भूपाळगड

सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील इतिहासप्रसिद्ध शिवकालीन गिरिदुर्ग म्हणजे भूपाळगड. किल्ल्यात असलेल्या बाणूर गावामुळे हा गड बाणूरगड या नावाने देखील ओळखला जातो.शिवकाळात आदिलशाहीच्या सीमारेषेवर असलेला हा किल्ला स्वराज्याच्या सीमारक्षणासाठी तसेच पूर्वेकडील प्रदेशांवर वचक ठेवण्यासाठी एक महत्वाचा किल्ला होता. किल्ला विस्ताराने प्रचंड असला तरी किल्ल्यावर मोठया प्रमाणात यांत्रिक शेती केली जात असल्याने एक तलाव, महादेव मंदिर, समाधी व जुजबी तटबंदी असे मोजकेच अवशेष उरले आहेत. खानापुर या तालुक्याच्या ठिकाणाहुन भिवघाट ओलांडुन सांगोला-विटा मार्गावर १२ कि.मी. अंतरावर पळशी गाव आहे. पळशी गावातुन बाणूरगड म्हणजे भूपाळगड साधारण ७ कि.मी. अंतरावर आहे. बाणूर गाव किल्ल्यातच दक्षिण बाजुस असल्याने गावासाठी तटबंदी फोडुन गाडीरस्ता आत नेला आहे. या रस्त्याने बाणूरगडावरील टेकडीवर असलेल्या महादेव मंदिरापर्यंत गाडीने जाता येते. गाडीने किल्ल्यावर शिरतानाच तटबंदी व त्यातील बुरुज पहायला मिळतात. येथे किल्ल्याची उंची फारशी नसल्याने या भागात दुहेरी तटबंदीची रचना असावी. येथे असलेल्या मारुती मंदिराकडील उजव्या बाजुच्या तटबंदीवरून काही अंतर गेल्यावर दोन बुरुजाच्या आधारे बांधलेला किल्ल्याचा दरवाजा पहायला मिळतो. सध्या हा दरवाजा खूप मोठया प्रमाणात गाडला गेला असुन त्यातुन रांगतच आतबाहेर जाता येते. या दरवाजावर दगडी कमान देखील पहायला मिळते. दरवाजा पाहुन मंदिराकडे परत यावे व रस्त्याने थेट गावाबाहेर निघावे. येथुन पुढील कच्चा रस्ता आपल्याला गावामागील टेकडीवर असलेल्या बालेकिल्ल्यात घेऊन जातो. या रस्त्याने जाताना उजव्या बाजुस कातळात खोदलेला एक मोठा तलाव पहायला मिळतो. तलावाकडून बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. या वाटेवर सध्या एक सिमेंटची कमान उभारली आहे. बालेकिल्ल्याचा परीसर साधारण १२ एकर असुन त्यात असलेले महादेवाचे मंदिर बाणलिंग मंदीर म्हणुन ओळखले जाते. कधीकाळी या मंदिराला प्राकाराची भिंत असावी पण आज हि भिंत केवळ एकाच बाजूने शिल्लक असुन या भिंतीत प्राकाराचा दरवाजा व त्यातील ओवऱ्या पहायला मिळतात. या दरवाजाबाहेर दगडी चौथऱ्यावर एक तुळशी वृंदावन आहे. हे वृंदावन म्हणजे महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांची समाधी असल्याचे मानले जाते पण याची कोणतीच अधीकृत नोंद इतिहासात नाही. समुद्रसपाटी पासून २८२० फुट उंचीवर असलेला हा किल्ला ४०० एकरपेक्षा जास्त परिसरात पसरलेला असुन किल्ल्याभोवती रचीव दगडांची तटबंदी व मध्यभागी एका टेकडीवर बालेकिल्ला अशी याची रचना आहे. समाधी समोरील पायवाटेने टेकडीखाली उतरल्यावर दरीच्या काठावर किल्ल्याची रचीव दगडांची उध्वस्त तटबंदी व त्यातील बुरुज पहायला मिळतात. या तटबंदीत २-३ ठिकाणी चोर दरवाजे तर एका ठिकाणी शौचकुप आहे. किल्ल्याची दक्षिण बाजु वगळता उर्वरित बाजुस खोल दऱ्या आहेत. किल्ल्यात मोठया प्रमाणात शेती केली जात असल्याने किल्ल्याचे उर्वरित अवशेष पुर्णपणे नष्ट झाले आहेत. किल्ल्याचा आकार पहाता किल्ल्यावर असलेला एकमेव तलाव व एक विहीर किल्ल्यावरील शिबंदीला पुरेशी वाटत नाही. किल्ला फिरताना होणारी दमछाक टाळण्यासाठी स्थानीक माहीतगार सोबत घ्यावा म्हणजे कमी वेळात संपुर्ण किल्ला व त्यावरील सर्व अवशेष पाहुन होतात. बुसातिन-उस-सलातिन या ग्रंथानुसार अफझलखान वधानंतर शिवरायांनी आदिलशाहीच्या सरहद्दीवर मांजऱ्या पर्वताजवळ एक मजबूत किल्ला बांधून त्यास भूपाळगड नाव दिले तर लोककथेनुसार भूपाळसिंह राजाने हा गड बांधल्याने त्याचे नाव भूपाळगड पडले. स्वराज्याच्या सीमेवर असलेल्या या किल्ल्यावर फिरंगोजी नरसाळा किल्लेदार असल्याचा उल्लेख येतो. डिसेंबर १६७८ मध्ये युवराज संभाजीराजे मोगलास मिळाल्यावर त्यांचा ढाल म्हणुन वापर करत दिलेरखान मराठी मुलूखावर हल्ला करीत सुटला. पुढे विजापुरवर चालून जात असताना दिलेरखानाने २ एप्रिल १६७९ रोजी वाटेत असणाऱ्या भूपाळगडावर हल्ला चढविला. संभाजी राजे गडावर चालून आलेले पाहून किल्लेदार फिरंगोजीने प्रतिकार केला नाही. दिलेरखानाने शेजारील डोंगरावर तोफा चढवुन केलेल्या तोफांच्या माऱ्याने किल्ल्याचा बुरुज ढासळला व किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. महाराजांना ही खबर लागताच १६००० सैन्याची कुमक मदतीस पाठवली पण मदत मिळायच्या आतच किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला होता. दिलेरखानाने किल्ल्यातील धान्य, दारूगोळा व इतर संपत्ती ताब्यात घेऊन कैद केलेल्या ७०० मराठी शिपायांचा उजवा हात तोडला व त्यांना सोडून दिले. महाराजांनी पाठविलेल्या सैन्याने किल्ल्याला वेढा दिला व किल्ले परांड्याकडून दिलेरखानाच्या फौजेस रसद पुरवठा करणाऱ्या इराजखान व बजाजीराव (निंबाळकर) यांच्यावर हल्ला केला. दिलेरखानाने इख्लासखानाला १५०० स्वार देऊन इराजखानाच्या मदतीस पाठविले. किल्ल्यापासून साधारण २५ कि.मी. अंतरावर इख्लारसखान व मराठे यांच्यात लढाई झाली पण मराठ्यांचे सैन्य पराभूत झाले. दिलेरखानाने किल्ल्यातील वास्तुंची जाळपोळ करत किल्ल्याची मोडतोड केली व तो संभाजी राजासह धुळखेडला आला. पुढे मराठ्यांनी करकंबजवळ इराजखानाचा पराभव केला आणि भूपाळगडच्या पराभवाचा सूड उगवला. दरम्यान शिवाजीं महाराजानी युवराजांची समजूत घातली व संभाजीराजे पन्हाळ्यास स्वराज्यात परतले.------------सुरेश निंबाळकर

जिल्हा - सांगली

श्रेणी  -  सोपी

दुर्गप्रकार- गिरीदुर्ग