जिल्हा - रायगड 
श्रेणी  - मध्यम   
दुर्गप्रकार - गिरीदुर्ग
 

सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात काळाच्या ओघात विस्मृतीच्या पडदयाआड गेलेले अनेक गडकिल्ले आहेत. इतिहासात या किल्ल्यांचा उल्लेख नसल्याने व यांचे निश्चित स्थानही माहित नसल्याने कुणीही या किल्ल्यांकडे फिरकत नाही. अशा अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला म्हणजे रायगड जिल्ह्यातील अलिबाग जवळ असलेला रामदरणे किल्ला. किल्ल्याचे स्थान व आकार पहाता याचा उपयोग केवळ टेहळणीसाठी होत असावा असे वाटते. रामदरणे किल्ल्यास भेट देण्यासाठी सर्वप्रथम अलीबाग-रेवसमार्गे ७ कि.मी. अंतरावरील वायशेत गाठावे. रामदरणे किल्ला गावकऱ्याना माहित नसुन किल्ल्याच्या अलीकडील डोंगरावर असलेले रामदरणेश्वर मंदिर मात्र सर्वानाच परिचित आहे त्यामुळे गावात किल्ल्याची चौकशी करण्याऐवजी या मंदिराची चौकशी करावी. किल्ला असलेल्या डोंगराखालील पठार अस्ताव्यस्त पसरलेले असुन या डोंगराखाली असलेल्या गावातुन पठारावर जाण्यासाठी अनेक वाटा आहेत पण वायशेत येथुन किल्ल्यावर जाणारी वाट सरळसोपी व जास्त रुळलेली आहे. वायशेत गावाच्या पुर्वेस दगडाची खुप मोठी खाण असुन या खाणीच्या वरील बाजुस टेकडीवर रामदरणेपाडा म्हणुन लहानशी आदिवासी वस्ती आहे. वायशेत गावातुन एमआयडीसी पाईपलाईन रोड ओलांडुन आपण या वस्तीवर येतो. या वस्तीच्या वरील बाजुस मातीचा बंधारा असलेला तलाव असुन तेथवर जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे पण तो बऱ्याच ठिकाणी खचलेला असल्याने त्यावरून पायगाडी हाच उत्तम पर्याय आहे. वायशेत गावातुन रामदरणे पाड्यावर येण्यास अर्धा तास पुरेसा होतो. रामदरणेश्वर मंदिराकडे जाणारी वाट मळलेली असली तरी तेथुन पुढे किल्ल्यावर वावर नसल्याने शक्य झाल्यास या पाड्यावरुन वाटाड्या घ्यावा. पाड्याच्या वरील बाजुस एक प्रशस्त पठार असुन या पठारावर मातीचा बंधारा घालुन पाणी अडविलेला मोठा तलाव आहे. या तलावाच्या काठावर एक देवीमंदिर असुन या मंदिरात दहा-बारा जणांची राहण्याची सोय होते. या मंदिराच्या अलीकडून एक वाट समोरील डोंगरावर असलेल्या रामदरणेश्वर मंदिराकडे जाते. मंदिर असलेल्या टेकडीच्या पायथ्याशी आल्यावर एक वाट डाव्या बाजुने टेकडीवरील जिर्णोध्दारीत मंदिराकडे जाते तर एक वाट सरळ पुढे जाते. मंदिर न पहाता किल्ल्यावर जायचे असल्यास सरळ पुढे निघावे किंवा टेकडीवर चढुन मंदिर पाहुन दुसऱ्या बाजुने परत खाली उतरावे. पाड्यावरून या मंदिरापर्यंत येण्यास एक तास लागतो. रामदरणेश्वर मंदिर पठारावरील सर्वात उंच टेकडावर असल्याने येथुन थळचा खतप्रकल्प, सागरगड, खांदेरी, उंदेरी आणि कनकेश्वर डोंगर इतका दूरवरचा प्रदेश दिसुन येतो. मंदीर व रामदरणे किल्ला यामध्ये एक उंच टेकाड असल्याने किल्ला मात्र दिसत नाही. मंदीर पाहुन खाली आल्यावर अथवा वाटेने सरळ पुढे आल्यास एक ओढा पार करताना त्यात पाण्याचे कुंड खोदलेले दिसते. या कुंडातील पाणी दुधी रंगाचे असुन गावकरी हे पाणी तीर्थ म्हणुन पिण्यास वापरतात. ओढा पार केल्यावर काही अंतरावर अजुन एक नव्याने बांधलेले देवीचे मंदिर दिसुन येते. मंदिराबाहेर काही झिजलेल्या मुर्ती ठेवलेल्या असुन मंदिरात नव्याने स्थापित देवीची मुर्ती व काही तांदळे ठेवलेले आहेत. मंदीरासमोर एक डोंगर असुन या मंदिराकडून खऱ्या अर्थाने किल्ला चढायला सुरवात होते. मंदिराकडून या डोंगरावर जाण्यास ठळक अशी वाट नसुन डोंगराच्या उजव्या बाजुने डोंगर चढण्यास सुरवात करावी. येथुन १५ मिनिटांचा उभा चढ चढुन गेल्यावर आपण डोंगरमाथ्यावर पोहोचतो. येथुन समोर दिसणारी टेकडी म्हणजेच रामदरणे किल्ला पण तेथे जाण्यासाठी आपण आलो तो डोंगर उतरत किल्ला व डोंगर यामधील घळीत जावे लागते. हि घळ म्हणजे किल्ल्याला या डोंगरापासून वेगळे करण्यासाठी मानवनिर्मित खाच आहे. घळीच्या वर किल्ल्याकडील बाजुस चौकीचे अवशेष असुन घळीत उजवीकडे व डावीकडे जाणाऱ्या पायवाटा दिसतात. डावीकडील पायवाट किल्ल्यावर तर उजवीकडील पायवाट पाण्याच्या टाक्याकडे जाते. टाक्याकडे जाणारी पायवाट टाक्यापुढील भागात मोठया प्रमाणात कोसळली असल्याने टाक्यापर्यंत पोहोचता येत नाही पण किल्ल्यावरून कातळात कोरलेली हि ३ टाकी पहाता येतात. डावीकडील वाटेने वर चढत आल्यावर आपला एका बुरूजावरून गडमाथ्यावर प्रवेश होतो. वायशेत गावातुन येथवर येण्यास दोन ते अडीच तास लागतात. या ठिकाणी असलेला गडाचा दरवाजा व त्याची कमान पुर्णपणे नष्ट झालेली असुन दरवाजाशेजारी असणारे दोन्ही बुरुज व त्याशेजारील तटबंदी आजही काही प्रमाणात शिल्लक आहे. बुरुज व तटबंदीच्या या बांधकामात कोणतेही मिश्रण वापरलेले नाही. दरवाजात उभे राहिले असता किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या परहूररपाडा गावातून किल्ल्यावर येणारी एक वाट नजरेस पडते. किल्ल्याचा दरवाजा पश्चिमाभिमुख असुन किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून ७४० फुट उंच आहे. साधारण त्रिकोणी आकाराचा गडमाथा दिड एकर परिसरावर पसरला असुन किल्ल्यावर एका मोठया उध्वस्त वास्तुचे तसेच काही घरांचे अवशेष दिसुन येतात. किल्ल्याच्या पश्चिमेकडील सोंडेवरून तटबंदीखाली असलेली कातळात कोरलेली ३ टाकी दिसतात. किल्ल्यावरुन कार्ले खिंड, सागरगड, उंदेरी,खांदेरी आणि कनकेश्वर डोंगर इतका दूरवरचा प्रदेश दिसतो. गडाचा घेरा फारच लहान असल्याने १५ मिनिटात आपली गडफेरी पुर्ण होते.-------------------------सुरेश निंबाळकर

रामदरणे