गावीलगड

गाविलगड किल्ल्यावर जाण्यासाठी सर्वात जवळचे ठिकाण म्हणजे चिखलदरा. चिखलदरा जाण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई - नागपूर मार्गावरील बडनेरा अथवा अमरावती गाठावे. अमरावती येथे जाण्यासाठी ठरावीक ट्रेन असुन बडनेरा या जंक्शनवर अमरावतीपेक्षा जास्त ट्रेन थांबतात. बडनेरा ते अमरावती हे अंतर ८ कि.मी असुन तेथे जाण्यासाठी बस तसेच रिक्षाची सोय आहे. अमरावती बस स्थानकातून चिखलदरा जाण्यासाठी दर २ तासांनी बस आहे तर वाटेवर ५० कि.मी. वर असलेल्या परतवाडा येथे जाण्यासाठी दर १५ मिनिटाला बस आहे. परतवाडा- चिखलदरा हे अंतर फक्त ३५ कि.मी असुन परतवाडा येथुन चिखलदऱ्याला जाण्यासाठी दर अर्ध्या तासाला मिनी बस आहेत तसेच खाजगी वाहनांची मोठया प्रमाणात सोय आहे. त्यामुळे अमरावती येथुन परतवाडयाला जाऊन तेथुन चिखलदरा जाणे जास्त सोयीचे आहे. चिखलदरा बसस्थानकातुन गाविलगडचा दरवाजा २ कि.मी.वर असुन चालत जाण्यास अर्धा तास लागतो. किल्ला पुरातत्व खात्याच्या ताब्यात असल्याने प्रवेश शुल्क प्रतिव्यक्ती २५ रुपये तर किल्ला पहाण्याची वेळ सुर्योदय ते सुर्यास्त अशी आहे. गाविलगड पहाण्यास एक अख्खा दिवस लागत असल्याने व किल्ला पहाण्यास पुर्ण दिवस चालायचे असल्याने शक्यतो खाजगी वहानाने किल्ल्याच्या दरवाजापर्यंत जावे. यामुळे चालायचे श्रम वाचतात शिवाय किल्ला पहाण्यास अर्धा तास जास्त मिळतो. किल्ल्यावर पिण्यायोग्य पाणी व जेवणाची सोय नसल्याने दिवसभर पुरेल इतके पाणी व खाण्याचे पदार्थ सोबत ठेवावे. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण असल्याने येथे मोठया प्रमाणात पर्यटकांची गर्दी असते व हि गर्दी किल्ल्यावर येत असल्याने शक्यतो सुट्टीच्या दिवशी किल्ल्यावर जाणे टाळावे. सकाळी लवकर सुरवात केल्यास गर्दी होण्यापुर्वी आपला किल्ल्याचा सुरवातीचा भाग पाहुन होतो. फिरायला आलेली मंडळी दुर्गप्रेमी नसल्याने दिवसभर पुर्ण किल्ला फिरण्याचे श्रम घेत नाही पण किल्ल्याच्या सुरवातीच्या भागात मोठया प्रमाणांत गर्दी असते. गाविलगड मुख्य किल्ला व परकोट अशा दोन भागात विभागलेला असुन मुख्य किल्ला १४ व्या शतकात तर परकोट नंतरच्या काळात म्हणजे १७ व्या शतकात बांधलेला आहे. मुख्य किल्ल्यासमोर असलेल्या लहान टेकडीला परकोट बांधलेला असुन कि टेकडी चिखलदऱ्याला लहानशा सपाटीने जोडलेली असल्याने शत्रुला सहजपणे पोहोचता येऊ नये यासाठी या भागात खंदक तसेच दुहेरी तटबंदीची रचना केलेली आहे. किल्ल्याचा डोंगर पुर्वपश्चिम पसरलेला असून मुख्य किल्ल्याचा परीसर २४० एकर तर परकोटाचा परीसर ९० एकर आहे. संपुर्ण किल्ल्याची तटबंदी साधारण ६ कि.मी.वर पसरलेली आहे. खाजगी वहानाने किल्ल्याजवळ आल्यावर आपल्याला उजवीकडे तटबंदीला लागुन असलेला मछली तलाव तर समोरच दोन बुरुजात बांधलेला दक्षिणाभिमुख मछली दरवाजा दिसतो. तटबंदीसाठी दगड काढल्याने मछली तलाव निर्माण झाला असुन यामुळे पाणी व खंदक या दोन्ही गरजा पुर्ण झाल्या आहेत. मछली तलावाच्या बाजुस परकोटाची दुहेरी तटबंदी असुन या तटबंदीत तलावाचे पाणी घेण्यासाठी लहान दरवाजा बांधलेला आहे. दरवाजातुन आत शिरल्यावर दुसऱ्या दरवाजाकडे जाणारा मार्ग दोन्ही बाजुंनी तटबंदीने बंदीस्त केला आहे. डावीकडील तटबंदीत दोन ठिकाणी फांजीवर जाण्यास पायऱ्या बांधल्या आहेत. दुसरा दरवाजा पहील्या दरवाजाला काटकोनात बांधलेला असुन या दरवाजाशेजारी दोन लहान चौकोनी बुरुज व उजव्या बुरुजाला लागुन दुसरा मोठा गोल बुरुज आहे. या दरवाजाला बिरभान दरवाजा नाव आहे. दरवाजाच्या आत उजव्या बाजुस पहारेकऱ्यासाठी ओटा बांधलेला आहे. दरवाजातुन आत शिरल्यावर सर्वप्रथम गडाचा डावीकडील भाग पाहुन घ्यावा. दरीच्या काठावर टोकापर्यंत असलेल्या या तटबंदीत एकुण ४ बुरुज असुन सुरवातीला असलेला बुरुज तेलिया बुरुज म्हणुन ओळखला जातो. या बुरुजाच्या वरील भागात खोली बांधलेली असुन तटाखाली कमानीदार ओवऱ्या बांधलेल्या आहेत. तटाच्या पुर्व टोकाशी असलेल्या बुरुजावर तोफेसाठी गोलाकार चौथरा बांधलेला आहे. या बुरुजावरून किल्ल्याच्या आतील भागात पहिले असता उतारावर कोरडा पडलेला बांधीव तलाव दिसतो. हा तलाव दर्या तलाव नावाने ओळखला जातो. किल्ल्याच्या या भागात काही प्रमाणात झाडी त्यात तुरळक वास्तु अवशेष नजरेस पडतात. दरवाजाचा डावीकडील हा भाग पाहुन झाल्यावर उजव्या बाजुने आपल्या पुढील गडफेरीस सुरवात करावी. हा संपुर्ण भाग दुहेरी तटबंदीने बंदिस्त केला असुन या तटबंदीत तलावाच्या वरील बाजुस मछली बुरुज पुढे चांदणी बुरुज व शेवटी खिंड दरवाजा पहायला मिळतो. झाडीतुन वाट काढत फांजीवरून जाताना तटामध्ये बांधलेल्या ओवऱ्या तसेच तटावर जाण्यासाठी जागोजागी पायऱ्या पहायला मिळतात. तटावरून फेरी मारत आपण गडाच्या पश्चिम टोकावर मोझरी गावाच्या दिशेने असलेल्या खिंड दरवाजात पोहोचतो. या भागात मोठया प्रमाणात बांधकामे असुन गड नांदता असताना हाच दरवाजा प्रामुख्याने वापरात असावा. मोझरी दरवाजाच्या बांधकामात एक मुख्य दरवाजा व त्याशेजारी काही अंतरावर दुसरा लहान दरवाजा आहे. दरवाजाजवळील बुरुजात तळघर असुन त्यातुन तटावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. या भागात तटाजवळ एका मोठया वास्तुच्या दरवाजाची कमान शिल्लक असुन तटामध्ये मोठया प्रमाणात देवड्या आहेत. हि बहुदा गडाची सदर अथवा शासकीय कामाची इमारत असावी. सदरेच्या पुर्व बाजुस असून एक तळघर/ भुयार पहायला मिळते. या भुयाराजवळ थडग्याचा कोरीव दगड पडलेला आहे. याच्या जवळच असलेल्या दुमजली पडीक वास्तुच्या भिंतीत एक लहान दरवाजा तसेच वरील मजल्यावर जाण्यासाठी असलेल्या पायऱ्या दिसतात. हा भाग पाहुन झाल्यावर आतील वाटेने बिरभान दरवाजाजवळ परतताना एका झाडाच्या कठड्यावर शिवलिंग व समाधीचा दगड पहायला मिळतो. बिरभान दरवाजाजवळ येऊन सरळ जाणाऱ्या पायवाटेने मुख्य किल्ल्याच्या दिशेने निघावे. या वाटेने जाताना काही अंतरावर डाव्या बाजुस परकोटाची तटबंदी लागते. या तटबंदीच्या वळणावर बांधलेल्या चौकीतुन परकोटाचा वीरभान दरवाजा व गाविलगडचा मुख्य शार्दुल दरवाजा अशा दोन्ही दरवाजावर नजर ठेवता येते. वीरभान दरवाजातुन गाविलगडच्या उत्तराभिमुख शार्दुल दरवाजात येण्यास २० मिनीटे पुरेशी होतात. शार्दुल दरवाजासमोर रुंद पायऱ्या बांधलेल्या असून गाविलगडचा हा दरवाजा त्यावरील गंडभेरुंड शिल्पामुळे दुर्गप्रेमीना चांगलाच परिचयाचा आहे. साधारण २५ फुट उंचीच्या या दरवाजाच्या दोन्ही बाजुस कमळपुष्प कोरली असून कमानीवर फळांनी लगडलेले खजुराचे झाड व त्याशेजारी दोन्ही बाजुस गंडभेरुंड शिल्प कोरलेले आहे. गंडभेरुंड हा काल्पनिक दुतोंडी पक्षी असुन या पक्षाने दोन चोचीत दोन हत्ती व पंजात एक शरभ पकडलेला असुन या शरभाने पंजात चार शेपटीत एक व दोन्ही तोंडात प्रत्येकी एक असे सहा हत्ती पकडल्याचे दर्शविले आहे. एकेकाळी विजयनगरच्या हिंदु साम्राज्याचे प्रतिक असलेले हा गंडभेरुंड आजही कर्नाटक राज्य वाहतुक महामंडळाचे बोधचिन्ह आहे. दरवाजाच्या आतील कमानीत असलेला नक्षीदार घुमट आवर्जुन पहावा असा आहे. या दरवाजाच्या आत उजवीकडे १०० फुटावर काटकोनात दुसरा दरवाजा बांधला असुन त्यापुढे १०० फुटावर काटकोनात तिसरा प्रशस्त दिल्ली दरवाजा बांधलेला आहे. शार्दुल दरवाजा ते दिल्ली दरवाजा या मार्गावर पायऱ्या बांधलेल्या असुन हा संपुर्ण मार्ग तटबंदीने बंदिस्त केलेला आहे. दिल्ली दरवाजा दोन चौकोनी स्तंभात बांधलेला असुन त्याशेजारी दोन गोलाकार बुरुज आहेत. या दोन्ही स्तंभात रहाण्यासाठी व टेहळणीसाठी दालने आहेत. या दरवाजाच्या कमानीवर दोन मोठे शरभ कोरलेले असल्याने या दरवाजाला वाघ दरवाजा म्हणुन देखील ओळखले जाते. या दरवाजाच्या आत दोन्ही बाजुस लांबलचक चौथरे बांधलेले असुन समोरील बाजुस किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी दुसरा दरवाजा बांधला आहे. या दोन्ही चौथऱ्यावर असलेले कमानीदार छत हल्लीच ढासळलेले असुन त्याचे दगड या चौथऱ्यावर पडलेले आहेत. या ठिकाणी परीसरातील लोकांसाठी सदर असावी व त्यांना गडातील पुढील प्रवेश वर्ज्य असावा. दरवाजातुन आत शिरल्यावर डावीकडे हिरव्यागार पाण्याने भरलेला खांब तलाव आहे. या तलावाच्या काठाने सरळ पुढे आल्यावर आपण देव तलावाजवळ येतो. हा गडावरील सर्वात मोठा तलाव असुन या तलावाच्या काठावर खांब तलावाच्या दिशेने असलेल्या भिंतीत हा तलाव भरल्यावर त्यातील पाणी नाळीवाटे खालील खांब तलावात सोडण्याची सोय केलेली आहे. तलावाच्या काठावर तीन कमानीवर तोललेली लहान मशीद असुन मशिदीच्या उजवीकडील उंचवट्यावर टांकसाळची कमानीदार इमारत आहे. घडीव दगडात बांधलेल्या या मशीदीवर मोठया प्रमाणात कोरीव काम केलेले असून छतावर चार टोकास चार चौकोनी स्तंभ तर मध्यभागी गोलाकार घुमट आहे. मशीदीत असलेल्या शिलालेखात हि मशीद निजामशाही काळात बहिरामखानच्या मुलाने बांधल्याचा उल्लेख आहे. येथुन एक वाट सरळ तर दुसरी वाट उजवीकडे देव तलावाच्या बांधावरून जाताना दिसते. बांधावरील या वाटेने पुढे जाताना डावीकडे खाली दरीच्या काठावर झाडीत लपलेला लहान कीचक दरवाजा दिसतो. येथुन पुढे गेल्यावर वाटेच्या डावीकडे बुरुजासारखा बांधीव गोलाकार उंचवटा दिसतो. या उंचवट्यावर आपल्याला २० फुट लांबीची लोहारा नावाची तोफ पहायला मिळते. तोफेकडे उभे राहुन दरीच्या दिशेने पाहीले असता दूरवरचा प्रदेश नजरेस पडतो तर किल्ल्याच्या आतील भागात समोरील उंचवट्यावर झाडीत लपलेली इमारत दिसते. लोहारा तोफेकडून या इमारतीकडे आले असता या इमारती भोवती अनेक कोनाडे व दोन दरवाजे असलेली प्राकाराची भिंत दिसते. अतिशय जीर्ण अवस्थेत असलेल्या या इमारतीचे बांधकाम विट व चुन्यामध्ये केलेले असुन हि इमारत म्हणजे भोसलेंच्या काळात बांधलेले मंदिर आहे. काही ठिकाणी हे शिवमंदिर असल्याचे उल्लेख येतात पण आत मुर्तींसाठी असलेले कट्टे पहाता हे शिवमंदिर नसुन इतर देवतांचे मंदिर असावे. मंदिराकडून तलावाकडे जाण्यासाठी रुंद पायऱ्या बांधलेल्या असुन थोडे पुढे गेले असता कोरडा पडलेला सती तलाव पहायला मिळतो. सती तलाव पाहुन पायऱ्यांच्या वाटेने खाली उतरल्यावर उजवीकडे एक समाधी छत्री पहायला मिळते तर डावीकडे धोबी तलाव आहे. धोबी तलाव व देव तलाव यामधील बांधावर दोन समाधी वृंदावन बांधलेले आहेत. इ.स.१८०३ मधील इंग्रज मराठे युद्धात किल्लेदार बेनसिंग यास विरगती प्राप्त झाल्यावर त्याला देव तलावाच्या काठावर अग्नी दिला त्यावेळी त्याची पत्नी कुंवारीसह इतर १४ स्त्रिया सती गेल्याचा उल्लेख इंग्रज अधिकारी जस्पर निकोलस याच्या दैनंदिनीत येतो. यावरून छत्री समाधी किल्लेदार बेनसिंग याची व इतर समाध्या त्याच्या बायकांच्या असण्याची शक्यता आहे. सरळ वाटेने पुढे जाताना डावीकडील बाजुस काही अंतरावर लेंडी तलाव आहे तर सरळ गेल्यावर आपण सुरवातीस पाहिलेल्या टांकसाळीच्या इमारतीपाशी येतो. काही ठिकाणी हे धान्यकोठार अथवा दारुकोठार असल्याचा उल्लेख येतो पण वस्ती व पाणवठ्याजवळ दारुकोठार असणे शक्य नाही शिवाय गडावर इतकी सपाटी असताना अडचणीच्या ठिकाणी इतके लहान धान्यकोठार बांधणे शक्य नाही. या कोठारात वेगवेगळी दालने असुन या इमारतीची अंतर्गत रचना पहाता हि इमादशाहीच्या काळात बांधली गेलेली टांकसाळ आहे. टांकसाळीच्या मागील बाजुस झाडीत लपलेली लांबलचक भिंत दिसते. टांकसाळीच्या पुढील बाजुने वडाच्या झाडांमधुन तेथे जाण्यासाठी बांधीव पायरीमार्ग आहे. या पायऱ्यांच्या वरील बाजुस जमीनीत एक भुयार असुन या भुयाराच्या तोंडावर मोठया प्रमाणात झाडी वाढलेली आहे. येथे मोठया प्रमाणात झाडी वाढलेली असुन तलावाच्या दिशेने असलेल्या भिंतीत काही खिडक्या व मोठया प्रमाणात कोनाडे आहेत. लांबलचक असलेली हि वास्तु रुंदीला फारशी नसुन झाडी असल्याने नीटपणे फिरता येत नाही. पण हि वास्तु बहुदा घोडयाची पागा असावी. या वास्तुच्या पुढील भागात तटबंदीने बंदीस्त केलेला राजवाडा असुन त्यात हमामखाना तसेच एक बांधीव विहीर आहे. राजवाड्याच्या पुढील भागात राजदरबार आहे. राजदरबार व राजवाडा हि दोन्ही ठिकाणे लेंडी तलावाच्या वरील बाजुस आहेत. या वास्तु पाहुन आलो त्या दिशेने असलेल्या समोरील टेकडीवर चढुन जावे. हि टेकडी काही ठिकाणी तटबंदीने बंदिस्त केलेली असुन टेकडीच्या माथ्यावर नगारखाना नावाची १८ फुट लांब बांगडी तोफ आहे. टेकडीच्या खालील बाजुस तटबंदीच्या दिशेने एका चौथऱ्यावर बांधलेली सुस्थितीतील वास्तु दिसते. या वास्तुच्या भिंती आजही शिल्लक असून केवळ छप्पर कोसळलेले आहे. नगारखाना म्हणुन ओळखली जाणारी हि इमारत मात्र काही वेगळ्याच वापरासाठी असावी. या इमारतीच्या उजवीकडून खाली तटबंदीवर उतरून आले असता आपण दिल्ली दरवाजाच्या उजव्या बाजुस येतो. येथे तटावर तुटलेल्या तोफेचा मागील भाग पहायला मिळतो. आतापर्यंत अर्धा दिवस संपलेला असल्याने व आपली पुढची गडफेरी तटबंदीच्या काठाने उन्हातुन करायची असल्याने खाण्याचा कार्यक्रम येथे सावलीत उरकून घ्यावा. जेवताना पायांना अर्ध्या तासाची सुट्टी मिळालेली असल्याने वेळ न दवडता आपल्या पुढील गडफेरीस सुरवात करावी. तटबंदीच्या कडेने त्यातील बुरुज पहात नगारखान्याची इमारत पार करून १० मिनिटात आपण गडाच्या पश्चिम टोकावर मोझरी गावाच्या दिशेने असलेल्या बुरुजावर पोहोचतो. या बुरुजाच्या अलीकडे तटबंदीत परकोट व मुख्य किल्ला यामधील दरीत उतरण्यासाठी लहान दरवाजा असुन वाटेवर १२ फुट लांबीची बांगडी तोफ दिसते. या तोफेचा मागील भाग तुटलेला असुन आपण सुरवातीस पाहिलेली ६ फुट लांबीची भग्न तोफ या तोफेचा मागील भाग असावा म्हणजे हि तोफ देखील १८ फुट लांबीची असावी. मोझरी बुरुज पाहून तटबंदीच्या काठाने साधारण १५ मिनीटे चालल्यावर आपण किल्ल्याच्या दक्षिण बाजुला असलेल्या चोर दरवात पोहोचतो. या दरवाजा पुढे किल्ल्यावरील सर्वात सुंदर व प्रशस्त असा अर्धगोलाकार बहराम बुरुज आहे. या बुरुजात १२ गवाक्ष असल्याने याला बारा खिडकी बुरुज म्हणुन ओळखले जाते. या बुरुजातील गवाक्षावर असलेल्या पर्शियन शिलालेखात या बुरुजाचा उल्लेख बुर्ज-ए-बेहराम असा आला असुन या बुरुजाचे बांधकाम व किल्ल्याची दुरुस्ती निजामशाही किल्लेदार बहराम याने हिजरी सन ९८५ म्हणजेच इ.स.१५७७ मध्ये केल्याचा उल्लेख येतो. बेहराम बुरुज पाहुन समोरील उंचवट्यावर गेले असता दोन महाकाय तोफा पहायला मिळतात. यातील पहिली बिजली तोफ १० फुट लांब असुन हिचा व्यास २ फुटाचा आहे. हि तोफ कमी अंतरावर मारा करणारी असुन हिची विध्वंसक ताकद जास्त आहे. तर दुसरी काळभैरव तोफ २० फुट लांब असुन हिच्यात लांबवर मारा करण्याची क्षमता आहे. या तोफांच्या पुढील बाजुस काही अंतरावर दिसणारी वास्तु म्हणजे आपण आधी पाहिलेला राजदरबार आहे. राजदरबाराच्या या वास्तुकडे जाऊन खाली उतरल्यावर आपण लेंडी तलावाच्या काठावर येतो व तेथुन खाली आल्यावर धोबी तलावाच्या काठावरील मुख्य पायवाटेवर येतो. या मळलेल्या वाटेने पुढे जाताना डावीकडे झाडीत काही समाधी व विरगळ आहेत. येथुन पुढे आल्यावर उजवीकडे मातीत अर्धवट गाडलेल्या एका वास्तुची कमान दिसते तर थोडया अतरावर डावीकडे आटत चाललेला साचपाण्याचा पावसाळी तलाव दिसतो. तलावाकडून पायऱ्या चढुन वर आल्यावर आपण या किल्ल्यावरील सर्वात उंच ठिकाणी असलेल्या सुंदर अशा जामा मशिदीकडे पोहोचतो. या ठिकाणी किल्ल्याची समुद्रसपाटीपासुन उंची ३४३९ फुट आहे. किल्ल्यावरील सर्वात उंच भागात असलेल्या या मशिदीचे घुमट किल्ला फिरत असताना सतत आपल्याला दिसत असतात. मशिदीचे आवार ताशीव दगडांनी फरसबंद केले असुन सभोवताली दगडी कुंपण घालुन बंदीस्त केलेले आहे. या कुंपणाच्या भिंतीवर नक्षीदार कमानी बांधलेल्या असुन मशिदीच्या आवारात प्रवेश करण्यासाठी तीन दिशांना तीन दरवाजे तर एका बाजुस मशिदीची इमारत आहे. या सर्व दरवाजांवर मोठया प्रमाणात कलाकुसर केलेली आहे. या मशिदीला ७ कमानी असलेली एकामागे एक अशी ३ दालने होती व या सर्व दालनांच्या छ्तावर २१ घुमट होते. यातील शेवटचे दालन आता कोसळलेले असून उर्वरित दोन दालनावरील केवळ १४ घुमट शिल्लक आहेत. या दालनातील कमानी आणि घुमटांचा भार चौकोनी खांबांवर तोललेला असुन या सर्वांवर मोठया प्रमाणात नक्षीकाम केलेले आहे. मशिदीच्या छताला चार टोकावर ४ नक्षीदार मनोरे होते पण मागील दालन कोसळल्याने आता केवळ दर्शनी भागातील २ मनोरे शिल्लक आहेत. मशिदीच्या मुख्य दरवाजासमोर चुना व विटांमध्ये बांधलेली घुमटाकार एकमजली इमारत म्हणजे इमादशाहीचा संस्थापक फत्तेउल्ला इमाद उलमुल्क याची कबर आहे. पण कोणी मुर्खांनी गुप्त धनासाठी हि कबर उकरलेली आहे. मशीद पाहुन झाल्यावर आपण सर्वप्रथम उजवीकडील दरवाजाने बाहेर पडावे. येथुन तटबंदीच्या कडेने उजवीकडे ५ मिनीटे चालत गेल्यावर तटाजवळ शेंदुर फासलेली हनुमान मुर्ती आहे. हि तटबंदी आजही सुस्थितीत असुन तटावरील फांजी व चर्या कायम आहेत. येथुन पुन्हा मशिदीत यावे व डावीकडील दरवाजाने बाहेर पडावे. या वाटेने सरळ चालत गेल्यावर गडावरील धान्यकोठार म्हणजेच अंबरखाना पहायला मिळतो. या अंबरखान्याला दोन मोठी दालने आहेत. अंबरखाना पाहुन पुन्हा मशिदीत यावे व मुख्य दरवाजाने खाली उतरून फत्तेउल्ला इमाद उलमुल्क याची समाधी पाहुन घ्यावी. समाधी पाहुन उजवीकडे वळून तटबंदीच्या काठाने पुढे आल्यावर एक पायवाट डावीकडे जाताना दिसते. या वाटेने आपण किल्ल्याच्या अंतर्गत भागात असलेल्या पीरफत्ते बुरुजावर येतो. या बुरुजावर गाविलगडावरील सर्वात लांब २५ फुट लांबीची पीरफत्ते तोफ ठेवलेली आहे. या तोफेकडून उजवीकडे तटबंदीच्या दिशेने खाली उतरून सरळ चालत गेल्यावर आपण फत्ते दरवाजात पोहोचतो. दरवाजाला लागुन पहारेकऱ्याच्या देवड्या असुन यातील एका देवडीत अलीकडे पिराची स्थापना केलेली आहे. संपुर्ण दरवाजाची बांधणी काळ्या दगडात केलेली असुन दरवाजावर मोठया प्रमाणात कोरीवकाम केलेले आहे. गडावरील हा सर्वात जास्त सजावट केलेला दरवाजा असुन दरवाजाच्या कमानीवरील भागात झीज झालेला पर्शियन शिलालेख आहे. मुख्य दरवाजा बंद असताना गडात प्रवेश करण्यासाठी या दरवाजाला लागुन असलेल्या बुरुजात एक लहान दरवाजा आहे पण हे बांधकाम दरवाजाच्या मुळ बांधकामातील नाही. दरवाजाशेजारील तटबंदीत राणी झरोका नावाचा गोलाकार दुमजली मनोरा असुन त्यातील पायऱ्यांनी वर गेले असता कमानीदार गवाक्ष पहायला मिळतात. चुना व विटांमध्ये बांधलेल्या या मनोऱ्याची बरीच पडझड झालेली असुन येथुन किल्ल्याचा पीरफत्ते दरवाजा व आसपासचा विस्तिर्ण प्रदेश दिसतो. पीरफत्ते दरवाजातुन खाली उतरणारी वाट बागलींगा गावात जाते. एव्हाना सुर्य उतरणीला लागलेला असून किल्ला पहाण्याची वेळ संध्याकाळी ६ वाजेपर्यंत असल्याने आपल्या परतीच्या प्रवासास सुरवात करावी. येथुन पुन्हा पीरफत्ते तोफेकडे येऊन तेथुन तटबंदीच्या काठाने आपला परतीचा प्रवास सुरु करावा. या वाटेने जाताना उजव्या बाजुस हिरव्या पाण्याने भरलेला धामाजी तलाव नजरेस पडतो. गडाच्या या पुर्व टोकाला दरीकाठावर सोनकिल्ला बुरुज असून वेळेअभावी तेथे जाणे झाले नाही. पाहिले हे देखील थोडके नसे अशी मनाची समजूत घालत दिल्ली दरवाजापाशी आल्यावर आपली गडफेरी पुर्ण होते. चिखलदरा वनविभाग कार्यालयाच्या आवारात आपल्याला गाविलगडावरून आणलेली ४ क्विंटल वजनाची पंचधातुची तोफ पहायला मिळते. गाविलगडचा इतिहास थेट महाभारत काळाशी जोडला जातो. प्राचीनकाळी या परिसरावर विराट राजाचे राज्य असताना पांडव अज्ञातवासासाठी येथे आले. द्रौपदीचा मोह धरणाऱ्या कीचकाचा भीमाने जेथे वध केला ते ठिकाण म्हणजे किचकदरा ज्याचा अपभ्रंश होऊन चिखलदरा झाले. हा किल्ला नेमका कोणी व केव्हा बांधला हे समजत नाही पण याची सध्याची बांधणी मात्र मुस्लीम वास्तु शैलीनुसार आहे. स्थानिक कथानुसार १२ व्या शतकात अहिर नावाच्या गवळी राजाने येथे मातीचा किल्ला बांधला त्यामुळे त्याला गवळीगड/गाविलगड असे नाव मिळाले. मध्ययुगीन काळात मध्यप्रदेशातुन सातपुडा डोंगररांग ओलांडुन वऱ्हाडात प्रवेश करणारे मल्हारघाट, देऊळघाट व भिंगारघाट हे घाटमार्ग या किल्ल्याच्या परीसरात असल्याने ज्याच्या ताब्यात गाविलगड त्याची वऱ्हाडवर सत्ता हे समीकरण होते. तारिख-इ-फरीश्ता या ग्रंथातील नोंदीनुसार हा किल्ला बहमणी शासन काळात इ.स. १४२५ मध्ये नववा बहमणी राजा अहमदशहा वली याने सातपुड्याच्या संरक्षणासाठी व उत्तरेकडून होणाऱ्या आक्रमणाला पायबंद घालण्यासाठी बांधला. पुढे वऱ्हाडचा सुभेदार फत्तेउल्ला इमाद उलमुल्क याने इ.स. १४८८ मध्ये या किल्ल्याची दुरुस्ती व विस्तार केला. विजयनगर साम्राज्यातील हा ब्राम्हण मुलगा बाटवल्याने मुसलमान झाला होता. बहमणी राज्याचा वऱ्हाड प्रांताचा सेनापती खान-ए-जहान याचा खास मर्जीतील हा मुलगा कालांतराने बहामनी राज्याचा सेनापती बनला. गाविलगडची दुरुस्ती करतांना शार्दुल दरवाजा बांधताना त्यावर त्याने विजयनगर साम्राज्याचे चिन्ह गंडभेरूंड व मुस्लीम राजसत्तेचे प्रतिक असलेली खजूराचे झाड ही दोन्ही चिन्हे कोरली. बहामनीची शकले पडुन स्वतंत्र झाल्यावर फत्तेउल्ला इमाद उलमुल्क याने इ.स.१४९० मध्ये इमादशाहीची स्थापना केली व गाविलगडला आपली राजधानी केली. इमादशाही घराण्याने ९० वर्षे वऱ्हाड प्रांतावर राज्य केले. इ.स. १५७२ मध्ये नरनाळा येथील तुफालखानाच्या पराभवानंतर इमादशाहीच्या सर्व वंशजांची हत्या करण्यात आली व इमादशाही संपुष्टात येऊन गाविलगड व नरनाळा किल्ले निजामशहाच्या ताब्यात आले. निजामशहाच्या काळात किल्लेदार बहरामखान याने इ.स.१५७७ या किल्ल्याची दुरुस्ती केल्याचा उल्लेख पश्चिमेकडील बहराम बुरुजावरील शिलालेखात येतो. बऱ्हाणपुरचा महमदशाह फारुकी याने किल्ल्यावर हल्ला केला पण त्याला या लढाईत पराभव पत्करावा लागला. अबुल फजल याच्या ऐने इ अकबरीत अकबराच्या काळात इ.स.१५९८ मध्ये हा अतिशय बळकट व मजबुत किल्ला मुघल साम्राज्याला जोडल्याचा उल्लेख येतो. पुढे मलिक अंबरने हा किल्ला पुन्हा निजामशाहीत आणला पण शहाजहानच्या काळात निजामशाहीच्या अस्तानंतर गाविलगड पुन्हा मुघलांच्या ताब्यात गेला. इ.स.१६८० मधे संभाजीराजानी देवगडच्या गोंड राजांच्या मदतीने या किल्ल्याच्या आसपासच्या भागावर हल्ले केल्याचे उल्लेख येतात. इ.स.१७०३ साली औरंगजेबने दिलेरहीमतच्या जागी मीर अब्दुलसलाम याची किल्लेदार म्हणुन नेमणूक केली. इ.स.१७३८ मध्ये रघूजी भोसले यांनी अचलपुरचा सुभेदार शुजातखानचा पराभव करुन गाविलगड व नरनाळा हे दोन्ही किल्ले मराठा राज्यात सामील केले पण लवकरच हे किल्ले पुन्हा निजामाच्या ताब्यात गेले. निजाम व पेशवे यांच्यातील वादात मुधोजी भोसले यांनी १७५२ मध्ये गाविलगड जिंकून घेतला. त्यानंतर संकटकाळी गाविलगड हे नागपुरकर भोसल्यांचे मुख्य ठाणे बनले. इ.स.१७६९ मध्ये माधवराव पेशवे वऱ्हाडवर चालून येत आहेत कळल्यावर जानोजी भोसले यांनी त्यांचे कुटुंब व खजीना गाविलगडवर हलवला व नरहर बल्लाळ याची पाच हजार सैन्यासह गाविलगडवर नेमणूक केली. या काळात त्यांनी मुळ किल्ल्याबाहेर सुरक्षेसाठी मजबुत परकोट बांधला. २१ मे १७७२ रोजी जानोजी भोसले यांचा गाविलगडवर मृत्यु झाला. इ.स. १८०३ मध्ये आडगाव येथील इंग्रज मराठे युद्धात मराठ्यांच्या पराभवानंतर इंग्रजांनी गाविलगडावर आपले मोर्चा वळविला. १३ ते १५ डिसेंबर १८०३ या तीन दिवसात इंग्रज सेनानी वेलस्ली व भोसल्यांचा किल्लेदार बेनिसिंग यांच्यात गाविलगडावर लढाई झाली. १४ डिसेंबरच्या रात्री तोफांचा मारा करून शार्दुल दरवाजा इंग्रजांनी सर केल्याने १५ डिसेंबर रोजी दिल्ली दरवाजात झालेल्या निकराच्या लढाईत बेनिसिंग व इतर अनेक सैनिक मारले गेले. या लढाईत इंग्रज सैन्यातील १५ सैनिक ठार झाले तर ११० जण जखमी झाले व किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. यावेळी बेनिसिंगाची पत्नी कुंवारीसह इतर १४ स्त्रिया देव तलावाच्या काठावर सती गेल्या. या सतीची व बेनीसिगंच्या पराक्रमाची नोंद इंग्रज अधिकारी जस्पर निकोलस याने आपल्या दैनंदिनीत केली आहे. पुढे १८ डिसेंबर १८०३ रोजी झालेल्या देवगाव तहानुसार गाविलगड व नरनाळा हे दोन्ही किल्ले भोसल्यांच्या ताब्यात राहीले पण त्यावर असलेला भोसल्यांचा खजिना मात्र इंग्रजांनी लुटला. पुढे इ.स.१८२२ मधील इंग्रज व अप्पासाहेब भोसले यांच्यात झालेल्या तहानुसार गाविलगड व नरनाळा किल्ले इंग्रजांकडे गेले. इ.स.१८५७ मध्ये तात्या टोपे जळगाव भागात असताना किल्ला क्रांतिकारकांच्या हाती जाऊ नये म्हणून इंग्रजांनी गाविलगडाची डागडूजी केली. त्यानंतर सतत दुर्लक्षित राहिलेला हा किल्ला आज पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत आहे.----------सुरेश निंबाळकर टीप- किल्ल्यावरील जंगलात वन्य प्राण्यांचा विशेषतः अस्वलांचा वावर असल्याने एक-दोघानी आडवाटेवरील वास्तु फिरण्याचा धोका पत्करू नये.

जिल्हा - अमरावती

श्रेणी  -  सोपी

दुर्गप्रकार- गिरीदुर्ग