जिल्हा - धुळे  
श्रेणी  - सोपी   
दुर्गप्रकार - भुईकोट

खानदेश प्रांत साडे बारा रावलांचे वतन म्हणुन देखील ओळखला जातो. रावळ हि पदवी असुन या रावळात सिसोदिया, सोळंकी, परमार, प्रतिहार अशी वेगवेगळी कुळे आहेत. हि साडेबारा वतन म्हणजे १.दोंडाईचा २.मालपुर ३.सिंदखेडा ४.आष्टे ५.सारंगखेडा ६.रंजाणे ७.लांबोळा 8.लामकानी ९.चौगाव १०.हातमोइदा ११.रनाळे १२.मांजरे १३.करवंद हे अर्धे वतन खानदेशात व अर्धे खानदेश बाहेर असल्याने अर्धे वतन म्हणुन ओळखले जाई. यातील आष्टे, लांबोळा, चौगाव, हटमोईदा या ४ गढी पुर्णपणे नष्ट झालेल्या असुन ४ गढी आजही त्यांच्या मूळ रुपात शिल्लक आहेत तर उरलेल्या ५ गढी त्यांचे अवशेष संभाळत काळाशी झुंज देत आहेत. यातील बहुतांशी गढीकोटात गावे वसलेली असल्याने गावातील वाढत्या वस्तीने या कोटांच्या अवशेषांचा घास घेतला आहे तसेच स्थानिकांची उदासीनता देखील या कोटांच्या ऱ्हासाला कारणीभूत होत आहे. वतने खालसा झाल्यावर खाजगी मालमत्ता असलेल्या गढीची देखभाल करणे गढी मालकाला अवघड झाल्याने बहुतांशी गढीकोट उध्वस्त होत चालले आहेत तर काही पार जमीनदोस्त झाले आहेत. लामकानी गढी हि त्यापैकी एक. आजच्या संगणकाच्या युगात आंतरजालावरही या गढीची माहिती दिसुन येत नाही. आमच्या दुर्गभरारी या समुहाने या सर्व गढीचा दौरा केला असता मिळालेली माहिती या संकेतस्थळावर मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. लामकानी गढी धुळे शहरापासुन ४० कि.मी. अंतरावर असुन मुंबई- आग्रा महामार्गावरील सर्वंड फाटा येथुन तेथे जाता येते. सर्वंड फाटा ते लामकानी हे अंतर २४ कि.मी. आहे. लामकानी गावात या गढीचे उरलेसुरले अवशेष आहेत. गढीच्या मूळ वास्तुवर नव्याने बांधलेली घरे असुन या घरांच्या बांधकामात गढीचे उरलेसुरले अवशेष पुर्णपणे नष्ट झाले आहेत. उंचवट्यावर असलेल्या या घरांपैकी एका घराच्या मागील बाजुस या गढीचा केवळ एक ढासळलेला बुरुज व एक विहीर शिल्लक आहे. गढीचे हे दोनच अवशेष आज शिल्लक आहेत. गढीचे उर्वरित अवशेष संपुर्णपणे नष्ट झाल्याने गढीचा आकार व इतर अवशेष याबाबत काहीच अंदाज करता येत नाही. गढीचे अवशेष पहाण्यास दहा मिनिटे पुरेशी होतात. गावात फिरताना काही जुन्या वाड्यांचे अवशेष पहायला मिळतात. इतिहासात लामकानी गढीचे फारसे वेगळे असे संदर्भ आढळत नाहीत. खिलजीच्या आक्रमणानंतर राजपुतांची २४ कुळे अभयसिंह रावल यांच्या नेतृत्वाखाली मांडूच्या दिशेने गेली. औरंगजेब पुत्र शाहआलमच्या काळात लामकानी येथील रावल मोहनसिंह यांचे मुघलांशी भांडण झाले व त्यांनी मुघलांच्या एका तुकडीचा पराभव केला. औरंगजेबच्या मृत्युनंतर शाहु महाराज दक्षिणेत परतत असताना त्यांनी लामकानी येथे एक महिना मुक्काम केल्याची व त्यांना येथील जमीनदार सुजानसिंह रावळ यांनी मदत केल्याची नोंद राजवाडेंच्या खंड २० पृ. ६० मध्ये आली आहे. राजगादीच्या हक्काबाबत उदभववलेल्या तंट्यात येथे बरेच मराठा सरदार त्यांना सामील झाले. शाहूमहाराज येथुन चोरवडला व तेथुन परत कुसुंबीला आले व तेथुन काही दिवसांनी अहमदनगरला गेले. त्यानंतर थोरले बाजीराव पेशवे यांनी त्यांच्या उत्तरेकडील मोहिमेत सुजानसिंग रावळ यांची लामकांनीची गढी घेतली व सुजानसिंग रावळ यांना कैद करून त्यांची मालमत्ता जप्त केली. यावर सुजानसिंग रावळ यांनी छत्रपती शाहूमहाराजाना केलेल्या अर्जानुसार छत्रपती शाहूमहाराजानी बाजीराव पेशव्यांना सुजानसिंग रावळ यांना त्यांची मालमत्ता परत करून त्यांना सोडुन देण्याचा हुकुम दिला. इ.स.१७२३-२४ दरम्यान घडलेल्या या घटनांची नोंद शाहु रोजनिशीत आली आहे. वेळोवेळी सत्ताबदल झाले तरी या रावलांचे अधिकारात त्या सत्ताधीशांनी कोणतेच बदल केले नाही.-----------सुरेश निंबाळकर

लामकानी