चांदवड

जिल्हा - नाशिक

श्रेणी  -  अत्यंत कठीण दुर्गप्रकार- गिरीदुर्ग

दुर्ग भटकंती करताना स्थानिक लोकांशी सवांद साधताना आपल्याला किल्ल्याच्या निर्मितीच्या काळाबाबत काही ठोकताळे लावता येतात. जर गावकऱ्यांनी सांगीतले हा किल्ला शिवाजीने बांधला तर समजावे कि किल्ला मध्ययुगीन आहे, जर पांडवानी बांधल्याचे सांगीतले तर समजावे किल्ला प्राचीन आहे पण जर का एखादया किल्ल्याचा संबंध पुराणाशी अथवा ऋषीमुनीशी जोडला गेला तर समजावे कि किल्ला अतीप्राचीन आहे. नाशिक जिल्ह्यातील सातमाळ डोंगररांगेत चांदवड तालुक्यात अगस्ती ऋषींशी नाते सांगणारा असाच एक प्राचीन किल्ला म्हणजे चांदोर उर्फ चांदवडचा किल्ला. मुंबई – आग्रा महामार्गावर नाशिकपासून ६० कि.मी. अंतरावर महामार्गाला लागुनच चांदवड शहर आहे आणि या शहराच्या रक्षणासाठी शहरामागील डोंगरावर आहे चांदवड किल्ला. चांदवड शहर अनेक शहरांशी गाडीमार्गाने जोडलेले असुन येथे जाण्यासाठी वाहनांची चांगली सोय आहे. १९ कि.मी. वर असलेले लासलगाव व २५ कि.मी.वर असलेले मनमाड हि जवळची रेल्वे स्थानके आहेत. नाशिकहुन जाताना चांदवड पथकर नाक्यापुढे महामार्गावर ६ कि.मी. वर उजवीकडे चंद्रेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता आहे. गडाचे माची व बालेकिल्ला असे दोन भाग पडलेले असुन माचीवर असलेल्या चंद्रेश्वर मंदिरापर्यंत वनखात्याने गाडी रस्ता बनविल्याने खाजगी वाहन असल्यास आपण गाडीने माचीवरील चंद्रेश्वर मंदिराच्या आवारात जातो. गडाचा डोंगर पुर्वपश्चिम पसरलेला असुन माची हा किल्ल्याचा भाग असल्याने आपल्या गडफेरीला माचीवरूनच सुरवात करावी. आठव्या शतकात बांधलेल्या या प्राचीन मंदिराचा अहिल्याबाई होळकर यांनी जीर्णोद्धार केलेला असुन आता त्याचे काही ठिकाणी नव्याने बांधकाम करण्यात आले आहे. जुन्या व नवीन बांधकामाचा हा भयानक संगम पहात आपण मंदिराला प्रदक्षिणा घालावी. मंदिराच्या आवारात भग्न अवस्थेतील काही कोरीव मुर्ती पडलेल्या असुन त्याचबरोबर सुंदर असे मंदिराचे स्तंभ पडलेले आहेत. मंदिराच्या बाह्यांगावर अनेक शिल्पे कोरलेली असुन काही ठिकाणी सुरसुंदरी कोरलेल्या आहेत. मंदिराची देवकोष्टके रिकामी आहेत. संपुर्ण मंदिराला सफेद रंग फासलेला असुन दर्शनी भागात रंगरंगोटी करण्यात आली आहे. मंदिराचा परिसर फिरताना एक भग्न शिवलिंग व नंदी तसेच प्राकाराच्या भिंतीत गाडलेल्या दोन भग्न मुर्ती पहायला मिळतात. चंद्रेश्वराचे दर्शन घेउन मंदिराच्या दरवाजासमोर असलेल्या पायऱ्यांनी मंदिराबाहेर यावे. या वाटेने पुढे जाताना उजव्या बाजुस कातळात कोरलेले एक टाके असुन आता त्याला सिमेंटचा नवा कठडा बांधण्यात आला आहे. वाटेच्या डाव्या बाजुस नव्याने बांधलेले मारुती मंदीर असुन त्यातील मुर्ती मात्र पेशवेकालीन आहे. पुढे आल्यावर अलीकडील काळात घडीव दगडात बांधलेली एक भिंत असुन या भिंतीत तीन गणेशशिल्प व एक भग्न विरगळ आहे. या भिंतीत एक लहान लोखंडी दरवाजा बसवलेला असुन दरवाजाच्या आतील बाजुस कातळात कोरलेली गुहा व या गुहेत पाण्याचे टाके आहे. भिंतीच्या तळात गोमुख बसवलेले असुन त्यातून त्याखाली असलेल्या लहान टाक्यात साधारण डिसेंबर महिन्यापर्यंत पाणी वहात असते. येथुन पुढे आल्यावर वाटेत गोलाकार आकाराचा बांधीव तलाव असुन या तलावाच्या डावीकडे दोन घडीव दगडात बांधलेल्या समाधी व त्यापुढे विटांत बांधलेल्या एका वास्तुचे अवशेष आहेत. समाधींच्या पुढे आल्यावर एका चौथऱ्यावर बांधलेली सात थडगी असुन या थडग्यापुढे एक मोठी समाधी आहे. येथुन समोरच एक घुमटीवजा मंदीर पहायला मिळते. या घुमटीत गणेशाची मुर्ती ठेवलेली आहे. येथे डोंगराच्या वरील बाजुस तारांचे कुंपण घातलेले आहे. येथे डावीकडे म्हणजे तलावाच्या वरील बाजुस तारांचे कुंपण संपताच एक ठळक पाउल वाट गडाच्या दिशेने जाते या वाटेने चढाई करीत माथ्याखाली असलेल्या थोडयाफार सपाटीवर यायचे. येथुन डावीकडील वाट टांकसाळच्या दिशेने जाते तर उजवीकडील वाट माथ्याखाली असलेल्या बुरुजाकडे जाते. डाव्या बाजूच्या पायवाटेने टांकसाळ कडे जाताना लहान लहान वास्तुंचे विखुरलेले अवशेष असुन त्यापुढे उतारावर घडीव दगडात एक मोठा चौथरा बांधलेला आहे. हा चौथरा पाहून डावीकडे तिरकस चढत गेल्यावर १५-२० मिनिटात आपण टांकसाळीच्या उध्वस्त इमारतीपाशी पोहोचतो. इमारतीचा दरवाजा व भिंती आजही शिल्लक असुन भिंतीत काही ठिकाणी खापरी नळ आहेत तर काही ठिकाणी भिंत दुहेरी बांधलेली आहे. याची रचना समजावण्यासाठी कोणी जाणकार माणुस सोबत हवा. टांकसाळ पाहून उजवीकडे किल्ल्याच्या डोंगराच्या पश्चिम बाजुस चढण्यास सुरवात करावी. वाट बऱ्यापैकी मळलेली असुन काही ठिकाणी पायऱ्या कोरलेल्या आहेत. या वाटेने आपण गडमाथ्याच्या कडयाखाली पोहोचतो. या ठिकाणी पुर्वी गडाचा दरवाजा असल्याने हा भाग बुरुज तटबंदीने बंदीस्त केलेला होता पण आज त्याचे केवळ अवशेष उरलेले आहेत. या तटबंदीत आपल्याला एक शौचकुप व दोन बुरुज पहायला मिळतात. कडयाच्या पोटात १०-१२ गुहा कोरलेल्या असुन या सर्व गुहा दगडमाती व झुडूपानी झाकल्या आहेत. येथे मोठ्या प्रमाणात दगड पसरलेले असुन हे सर्व दगड इंग्रजांनी सुरुंग लावुन तोडलेल्या पायऱ्याचे आहेत. गडावर जाणारा पायरीमार्ग नष्ट झाल्याने या ठिकाणी कडयाला लागुन एक लोखंडी शिडी लावलेली आहे. शिडीच्या उजव्या बाजूला कातळात कोरलेला पर्शियन भाषेतील शिलालेख असुन त्यात इ.स.१६३६ मध्ये शहाजहान बादशहाचा सेवक अलीवर्दी खान याने हा किल्ला व इतर किल्ले जिंकून घेतल्याचा उल्लेख आहे. शिलालेखाच्या उजव्या बाजूस वरील टप्प्यात एक गुहा कोरली असुन त्याखाली दोन गुहा कोरलेल्या आहेत. शिडी अतिशय तकलादु असुन अर्धवट असल्याने वर चढून गेल्यावर पुढचा कातळ टप्पा प्रस्तरारोहण करुन पार करावा लागतो. हा टप्पा चढण्यासाठी गिर्यारोहण साहित्य आणि दोराची आवश्यकता आहे. आम्ही सर्व साहित्यानिशी गडावर गेलो होतो पण दोन दिवस अवकाळी आलेल्या पावसाने हा टप्पा चांगलाच शेवाळलेला व निसरडा झालेला होता. दोर बांधताना हा टप्पा सहजपणे पार करणारे या भागातील वाटाडे वसंत जाधव उर्फ वसंतमामा या टप्प्यावर दोनदा निसटल्याने आम्ही पुढचा धोका न पत्करता आमची गडफेरी इथेच पुर्ण केली. चंद्रेश्वर मंदिरापासून दरवाजाच्या शिडीपर्यंत येण्यासाठी दीड तास पुरेसा होतो. दरवाजाच्या या भागातुन इंद्राई किल्ला, साडेतीन रोड्ग्यांचा डोंगर व सातमाळा डोंगराची रांग नजरेस पडते. पर्यटनस्थळ विकासाच्या नावाखाली चंद्रेश्वर मंदीर परिसरात केलेला अवास्तव खर्च पहाता यातील अगदी मामुली भाग खर्च करून गडावर जाण्यासाठी शिडी बसवता आली असती पण पर्यटन विभागाच्या लेखी या गडाचे किंमत शून्य असावी. गड उतरताना हि गोष्ट मनाला खटकत रहाते. पुढील वेळेस या भागात येऊ तेव्हा नक्कीच माथ्यावर जाऊ त्यावेळी उर्वरीत दुर्गदर्शन पुर्ण होईल. तोवर गडाच्या इतिहासाकडे वळुया. एका पौराणीक कथेनुसार अगस्ती ऋषी चांदवडमध्ये असताना त्यांना येथील लोकांनी तूप दिले नाही म्हणून त्यांनी या नगराला चांडाळनगरी म्हणुन शाप दिला. या चांडाळपूर शब्दाचा अपभ्रंश होऊन हे नगर चांदवड म्हणून ओळखले जाऊ लागले. शनिमहात्म या ग्रंथात चांदवडला ताम्रलींदापूर असे म्हटले आहे तर जैन साहित्यात चांदवडचा उल्लेख चंद्रादिव्यपुरी म्हणुन येतो. चांदवड किल्ला कोणी व केव्हा बांधला हे ज्ञात नाही पण नांदगाव येथे सापडलेल्या चालुक्य नरेश चांद्रदित्य उर्फ नागवर्धन (इ.स.६५०) यांच्या ताम्रपटात चंद्रादित्यपूर म्हणजेच चांदवडचा उल्लेख येतो. इ.स.८ ते ११ व्या शतकात चांदवडवर यादवांचे राज्य ते. इ.स.आठव्या शतकात यादव राजघराण्याचा संस्थापक द्रढप्रहार चंद्रादित्यपूर येथे स्थायीक झाल्याचा उल्लेख येतो. या द्रढप्रहार राजाच्या काळात चांदवड किल्ला बांधल्याचे मानले जाते. यानंतर द्रढप्रहारचा मुलगा सेउणचंद्र याने सिन्नर येथे आपली राजधानी स्थापन केली. १४ व्या व्या शतकात या भागावर बहमनी सत्ता होती पण बहामनी सत्तेच्या अस्तानंतर हा प्रांत निजामशाहीत सामील झाला. इ.स. १६३५ मध्ये मुघल बादशहा शहाजहानने शाहिस्तेखानाला महाराष्ट्रात पाठवले. शाहिस्तेखानाचा सरदार अलीवर्दीखान याने इ.स. १६३६ दरम्यान चांदवडसह या परिसरातील अनेक किल्ले जिंकुन घेतल्याचा शिलालेख किल्ल्यावर पहायला मिळतो. मोगलांच्या काळात चांदवडचे नामकरण जाफराबाद केले गेले. इ.स.१६६७ मध्ये मोगलांकडून बाकीखान चांदवडचा किल्लेदार होता. इ.स.१६६७-१६७० दरम्यान महाराजांनी चांदवड शहर लुटुन १ हत्ती, १२ घोडे व ४०००० रुपये नेल्याचा उल्लेख येतो. यावेळी किल्लेदार बाकीखान किल्ल्यात लपून बसला तर तळकोकणचा फौजदार लोदीखान पराभूत होऊन पळून गेला. इ.स.१६७० मध्ये सप्टेंबर महीन्यात दुसऱ्यांदा सुरत लुटल्यावर महाराज बागलाणातुन परत जाताना खानदेशचा सुभेदार दाऊदखान कुरेशी महाराजांकडून खजिना हस्तगत करण्यासाठी पाच हजार सैन्यानिशी १६ ऑक्टोंबर १६७० रोजी चांदवड किल्ल्यावर पोहोचला व त्याने या ठिकाणी कांचनाबारीच्या लढाईची तयारी केली. इ.स.१६८२ ऑक्टोंबर महीन्यात छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात मराठ्यांची एक तुकडी चांदवड वर चालून आल्याचे उल्लेख येतात. यावेळी चांदवडचा ठाणेदार अब्दुल्ला व गडाचा किल्लेदार या दोघांनी या तुकडीला अटकाव न केल्याने ठाणेदाराची मनसब २०० स्वारांनी तर किल्लेदाराची मनसब १०० स्वारांनी कमी करण्यात आली. या नंतरच्या काळात गडावर रहीमुद्दिन, रघुनाथसिंग, महीपतसिंग हे मोगली किल्लेदार असल्याचे उल्लेख येतात. इ.स.१७२४ मध्ये असफजहा निजाम उल्मुकने दक्षिणेत स्वतःचे स्वतंत्र राज्य घोषीत केल्यावर हा भाग त्याच्या ताब्यात आला पण पहिल्या बाजीरावाच्या काळात लवकरच चांदवड किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. पुढे नानासाहेब पेशव्यांनी मल्हारराव होळकरांना चांदवड जहागिरी म्हणून दिले व चांदवडचा किल्ला मल्हाराव होळकरांच्या ताब्यात आला. याच काळात येथे तांब्याचा व्यवसाय बहरला. मल्हारराव होळकरांनंतर अहिल्यादेवी होळकर यांनी चांदवडची सूत्रे हातात घेतली. चंद्रेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकर यांनी १७४० मध्ये केला. चंद्रेश्वर मंदिराखाली तांबडका डोंगरावर असलेल्या मंदिराचा जीर्णोद्धारही याच काळात केला गेला. इ.स.१७४९-५० दरम्यान संताजी मोहिते हा येथील किल्लेदार होता. इ.स.१७७२मध्ये माधवराव पेशवे यांच्या परवानगीने तुकोजी होळकर यांनी चांदवड किल्ल्यावर चांदोरी रुपयांची टांकसाळ चालू केली. हा चांदवडी रुपया चांदवडी तुर्रा म्हणुन प्रसिद्ध आहे. इ.स.१७७३-७४ दरम्यान उद्धव वीरेश्वर हा येथील किल्लेदार होता. या काळात चांदवड किल्ल्याचा वापर तुरुंग म्हणून केला गेला व नारायणराव पेशव्यांच्या खुनातील आरोपींना येथे कैदेत ठेवण्यात आले. इ.स.१८०० मध्ये किल्लेदार व टाकसाळ अधिकारी यांच्यातील भांडणामुळे किल्ल्यावरील टाकसाळ चांदवड गावात हलवली गेली. याच वर्षी यशवंतराव होळकरांच्या सैन्यातील अहमदखान व आमिरखान यांनी मालेगाव व चांदवड लुटले. इ.स.१८०४ मध्ये कर्नल वॉलेस याने चांदवड ताब्यात घेतला पण पुन्हा होळकरांच्या ताब्यात दिला. इ.स.१८१८ मध्ये एप्रिल महीन्यात थॉमस हिस्लॉपने होळकरांकडून पुन्हा चांदवड ताब्यात घेतले. दळणवळणासाठी चांदवड घाटाचे महत्व ओळखुन या भागाचा ताबा घेतल्यावर लेफ्टनंट कर्नल मक्डोवील व त्याच्या फौजेने चांदवड येथे मुक्काम ठोकला. इ.स.१८२९ मध्ये चांदवड टांकसाळीतील चांदीच्या रुपयाची नाणी पाडण्याचे काम बंद करण्यात आले. १८३० मध्ये तांब्याची नाणी पाडण्याचे काम थांबवुन टांकसाळ बंद करण्यात आली. इ.स.१८५७ च्या उठावानंतर इंग्रजांनी गडावर जाण्याचा पायरीमार्ग उध्वस्त केला.---------------सुरेश निंबाळकर