जिल्हा - रत्नागिरी
श्रेणी  -  सोपी   
दुर्गप्रकार - सागरी किल्ला 

रत्नागिरी शहरापासून ६० कि.मी.अंतरावर असलेल्या राजापूरच्या आसमंतावर निसर्गाने सौंदर्याची विशेष उधळण केली आहे. अर्जुना नदी जिथे समुद्राला मिळते तिथल्या खाडीमुखावर वसलेलं राजापूर बंदर समुद्रापासून ३० कि.मी. आत असल्याने त्याकाळी सर्वांत सुरक्षित बंदर मानले जाई. घाटावरील बाजारपेठांमधील माल अणुस्कुरा घाटाने राजापूर बंदरात येत असे. तेथून बोटीने तो माल अरबस्तानात व अन्य बंदरात जात असे. इ.स. १६४८ मध्ये आदिशहाच्या ताब्यात हा भाग असता इंग्रजांनी या ठिकाणी वखार बांधली. वखारीतील मालाचे रक्षण करण्यासाठी त्यांनी याठिकाणी किल्ल्याप्रमाणे तटबंदी व बुरुज बांधून त्यावर तोफा ठेवुन भरभक्कम असा किल्लाच बांधला. कालांतराने इंग्रजांनी मुंबई बेटावर आपली मुख्य वखार वसाविल्याने हि वखार ओस पडली. राजापूर शहरात आज या वखारीचे फार थोडेसे अवशेष शिल्लक आहेत. राजापुरवासीयांना या वखारीबद्दल फारशी माहिती नसल्याने त्यांना विचारताना पोलिस वसाहत विचारावी कारण या वखारीत आता पोलिस वसाहत आहे. राजापुर वखारीला भेट देण्याचे मुख्य कारण म्हणजे शिवाजी महाराजानी त्यांच्या कारकिर्दीत सुरतनंतर लुटलेली हि राजापूरची वखार. मुंबई-गोवा महामार्गावरील राजापुर एस.टी.स्थानकाच्या पुढून राजापुर शहरात आल्यावर धुतपापेश्वर मंदिराकडे जाताना अर्जुना नदीवरील पुल लागतो. हा पूल ओलांडल्यावर डाव्या बाजूलाच राजापूरच्या वखारीचे अवशेष आहेत. १९४० मध्ये राजापूर नगरपालिकेची स्थापना झाल्यावर या वखारीच्या दगडी इमारत सरकारी कचेरीच्या उपयोगांत आणल्या गेल्या. वखारीच्या परिसरात आल्यावर समोरच चिऱ्यात बांधलेल्या पडक्या वास्तूंचे अवशेष दिसतात. यातील एका दुमजली इमारतीत पोलीस कचेरी असुन इतर वास्तू पडक्या अवस्थेत आहेत. पोलीस कचेरीच्या डाव्या बाजूस एक चौकोनी विहीर असुन या विहिरीच्या मागील बाजुस एक बुरुज आहे. पोलीस कचेरी व तिच्या उजव्या बाजूस असलेल्या पडक्या वास्तू यामधील पायऱ्यांनी वखारीच्या मागील बाजूस असणाऱ्या नदीकडे उतरता येते. येथील नदीच्या पात्रात काही पायऱ्या दिसुन येतात. वखारीची नदीच्या बाजुने असणारी तटबंदी आजही शिल्लक असुन या तटबंदीच्या दोन्ही टोकाला दोन बुरुज दिसुन येतात. तटबंदीच्या पडक्या वास्तुमागील बुरुजावर चढले असता या भागातील काही प्रमाणात शिल्लक असलेली तटबंदी दिसुन येते. वखारीच्या इतर भागात पोलिस वसाहत असल्याने वखारीचे अवशेष नामशेष झालेले आहेत. इतिहासकालापासून राजापूर हे बंदर व व्यापारी केंद्र म्हणून प्रसिद्ध होते. इ.स. १३१२ मध्ये आदिलशहाने राजापूर जिंकले त्यावेळी हे परगण्याचे मुख्य ठिकाण होते. राजापूर ही एक मोठी बाजारपेठ व आयात-निर्यातीचे केंद्र असल्यामुळे इ.स.१६४८ च्या उत्तरार्धात इंग्रजांनी तिथे एक वखार उघडलेली होती. शिवरायांच्या काळात राजापूरला फार महत्वाचे स्थान आहे. या भूमीत बाळाजी आवजी चित्रे सारखा हिरा राजांना लाभला. अफझलखानावरील स्वारीशी राजापूरचा निकटचा संबंध होता तर गोमंतक मोहिमेची तयारी इथेच पार पडली. अफझलखानाचा वध केला त्यावेळी राजापूरच्या खाडीत अफजलखानाची तीन जहाजे व्यापारी मालाने खचाखच भरून उभी होती. महाराजांनी हि तीन जहाजे ताब्यात घेण्यासाठी दोरोजी यास पाठवले पण इंग्रजांच्या मदतीने दोन जहाजे खोल समुद्रात निसटण्यात यशस्वी ठरली. महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले असता हेन्री रेव्हिंग्टन व गिफर्ड या इंग्रज अधिकाऱ्यांनी सिध्दी जोहरला तोफा तसेच दारुगोळा पुरविला व पन्हाळगडावर तोफाचा मारा केला. यामुळे इंग्रजाना अद्दल घडविण्यासाठी १६६१ मध्ये राजापूरची वखार महाराजांच्या आदेशानुसार लुटली गेली व इंग्रज अधिकारी गिफर्ड यास कैद करून खारेपाटण किल्ल्यात ठेवण्यात आले. इ.स.१७१३ मधे बाळाजी विश्वनाथ यांच्या मध्यस्थीने कान्होजी आंग्रे आणि छत्रपती शाहू महाराज यांच्यात झालेल्या सलोख्यात राजापुरची वखार कान्होजीं आंग्रेकडे राहीली. अठराव्या शतकाच्या पूवार्धात राजापूर आंग्रे यांच्या ताब्यात होते. इ.स. १७५६ मध्ये राजापुर पेशव्यांनीं तुळाजी आंग्रे याच्याकडून जिंकुन घेतले. १८१८ मध्ये कर्नल इमलॉक याने राजापुर ताब्यांत घेतले.-------------------सुरेश निंबाळकर

राजापूर वखार