायगडाच्या टकमक टोकासारखे दिसते म्हणून यास टकमक असे नाव आहे. यांच्यामधील घळीत प्रतिध्वनी येतो म्हणून याला बोलते कडे असेही म्हणतात. येथे भन्नाट वारा वाहतो. भोराई मंदिरावरून टकमक कडे जाताना वास्तूंचे अवशेष आढळतात. येथून डावीकडे खाली एक पायवाट उतरते जी थेट आपल्याला एका मोठ्या टाक्याकडे घेऊन जाते. इथे आपल्याला एक गोमुख आढळते. पाच्छापूर दरवाजातून आल्यावर दोन मोठे बुरुज दिसतात एक पाच्छापूर कडे तोंड करणारा आणि दुसरा ठाकूरवाडी कडे नजर ठेवणारा. दोन्ही चिलखती बुरुज असून आजही चांगल्या अवस्थेत आहेत. ठाकूरवाडी कडे तोंड करणाऱ्या बुरुजावरून आपण तो परिसर व्यवस्थित पाहू शकतो. भोराई मंदिरावरून महादरवाजाकडे जाताना उजवीकडे जंगलात एक छोटीशी पायवाट जाते. काळजीपूर्वक या वाटेचा मागोवा घेत आपण एका टेकाडापाशी पोचतो. हि पूर्वेकडील बाजू असून येथे पुढे चालत आलो की गडावरील सर्वात मोठा बुरुज आपल्याला आढळतो. हा बुरुज घनगड कडे तोंड करून उभा आहे, आणि थोड्या खालच्या टप्प्यावर आहे. काळजी घेतली तर येथे उतरून हा बुरुज नीट पाहता येतो. पंत सचिवांच्या वाड्यातून भोराई मंदिराकडे जाताना डावीकडे वळल्यास आपण एका पायवाटेने उतरतो. पायवाट उतरून डावीकडे गेलो की बुरुजातून छोट्या दरवाजातून वाकून खाली जाता येते. तसेच उजवीकडे वळल्यास आपण काही पायऱ्या उतरून सलग तटबंदीवरून चालत अगदी टोकापाशी पोचतो. गडाचा विस्तीर्ण परिसरात अनेक ठिकाणी आपल्याला बांधीव टाकी दिसतात. यापैकी वाड्याच्या जवळ तीन मोठी टाकी असून ती मुख्य पाण्याचा स्त्रोत आहेत. एक टाके ३५ x २५ फूट आहे तर दोन जोडलेली टाकी १५ x २५ फुटाची आहेत. यातील सर्वात मोठ्या टाक्यात उतरण्यास सोय आहे. उन्हाळ्यात मधल्या टाक्यातले पाणी पिणे सोयीस्कर. या तीन टाक्यांच्या समोर टकमक टोकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अजून २ ते ३ टाकी आहेत, जी सुकलेली आहेत. तसेच आपल्याला गुप्त दरवाजा परिसरात २-३ टाकी आढळतात. गडावर पाण्याचे अनेक तलाव आढळतात. येथे जंगलही बऱ्यापैकी आहे. आजुबाजूच्या जंगलाच्या परिसरात अनेक प्रकारची औषधी वनस्पती आढळतात. सुधागडावरून समोरच उभा असणारा सरसगड, घनगड, कोरीगड, तैलबैला तसेच अंबानदी व नदीच्या आजुबाजूची गावे हा परिसर दिसतो. सुधागड हा ह्या भागातला चांगल्या स्थितीत असलेला किल्ला म्हणावा लागेल. अगदी स्वातंत्र्यापर्यंत भोर संस्थानाकडे असल्यामुळे त्याची देखरेख नीट झाली होती. त्यापुढे हे ही म्हणावे लागेल की आज जी काही दुरावस्था दिसते ती स्वातंत्र्यप्राप्तीनंतरची आहे. शिवकालीन पत्र सार संग्रह - खंड २---पत्र क्र. १४५९---शके १५९३---इ.स. १६७१-७२---तह “प्रतीपाश्चंद्रलेखेव”जाबिता तह इमारती करणे. सन इसन्नेकारणे इमारती करावयाचा तह केला असें की, गबाळ हुन्नरवंद लावून पैका पावत नाही. हुन्नरवंद गवगवा करिता काम करीत नाहीत. याबद्दल तह केला की, नेमास्तच इमारती करावी - होन. १,७५००० म||| एक लाख पंचाहत्तर हजार होन रास. ५०,००० रायगड, ३५,००० दि|| घरे, २०,००० तळी २ प्रत्येकी १०,०००, गच्ची ५,०००; - किल्ले, १५,०००; तट १०,००० प्रत्येकी - सिंहगड, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, प्रतापगड,पुरंधर, राजगड. ५००० प्रत्येकी प्रचंडगड=तोरणा, प्रसिद्धगड, विशालगड, महिमतगड, सुधागड, लोहगड,सबळगड, श्रीवर्धनगड व मनरंजन. ३००० कोरीगड, २००० सारसगड व महीधरगड, १००० मनोहरगड, ७००० किरकोळ. एकूण १,७५०००. येणेप्रमाणे एक लाख पंचाहत्तर हजार होन खर्च करणे. मोर्तब सूद. दस्तुर राजेश्री पंत म्हणून संग्रह केला. (मर्यादेय विराजते.).

सुधागड