रेवदंडा

जिल्हा - रायगड  
श्रेणी  -  सोपी
दुर्गप्रकार-  सागरीदुर्ग

रायगड जिल्ह्य़ातील अलिबाग तालुक्यात रेवस ते कुंडलिका खाडीपर्यंत समुद्रकिनाऱ्यालगत निसर्गसौंदर्याने नटलेला भाग म्हणजे अष्टागर. या अष्टागरात दक्षिण-पूर्वेकडील कुंडलिका खाडीवरचे शेवटचे गाव म्हणजे रेवदंडा. रेवदंडा म्हणजे प्राचीन चौलचाच एक भाग. मूळ चौलच्या दोन-तीन पाखाड्या स्वतंत्र करून रेवदंडा आकारास आल्याने आजही या परिसराचा उल्लेख चौल-रेवदंडा असा केला जातो. निसर्गसौंदर्याने भरलेल्या व मुंबई-पुण्याहुन काही तासाच्या अंतरावर असलेल्या या भागाला पर्यटनामुळे चांगले दिवस आले आहेत. चौल हे प्राचीन बंदर असल्याने या भूमीचा इतिहास चौलशीच जोडला जातो पण रेवदंडा भाग चर्चेत आला तो पोर्तुगीज राजवटीत. सोळाव्या शतकाच्या सुरुवातीस पोर्तुगिजांनी येथे पाय रोवले व जवळपास २१० वर्षे या भागावर वर्चस्व राखले. वसईच्या बरोबरीनेच पोर्तुगीजानी रेवदंडय़ात सत्ता राखली व या काळात त्यांनी रेवदंडय़ाचा किल्ला बांधला. रेवदंडा किल्ला पहाण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला अलीबाग येथे यावे लागते. मुंबई-अलिबाग हे अंतर १०० कि.मी.असुन पुणे अलिबाग हे अंतर साधारण १४० कि.मी. आहे. अलिबागपासून रेवदंडा किल्ला २० कि.मी.अंतरावर असुन तेथे जाण्यासाठी बस-रिक्षाची सोय आहे. रेवदंडा गाव किल्याच्या तटबंदीच्या आत वसलेले असुन गावात शिरणारा रस्ता तटबंदी फोडून काढला असल्याने गावात शिरतानाच तटबंदी दिसुन येते. संपुर्ण किल्ला पहायचा असल्यास रेवदंडा बसस्थानकावर उतरुन गडफेरीला सुरुवात करावी. साधारण लंबगोलाकार आकाराचा हा किल्ला पुर्व-पश्चिम पसरलेला असुन किल्ल्याचे क्षेत्रफळ ७० एकरपेक्षा जास्त आहे. संपुर्ण रेवदंडा गावाभोवती हि तटबंदी असुन या तटबंदीची लांबी २ कि.मी. पेक्षा जास्त आहे. किल्ल्याची बहुतेक तटबंदी आजही शिल्लक आहे. तटबंदीच्या पश्चिमेला अरबी समुद्र आणि उत्तरेला कुंडलिका खाडी असुन पुर्व बाजुला दलदल व तर दक्षिण बाजूच्या तटाबाहेर खंदक खोदलेला होता. हा खंदक आता पुर्णपणे बुजला आहे. किल्ल्याला उत्तर व दक्षिण दिशेला दोन मुख्य दरवाजे असुन तटबंदीत अजुन दोन लहान दरवाजे पहायला मिळतात. किल्ल्याला अजुनही लहान दरवाजे असावेत पण खाजगी मालकी हक्कामुळे किल्ल्याच्या बऱ्याच भागात फिरता येत नाही. बस स्थानकाकडून किल्ला फिरायला सुरवात केल्यावर सर्वप्रथम आपण कुंडलिका खाडीच्या दिशेने असलेल्या किल्ल्याच्या मुख्य दरवाजाकडे येतो. येथे दुहेरी तटबंदीत एकामागोमाग एक असे दोन दक्षिणाभिमुख दरवाजे असुन या दोन्ही दरवाजांमधील भागात रणमंडळाची रचना आहे. यातील एका दरवाजाच्या कमानीवर पोर्तुगीज सत्तेचे राजचिन्ह कोरलेले आहे. दोन दरवाजांच्या मध्ये असलेल्या रणमंडळाच्या भिंतीत पोर्तुगीज भाषेत दरवाजा बांधल्याचा काळ सांगणारा एक शिलालेख आहे. एकेकाळी या किल्ल्यात पोर्तुगिजांचे अकरा शिलालेख होते. यातील काही आजही इथे असुन काही मुंबई एशियाटिक सोसायटीत ठेवण्यात आले आहेत. दुसऱ्या दरवाजातून आत शिरताच समोरच तीन मोठे दगडी गोळे दिसतात. दरवाजाच्या बाजूलाच तटबंदी व शेजारील बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. या पायऱ्याशेजारील भिंतीत एक तोफगोळा असुन बुरुजावर दोन मोठया तोफा दिसुन येतात. तटावरून खाली उतरून थोडे पुढे आल्यावर अजुन एक दरवाजा पहायला मिळतो. शिल्पकृतींनी सजलेल्या या दरवाजावर दोन धर्मगुरु कोरलेले असुन त्याखाली त्यांची नावे व वरील बाजुस क्रॉस तसेच राजचिन्ह कोरलेले आहे. या दरवाजाच्या आतील बाजुस पोर्तुगीजांनी रेवदंडा येथे किल्ल्याआधी १५१६साली बांधलेली वखार असुन या वखारीभोवती हा दरवाजा व तटबंदी १५२१ ते १५२४ या काळात बांधली गेली. हा भाग खाजगी मालमत्ता असुन वखारीच्या दरवाजालाच फाटक लावून बंद केल्याने आत जाता येत नाही. येथुन डांबरी वाटेने किल्ल्याच्या दुसऱ्या टोकाला जाताना वाटेत डाव्या बाजुला जेझुईट मोनेस्ट्रीचे अवशेष दिसतात. या मोनेस्ट्रीसमोरच किल्ल्याच्या तटबंदीतील एक लहान दरवाजा तोडून रस्ता बाहेर गेलेला आहे. या रस्त्याने बाहेर जाऊन किल्ल्याची तटबंदी पहाता येते. येथे असलेल्या बुरुजाच्या वरील भागात एका तोफेचे तोंड दिसुन येते पण हा भाग देखील खाजगी मालमत्ता असल्याने तेथवर जाता येत नाही. येथुन परत आत येऊन उजव्या बाजुला तटबंदीला समांतर गेल्यावर काही अंतरावर तटबंदीत एक दरवाजा आहे. हा भाग खाजगी मालमत्ता असला तरी येथील मालकाने आत जाण्यास परवानगी दिली. या दरवाजाच्या आतील बाजूस सैनिकांसाठी खोल्या असुन तटाच्या आत जमिनीखाली दारूगोळ्याचे कोठार आहे तसेच प्रसंग पडल्यास तटाबाहेर खंदकात जाण्यासाठी भुयारी मार्ग आहे. येथुन तटबंदीला समांतर तसेच पुढे गेल्यावर काही अंतरावर तटाला लागुनच तटबंदीवर तोफा चढवण्यासाठी बांधलेला उतार दिसतो. तेथुन पुढे आल्यावर किल्ल्याच्या उत्तर तटबंदीत असलेला किल्ल्याचा दुसरा मुख्य दरवाजा दिसतो. येथे देखील दोन दरवाजे असुन या दरवाजांची रचना पहिल्या दरवाजाप्रमाणेच आहे. येथे बाहेरील दरवाजाच्या वरील बाजुस पोर्तुगीज राजचिन्ह कोरलेले असुन त्यावरील बाजूस मोठा राजमुकुट कोरलेला आहे. बाहेरील दरवाजासमोर एक लहानसे मंदिर असुन तटामध्ये लहान लहान देवड्या आहेत. किल्ल्याच्या या दरवाजांवर मोठया प्रमाणात झाडे वाढली आहेत. दरवाजा पाहुन परत आल्यावर तटबंदीला समांतर न जाता डावीकडे वळावे. या वाटेवर समोरच पांढऱ्या रंगाने रंगवलेली सिद्धेश्वर मंदिराची दीपमाळ दिसते. मंदिराला लागुनच अलीकडे तटबंदीयुक्त तीन मजली वाड्याचे अवशेष आहेत. वाड्याचा दरवाजा आजही सुस्थितीत असुन दरवाजात १६३० मधील दोन शिलालेख आहेत. हा भाग देखील खाजगी मालमत्तेत असल्याने वाडयाच्या दरवाजालाच फाटक लावुन आत जाण्याचा मार्ग बंद करण्यात आला आहे. वाडयाच्या अवशेषात नारळाची बाग लावलेली आहे. सिद्धेश्वर मंदीर १७४० मध्ये बाबुभट नेने यांनी लोकवर्गणीतुन बांधलेले असुन मंदिराच्या आवारात पायऱ्या व दरवाजा असलेली विहीर आहे. हि विहीर वरील बाजूस चौकोनी असुन आतील बाजूस गोलाकार आहे. मंदिरात शिवलिंग व नंदी असुन एका कोनाड्यात गणेशमुर्ती आहे. या मंदिरात शिकारीचा प्रसंग कोरलेली सुंदर लाकडी तुळई पहायला मिळते. मंदिरासमोर पोर्तुगीज शैलीतील एका वास्तुचे अवशेष असुन या वास्तुचा पडझड झालेला दरवाजा पहायला मिळतो. मंदिराकडून सरळ पुढे जाऊन उजव्या हाताला वळल्यावर एक मनोरा आपले लक्ष वेधुन घेतो. ६ मजले असलेली हि इमारत सातखणी मनोरा व पोर्तुगिज आरमाराचा रखवालदार म्हणुन ओळखली जाते कारण या मनोऱ्यावरुन संपुर्ण किल्ल्याचा अंतर्भाग तसेच तटाबाहेरील समुद्राचा खुप लांबवरचा प्रदेश दिसत असे. याचा उपयोग वॉचटॉवर म्हणून होत असावा. या मनोऱ्याच्या आवारात २ फोर्ज वेल्डेड तोफा व ५ ओतीव तोफा दिसतात. मनोऱ्याच्या आसपास असलेले उध्वस्त अवशेष पहाता येथे एखादे चर्च असल्याचे जाणवते. याशिवाय या आवारात असलेल्या दफनभूमीत दोन शिलालेख पहायला मिळतात. मनोऱ्याच्या मागील बाजुला असलेल्या तटात उजवीकडे समुद्राकडे बाहेर पडणारा एक लहान दरवाजा असुन भरतीच्या वेळेस या दरवाजाच्या पायरीच्या पातळीपर्यंत पाणी चढते व आत किल्ल्यात येते. हे पाणी परत बाहेर जाण्यासाठी तटात एक लहान नाली ठेवलेली आहे. या दरवाजाने बाहेर समुद्रावर आल्यावर तटाच्या प्रचंड बांधकामाची कल्पना येते. येथुन समोरच खाडी पलीकडे बेटावर असलेला कोरलई किल्ला नजरेस पडतो. येथुन किल्ल्यात परत आल्यावर दरवाजा शेजारील तटबंदी वरून उजवीकडे गेले असता एक बुरुज लागतो. या बुरुजावर एक तोफ पडलेली असुन या बुरुजावरून किल्ल्याबाहेर जाण्यासाठी दरवाजा आहे. येथुन पुढे गेल्यावर एक बुरुज सोडुन दुसऱ्या बुरुजावर एक भलीमोठी तोफ आहे. किल्ल्याच्या या भागात तटावरून फिरता येते पण मोठया प्रमाणात झाडी वाढलेली आहे. रेवदंडा किल्ल्याचे प्रमुख वैशिष्टय़ म्हणजे किल्ल्याच्या तटबंदीखाली असलेला भूयारी मार्ग. किल्ल्याभोवती असलेल्या खंदकातून या तटबंदीमध्ये शिरण्यासाठी ६ भुयारी मार्ग आहेत. वरून जरी हे सहा मार्ग असले तरी अंतर्गत ते एकमेकांना जोडले गेले आहेत. किल्ला बांधण्यापुर्वीच हि भुयारे बांधली गेली असावीत. जुलै १९८२ मध्ये केव्ह एक्स्प्लोरर्स या संस्थेने या भुयारांचा शोध घेतला. भुयारांच्या आतील बांधकाम दगडविटांनी केलेले असुन ८-९ फूट उंच आणि चांगलाच रुंद असलेला हा भुयारी मार्ग तत्कालीन स्थापत्याची साक्ष देतो. माती-गाळाने भरलेले हे मार्ग या संस्थेने काही प्रमाणात खुले केले होते पण त्याची योग्य निगा न राखल्याने हे मार्ग पुन्हा गाळ आणि घाणीने बुजले आहेत. याच्या तोंडावर वाढलेल्या झुडपांमुळे आत जाता येत नाही. किल्ल्याच्या नैऋत्य कोपऱ्यात डोमिनिक चर्च हे रेवदंडय़ातील भव्य चर्च आहे. इ.स. १५४९ मध्ये बांधलेल्या या चर्चचे छत जरी कोसळलेले असले तरी त्याचा सभामंडप, भिंती व त्यावरील नक्षीकाम यातून त्याची भव्यता लक्षात येते. याशिवाय पोर्तुगीजांच्या महत्त्वाच्या वास्तूंपैकी सेंट झेवियर चर्चही रेवदंड्यात आहे. या चर्चच्या सभामंडपात त्याच्या बांधकामा बाबत शिलालेख पडलेला आहे. या शिवाय किल्ल्यात फिरताना पोर्तुगीज शैलीतील बुरूज व अनेक बांधकामे पडीकावस्थेत दिसतात. किल्ल्याचा बराच भाग खाजगी मालमत्ता असल्याने काही मालक आत जाऊन पहायला परवानगी देतात तर काही उगीचच शिष्टपणा दाखवतात. संपुर्ण किल्ला पहाण्यास साधारण दोन तास लागतात. सह्याद्रीत उगम पावणारी कुंडलिका नदी चौल-रेवदंडाजवळ अरबी समुद्राला जेथे मिळते त्या कुंडलिका खाडीच्या मुखावर प्राचीन काळापासून चौल हे सुरक्षित व प्रसिद्ध बंदर होते. इ.स.१३० पासून ते १७६८ पर्यंत ह्या बंदरातून जगाच्या कानाकोपऱ्यात जहाजे जात येत होती. परंतु कालांतराने या बंदरात गाळ साचल्याने ह्या बंदराचा उपयोग कमी होत गेला. प्राचीन काळी रेवदंडा हे गाव रेवतीक्षेत्र म्हणून प्रसिध्द होते. शिलाहार राजवंशाने या भागावर दीर्घकाळ राज्य केले.दहाव्या शतकात अल मसुदी हा अरबी व्यापारी येथे आला असता झंझ शिलाहार राजा येथे राज्य करत असल्याचे त्याने नमूद केले आहे. भारताला भेट देणारा अफनासी निकीतीन हा पहिला रशियन प्रवासी इ.स.१४६६ ते ७२ या काळात भारतात आला होता. त्याने त्याच्या या प्रवासाची सुरुवात चौलच्या बंदरातुनच केली होती. पुढे त्याने पाली, मुंब्रा, जुन्नर असा मोठा प्रवास करून या प्रदेशाचे वर्णन करून ठेवले आहे. १५ व्या शतकात रेवदंडा गावाचे महत्व ओळखून पोर्तुगिजांनी खाडीच्या मुखावर किल्ला बांधला. किल्ला बांधताना संपूर्ण गावाभोवती तटबंदी बांधून त्यांनी गावालाच रेवदंडा किल्ल्याच्या कवेत घेतल. पोर्तुगिज कप्तान सोज याने १५२८ मध्ये किल्ला बांधायला सुरुवात केली पण त्यापूर्वी १५१६ मध्ये पोर्तुगिजांनी निजामाकडून परवानगी घेऊन कारखान्यासाठी सध्या चौकोनी बुरुज म्हणुन ओळखली जाणारी इमारत बांधली. इ.स.१५२१ मध्ये विजापूरच्या आरमाराने चौल जाळले व पोर्तुगीजांचा पराभव केला त्यामुळे १५२१ ते १५२४ दरम्यान पोर्तुगीजांनी या वखारीभोवती तटबंदी बांधली. सोळाव्या शतकाच्या अखेरपर्यंत या किल्ल्यात पोर्तुगिजांनी अनेक इमारती बांधल्या. इ.स.१६३४ मध्ये इथे आलेला अँटॉनिओ बोकारोने हा पोर्तुगीज लिहितो या किल्ल्यात सेनापती आणि दोनशे पोर्तुगीज सैनिक राहत असुन आत या सैनिकांची घरे, शस्त्रागार, कॅथ्रेडल, चर्च, वखार,तुरूंग आदी इमारती आहेत. किल्ल्याच्या बुरुजांवर कॅमल नावाची तोफ आहे. १४ ते ६५ पौंडी गोळय़ांचा मारा करणाऱ्या या तोफा पितळ वा पोलादाच्या आहेत. आजही किल्ल्याच्या तटाबुरुजावर अनेक तोफा दिसतात. इ.स.१६३६ मध्ये निजामशाही वाचवताना शहाजीराजांनी रेवदंड्याच्या कॅप्टनकडे मदत मागितली असता त्यांनी नकार दिला. इ.स.१६५७-५८च्या सुमारास शिवरायांनी चौल जिंकले पण रेवदंडा मात्र पोर्तुगीजांकडे राहिला. इ.स.१६७४ मध्ये महाराजांच्या राज्याभिषेकाला हजर असलेला इंग्रज वकील हेन्री ओकझेंडन एक दिवस रेवदंडा किल्ल्यात राहिला होता. २२ जुलै १६८३च्या रात्री संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी ६ हजार शिपाई व २ हजार घोडेस्वारांसह रेवदंडा किल्यावर हल्ला केला पण पोर्तुगिजांनी सिद्दींच्या मदतीने तो उधळून लावला. मराठ्यांनी रेवदंड्याला वेढा घातल्यावर तो मोडून काढण्यासाठी पोर्तुगिजांनी फोंड्यावर हल्ला केला. त्यामुळे मराठ्यांना वेढा सोडून जावे लागले. इ.स. १७२८ मधील आंद्रे रिबेरो कुरिन्हाने या पोर्तुगीजाच्या अहवालात या किल्ल्याचा तपशील येतो. तो म्हणतो या किल्ल्यास अकरा बुरूज असुन किल्ल्यात तीन ते चाळीस पौंड वजनाचे गोळे फेकणाऱ्या ५८ तोफा आहेत. ६२ सैनिकांची एक याप्रमाणे तीन कंपन्या इथे तैनात आहेत. इ.स.१७३९ मध्ये वसई मराठ्यांच्या ताब्यात गेल्यावर मराठ्यांपुढे आपला टिकाव लागणार नाही हे ओळखुन २५ नोव्हेंबर १७४० रोजी झालेल्या तहानुसार पोतुगिजांनी साष्टीतील गावांच्या बदल्यात रेवदंडा व कोर्लईचा ताबा मराठ्यांना दिला. १८०६ मध्ये इंग्रजांनी याचा ताबा घेतला. १८१७ मध्ये आंग्रेने हा गड जिंकला. पण लगेच १८१८ मध्ये रेवदंडा किल्ला इंग्रजाकडे गेला.---------- सुरेश निंबाळकर