गायमुख कोट

प्राचीन काळी कल्याण हे महत्वाचे बंदर होते.अरबी समुद्रातून उल्हासखाडी मार्गे जहाजांची ये-जा चालत असे. ह्या जलमार्गावर घोडबंदर, नागलाबंदर ही प्राचीन बंदरे होती. ह्या बंदरांचे व जलमार्गाचे रक्षण करण्यासाठी घोडबंदर, नागलाबंदर, गोमुख व ओवले कोट हे चार किल्ले बांधले गेले. श्री.सदाशिव टेटविलकर ह्यांच्या "दुर्गसंपदा ठाण्याची"ह्या पुस्तकात गायमुख किल्ला हा " गायमुख गढी " ह्या नावाने नोंद केला आहे. ठाणे किनारी लगत असणाऱ्या १२ किल्ल्यामध्ये ह्या किल्ल्याचा समावेश आहे. नागला बंदर किल्ल्यापासून ४ किमी अंतरावर उल्हासखाडी एक झोकदार वळण घेते. ह्याच ठिकाणी सह्याद्रीची एक सोंड खाडीजवळ उतरते. ह्याच सोंडेवर गढीवजा गोमुख किल्ला उभा होता. ठाणे - बोरीवली रस्त्यावर गोमुख गावात उतरुन ह्या ठिकाणी जाता येते. गायमुख गावाजवळच खाडीला लागून असणाऱ्या या गायमुख किल्ल्याचे ठिकाण हे गावातील लोकांना माहित नसल्याने येथे शोधयात्रा करावी लागते. बऱ्याच ठिकाणी गायमुख किल्ला पुर्णपणे नष्ट झाल्याचे सांगितले जाते पण गायमुख किल्ल्याचा एक अवशेष आजही काळाशी झुंजत उभा आहे तो म्हणजे कोटाच्या आतील एका वास्तुच्या तीन भिंती. याचा कचराकुंडी आणि मुतारी असा वापर केल्यामुळे आत दुर्गंधी आणि घाणीचे साम्राज्य आहे. किल्ल्याच्या भिंतींवर झाडे वाढीस लागली आहेत ज्यांची मुळे किल्ल्यांच्या भिंतींमध्ये खोलवर रुतत चालली आहेत. या कोटाच्या बांधणीत अघडीव दगड, चुना, चिकटमाती, यांचा वापर केला गेलेला दिसतो. हि वास्तू दुमजली होती हे कोटाच्या भिंतीवर लाकडी वाशाकरिता असलेल्या खोबण्यावरून लक्षात येते. हा मुळ अवशेष कशाचा आहे हे ओळखता येत नाही. उपलब्ध अवशेष पाहता सदर कोट केवळ जकातीचे अथवा टेहळणीचे एक ठाणे असावे. याच्या सभोवतालच्या संरक्षक भिंती पडून गेल्याने याचे स्वरूप बदललेले आहे. किल्ला छोटेखानी असून दहा मिनिटात पाहून होतो. घोडबंदर रस्ता रुंदीकरण करताना किल्ल्याचा बराचसा भाग नष्ट केला गेला. आज जरी किल्ला अस्तित्वात नसला तरी त्याचे नेमके भौगोलिक स्थान व उल्हास खाडीवर पहारा देण्याची मोक्याची जागा पाहाता येते. लहान आकाराचे कोट, टेहळणी बुरूज व लांब पल्ल्याच्या तोफा यांचा वापर करत पोर्तुगीजांनी उत्तर कोकणातील समुद्री मार्गावर आपले साम्राज्य वसवले. साधारणतः १६व्या शतकात पोर्तुगीजानी उभारलेल्या या टेहळणीवजा कोटांचा मुख्य उपयोग जलमार्गाचे रक्षण करणे व प्रांतातील लहान मोठया कोटाना आवश्यक रसद पुरविणे हा होता. इ.स.१७३७ मध्ये मराठयांच्या वसई मोहिमेच्या पुर्वार्धात गायमुख किल्ला व परिसर मराठ्यांच्या ताब्यात आला आणि पोर्तुगीजाचे या भागातून उच्चाटन झाले. किल्ला पाहण्याच्या हेतुने येणाऱ्याचा येथे हिरमोड होण्याची शक्यता आहे पण सागरी व्यापारी मार्गावरील पोर्तुगीजांची टेहळणी चौकी व तिचे भौगोलिक महत्व पाहायचे असेल त्याने या स्थानास अवश्य भेट द्यावी. ----------------------सुरेश निंबाळकर

जिल्हा - ठाणे 
श्रेणी  - सोपी 
दुर्गप्रकार - सागरी  किल्ला