चांदपूर

जिल्हा - भंडारा
श्रेणी  -  सोपी

दुर्गप्रकार- गिरीदुर्ग

महाराष्ट्रातील अनेक भुईकोट किल्ल्यांना अतिक्रमणाचे ग्रहण लागले आहे. केवळ शहरी भागातील किल्लेच नव्हे तर ग्रामीण भागातील किल्लेदेखील याला अपवाद नाही. सुधारणेच्या नावाखाली या किल्ल्यावर होणाऱ्या बांधकामामुळे किल्ल्यावरील अवशेष नष्ट होत चालले आहेत. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात असलेला चांदपूर किल्ला हा देखील शेवटच्या घटका मोजत आहे. उर्वरित अवशेष नष्ट होण्याआधी लवकरात लवकर या किल्ल्याला भेट दयायला हवी. चांदपूर किल्ला भंडारा शहरापासुन ५२ कि.मी.अंतरावर तर तुमसर या तालुक्याच्या ठिकाणापासुन २१ कि.मी.अंतरावर आहे. चांदपुर गावात जाण्यासाठी सार्वजनीक वाहतुक व्यवस्था फारशी उपलब्ध नसल्याने खाजगी वाहतुकीचा पर्याय शोधावा लागतो. चांदपूर गावात शिरण्याआधी अलीकडे असलेल्या वळणावरील टेकडीवरच चांदपूर किल्ला वसलेला आहे. या वळणावरून किल्ल्यावर जाणारी पायवाट असुन किल्ल्यावर असणाऱ्या दर्ग्यामुळे टेकडीवर जाण्यासाठी नव्याने सिमेंटच्या पायऱ्या बांधलेल्या आहेत. या शिवाय गावातुन एक पक्का गाडीरस्ता या किल्ल्यातील दर्ग्यापर्यंत हल्लीच बांधलेला आहे. या सर्व बांधकामामुळे किल्ल्याचे अवशेष मोठया प्रमाणात नष्ट झाले आहेत. पायऱ्यांच्या वाटेने जाताना उध्वस्त तटबंदीतुन आपला गडावर प्रवेश होतो. गडावर प्रवेश केल्यावर समोर दोन बाजुला दोन बुरुज दिसुन येतात.यातील एका बुरुजावर थडगे उभारलेले आहे. किल्ल्यावर आलेला रस्ता हा किल्ल्याची तटबंदी व दरवाजाचे उरलेसुरले अवशेष पाडून वर आणलेला आहे. चौकोनी आकाराचा हा किल्ला १ एकर परिसरात पसरलेला असुन टेकडीच्या उतारावर बांधलेल्या या किल्ल्याच्या तटबंदीत चार टोकाला चार ढासळलेले बुरुज पहायला मिळतात. किल्ल्याची तटबंदी मोठया प्रमाणात ढासळलेली असुन आज हि तटबंदी केवळ ६-७ फुट उंच शिल्लक आहे. किल्ल्यात सुफी संताचा दर्गा असुन इतर काही थडगी पहायला मिळतात. किल्ल्यात फेरी मारताना एक वाड्याचा चौथरा वगळता इतर कोणतेही अवशेष दिसू येत नाही. किल्ल्यात कोणत्याही प्रकारची पाण्याची सोय आज दिसुन येत नाही. असल्यास काळाच्या ओघात नष्ट झाली असावी. किल्ल्याचा परीसर फारच लहान असल्याने १५ मिनीटात आपली गडफेरी पुर्ण होते. महानुभव पंथाच्या लीळाचरित्र या ग्रंथात भंडारा जिल्ह्याचा उल्लेख अनेकदा येतो. निसर्गाचे वरदान लाभलेला हा प्रांत १७४३ पर्यंत गवळी राजवटीखाली होता व त्यानंतर नागपुरकर भोसले यांच्या अमलाखाली आला. इ.स. १८५३ साली नागपुरकर भोसले यांच्या ताब्यात असलेला हा प्रांत इंग्रजांच्या हाती गेला.------------------सुरेश निंबाळकर