गोरखगड

गोरखगड हा मुंबईकर व पुणेकर यांना एक दिवसात करता येण्याजोगा किल्ला आहे. गोरखगडावर येण्यासाठी मुंबईकरांनी कल्याणमार्गे मुरबाडला तर पुणेकरांनी कर्जत मार्गे मुरबाडला यावे. मुरबाडहून देहरी येथे येण्यासाठी खाजगी जीप अथवा एस.टी उपलब्ध आहे. येथे मुक्काम करावयाचा असल्यास गावातील विठ्ठल मंदिरात मुक्काम करता येतो. देहरी गावातून दिसणाऱ्या दोन सुळक्यापैकी मोठा सुळका गोरखगड तर छोटा सुळका मच्छीन्द्रगड. गोरखगड आणि मच्छीन्द्रगड हे त्यांच्या सुळक्यामुळे प्रस्तरारोहण करण्यासाठी एक आकर्षण ठरले आहे. नाथ संप्रदायातील गोरक्षनाथाच्या साधनेचे हे ठिकाण म्हणून याचे नाव गोरखगड असे पडले आहे. गोरखगडाची उंची समुद्र सपाटीपासून २१३७ फुट आहे.गोरखगडाच्या आजुबाजुचा परिसर येथील घनदाट भीमाशंकर अभयारण्यामुळे प्रसिध्द आहे. येथे कोणत्याही प्रकारची लढाई झाल्याचा उल्लेख नाही पण १६५७ साली मराठयांच्या ताब्यात आलेल्या ह्या गडाचा मोगलांनी २० औक्टोबर १६९३ रोजी ताबा घेतल्याचा उल्लेख आढळतो. गोरखगडाचा विस्तार मर्यादित आहे ,या गडाचा उपयोग केवळ आसपासच्या प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी होत असे. पुर्वी नाणेघाट मार्गे जुन्नरला जाताना या गडाचा निवासस्थान म्हणून वापर करत असत. मर्यादित विस्तार असुनही मुबलक पाण्याची उपलब्धता व निवाऱ्याची सोय गडावर आहे. गावातील विठ्ठल मंदिराच्या मागील बाजूने जंगलात जाणारी वाट आपल्याला गोरखगडाच्या पायथ्याच्या खिंडीत आणून सोडते.या खिंडीत महादेवाचे छोटेसे मंदिर असुन मंदिरासमोर दोन प्राचीन समाध्या आहेत.पूर्वीच्या काळी येथे एखादे प्राचीन मंदिर असावे कारण या खिंडीत मोठया प्रमाणात प्राचीन कोरीवकाम केलेले मंदिराचे अवशेष आढळून येतात. किल्ल्याची खरी सुरुवात येथूनच होते.पूर्वी येथे किल्ल्याचा दरवाजा असावा पण आता मात्र आपला प्रवेश ढासळलेल्या तटबंदी मधून होतो. थोडे वर गेल्यावर पायऱ्यापूर्वी एक वाट उजवीकडे जाते तिथे पाण्याचे खडकात खोदलेले टाके असुन शेजारी खडकात खोदलेली छोटी गुहा आहे, ते पाहून मूळ वाटेवर परत यावे. कातळात खोदलेल्या जवळ जवळ १०० पायऱ्या चढून गेल्यावर आपला प्रवेश गोरखगडाच्या कातळात खोदलेल्या प्रवेशद्वारातून गोरखगडात होतो. या पायऱ्या उभ्या कड्यात खोदलेल्या असल्याने थोडे सांभाळूनच चढावे लागते. पायऱ्या चढताना वाटेतच एका ठिकाणी आपल्याला कातळात कोरलेला पण उघडयावर असल्याने झीज होऊन अस्पष्ट झालेला शिलालेख दिसतो. प्रवेशव्दारातून चढून गेल्यावर वर पाण्याची तीन टाकी दिसतात. समोरची वाट पुन्हा थोडयाश्या चढणीवर घेऊन जाते. इथुन परत एक वाट उजवीकडे जाते तिथे पाण्याचे खडकात खोदलेले टाके असुन शेजारी खडकात खोदलेली एक गुहा आहे, या गुहेत कातळात खोदलेले एक शिल्प असुन त्यात दोन व्यक्ती घोडयावर स्वार झालेल्या आहेत व शेजारी एक कावड घेतलेल्या व्यक्तीचे छोटे शिल्प आहे. दोन्ही शिल्पांना गावकऱ्यानी रंगवलेले आहे. गावकरी या शिल्पाला मामा भाच्याचा दगड म्हणतात. ते पाहून मूळ वाटेवर परत यावे. या वाटेने पुढे थोडे खाली पायऱ्या उतरल्यावर आपण गोरखगडाच्या सुळक्यात खोदलेल्या विशाल गुहेसमोर येऊन पोहोचतो. गुहेतुन समोरच दरीत झुकलेला चाफ्याचे डेरेदार झाड आणि मच्छीन्द्रगड निसर्गाचे भव्य आणि उग्ररूपाचे दर्शन करून देतो. गोरखगडावर पाण्याची एकंदर बारा टाकी आहेत त्यापैकी गुहेजवळ असणाऱ्या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे.गुहा ते गोरखगडाचा माथा हा या ट्रेकमधील सर्वात महत्वाचा टप्पा आहे.याशिवाय हा ट्रेक पूर्णच होऊ शकत नाही.गुहेच्या उजव्या बाजूने जाणाऱ्या वाटेने थोडे पुढे गेल्यावर सुळक्यावर जाण्यासाठी ५० ते ६० पायऱ्या कोरल्या आहेत त्यातील सुरवातीच्या १० -१२ पायऱ्या तुटलेल्या असल्याने आपल्याला थोडेसे सोपे प्रस्तरारोहण करावे लागते. पायऱ्याची वाट तशी खडतरच आहे त्यामुळे प्रत्येक पाऊल जपून टाकावे लागते.गडाचा माथा फारच लहान असुन वर एक महादेवाचे अलीकडील काळातील सिमेंटने बांधलेले मंदिर आहे.येथुन समोरचा मच्छीन्द्रगड, सिद्धगड, जीवधन, अहुपेघाट हा सर्व परिसर नजरेत भरतो. ----------------------------सुरेश निंबाळकर

​जिल्हा - ठाणे  
श्रेणी  -  कठीण  
दुर्गप्रकार - गिरीदुर्ग