DIRECTION

अहमदनगर जिल्ह्यामधील अकोले तालुका हा दुर्गसंपन्न तालुका. येथील हरिश्चंद्रगड हा बहुतेक दुर्ग भटक्यांचा आवडता किल्ला. येथील निसर्गसौंदर्याने मोहित होऊन दुर्ग भटक्यांनी कधी ना कधी या किल्ल्याला भेट दिलेली असते. या हरिश्चंद्रगडाच्या प्रभावळीत या किल्ल्याकडे येणाऱ्या विविध मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी प्राचीन काळी कुंजरगड (कोंबडगड), भैरवगड (कोथळे), कलाडगड, भैरवगड (शिरपुंजे) हे किल्ले बांधले गेले. या चार गिरिदुर्गापैकी एक अपरिचित दुर्ग म्हणजे कुंजरगड. माळशेज घाटापासून सह्याद्रीची एक उपरांग पूर्वेकडे धावते. ही डोंगररांग बालाघाट म्हणून ओळखली जाते. हरिश्चंद्रगडापासूनसुरू होणारी ही रांग माळशेज घाट परिसरात पुणे व अहमदनगर जिल्ह्यांची सीमा विभागते. या रांगेमध्ये हरिश्चंद्रगडाच्या पूर्वेला कुंजरगड उर्फ कोंबडगड हा टेहळणीचा किल्ला आहे. कुंजरगडाला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. कुंजरगडाच्या एका बाजुला फोफसंडी हे गाव तर दुसऱ्या बाजुला विहीर हे गाव वसले आहे. फोफसंडी गाव डोंगररांगेच्या माथ्यावर असलेल्या पठारी भागात असुन फोफसंडीला पोहोचण्यासाठी चांगलीच पायपीट करावी लागते. त्यामानाने विहीर गावातुन या किल्ल्यावर जाताना कमी दमछाक होते. मुंबईहुन माळशेज घाटमार्गे ओतूर-बामणवाडा- कोतुळ किंवा मुंबई-घोटी– भंडारदरामार्गे राजूर या मार्गाने विहीर गावात जाता येते. विहीर गाव म्हणजे काही घरांची एक छोटी वस्ती आहे. विहीर गावामागे उत्तर दिशेला कुंजरगड खरोखर एखाद्या हत्तीसारखा पसरलेला दिसतो. कुंज या संस्कृत शब्दाचा अर्थ हत्ती असा होतो. याचाच अपभ्रंश होऊन कुजंरगड असे पडले असावे.किल्ल्याची चढाई पायथ्याच्या विहीर गावातून सुरू होते. गावातून गडावर जाण्यासाठी २ वाटा आहेत. एक म्हणजे कुंजरगडाच्या उजव्या बाजूच्या डोंगरावर चढून नैसर्गिक गुहा पाहून किल्ल्यावर जाता येते. दुसरा म्हणजे गड व त्याच्या उजव्या बाजूचा डोंगर यांच्या खिंडीतून जाणाऱ्या वाटेने गडावर जाता येते. दुसऱ्या वाटेने गडावर जाण्यासाठी कमी वेळ लागतो आणि गडावरील सर्व अवशेष ही पाहता येतात. सुरूवातीला किल्ल्यावर जाणारी पायवाट आणि पुढील खडी चढण आपल्याला खिंडीच्या साधारणत: पाऊण उंचीवर आल्यावर डावीकडे वळते. पुढचा प्रवास गड उजव्या बाजूला ठेवून डोंगराला वळसा घालून करावा लागतो. या वाटेने जाताना सर्वप्रथम झाडीत उघड्यावर ठेवलेल्या दोन मूर्ती पाहायला मिळतात. त्यातील एक मुर्ती हनुमानाची असून दुसऱ्या मुर्तीला गावकरी काळोबा म्हणतात. या मुर्ती पाहून कड्याला लागून असलेल्या वाटेवरुन कारवीच्या झाडीतून आपण अर्ध्या तासात दोन डोंगरामधील खिंडीत पोहोचतो. या वाटेने डोंगराला पूर्ण वळसा घालून आपण विहिर गावाच्या विरुध्द बाजूस पोहोचतो. फोफसंडी गावाकडून येणारी वाट खिंडीच्या या बाजूला येऊन मिळते. या खिंडीत आल्यावर समोरच गडाची ढासळलेली तटबंदी दिसते. येथुन डावीकडुन जाणाऱ्या पायवाटेने आपल्याला गडावर जाणाऱ्या पायऱ्याकडे जाता येते किंवा थोडेसे सोपे प्रस्तरारोहण करुन उजवीकडील तुटलेल्या तटबंदीमधून गडप्रवेश करता येतो पण सर्व अवशेष पहायचे असल्यास पायवाटेने जाणेच योग्य. किल्ल्याच्या शेवटच्या टप्प्यावर गडावर जाण्यासाठी कातळात खोदलेल्या पायऱ्या आहेत. या पायऱ्यांच्या सुरवातीलाच एक नैसर्गिक गुहा असुन ती काही प्रमाणात खोदलेली आहे. या गुहेच्या अलीकडे उजवीकडे कड्याला लागुन एक समांतर वाट आहे. या वाटेने काही १०० फुट अंतर गेल्यावर आपल्याला गडावरील सर्वात मोठे आश्चर्य दिसते. येथे फोफसंडी गावाच्या दिशेने तोंड करून एक कातळात खोदलेली गुहा आहे. या गुहेचे वैशिष्ट्य म्हणजे या गुहेत डोंगराच्या पुर्व-पश्चिम आरपार जाणारे एक नैसर्गिक भुयार असुन या भुयाराची रूंदी केवळ एक माणूस रांगत जाईल एवढी आहे. विजेऱ्यांच्या उजेडात सावधगिरीने या भुयारात शिरावे लागते. सुरवातीला काही अंतर रांगत जाऊन नंतर झोपून डावीकडे वळावे लागते. जमिनीलगत असलेल्या लहान भोकातून डोके आत घालून सर्व शरीर आत ओढून घ्यावे लागते. येथून आत शिरल्यावर पुढे हे भुयार मोठे होत जाते. भुयारात प्रवेश केल्यावर दोन मिनिटात आपण विहिर गावाकडे असलेल्या मुखाने बाहेर येतो. या भुयाराच्या टोकाला एकावेळी चार पाच जण उभे राहू शकतात. हि गुहा पाहुन परत मूळ वाटेवर आल्यावर पायऱ्याच्या मार्गाने आपण गडाच्या उध्वस्त प्रवेशव्दारातून गडावर प्रवेश करतो. पायथ्यापासुन चढाईला सुरवात केल्यानंतर दिड तासात आपण गडावर पोहोचतो. गडावर प्रवेश केल्यावर समोरच आपल्याला उध्वस्त वास्तुचे अवशेष दिसतात. या वास्तुच्या भिंतीलगत एक मारुतीची मुर्ती ठेवलेली आहे. गडाचा माथा उजवीकडे अतिशय चिंचोळा असुन या भागात केवळ पाण्याचे एक मोठे उध्वस्त जोडटाके आहे. गडाच्या या टोकावरून दुरवरचा प्रदेश नजरेस पडतो. गड ७ एकर परिघात दक्षिणोत्तर पसरलेला असुन गडावरील सर्व अवशेष प्रवेशव्दाराच्या डाव्या बाजुस आहे. या वाटेने डाव्या बाजूच्या टोकाकडे जातांना डाव्या बाजुला डोंगर उतारावर ठराविक अंतरावर पाण्याची ५ सुकलेली टाकी दिसतात. यात एक जोडटाके असुन एक पावसाळी साचपाण्याचे टाके आहे. या टाक्यांच्या मधील भागात एका लहानशा उध्वस्त वास्तू अवशेषात एक नव्याने बांधलेला सिमेंटचा नंदी व शिवपिंडी असुन गवतात भग्न झालेली हनुमानाची मुर्ती आहे. वाटेच्या उजव्या बाजुस टेकडावर एका मोठ्या वास्तूचे अवशेष दिसतात. एकंदरीत रचनेवरून हा किल्लेदाराचा वाडा व सदर असावी. या वाड्याच्या मागील भागात उतारावर दगडात कोरलेली पाण्याची अजुन सहा टाकी असुन यात एक कपारीत खोदलेले टाके आहे ज्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. हे पाणी एप्रिल-मे पर्यंत उपलब्ध असते. तसेच एका मोठया जोडटाक्याच्या भिंतीवर दोन झिजलेली शिल्पे दिसुन येतात. गडाच्या माथ्यावरुन हडसर, निमगिरी, सिंदोळा, हरिश्चंद्रगड, कलाडगड, आजोबा, घनचक्कर, भैरवगड तसेच कळसूबाई रांग दिसते. येथून प्रवेशव्दारापाशी परत आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते. संपूर्ण गडफेरी करण्यास एक तास पुरेसा होतो. गावकऱ्यांच्या सांगण्यानुसार कुंजर गडासमोरील डोंगरावर तीन गुहा असुन या गुहांचा वापर ते पावसाळ्यात आपली गुरे बांधण्यासाठी करतात. गडावर चढून आलेल्या वाटेने परत न जाता गडाच्या उजव्या बाजूला लागून असणाऱ्या या डोंगरावरून खाली उतरल्यास कपारीतील या तीन गुहा पाहायला मिळतील. या गुहा पाहुन तो डोंगर उतरुन विहिर गावात जाता येते. इतिहासात या किल्ल्याचा ओझरता उल्लेख मिळतो. ऑक्टोबर १६७० मध्ये दिंडोरीच्या लढाईनंतर शिवाजी महाराज कुंजरगडावर आले होते. मराठयांची फौज येथे विश्रांतीसाठी थांबली असता दिंडोरीच्या लढाईतील जखमींवर येथे उपचार केले गेले.------------सुरेश निंबाळकर

​जिल्हा - नगर  
श्रेणी  - मध्यम   
दुर्गप्रकार - गिरीदुर्ग

कुंजरगड