मलकापुर

जिल्हा - बुलढाणा  
श्रेणी  -  सोपी
दुर्गप्रकार- भुईकोट

बुलढाणा जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेले मलकापुर शहर मध्य लोहमार्गावर एक महत्वाचे स्थानक आहे. मध्ययुगीन काळापासूनच अस्तित्वात आलेल्या या शहराचे महत्व आजही अबाधित राहिले आहे. मध्ययुगीन काळापासून नळगंगा नदीकाठी असलेले हे शहर उत्तरेतुन बुऱ्हाणपूरमार्गे दक्षिणेकडे जाणाऱ्या मार्गावरील महत्वाचे ठिकाण होते. सात वेशींचे शहर अशी ओळख असलेल्या या शहरात अगदी अलीकडील काळापर्यंत चार वेशींचे दरवाजे शिल्लक होते. यातील एक दरवाजा रस्ते रुंदीकरणात हल्लीच पाडला गेला असुन उर्वरीत तीन दरवाजे व त्या शेजारी असलेली तटबंदी आजही शिल्लक आहे. हे दरवाजे आज मुघल दरवाजा,मोहनपुरा दरवाजा आणि गांधीनगर दरवाजा या नावाने ओळखले जातात. किल्ला पहाण्यासाठी मलकापुर बस स्थानक अथवा रेल्वे स्थानकात उतरल्यावर साधारण २ कि.मी. अंतरावर असलेले मलकापुर गावठाण गाठावे. हे गावठाण म्हणजेच पुर्वीचे किल्ल्यात वसलेले मलकापुर शहर. साधारण ५० एकर परिघात वसलेल्या या शहराला तीन बाजुंनी नळगंगा नदीपात्राने वेढलेले असुन नदीच्या बाजुने जुजबी तटबंदी तर जमिनीकडील बाजुला भक्कम तटबंदी बांधुन संरक्षित करण्यात आले असावे. जमीनीच्या बाजुने शहराची वाढ झाल्याने त्या बाजुला असणारी तटबंदी व दरवाजे पुर्णपणे नष्ट झाले असुन नदीच्या काठाने असलेली काही तटबंदी व त्यातील तीन दरवाजे मात्र आजही शिल्लक आहेत. या तटबंदीला लागुनच स्थानिकांनी आपली घरे बांधली असल्याने तटबंदी आतील बाजुने जरी पहाता आली नाही तरी नदीकडील बाजुने पहाता येते. नदीच्या बाजुने असणारी तटबंदी म्हणजे केवळ जाडजुड दगडी भिंत असुन त्यावर फांजी व जंग्या दिसुन येत नाही. नदीच्या बाजुला गावाच्या दक्षिण दिशेला असलेला दरवाजा या कोटाचा बहुदा मुख्य दरवाजा असावा. या दरवाजाची अलीकडेच डागडुजी करण्यात आली असुन बुरुज व दरवाजाच्या बांधकामात बंदुकीच्या मारगिरीसाठी जंग्या दिसुन येतात. पुर्वाभिमुख असलेल्या या दरवाजा समोर जीभीची भिंत असुन या भिंतीत दोन लहान बुरुज आहेत. किल्ल्याचा मुख्य दरवाजा व जीभीची भिंत या मधील भागात जुने मारुतीचे मंदिर आहे. दरवाजाशेजारी दोन भक्कम बुरुज असुन यातील एका बुरुजावर झेंडा फडकविण्याची जागा आहे. दरवाजाच्या आतील बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या असुन तटाला लागुनच दरवाजावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. हा दरवाजा पाहुन सरळ गावातुन सरळ रस्त्याने गेल्यावर आपण या दरवाजाच्या विरुध्द दिशेला म्हणजे उत्तर दिशेला नदीकाठी असलेल्या मुघल दरवाजातून बाहेर पडतो. मुघल दरवाजा व त्या शेजारील तटबंदी आजही बऱ्यापैकी शिल्लक असुन आतील देवड्या मात्र कोसळलेल्या आहेत. या दरवाजाच्या बाहेरील बाजुस काही ओवऱ्या आहेत. या बहुधा घोड्यांच्या पागा किंवा वाटसरूंना रहाण्यासाठी धर्मशाळा असावी. दरवाजाबाहेर समोरच नदीकाठावर एक भलामोठा उध्वस्त बुरुज दिसुन येतो. मुघल दरवाजा पाहुन झाल्यावर तटबंदी बाहेरून सरळ रस्त्याने पुढे आल्यावर आपण किल्ल्याच्या तिसऱ्या दरवाजात पोहोचतो. हा दरवाजा व त्याशेजारील तटबंदी आजही सुस्थितीत असुन दरवाजाचे बाहेरील बांधकाम दगडांनी तर आतील बांधकाम विटांनी केले आहे. दरवाजाच्या आतील बाजुस पहारेकऱ्याची देवडी असुन वरील बाजुस बंदुकीच्या मारगीरीसाठी जंग्या दिसुन येतात. तटबंदीला लागुन दरवाजावर जाण्यासाठी पायऱ्या असुन या भागात घरे असल्याने तटाकडे व दरवाजावर जाता येत नाही. दरवाजाशेजारी असलेल्या तटबंदीत काही अंतरावर एक उध्वस्त बुरुज दिसुन येतो. याशिवाय नदीपात्रात एक लहान सुटा बुरुज दिसुन येतो पण त्याचे प्रयोजन कळत नाही. गावात फिरताना बऱ्याच जुन्या वास्तु पहायला मिळतात. संपुर्ण किल्ला फिरण्यास दोन तासाचा अवधी पुरेसा होतो. याशिवाय गावाबाहेर असलेली राणीची बाव म्हणुन ओळखली जाणारी विहीर आवर्जुन पहावी अशी आहे. विहीर असलेल्या या भागात काही प्रमाणात तटबंदी असुन मोठया प्रमाणात उध्वस्त वास्तु पहायला मिळतात. बहामणी सुलतान मलिक खान यांनी १३ व्या शतकात या शहराची स्थापना केली व शाहजादी मालिका हिच्या नावावरुन शहराला मलकापुर नाव मिळाले. ऐन-ई-अकबरी मधील उल्लेखानुसार मलकापुर परगणा नरनाळा सुभ्याचे मुख्यालय होते. या काळात फारुकी शहजादा मिरान गनी आदिलखान याचे देखील उल्लेख आढळून येतात. इ.स. १७६१ मध्ये रघुनाथराव पेशवे यांच्या सैन्याने मलकापुर येथुन ६०००० रुपयांची खंडणी वसुल केली. निजामांनी त्यांच्या सरहद्दीच्या या सीमावर्ती भागात सुमारे २०००० फौजफाटा ठेवला होता. इ.स. १८०३ मध्ये जनरल लॉर्ड वेलेस्लीच्या सुचनेवर कर्नल कॉलिन्स याने दौलराव शिंदे आणि रघुजी भोसले यांचा मलकापूरजवळ पडलेला तळ उध्वस्त केला. -------------सुरेश निंबाळकर