गुमतारा

मुंबईमुळे कोकण प्रांताचे उत्तर कोकण व दक्षिण कोकण असे दोन भाग पडले आहेत. वसई ते दमण हा पट्टा उत्तर कोकण म्हणुन तर अलीबाग ते कारवार हा पट्टा दक्षिण कोकण म्हणुन ओळखला जातो. निसर्गसौंदर्याचे वरदान लाभलेल्या व मुंबईजवळ असलेल्या उत्तर कोकणात आपल्याला जलदुर्ग,गिरीदुर्ग.वनदुर्ग,स्थळदुर्ग असे सर्व प्रकारचे किल्ले पहायला मिळतात. यातील काही किल्ले सहज साध्य आहेत तर काही किल्ले भटकंतीचा कस पहाणारे आहेत. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात गुमतारा,गोतारा,दुगाड अशा विविध नावानी ओळखला जाणारा हा व भटकंतीचा कस पहाणारा दुर्गम दुर्ग म्हणजे घोटावड्याचा किल्ला. मुंबई ठाण्याहून अगदी जवळ असूनही भिवंडी -वाडा मार्गावरील मोहोली व दुगड गावाजवळ असलेला हा किल्ला गिरीमित्रांना तसा अपरीचीतच आहे. चारही बाजुला घनदाट जंगल असलेला हा किल्ला चढाईसाठी कठीण नसला तरी किल्ल्यावर जाणाऱ्या अनेक वाटा या किल्ल्याच्या दुर्गमतेत भर घालतात. किल्ल्याच्या परिघात असलेल्या गावातुन किल्ल्यावर जाण्यासाठी अनेक वाटा असल्या तरी मोहोली गावातुन किल्ल्यावर जाणारा सर्वात सोपा व सोयीचा मार्ग आहे. आपली दुर्गभ्रमंती सोपी व्हावी यासाठी हा मार्ग घेणे जास्त सोयीस्कर आहे. गुमतारा किल्ल्याची भटकंती करण्यासाठी आपल्याला मोहोली हे गडपायथ्याचे गाव गाठावे लागते. भिवंडी वाडा रोड वरील दुगडफाटा हे अंतर १८ कि.मी असुन दुगडफाटा ते मोहोली हे अंतर ४ कि.मी. आहे. वाहनाची सोय न झाल्यास दुगड फाटा ते मोहोली हे अंतर पायी पार करावे लागते. याशिवाय वज्रेश्वरी येथुन देखील १० कि.मी. अंतरावरील मोहोली गावात रिक्षाने जाता येते. गावातुन आपल्याला गावामागे एक मोठा व त्याशेजारी दुसरा लहान असे दोन डोंगर दिसतात. मोहोली गावातुन किल्ल्यावर जाण्यासाठी दोन वाटा असुन यातील एक वाट शेजारील लहान डोंगरावरून किल्ल्यावर जाते तर दुसरी वाट किल्ल्याच्या डोंगरसोंडेवरून वर चढते. यातील पहिली वाट सोपी पण थोडा जास्त वेळ घेणारी तर दुसरी वाट सोपीच पण उभा चढ असणारी आहे. या दोन्ही वाटा दोन तासात आपल्याला किल्ल्याच्या दरवाजाखाली आणून सोडतात. या दोन्ही वाटा सोप्या असल्या तरी वाटेवर जंगल आणि गवत माजले असल्याने तसेच या वाटेना अधुनमधुन फाटे फुटत असल्याने किल्ल्यावर जाण्यासाठी वाटाड्या घेणे गरजेचे आहे. कारण वाट चुकल्यास खालील जंगलात हरविण्याची दाट शक्यता आहे. दरवाजाखालील भागात आले असता वरील बाजुस कड्याच्या टोकावर असलेली तटबंदी व या तटबंदीतील दोन बुरुज दिसुन येतात. किल्ल्याच्या उर्वरित भागात ताशीव कडे असल्याने इतरत्र तटबंदीची गरज भासली नसावी. कड्याखालुन दरवाजापर्यंतचा आपला प्रवास हा घळीच्या वाटेने होतो. या घळीत पायऱ्या असाव्यात पण सध्या त्या पुर्णपणे उध्वस्त झाल्या आहेत. घळीतून १० मिनिटात वर आल्यावर समोरच किल्ल्याची तटबंदी दिसते. या तटबंदीच्या आतील बाजुस एका बुरुजाच्या आधारे बांधलेला पश्चिमाभिमुख वळणदार पण उध्वस्त दरवाजा नजरेस पडतो. या दरवाजाची केवळ खालील चौकट आज शिल्लक असुन आतील बाजुस दरवाजाचे घडीव दगड पडलेले आहेत. या दगडात दरवाजा गुंतविण्यासाठी असलेली दगडी बिजागर दिसुन येते. दरवाजासमोर खडकात कोरलेले मातीने भरलेले एक टाके असुन त्यापुढे काही अंतरावर तटाला लागून साचपाण्याचे दुसरे टाके आहे. या भागात किल्ल्याची पडझड झालेली तटबंदी असुन या तटबंदीच्या टोकाला अजून एक बुरुज दिसुन येतो. येथे तटावरील सपाट भागात दोन वास्तुंचे चौथरे दिसुन येतात. या तटाच्या खाली भागात असलेली किल्ल्याची सोंड एका खाचेने किल्ल्यापासून वेगळी केली आहे. या खाचेत उतरून किल्ल्याला वळसा मारत पश्चिमेस गेले असता एके ठिकाणी दगडाच्या कपारीत असलेला पाण्याचा झरा पहायला मिळतो. किल्ल्यावर पिण्यासाठी फक्त हेच पाणी असुन ते वर्षभर उपलब्ध असते. येथुन परत फिरून दरवाजाकडे यावे. दरवाजाच्या उजव्या बाजुस कातळात खोदलेली पाण्याची सात टाकी असुन यातील एका टाक्यात पाणी तर उरलेल्या सहा टाक्यात माती भरलेली आहे. टाक्याच्या पुढुन जाणारी वाट गडावरील सर्वोच्च भागात असलेल्या ध्वजस्तंभांकडे जाते. या ठिकाणी आपल्याला अजुन दोन वास्तुंचे चौथरे पहायला मिळतात. येथुन मागे फिरून परत टाक्यांच्या समूहाकडे आले असता एक वाट समोरील झाडीत शिरताना दिसते. या वाटेने गेले असता आपल्याला एका वाड्याचे जोते पहायला मिळते. वाड्याच्या जोत्यावर एक शेंदुर फासलेली मुर्ती ठेवलेली आहे. येथुन पुढे गेले असता वाटेवर खडकात खोदलेले अजून एक टाके पहायला मिळते. या टाक्याच्या काठावर भग्न झालेली एक कोरीव मुर्ती ठेवलेली आहे. टाके पाहुन दरवाजाकडे आल्यावर आपली गडफेरी पुर्ण होते. किल्ल्याच्या माथ्यावरून तुंगारेश्वर जंगल, भिवंडीचा परिसर तसेच कामणदुर्ग, टकमक व अशेरीगड हे किल्ले दिसतात. किल्ल्याचे एकुण आकारमान व किल्ल्यावर असलेली पाण्याची सोय पहाता या किल्ल्याचा वापर केवळ टेहळणीसाठीच होत असावा असे वाटते. पेशवे दफ्तरात नोंद असलेले घोटवड, दुगाड, भिवाळी, पिराची वाडी, तिल्हेर गाव, मोहिली गाव हि गावे व वेढे वाडी ही गांव इतिहासाची साक्ष देत या किल्ल्याच्या कुशीत आहे. गुमतारा किल्ला केव्हा बांधला गेला हे माहित नसले तरी या किल्ल्याचा सर्वप्रथम उल्लेख इ.स.१६८९ मध्ये येतो. इ.स.१६८९ मध्ये संभाजी महाराजांच्या अटकेनंतर मोगलांचा नाशिकचा सुभेदार मातबरखान माहुलीवर चालून आला व त्याने मराठ्याच्या ताब्यातील माहुली, भिवंडी,दुगाड, मलंगगड व कल्याण हि ठिकाणे ताब्यात घेतली. त्यानंतर मात्र हा किल्ला ओस पडला असावा. या किल्ल्याचा दुसरा उल्लेख येतो तो वसई मोहीमेत.पेशवे दफ्तरातील नोंदीनुसार काळात वसई मोहिमेवर जातांना गंगाजी नाईक यांची फौज माहुलीच्या रानात दबा धरून बसली होती. २४ मार्च १७३७ रोजी गुरुवारी ती टोळी रानातून बाहेर निघाली व २५ मार्च १७३७ रोजी घोटवा किल्ल्या खालच्या रानात मुक्कामास आली. तो सबंध दिवस त्यांनी येथे रानात घालविला. उन्हाळयाचे दिवस व पाणी न मिळाल्याने या टोळीतले दोन चार लोक मेले. इ.स.१७८० मध्ये ८ ते १२ डिसेंबर दरम्यान मराठा सरदार रामचंद्र गणेश वीस हजाराची फौज घेऊन ब्रिटीशांवर चाल करून गेला. रामचंद गणेश व इंग्रज सेनापती कर्नल हार्टले यांच्यात झालेल्या लढाईत रामचंद्र गणेश हरी ठार झाले व मराठ्यांना पराभव पत्करावा लागला. या लढाईत ब्रिटीश सैन्यातील अनेक अधिकारी ठार झाले होते. मराठ्यांना मदत करणारा पोर्तुगीज अधिकारी सिग्रीअर नरोन्हा हा देखील जबर जखमी झाला.----------------सुरेश निंबाळकर

जिल्हा - ठाणे

श्रेणी  -  मध्यम

दुर्गप्रकार- गिरीदुर्ग