​​​​​​जिल्हा - रायगड 
श्रेणी  - अत्यंत कठीण   
दुर्गप्रकार - जलदुर्ग

उंदेरी

उंदेरी या जलदुर्गावर जाण्यासाठी आपल्याला अलिबागला यावे लागते. अलिबाग ते रेवस या मार्गावर अलिबागपासून ४ कि.मी.अंतरावर थळ गावाचा फाटा लागतो. या फाट्यापासून ३ कि.मी.वर थळ गाव आहे. थळजवळच्या समुद्रकिना-याहून दिसणारी दोन बेटे आपले लक्ष सहज वेधून घेतात यापैकी जवळ दिसणारे बेट म्हणजे उंदेरी तर डाव्या बाजुला थोडे लांब असणारे बेट म्हणजे खांदेरी. थळ बाजारपेठेजवळील किनाऱ्यावरून आपल्याला किल्ल्यावर जाण्यास बोटी मिळू शकतात. थळ बाजारपेठेत सकाळी लवकर आल्यास मासेमारी करून येणा-या बोटी आपल्याला उंदेरी-खांदेरीवर जाण्यास मिळतात. साधारण मध्यम आकाराच्या ५ ते ६ लोक बसू शकतील अशी होडी संपूर्ण खांदेरी- उदेरी दाखवून परत आणतात. उंदेरी किल्ला थळच्या समुद्रकिनाऱ्यावरून १ कि.मी. वर तर खांदेरी किल्ल्याहून पूर्वेला १ कि.मी.अंतरावर आहे. खांदेरी किल्ल्याप्रमाणे उंदेरीवर पण दोन कमी उंचीच्या टेकड्या आहेत. उंदेरी किल्ल्याकडे होडीने जात असतांनाच उंदेरीची मजबूत तटबंदी आणि बुरुज आपले लक्ष वेधून घेतात. खांदेरी किल्ल्यावर ज्याप्रमाणे बोटींना धक्क्याची सोय आहे ती सोय उंदेरीवर नाही. त्यामुळे उंदेरीवर भरती ओहटीची वेळ पाळूनच जावे लागते. ज्या ठिकाणी बोटी लागतात तेथून किल्ल्याच्या तटबंदीवर पडझड झालेल्या दगडांवरून चालत जावे लागते. किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आपण बोटीने जेथे उतरतो त्याच्याच पुढील भागात आहे. प्रवेशदाराची कमान आजही शाबूत असुन दरवाजासमोर पायऱ्या व दगडाची बांधीव वाट आहे. दरवाजावर कोणतेही वास्तुशिल्प नाही. उंदेरीला एकूण दहा बुरुज असुन बहुतेक सर्व बुरुज चांगल्या स्थितीत आहेत व बऱ्याच बुरुजावर तोफा आहे. खांदेरीच्या मानाने हे बेट खूपच लहान असून मध्यभागी पठारासारखे सपाट मैदान दिसते. त्यावर अनेक भुईसपाट झालेल्या इमारतींची जोती शिल्लक राहिलेली दिसतात. मध्यभागी एका वाड्याचे भग्न झालेले अवशेष व दरवाजाची कमान तग धरून शिल्लक आहे. बेटावरून चहूबाजूला कायम अक्राळविक्राळ समुद्र दिसत असतो व त्याला तोंड देत खालच्या अंगाला एक दुहेरी तटबंदीही नजरेस पडते. या तटबंदीला छोटे बुरुज असून शेवटच्या बुरुजावर तीन तोफाही आहेत. दुर्गांवर भटकंती करणा-याना किल्ल्यावर तोफांचे दर्शन तसे दुर्लभच मात्र संपुर्ण उंदेरीवर किल्ल्यावर एकंदर २२ तोफा आहेत. खांदेरीवर पिण्याचे पाणी उपलब्ध आहे पण उंदेरीवर मात्र पाण्याची तीन टाकी असून त्यातील पाणी पिण्यासाठी उपयोगी नाही. किल्ल्यावर काही ठिकाणी खूपच झाडी असून वाटेत एका ठिकाणी तर चक्क झाडाच्या खोडांचा दरवाजा बनला आहे. किल्ल्याच्या दक्षिण तटबंदीध्ये एक लहान दरवाजा असून येथून बाहेर गेले असतांना किल्ल्याच्या मजबूत तटबंदीची आणि बुरुजाची कल्पना येते. किल्ल्याची तटबंदी दोन ठिकाणी पुर्णपणे ढासळलेली असुन भरतीच्या वेळेस समुद्राचे पाणी तेथुन आत शिरते. खांदेरी युद्धात मराठे सैन्य जुमानत नाही हे पाहून इंग्रजांनी जंजिऱ्याच्या सिद्दीची कुमक जोडून घेण्याचे ठरवले पण खांदेरी पाडाव होत नाही हे पाहून संतापलेल्या सिद्दीने उंदेरीवर किल्ल्याचे बांधकाम सुरु केले. एका बाजूने उंदेरीवर किल्ला बांधायचा आणि दुसरीकडे खांदेरीवरील बांधकामाला अडसर करायचा असा दुहेरी कार्यक्रम सिद्दी राबवत होता. दरम्यान जर खांदेरी घेतला तर तो स्वतःकडे ठेवून घेण्याचा सिद्दीचा डाव इंग्रज अधिकारी केग्विनच्या ध्यानी आला आणि इंग्रजांनी सिद्दी हा शिवाजी महाराजांपेक्षा शिरजोर ठरू शकेल या भीतीपोटी खांदेरी मोहिमेचा जोर कमी केला. २४ डिसेंबर १६७९ ला युद्धबंदी होऊन तहाची बोलणी सुरू झाली. १६ जानेवारी १६८० रोजी इंग्रज व मराठ्यांमध्ये तह झाला. मराठ्यांचा चौलचा सुभेदार अण्णाजी याने मराठ्यांतर्फे तहावर शिक्कामोर्तब केले. इंग्रजांनी माघार घेतली तरी सिद्दीने उंदेरीचे बांधकाम पूर्ण केले आणि खांदेरी वर तोफांचा मारा सुरू ठेवला. सुमारे चार-पाच महिने हे चालूच राहिले. त्यानंतर बरीच वर्षे मराठे आणि सिद्दी यांच्या मध्ये खांदेरी - उंदेरीचा ताबा मिळवण्यासाठी आणि टिकविण्यासाठी युद्ध सुरु राहिले. सिद्दीने उंदेरीचे बांधकाम पुर्ण करताच मराठी व्यापारी आणि मच्छिमारांना सतावण्यास सुरुवात केली. संभाजी राजांच्या आदेशानुसार सुमारे दोन-अडीचशे मावळ्यांनी उंदेरीवर शिड्या लावल्या. पण सिद्दीच्या सैनिकांनी हा हल्ला परतवून लावला आणि जवळपास सर्व मावळे मारले गेले. सिद्दीने ८० मावळ्यांची मस्तके कापून माझगावला आणली आणि ती त्याने बंदरावरील ८० खांबांना लावण्याची तयारी सुरु केली, पण इंग्रजांच्या आदेशानुसार सिद्दीला असे करण्यापासून रोखण्यात आले. पुढे ८ मार्च १७०१ रोजी सिद्दी याकूत खानने ‘खांदेरी’ वर हल्ला केला पण मराठयांनी तो परतावून लावला. सन १७१३ मध्ये सरखेल कान्होजी आन्ग्र्यांनी खांदेरी-उंदेरी वर मराठी साम्राज्याचा झेंडा रोवला. शेवटी १७४० ला पुन्हा इंग्रज आणि सिद्दी याच्या तह होवून गड जिंकल्यास तो त्यावरील दारुगोळा आणि शिबंदी, तोफांसह इंग्रजांच्या ताब्यात देण्याचे ठरले. पण रघुजी आंग्रे याने हे प्रयत्न धुळीस मिळवले आणि गडावर आणखी तोफा तैनातीस ठेवल्या. इ स १७५९ साली मानाजी आंग्रे यांच्या मृत्यूनंतर सिद्दीने कुलाब्याचा पाडाव केला. याला प्रत्युत्तर म्हणून माधवराव पेशव्याच्या आदेशानुसार रघुजी आंग्रे यांनी उंदेरीवर हल्लाबोल केला आणि घनघोर युद्धानंतर उंदेरीचा पाडाव केला. १८१८ साली इंग्रजांचे राज्य सुरु झाले तसे या किल्ल्यांचे स्वामित्व इंग्रजांकडे गेले. सुमारे सव्वाशे वर्ष स्वराज्याची साथसोबत करणाऱ्या या किल्ले जोडगळीला इंग्रजांनी त्यांच्या राज्यात सामील करून घेतले.