मुंबई पुणे महामार्गावरून जातांना अनेक किल्ले आपले लक्ष वेधुन घेतात. प्रबळगड, इरशाळ, चंदेरी, माथेरान, कर्नाळा यांच्या संगतीतच एक किल्ला आहे त्याचे नावं माणिकगड. रायगड जिल्ह्यातील कर्जत पनवेल डोंगररांगेतील कर्नाळा, सांकशी, माणिकगड हे तीन भाऊ पण या किल्ल्यांच्या यादीतील माणिकगड हा आडवाटेवरचा देखणा दुर्ग मात्र आजही उपेक्षेचे चटके सोसत उभा आहे. माणिकगडची उंची समुद्रसपाटीपासून २५०० फूट आहे. माणिकगड पातळगंगा एम.आय.डी.सी.च्या जवळ असल्याने तेथे जाण्यासाठी अनेक पर्याय आहेत. माणिकगडला पनवेल किंवा खोपोली मार्गे जाताना आपटे फाट्यामार्गे रसायनीला यावे. रसायनीमधून सावरोली खारपाडा रस्त्याने सावणे गावात यावे. येथवर येण्यासाठी पक्का रस्ता तसेच एस.टी.बसेसची सोय आहे. सावणे गावातुन एक कच्चा रस्ता १ की.मी.वरील मोदीमाळ या जांभिवली धरणा शेजारील वाडीत जातो. हे अंतर पनवेलपासुन २३ कि.मी आहे. पनवेलहून इथपर्यंत येण्यास एक तास पुरतो. पावसाळा सोडुन या वाडीपर्यंत खाजगी वाहनाने जाता येते. माणिकगडला जाण्यासाठी हा सर्वात जवळचा मार्ग असुन इतर वाटेने गेल्यास लागणाऱ्या वेळेपेक्षा एक तास कमी व एक डोंगर चढण्या उतरण्याचे श्रम वाचतात तसेच चुकण्याची शक्यता कमी होते. माणिकगडावर प्रथमच जात असल्यास गावातील एखादा वाटाडय़ा बरोबर घेणे चांगले. मोदीमाळ हि वाडी माणिकगड पठाराच्या पायथ्याशीच असुन गावाच्या मागील डोंगरावर माणिकगड दिसतो.गडाच्या दिशेने चालत निघाल्यावर दहा मिनिटात आपण जंगलात शिरतो व लगेचच खडय़ा चढणीला सुरूवात होते. इथुन डोंगराच्या पठारावर जाण्यास एक तास पुरतो. लांबलचक पठार पार करून आपण किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचतो. या मार्गावरून जाताना डावीकडे एक मारुतीची मूर्ती असलेला चौथरा आहे. किल्ल्याचा डोंगर डावीकडे ठेवत जंगलातून जाणारी ही पायवाट परिसरातील लोकांच्या वावरामुळे बऱ्यापैकी मळलेली आहे. तेथून दाट झाडीतील खड्या चढणीची वाट चढून आपण किल्ल्याला पूर्ण वळसा घालून किल्ल्याच्या गावातून दिसणाऱ्या बाजूच्या विरुध्द बाजूस पोहोचतो. इथपर्यंतचा हा प्रवास निर्धोक असून या संपूर्ण पायपिटीमध्ये माणिकगडाचे हिरवेगार जंगल आपली सोबत करते. माणिकगडाच्या मुख्य पहाडावर दोन सुळके आहेत. किल्ल्याचा मुख्य डोंगर आणि सुळका यांच्यातील घळीतून किल्ल्यावर जाण्यासाठी एक अवघड वाट आहे. पण आपण मात्र दुसरा राजमार्ग धरत किल्ल्याला वळसा घालत पुढे निघावे. माणिकगड व त्याच्या शेजारचा डोंगर यांच्या खिंडीतुन ही वाट किल्ल्यावर पोहोचते. या वाटेने थोडे पुढे गेल्यावर एक घळ लागते. या घळीतून वर चढून गेल्यावर किल्ल्याची तटबंदी व बुरुज दिसायला लागतात. इथुन उध्वस्त तटबंदीतुन आपला गडाच्या खालील भागात प्रवेश होतो. येथे गडाचा दरवाजा असावा कारण किल्ल्याच्या या बाजूच्या कडय़ावर दोन भग्नावस्थेतील बुरूज आणि तटबंदीचे अवशेष आहेत. येथे सपाटीवर पाण्याच एक टाक आहे. त्याच्या बाजूने पुढे जाऊन थोडे चढून गेल्यावर पूर्वेकडून तुटलेल्या तटबंदीतून आपण किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचतो. पायथ्याच्या मोदीमाळ वाडीतुन किल्ल्यावर इथपर्यंत येण्यास २ तास लागतात. किल्ल्यात प्रवेश केल्यावर समोरच चुन्याचा घाण्यासाठी कातळात कोरलेला चर दिसतो. चुन्याच्या घाण्याजवळच त्याची छोटी प्रतिकृती कोरलेली आहे. चुन्याच्या घाण्याजवळून सरळ चालत गेल्यास आपण उत्तराभिमुख प्रवेशव्दारापाशी पोहोचतो. पुर्वी येथून खाली उतरण्यासाठी वाट असावी असे दिसते. गडाचा दरवाजा पहारेकऱ्यासाठी असणाऱ्या देवड्या उध्वस्त झालेल्या आहेत. दरवाजाच्या आतल्या बाजूस घुमटी असुन त्यात एक शेंदुर फ़ासलेली मुर्ती ठेवलेली आहे. गडाच्या मुख्य दरवाजाच्या वरच्या बाजूस गडाचा दुसरा दक्षिणाभिमुख दरवाजा आहे. या प्रवेशद्वाराची चौकट अद्याप तग धरून आहे. तिच्या माथ्यावर गणेशपट्टी कोरलेली आहे. दरवाजा ओलांडुन आत गेल्यावर आपण गडाच्या सर्वोच्च माथ्यावर येतो. हा गडाचा बालेकिल्ला असावा व तो तटाबुरुजांनी सुरक्षित केला असावा. येथे उजव्या बाजूस वाड्याचे अथवा सदरेचे अवशेष आहेत. त्याच्या पुढे गडावरील सर्वात मोठे टाक व त्यापुढे छोटे टाके आहे. ते पाहून पुढे गेल्यावर खाली उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. त्या उतरून गेल्यावर गडाच्या उत्तर टोकावरील उध्वस्त बुरुजावर आपण पोहोचतो. येथुन उजवीकडे बुजलेला चोर दरवाजा नजरेस पडतो. पुढे गेल्यावर उजव्या बाजूस पाण्याची २ बुजलेली टाक असुन त्याच्या पुढे खोलगट भागात उघड्यावर शंकराची पिंड आणि नंदी आहे. तेथेच एक शेंदुर फ़ासलेली भग्न मुर्त्ती आहे. त्यापुढे रांगेत चार टाकी आहेत. त्यातील छोट्या टाक्यातील पाणी पिण्यालायक आहे. याशिवाय या टाक्यांसमोरच दरीच्या बाजूस एक शेंदुर फ़ासलेला दगड दिसतो तेथे दरीच्या खालच्या अंगाला एक टाक आहे. टाकी पाहून पुढे गेल्यावर आपण पूर्व टोकावरील बुरुजावर पोहोचतो. या बुरुजाच्या बाजूला असलेल्या पायऱ्यानी आपल्याला गडावर येता येते. बुरुजावरुन तटबंदीच्या बाजूने चालत जातांना ही तटबंदी अनेक ठिकाणी तुटलेली दिसते. पुढे गडाच्या सर्वोच्च माथ्यावरच्या बुरुजापाशी आपण पोहोचतो. गडावरील सुस्थितीत असलेल्या या बुरुजाला चर्याही आहेत. या बुरुजाच्या पुढे पायऱ्या आहेत. याठिकाणी उध्वस्त दरवाजाचे अवशेष आहेत. या दरवाजातून खाली उतरल्यावर पुन्हा गड जिथून पाहायाला सुरवात केली त्या जागेपाशी आपण येऊन पोहचतो. माणिकगडाच्या माथ्यावरून कर्नाळा, इरशाळगड, माथेरान, प्रबळगड, आणि सांकशीच किल्ला इतका विस्तीर्ण परिसर दिसतो. माणिकगडाचा माथा आटोपशीर असल्याने तासाभरात गडफेरी पुर्ण होते. ----------------------सुरेश निंबाळकर

माणिकगड

​​​​​​​​​​​जिल्हा - रायगड 
श्रेणी  - कठीण   
दुर्गप्रकार - गिरीदुर्ग