जिल्हा - नांदेड 
श्रेणी  - सोपी 
दुर्गप्रकार - गिरीदुर्ग

माहूरगड / रामगड

नांदेडपासून १४० कि.मी.वर असलेले महाराष्ट्रातील असंख्य भाविकांचे श्रध्दास्थान म्हणजे श्रीक्षेत्र माहुरगड. महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन पिठापैकी माहूरगड हे एक पुर्ण पीठ आहे. श्री रेणुकादेवी जगदंबेचे हे ठिकाण समुद्रसपाटीपासून २६०० फूट उंच डोंगरावर वसलेले असुन या ठिकाणी भक्तांचा वर्षभर वावर असतो. माहुर गाव नांदेड जिल्ह्याच्या टोकाला असल्याने तेथे जाण्यासाठी मुंबईहून नंदिग्राम एक्सप्रेसने किनवट गाठावे व तेथुन ५० कि.मी.वरील माहुरला एसटी किंवा खाजगी वहानाने जाता येते. ऋषीमुनींची तपोभूमी म्हणूनही माहूर गाव प्राचिन काळापासून अस्तित्वात असुन पुराणातील परशुराम कथा या भागाशी जोडलेल्या आहेत. आठव्या शतकातील वाकाटक काळातील लेणी येथे पहायला मिळतात. माहूर किल्ला गावापासून ८ कि.मी.वर असुन किल्ल्यावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. यातील पहिला मार्ग म्हणजे खिंडीतुन रेणुका मातेच्या मंदिरात जाण्यासाठी जेथुन पायऱ्या सुरु होतात त्याच्या समोरील बाजुस असणाऱ्या दुकानांच्या मागुन नव्याने बांधलेल्या पायरीमार्गाने १० मिनिटात आपण महाकाली बुरुजापाशी पोहोचतो तर दुसरा मार्ग या दुकानापासुन सरळ रस्त्याने साधारण १० मिनिटावर आहे. येथे तटबंदी फोडून किल्ल्यात तलावाकाठी असणाऱ्या महानुभाव पंथीयांचे ठिकाणावर जाण्यासाठी पायऱ्याचा मार्ग बनवलेला आहे. पायऱ्यांच्या सुरवातीलाच एक कमान आहे. महाकाली बुरुजास दुहेरी तटबंदी असुन वरील बुरूजातून खालील तटबंदीत येण्यासाठी दोन लहान दरवाजे आहेत. यातील एक दरवाजा दगड कोसळुन बंद झालेला असुन दुसऱ्या दरवाजाने बुरूजात बांधलेल्या पायरीमार्गाने आपला महाकाली बुरुजावर म्हणजेच किल्ल्यात प्रवेश होतो. महाकाली बुरुजाची उंची ४० फ़ुट असुन बुरुजाच्या बाहेरील बाजुस दोन शरभशिल्पे आहेत तसेच आतील एका ओवरीत महाकालीची स्थापना केलेली आहे. महाकाली मंदिराजवळ असलेला दगडी रांजण आपल्याला नाणेघाटातील दगडी रांजणाची आठवण करून देतो. महाकाली मंदिराच्या समोरील भागात सैनिकांच्या राहाण्यासाठी कमानदार ओवऱ्या असुन बुरूजात काही ठिकाणी टेहळणीसाठी खिडक्या तसेच तोफांसाठी जंग्या आहेत. बुरुजाच्या आतील भागात मधोमध एक उध्वस्त दिपमाळ असुन शेजारी दोन दगडी तोफगोळे दिसुन येतात. महाकाली बुरूज हा किल्ल्यात सर्वात उंच भाग असुन येथुन किल्ल्यातील खुप लांबवरचा परीसर दिसुन येती. माहुरगड समुद्रसपाटी पासून २६५० फूट उंचावर असुन साधारण त्रिकोणी आकाराचा गडाचा बालेकिल्ला ४५ एकर परिसरावर पुर्वपश्चिम पसरला आहे तर किल्ल्याच्या पश्चिमेस असणारी माची ४२ एकरवर पसरली आहे. बालेकिल्ल्याला १९ बुरूज असुन माचीचे बुरूज तेथील जंगलामुळे पहाता येत नाही. किल्ल्याच्या उत्तर व पश्चिम भागात जेथे किल्ल्याचे दोन मुख्य प्रवेशमार्ग आहेत त्या ठिकाणी किल्ल्याला दुहेरी तटबंदीचे सरंक्षण दिले आहे. यातील उत्तर भागातील दुहेरी तटबंदी लहान प्रमाणात असुन पश्चिम भागातील दुहेरी तटबंदीत किल्ल्याची माची वसली आहे. माचीच्या या भागात काही वास्तू असुन हा भाग डुक्कर किल्ला म्हणुन ओळखला जातो. महाकाली बुरुजावरून गडाच्या डावीकडील तटबंदीपासुन फांजीवरून गड फिरण्यास सुरवात करावी. गडाची तटबंदी हि निरनिराळ्या कालखंडात बांधली गेली असुन तटबंदीत चुना दगड तसेच विटांचा वापर केला आहे. सध्या पुरातत्त्व खात्याने या तटबंदीचे व किल्ल्याचे दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. गडाच्या तटबंदीवरील चर्या आजही सुस्थितीत असुन ठिकठिकाणी तटाखाली उतरण्यास पायऱ्या आहेत. या तटबंदीवरून दक्षिणेकडील निशाण बुरुजाकडे जाताना तटाला सहा बुरूज असुन निशाण बुरुजाच्या अलीकडे एक उध्वस्त मस्जिद आहे. मस्जिदसमोर एक छोटा हौद असुन बाहेरच्या भिंतीवर फ़ुलांची नक्षी कोरली आहे. देवळाचे मस्जिदमध्ये रुपांतर करतांना देवळातील मुळ खांब तसेच ठेवलेले आहेत. मस्जिद पाहून तटबंदीवरून आपण दक्षिण टोकावरील ढालकाठीच्या म्हणजेच निशाण बुरुजावर पोहोचतो. निशाण बुरुजाची उंची ६० फ़ूट असुन बुरुजाचा वरील भाग पुर्णपणे ढासळला आहे. बुरुजावरून किल्ल्याची बाहेरील तटबंदी तसेच गडावर येणारी वळणदार डांबरी सडक व दुरवरचा प्रदेश दिसतो. निशाण बुरुजावरून तटबंदीकडील वाटेने पुढील टोकाकडे म्हणजेच पश्चिमेकडील धन बुरुजाकडे निघावे. गडाच्या दक्षिण भागाला असणारी हि तटबंदी खुप मोठया प्रमाणात ढासळलेली असुन या तटबंदीवरून आपण हत्ती दरवाजावर असलेल्या हवामहाल या उध्वस्त वास्तुत येतो. या वास्तूच्या मध्यभागी पाण्याचा हौद असुन त्यात कारंजे आहेत तर एका बाजुला हत्ती दरवाजावरील झरोके आहेत. झरोक्यातून येणाऱ्या हवेने व हौदातील कारंजाच्या पाण्याने या वास्तुत थंडावा निर्माण केला जात असे त्यामुळे या वास्तूला हवामहल म्हणून ओळखले जाते. हवामहल पाहून पश्चिमेकडील दरवाजाने काही पायऱ्या उतरून आपण हत्ती दरवाजात येतो. हा दरवाजा उदाजीराम यांचा मुलगा जगजीवनराम यांनी बाधंला आहे. आपण किल्ल्याच्या आतून बाहेर निघत असल्याने दरवाजाच्या आतील भाग दिसतो. दरवाजाच्या आतील चौथऱ्यावर दोन्ही बाजूस गोलाकार खांब आणि कमानदार छत असुन याची रचना एखाद्या राजसदरे प्रमाणे आहे. स्थानिक लोक या जागेला घोड्याच्या पागा म्हणतात तर काही ठिकाणी याचा उल्लेख चिनी महाल म्हणुन येतो. या वास्तूची एकंदर रचना पहाता या वास्तूचा उपयोग कचेरीसाठी होत असावा.गडाचा हा दरवाजा उत्तराभिमुख असुन बालेकिल्ल्याच्या तटबंदीत बांधला आहे. दरवाजाची उंची एखादा हत्ती यातुन अंबारीसह सहज जाऊ शकेल इतकी आहे. दरवाजाच्या दोन्ही बाजूला चुन्यात कोरलेली अस्पष्ट शरभशिल्प असुन वर डाव्या बाजुला निळ्या पर्शियन टाइल्सचे तुकडे दिसुन येतात. दरवाजाच्या वरील बाजुस हवा महालाचे ६ झरोके असुन दरवाजाच्या दोन्ही बाजूला दोन मोठे बुरूज व समोरील बाजुस तटबंदी आहे. या तटबंदीच्या खाली असणारा भाग म्हणजेच किल्ल्याची माची किंवा डुक्कर किल्ला. या माचीवर खुप मोठया प्रमाणात झाडी वाढली असल्याने तेथे जाता येत नाही पण या तटबंदीवर उभे राहुन माचीवरील अवशेष पहाता येतात. या अवशेषात दोन घुमट असलेले दर्गा व एका उध्वस्त वास्तूचे अवशेष दिसतात. यातील एक दर्गा खुदाबंदखान याचा असुन दुसरा फरीदशाही दर्गा म्हणुन ओळखला जातो. किल्ल्यावर येण्याचा हा राजमार्ग असल्याने हत्ती दरवाजापुढे संरक्षणासाठी दरवाजांची साखळी उभारली होती. हत्ती दरवाजातून थोडे खाली उतरल्यावर डाव्या बाजुला गडाचा दुसरा पश्चिमाभिमुख दरवाजा असुन या दरवाजावर जाण्यासाठी दोन्ही बाजुला पायऱ्या आहेत. या दरवाजापुढे काही अंतरावर गडाचा तिसरा उत्तराभिमुख दरवाजा असुन दरवाजाच्या उजव्या बाजूला काही ओवऱ्या आहेत. या घोडेपागा असाव्यात. या मार्गावरील चौथा दरवाजा बाहेरील तटबंदीत असून तो पूर्वाभिमुख आहे पण पुढे मोठया प्रमाणात जंगल वाढले असल्याने आपल्याला तिसऱ्या दरवाजापुढे जाता येत नाही. येथुन मागे फिरून परत किल्ल्यात आल्यावर तटबंदी डावीकडे ठेवून सरळ पुढे चालत जावे. या वाटेवर अनेक उध्वस्त वास्तूंचे चौथरे पहायला मिळतात. या ठिकाणी राणीमहाल होता. पुढे गेल्यावर एक दरवाजा असुन या दरवाजाच्या अलीकडील भागात काही ओवऱ्या आहेत तर पुढील भागात दरवाजाला लागुन किल्ल्याच्या पूर्व टोकावर भव्य असा दुहेरी धन बुरुज आहे. या बुरुजाच्या बाहेरील भागात जाण्यासाठी खालील बाजुस दरवाजा असुन सध्या हा दरवाजा दगड ढासळून बंद झाला आहे. धनबुरुजावरून तटबंदी डावीकडे ठेवत पुढे गेल्यावर तटबंदीवरुन खाली उतरण्यासाठी जीना आहे. या जिन्याने आपण तटाखालील चोर दरवाजापाशी पोहोचतो. हा चोर दरवाजा पाहून किल्ल्याच्या आतील भागात असणाऱ्या वास्तूकडे निघावे. या वास्तूबाहेर पाण्याचा बांधीव सुकलेला हौद असुन समोरच्या भिंतीत कमानदार दरवाजा आहे. हि वास्तू राजमहाल,दारुकोठार, अंबरखाना या नावानी ओळखली जाते. साधारण १२ फुट उंचीच्या या वास्तुच्या आतील भागात आडव्या रांगेत तीन आणि उभ्या रांगेत चार अशा बारा कमानी असुन डाव्या बाजुच्या भिंतीत दोन तर उजव्या बाजुला एक खिडकी आहे. या खिडकीबाहेरील अवशेष पहाता येथे या वास्तुला सलग अशी दुसरी वास्तू असावी असे वाटते. येथुन परत तटबंदीवर येऊन पुढे चालत गेल्यावर एक ७ फ़ुट लांबीची तोफ़ पहायला मिळते. येथुन पुढील भागातील तटबंदी ढासळली असल्याने तटबंदीवरून खाली येऊन पुरातत्त्व खात्याने बांधलेल्या वाटेने गड उतरण्यास सुरवात करावी. वाटेत एक पाण्याचे मोठे तळे असुन त्यास इंजाळे अथवा परवेश तलाव म्हणतात. तलावाच्या काठावर महानुभावपंथीयांचे स्थान आहे. कधीकाळी तलावाच्या एका पुर्ण बाजुस असणाऱ्या पायऱ्या मोठया प्रमाणात ढासळल्या असुन तलाव कोरडा पडला आहे. उत्तर दिशेस असणारी टेकडी ब्रह्मतिर्थ म्हणुन ओळखली जाते. येथुन पुढील पायऱ्यांनी गडाखाली उतरणारी दुसरी वाट आहे पण या वाटेने न जाता सरळ गेल्यावर तटबंदीला लागुन दोन मनोरे असलेली उध्वस्त वास्तू दिसते. या वास्तुच्या आत पहारेकऱ्याच्या खोल्या आहेत. या वास्तुच्या पुढे डाव्या बाजुस किल्ल्यावर येणारा दुसरा राजमार्ग असुन येथे आतील तटबंदीत एक दरवाजा आहे. या दरवाजाबाहेरील दोन बुरूज दोन वेगळ्या कालखंडात बांधले असल्याने एक बुरूज चौकोनी तर दुसरा गोलाकार आहे. या दरवाजातुन काही अंतर खाली गेल्यावर बाहेरच्या तटबंदीतील दुसरा मुख्य दरवाजा आहे. या भागातील बुरूज व तटबंदी पुर्णपणे कोसळली असुन केवळ दरवाजा शिल्लक आहे. हे दोन्ही दरवाजे पाहून मुळ वाटेवर परत आल्यावर आपली गडफ़ेरी पूर्ण होते. पायथ्यापासुन संपूर्ण गड पाहाण्यासाठी ५ तास लागतात. इतिहासात पैनगंगा खोऱ्यावर नियंत्रण करण्यासाठी हा किल्ला महत्वाचा होता. राष्ट्रकुटांच्या काळात हे गाव महापूर या नावाने ओळखले जात असे. याचाच अपभ्रंश होउन सध्याचे माहूर नाव प्रचलित झालेले आहे. या महापूर गावाजवळील डोंगरावर असणारा किल्ला आज माहूरचा किल्ला म्हणून ओळखला जातो. राष्ट्रकुटाच्या ताब्यातील हा किल्ला यादवांच्या ताब्यात त्यांनी किल्ल्याला दुसरा तट बांधला. किल्ल्याचा दुसरा तट रामदेवराव यांनी बांधल्याने त्यांनी किल्ल्याचे नाव रामगड ठेवले. यादवांच्या काळात रामगड किल्ला प्रशासकीय विभागाचे प्रमुख ठाणे होते. आदिया बल्लाळसिंह शिरपुरच्या गादीवर असताना त्यानी माहूरचा भाग आपल्या ताब्यात घेतला. गोंडवनाचा विस्तार करताना हा किल्ला दक्षिण गोंडराज्यात सामील झाल्यावर या किल्ल्याचा पहिला तट यमाजी ठाकुर यांनी बाधंला. चौदाव्या शतकात रामगड किल्ला गौंड राजांच्या ताब्यात होता. बहमणी सुलतान अल्लाउद्दीन हसनशहाने इ.स.१३५० मध्ये रामगडवर चाल केली तेव्हा राजा तलवारसिंहने खंडणी देऊन बहामनी संकट टाळले. त्यानंतर १४१२ मध्ये बहामनी सुलतान फ़िरोजशहाने रामगडवर चाल केली पण त्यांना रामगड जिंकता आला नाही तेंव्हा सुभेदार दिनकर सिंहाबरोबर तह करुन तो निघून गेला. इ.स.१४२२ मध्ये बहामनी सुलतान अहमदशहा वलीने रामगडवर अचानक हल्ला करून तो जिंकून घेतला. त्यावेळी त्याने गौंडराजा जयसिंह व त्याच्या सैन्याची कत्तल करून त्यांच्या बायका मुलांना सक्तीने इस्लाम धर्म स्विकारायला भाग पाडले. रामगड किल्ल्याचे नाव बदलून अहमदाबाद असे ठेवले. त्याने या गडाला दक्षीण विदर्भाचे प्रमुख ठाणे बनवुन खुदावंत खान याची सुभेदार म्हणून नेमणुक केली. खुदावंतखानाने बहामनी सत्तेविरुध्द बंड केले आणि किल्ल्याच्या आश्रयाने बहामनी साम्राज्याला बरेच दिवस झुलवले. शेवटी बहामनी सुभेदार अमीर बरीद याने किल्ला ताब्यात घेऊन खुदावंत याला ठार मारले. उत्तरेकडील तटास लागुन खुदावंत यांची दर्गा आहे. अमीर बरीदने जिंकलेले माहूर इमादशहाने आपल्या राज्याला जोडून टाकले.पुढच्या काळा निजामशहाने माहूर किल्ला जिंकून घेतला. मुघल सम्राट अकबराने मे १५२९ मध्ये निजामाकडून माहूरचा किल्ला घेतला. त्याने उदाजीराम याला पंचहजारी मनसब देऊन माहूरवर नेमले. पुढे किल्ल्यावर या घराण्याचा अनेक पिढ्या ताबा होता. जहांगिर बादशहाचा मुलगा शहाजहान याने बापाविरुध्द बंड पुकारले तेव्हा उदाजीराम शहाजहांच्या बाजुने होते. शहाजहांन विरुध्द जहांगीरने शहाजादा परवीज व महबतखान यांना पाठविले. तेव्हा लखुजी जाधव, उदाजीराम व आतमखान ह्या सरदारांच्या सहाय्याने शहाजहांन व-हाडातुन ओरीसा बंगालकडे निघाला. बुऱ्हानपूरहून बंगालकडे जाताना शहाजहान याने माहूर किल्ल्यावर मुमताज व औरंगजेबासह मुक्काम केला तेव्हा औरंगजेब सहा वर्षाचा होता. उदाराम नंतर त्याचा मुलगा जगजीवनराम किल्लेदार बनला त्याने किल्ल्याची दुरुस्ती केल्याचा उल्लेख मिळतो. इ.स.१६५८ ला त्याचा मृत्यु झाला. त्याच्या नंतर त्याचा अल्पवयीन मुलगा बाबूराव याच्याकडे सुत्र गेली. त्याच्या वतीने त्याची आई सावित्रीबाई कारभार पाहात असे. वऱ्हाड प्रांतात हरचंदराय नावाच्या सरदाराने बंड केले. हे बंड सावित्रीबाईने मोडून काढले व हरचंदराय राजपूत याचा पराभव केला. वऱ्हाड प्रांतात मोगली अंमल कायम राहिला.तिची कर्तबगारी आणि शौर्य पाहून औरंगजेबने तिला पंडीता रायबाघन हा किताब दिला. शिवकाळात औरंगजेबाच्या आदेशावरून शाहिस्तेखानाच्या सैन्याबरोबर स्वराज्यावर चालून आलेली हि मुघलांची मनसबदार पंडिता रायबाघन उंबरखिंडीच्या लढाईत होती. थोरले बाजीराव पेशवे यांनी माहूरची लुट केल्याचा उल्लेख आहे. अठराव्या शतकात माहूरचा किल्ला नागपूरकर भोसल्यांनी मुघलांकडून जिंकून घेतला. त्यानंतर तो किल्ला निजामाने मराठ्यांकडून जिंकून घेतला. स्वातंत्र्य मिळेपर्यंत हा किल्ला निजामाकडे होता. रेणुकादेवीचे दर्शन घेउन रामगड किल्ला, लेणी, मातृतीर्थ आणि हत्तीखाना ही सर्व ठिकाणे पाहाण्यासाठी संपूर्ण दिवस लागतो.-----------------------------सुरेश निंबाळकर