मनोहरगड

महाराष्ट्रातील अनेक गडांवर शिवाजी महाराजांची पायधुळ झडली आहे पण काही गडांच्या वाटयाला हे भाग्य थोडे जास्तच प्रमाणात लाभले आहे. अशा भाग्यवान गडापैकी एक गड म्हणजे मनोहरगड. या गडावर महाराजांचे एक महिन्यापेक्षा जास्त काळ वास्तव्य होते. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरून कोकणात उतरण्यासाठी अनेक घाटमार्ग असले तरी त्यातील काही घाटमार्ग हे प्रामुख्याने व्यापारासाठी वापरले जात होते. कोकणातील बंदरात आलेला माल या घाटमार्गांनी घाटामाथ्यांवरील बाजारपेठात जात असे. या व्यापारी घाटमार्गातील हनुमंतघाट हा एक प्रमुख घाटमार्ग होता व याच्या रक्षणासाठी शिवपुर्वकाळात घाटाच्या माथ्यावर रांगणा तर पायथ्याशी मनोहर-मनसंतोष हि दुर्गजोडी उभारली गेली. आजही हे दुर्ग आपल्या अंगावर अनेक अवशेष बाळगुन असले तरी घनदाट जंगलात असलेल्या या किल्ल्यावर जाण्यासाठी असलेली अपुरी दळणवळण व्यवस्था यामुळे दुर्गप्रेमींची पावले या किल्ल्यांकडे सहसा वळत नाही. मनोहर- मनसंतोष या दुर्गजोडीतील हे दोन्ही दुर्ग केवळ एका लहान खिंडीमुळे एकमेकांपासून वेगळे झाले असुन मनोहरगडावर सहजपणे जाता येते तर मनसंतोष गडावर जाण्यासाठी मात्र गिर्यारोहण साधनांची गरज भासते. गडावर जाण्यासाठी पायथ्याशी गडाची पेठ असलेल्या पेठशिवापुर येथुन तसेच शिरसिंगे गावाच्या गोठवेवाडीतुन वाट आहे. पेठशिवापुर व गोठवेवाडी हि दोन्ही गावे या गडाच्या दोन बाजुस असुन एकमेकाशी रस्त्याने जोडली गेली आहेत पण शिवापुर येथुन गडाच्या खिंडीपर्यंत येणारा रस्ता कच्चा आहे तर गोठवेवाडी येथुन येणारा रस्ता पक्का आहे. या दोन्ही गावात जाण्यासाठी असलेली एसटी बसची मर्यादीत सेवा पहाता खाजगी वाहनाने गोठवेवाडी येथे जाणे सोयीचे पडते. शिवाय खाजगी वाहनाने आपण थेट गडाच्या पायवाटेजवळ पोहोचत असल्याने आपला जवळपास २ तासाचा वेळ तर वाचतोच पण चढ चढायचे श्रमही काही प्रमाणात कमी होतात. मनोहरगडास भेट देण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला सावंतवाडी शहर गाठावे लागते. मुंबई-गोवा महामार्गाने सावंतवाडी हे अंतर ५०६ कि.मी.असुन सावंतवाडीहुन कळंबस्ते-शिरसिंगे-गोठवेवाडी ३० कि.मी. अंतरावर तर पेठशिवापुर ४० कि.मी.अंतरावर आहे. या दोन्ही गावातुन किल्ल्यावर जाण्यास अडीच तास लागतात पण खाजगी वाहन असल्यास गोठवेवाडी पुढील ४ कि.मी अंतराचा चढ आपण वाहनाने पार करतो व आपले ४५ मिनिटांचे श्रम वाचतात. या रस्त्यावरून गडाची पायवाट जेथुन सुरु होते त्या ठिकाणी किल्ल्याच्या डोंगराची एक सोंड उतरलेली असुन गावातील तरुण मंडळींनी येथे कमान उभारली आहे. हि सोंड गरुडझाप म्हणुन ओळखली जाते. या सोंडेवरून उभा चढ चढत किल्ल्याचा डोंगर डाव्या बाजुला ठेवत आपण पुर्व दिशेला असलेल्या किल्ल्याच्या दरवाजाखालील वाटेवर पोहोचतो. शिवापुर येथुन येणारी पायवाट देखील येथेच या वाटेला मिळते. चढाचा काही भाग वगळता उर्वरित भागात जंगल असल्याने उन्हाचा त्रास जाणवत नाही शिवाय गोठवेवाडी ग्रामस्थांनी गडाच्या वाटेवर लावलेल्या दिशादर्शक फलकांमुळे सहसा वाट चुकण्याचा संभव नाही.या वाटेवर आपल्याला गडाचे एक मेट (चौकी) पहायला मिळते. शिवापूर व गोठवेवाडीतुन येणाऱ्या वाटा जेथे एकत्र होतात तिथून काही उध्वस्त पायऱ्या व घसारा पार करत १५ मिनिटात आपण किल्ल्याच्या तटबंदीपाशी पोहोचतो. या ठिकाणी असलेला किल्ल्याचा पहिला उत्तराभिमुख दरवाजा पुर्णपणे नष्ट झाला असुन आज केवळ एकच बुरुज शिल्लक आहे. या दरवाजातून आत आल्यावर सरळ जाणारी वाट मनोहरगडास वेढा मारून मनसंतोष गडाकडे तर उजवीकडची वाट मनोहरगडावर जाते. येथुन साधारण तीस बांधीव पायऱ्या चढून गेल्यावर आपण किल्ल्याच्या पुर्वाभिमुख उध्वस्त दरवाजाखाली येतो. येथुन पुढील पायऱ्या काही प्रमाणात ढासळल्या असुन त्यावर माती पडल्यामुळे जपून चढावे लागते. किल्ल्याचा दुसरा दरवाजा उभ्या कड्यावर बांधलेला असुन पहिल्या दरवाजात शिरल्यावर हि संपुर्ण वाट गडावरून माऱ्याच्या टप्प्यात ठेवुन बांधलेली आहे. किल्ल्यावर प्रवेश केल्यावर दरवाजाच्या दोन्ही बाजुस असलेले भक्कम बुरुज व त्यावरील ढासळलेल्या देवड्या नजरेस पडतात. या बुरुजावरून गडाची दूरवर पसरलेली तटबंदी, त्यावरील पायऱ्या व एका उंच चौथऱ्यावर बांधलेले कोठार नजरेस पडतो. त्रिकोणी माथा असलेला हा किल्ला पुर्वपश्चिम साधारण १४ एकरवर पसरलेला असुन गडाची समुद्रसपाटीपासुन उंची २१६० फुट आहे. तटावरून संपुर्ण गडाला फेरी मारत मध्यभागी असलेले अवशेष पहाता येतात. दरवाजाच्या उजवीकडील तटावरून गडफेरीस सुरवात केल्यावर भगवा झेंडा फडकत असलेल्या गडाच्या उत्तर टोकावर जाताना या तटबंदीत असलेले एक शौचकुप पहायला मिळते. येथुन तटाच्या कडेकडेने गडाच्या पश्चिम टोकावर मनसंतोषगडाकडे जाताना दोन चार लहान चौथरे वगळता इतर कोणतेही अवशेष नाहीत. गडाच्या या पश्चिम टोकावरून दोन गडांमधील दरी व मनसंतोषगडाचे सुंदर दर्शन होते. सध्या मनसंतोष गडावर सहजपणे जाता येत नसल्याने येथुनच त्याचा माथा पाहावा लागतो. गडाच्या पश्चिम टोकावर जवळपास १८ फुट उंचीचा मातीचा ढिगारा पहायला मिळतो. हा बहुदा येथुन मनसंतोष गडावर व गडाच्या अंतर्गत भागात नजर ठेवण्यासाठी बांधलेला सुटा बुरुज असावा जो काळाच्या ओघात ढासळला असावा. येथुन दक्षिणेकडील टोकावर जाताना काही ठिकाणी तटावर चौकीचे अवशेष पहायला मिळतात. किल्ल्याच्या दक्षिण टोकाकडून किल्ल्याच्या दरवाजापर्यंत असलेली संपुर्ण तटबंदी आजही पुर्णपणे सुस्थितीत असुन या तटबंदीत एकुण तीन शौचकुप बांधलेली आहेत. या तटाची रुंदी साधारण १०-१२ फुट असुन तटामध्ये पाण्याचा निचरा करण्यासाठी बांधलेल्या नाळी पहायला मिळतात. या तटबंदीच्या आधारे पाण्याचा तलाव बांधल्याने हि तटबंदी एका ठिकाणी कोसळली असुन आधार म्हणुन या तटबंदीच्या आतील बाजुस दुसरी अर्धवट बांधलेली तटबंदी पहायला मिळते. या सर्व वास्तु पहाण्यासाठी तटावरून न जाता तटाच्या कडेने गडफेरी करावी. गडाच्या संपुर्ण तटबंदीचा फेरा पुर्ण झाल्यावर आतील वास्तु पहाण्यास सुरवात करावी. जेथे तटबंदी कोसळली आहे त्याच्या वरील बाजुस डावीकडे एका लहान झाडाखाली बांधीव विहिर असुन या विहिरीत बारमाही पिण्याचे पाणी असते. गडावर पिंण्याच्या पाण्याची हि एकमेव सोय आहे. गडावरील मंदीर नष्ट झाल्याने विहीरीकडून उजवीकडे दिसणाऱ्या औदुंबराच्या झाडाखाली काही देवतांच्या मुर्त्या ठेवलेल्या आहेत. यात दोन भैरव,एक गजलक्ष्मी व एक देवीची मुर्ती पहायला मिळते. औदुंबराच्या झाडासमोर एका मोठया वास्तुचा उध्वस्त चौथरा व त्यात काही कोरीव दगड पहायला मिळतात. येथे बहुदा गडाची राजसदर असावी. गडाच्या या भागात विखुरलेले बहुतांशी अवशेष पहाता येथे मोठया प्रमाणात वस्ती असावी. चौथऱ्याच्या पुढील बाजुस एका उंच जोत्यावर दोन दालनाचे दगडी कोठार असुन त्याला एक मोठा व एक लहान असे दोन दरवाजे आहेत. या वास्तुचे छप्पर वगळता हि वास्तु आजही चांगल्या अवस्थेत आहे. माथ्यावरती औदुंबराची दोन झाडे व विहिरीकडील लहान झाड वगळता इतर कोठेही सावली नाही. गडावरून नारायणगड , महादेवगड, रांगणा हे किल्ले तसेच कोकणचा मोठा प्रदेश नजरेस पडतो. संपुर्ण गडफेरीस दीड तास पुरेसा होतो. या गडाची मुळ बांधणी कोणी व केंव्हा केली हे माहित नसले तरी बहामनी काळानंतर आदिलशहाच्या ताब्यात असलेला हा किल्ला १६६४ मधील जुन-जुलै महिन्यात स्वराज्यात दाखल झाला. यावेळी आदिलशाही सरदार असलेले सावंतवाडीचे लखम सावंत यांनी चांगला पराक्रम गाजवला पण मराठ्यांपुढे त्यांना माघार घ्यावी लागली. गडावरील काही बांधकाम पहाता याची डागडुजी शिवकाळात झाली असावी. मनोहरगडच्या पत्रव्यवहारातून या किल्ल्याबाबत बऱ्यापैकी माहिती मिळते. १६६६च्या सुमारास बाजी घोलप येथील किल्लेदार तसेच रुद्राजी तुकदेव,बोमाजी कालुजी हे सरनोबत तर रामजी विश्वनाथ हे सबनीस असल्याचे दिसुन येते. आग्राभेटीनंतर शिवाजी महाराज एक महिना मनोहरगडावर मुक्कामास असल्याचे उल्लेख येतात. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांचा सावत्र भाऊ व्यंकोजी याने रांगणा किल्ल्याला घातलेला वेढा असावा. आग्र्याहून परत आल्यावर रांगणा गडाला घातलेला वेढा उठवण्यासाठी महाराज ११ एप्रिल १६६७ ला या भागात दाखल झाले. रांगण्याचा वेढा उठवून १३ मे १६६७ रोजी महाराज मनोहर गडावर गेले. तेथे त्यांनी १५ जून १६६७ पर्यंत म्हणजे तब्बल ३४ दिवस मुक्काम केला. याचा उल्लेख ५ जुलै १६६७ च्या पोर्तुगीज कागदपत्रातून येतो. इतका काळ येथे रहाण्यामागे प्रकृती बिघाड होता किंवा काही अन्य राजकीय कारणे होती ते सांगता येत नाही. इ.स. १६८१ ते १७०७ दरम्यान औरंगजेब मराठा राज्य बुडवण्यासाठी आला असता त्याने अनेक किल्ले घेतले पण मनोहरगड त्याला जिंकता आला नाही. नंतरच्या काळात मनोहर- मनसंतोष गडाचा ताबा कोल्हापूरच्या छत्रपतींकडे गेला. १३ जानेवारी १७५१ रोजी सदाशिवरावभाऊ करवीरकरांचे पेशवे बनल्यावर करवीरच्या संभाजी राजांनी त्यांना दिलेल्या ५ किल्ल्यात मनोहरगडचा समावेश होता. १८२७ मध्ये मनोहरगडाच्या दारुगोळा कोठारात मोठया प्रमाणात हत्यारे असल्याचे दिसुन येते. १८३४ मध्ये गडकऱ्यानी केलेले बंड मोडण्यासाठी छत्रपतींनी अप्पाजीराव जाधव यांना पाठवुन बंड मोडले पण पुढील काळात बंड वारंवार होऊ लागल्यामुळे बंड मोडून काढण्यासाठी छ.शहाजी महाराज स्वत: १८३६ साली गडावर चालून आले. त्यांनी गडकऱ्याना अटक करून गडावरील २ तोफा नेल्याची नोंद आहे. इ.स. १८४२ मध्ये गणपतराव विचारे हे मनोहरगडाचे किल्लेदार तर येसाजी घाटगे हे सरनौबत होते. इ.स.१८४४मध्ये इंग्रजांनी करवीरकरांचे स्वतंत्र हिरावल्याने राज्यातील गडकऱ्यानी २२ जुलै १८४४ला बंड पुकारले. या बंडात मनोहर- मनसंतोष गडाने इंग्रजांना चांगलेच जेरीस आणले. हे बंड मोडण्यासाठी मेजर बेनबो याच्या नेतृत्वाखाली एक तुकडीने मनोहरगड व रांगणा यामधील हनुमंतघाटाच्या पायथ्याशी असलेल्या नेरुर गावी तळ दिला. १० ऑक्टोबर १८४४ला गडावरील तुकडीने गोठोस गावातील सबनीस व कुलकर्णी यांना ताब्यात घेत त्याच्या ताब्यातील सरकारी व खाजगी कागदपत्रे जाळली. दुसऱ्या दिवशी रात्री या तुकडीने नेरुर येथील सैन्यतळावर हल्ला केला. या बंडाचा सुत्रधार फोंड सावंत तांबूळकर याने सावंतवाडी संस्थानाचे अनासाहेब यांना बंडात सामील करून मनोहर गडावर आणून ठेवले व त्यांच्या नावाने आजूबाजूच्या परीसरात वसूली केली. त्याचप्रमाणे बंडवाल्यांनी मनोहर गडाच्या परीसरात स्वत:चा दारूगोळा बनविण्याचा कारखाना सूरु केला. त्यात तयार होणारा माल सामानगड, रांगणा इत्यादी किल्ल्यांवर इंग्रजांविरुध्द लढण्यासाठी पाठविण्यात आला. या सर्व घटनांमुळे इंग्रजांनी कर्नल वॉलेस व जनरल डेलामोंटी यांना मनोहर गडावरील बंडाचा बिमोड करण्यासाठी पाठविले. १६ जानेवारी १८४५ रोजी कर्नल वॉलेस याने शिवापुर येथे बंडकऱ्यावर भयानक गोळीबार केला. २६ जानेवारी १८४५ रोजी जनरल डेलामोंटी याने केलेल्या कुलपी गोळ्यांच्या माऱ्याने त्रस्त होऊन सावंतानी त्यांची मुले व अण्णासाहेब यांना सोबत घेऊन इंग्रजांना चकवत गोव्याला पलायन केले व गड इंग्रजांच्या ताब्यात आला.------------सुरेश निंबाळकर

जिल्हा - सिंधुदुर्ग

श्रेणी  -  मध्यम

दुर्गप्रकार- गिरीदुर्ग