चंदेरी

जिल्हा - ठाणे

श्रेणी  -  अत्यंत कठीण

दुर्गप्रकार- गिरीदुर्ग

महाराष्ट्रातील लिंगाणा,इरशाळगड यासारख्या अनेक गडकिल्ल्यांची शिखरे दुर्गप्रेमीना व साहसवीरांना गिर्यारोहणाची आव्हान देत उभी आहेत. या मालिकेतील असाच एक सुळका म्हणजे चंदेरी किल्ला. माथेरान-बदलापुर डोंगररांगेत असलेल्या या किल्ल्याचा पायथा मुंबई-पुणे या दोन्ही शहरापासुन एका दिवसात सहजपणे गाठता येतो पण पण किल्ल्याच्या माथ्यावरील सुळका गाठण्यासाठी मात्र प्रस्तरारोहण करावे लागते. गिर्यारोहण साहित्याशिवाय प्रस्तरारोहण करून किल्ल्याचा माथा गाठणे शक्य असले तरी अप्रिय घटना टाळण्यासाठी गिर्यारोहण साहित्याचा वापर करावा. चंदेरी किल्ल्यावर जाण्यासाठी दोन वाटा असुन यातील एक वाट बदलापुर जवळील चिंचवली गावातुन वर चढते तर दुसरी वाट पनवेल जवळील तामसाई गावातील दुंदरे वाडीतून वर चढते. या दोन्ही वाटा किल्याखाली असलेल्या खिंडीत एकत्र येतात. तामसाई गावातुन वर जाणाऱ्या वाटेवर खडी चढण असुन मोठया प्रमाणात घसारा असल्याने चिंचवली गावातुन गडावर जाणे जास्त सोयीचे आहे. चिंचवली गाव मध्य लोहमार्गावरील बदलापुर स्थानकापासुन ११ कि.मी.अंतरावर तर वांगणी स्थानकातुन ८ कि.मी. अंतरावर असुन या दोन्ही स्थानकातुन चिंचवली गावात जाण्यासाठी रिक्षाची सोय आहे. चिंचवली गावामागे असलेल्या लहानशा टेकडामुळे गावात गेल्यावर चंदेरी किल्ला नजरेस पडत नाही पण या टेकडावर असलेल्या पठारावरून किल्ल्यावर जाण्यासाठी मळलेली वाट आहे. चिंचवली गावातुन पठारावर जाण्यासाठी दोन वाटा असुन पठारावर आल्यावर उजवीकडे म्हैसमाळ डोंगर तर डावीकडे चंदेरी किल्ला दिसतो. या दोन्ही डोंगरांना जोडणाऱ्या सोंडेमध्ये V आकाराची खाच असुन या खाचेतुन किल्ल्यावर जाण्याचा मार्ग असल्याने हि खाच डोळ्यासमोर ठेवुनच मार्गक्रमण करावे. किल्ल्याखालील गुहेत स्थानिकांची देवता असल्याने त्यांचा किल्ल्यावर राबता असतो,त्यामुळे वाट पुर्णपणे मळलेली आहे. पठारावरील अर्ध्या तासाची गवताळ वाट पार करून आपण पायथ्याशी असलेल्या घनदाट जंगलात शिरतो. या जंगलातून वर चढत जाणारी वाट म्हणजे पाण्याच्या प्रवाहाचा मार्ग आहे. या वाटेने साधारण अर्धा तास वर चढल्यावर हि वाट प्रवाहाच्या उजव्या बाजुस वळते. येथुन अर्ध्या तासात आपण चंदेरी किल्ला व म्हैसमाळ डोंगर यांना जोडणाऱ्या लहानशा खिंडीत पोहोचतो. येथुन उजवीकडील वाट म्हैसमाळ डोंगरावर ,डावीकडील वाट चंदेरी किल्ल्यावर तर समोर उतरत जाणारी वाट तामसाई गावातील दुंदरे वाडीत जाते. खिंडीतुन किल्ल्यावर जाताना वाटेत एका ठिकाणी उजवीकडे कडयाच्या काठावर कातळात खोदलेले खळगे नजरेस पडतात तर दोन ठिकाणी कातळात कोरलेल्या चार-पाच पायऱ्या आहेत. साधारण १५ मिनिटांचा चढ पार करून आपण एका लहानशा खाचेत पोहोचतो. किल्ल्याला जोडणारी डोंगरसोंड या खाचेने किल्ल्यापासून वेगळी करण्यात आली आहे. सध्या गावकऱ्यांनी या खाचेत तसेच खाचेसमोरील उंचवट्यावर देवीचा तांदळा स्थापन केलेला आहे. हि खाच चढुन आल्यावर आपण किल्ल्याच्या उद्ध्वस्त दरवाजात पोहोचतो. किल्ल्याचा दरवाजा व त्याशेजारी असलेले बुरुज पुर्णपणे नष्ट झाले असुन त्यांचा केवळ तळपाया शिल्लक आहे. किल्ल्याच्या बांधकामातील हा एकमेव अवशेष आज शिल्लक आहे. दरवाजातून आत आल्यावर कातळात कोरलेल्या काही पायऱ्या दिसतात तर मान वर करून पाहील्यावर गगनाला भिडलेला किल्ल्याचा माथा दिसतो. या सुळक्याखाली आल्यावर उजवीकडील वाट आपल्याला सुळक्याच्या पोटात असलेल्या प्रशस्त गुहेकडे घेऊन जाते. गुहेकडे जाताना वाटेत डावीकडे कातळात खोदलेली दोन टाकी नजरेस पडतात. यातील पहिल्या टाक्यात पिण्यायोग्य पाणी असुन हे पाणी साधारण फेब्रुवारीपर्यंत उपलब्ध असते. हे टाके झाकण्यासाठी वरील बाजुस काठावर कातळात खोबणी कोरलेल्या आहेत. दुसरे टाके दगडमाती साठल्याने कोरडे पडले आहे. चिंचवली गावातून गुहेपर्यंत येण्यासाठी अडीच तास लागतात. गुहा चांगलीच प्रशस्त असुन नैसर्गिक असलेल्या या गुहेत काही प्रमाणात खोदकाम केलेले आहे. पावसाळा वगळता या गुहेत ३०-४० जण सहजपणे राहु शकतात. गुहेतील एका उंचवट्यावर संगमरवरी देव्हाऱ्यात शिवलिंग ठेवलेले आहे. गुहेमध्ये पाण्याचे तिसरे कोरीव टाके आहे पण यातील पाणी पिण्यायोग्य नाही. या गुहेपर्यंत सहजपणे पोहोचता येते पण येथुन पुढे किल्ल्यावर जाणारा मार्ग धोकादायक असुन या भागासाठी दोराचा वापर करणे आवश्यक आहे. कड्याला लागुन जाणाऱ्या या वाटेच्या पुढील भागात अजुन एक लहान नैसर्गीक गुहा आहे पण या गुहेच्या तोंडावरच कातळ कोसळल्याने हि गुहा सहजपणे दिसुन येत नाही. येथुन पुढे आल्यावर साधारण ३०-४० फुटांचा मुरमाड घसारा उतरावा लागतो. या उताराच्या खालील बाजुस दरी असल्याने हा भाग सावधतेने दोराच्या मदतीने पार करावा. पुढे कातळाला लागुन असलेल्या पायवाटेने १० मिनिटे चालत गेल्यावर आपण किल्ल्याच्या दुसऱ्या टप्प्यात पोहोचतो. या टप्प्यावर काही प्रमाणात सपाटी असुन बुरुजासारखा निमुळता भाग आहे. या भागाखाली कातळाच्या आतील बाजुस खोलवर खोदलेले पाण्याचे चौथे टाके असुन या टाक्यात पिण्यायोग्य पाणी वर्षभर असते. येथुन सुळक्याकडे पाहीले असता कातळात कोरलेल्या लहान लहान पायऱ्या दिसतात. या पायऱ्याचा वापर व प्रस्तरारोहण करत आपण किल्ल्याच्या वरील भागात पोहोचतो. येथुन पुढे किल्ल्याचा माथा उताराच्या खिंडीने दोन भागात विभागलेला असुन घसाऱ्याचा हा भाग काहीसा काळजीपुर्वक चढावा लागतो. येथे खिंडीच्या उजवीकडील कातळात अजुन एक पाण्याचे चौकोनी आकाराचे मोठे बंदीस्त टाके कोरलेले आहे. किल्ल्याच्या या भागात असलेली हि दोन्ही टाकी पहाता हा किल्ला शिवपुर्व काळापासूनच अस्तीत्वात असावा. येथुन पुढे काही छोटेमोठे कातळटप्पे पार करत आपण किल्ल्याच्या सर्वोच्च भागात पोहोचतो. किल्ल्याचा माथा म्हणजे टोकाकडे जाणारी लांबलचक वाट असुन या वाटेवर दोन ठिकाणी चौकीचे अवशेष दिसुन येतात. किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासुन २७०० फुट असुन किल्ल्याचा माथा म्हणजे २० जण दाटीवाटीने उभे राहू शकतील इतपत जागा आहे. माथ्यावर सिंहासनावर आरूढ महाराजांची मुर्ती ठेवलेली असुन भगवा ध्वज रोवलेला आहे. माथ्यावरून दक्षिणेला माथेरान, पेब, पुर्वेला प्रबळगड तर उत्तरेला मलंगगड तसेच पश्चिमेला भीमाशंकर पठार ,सिध्दगड, गोरक्षगड, पेठचा किल्ला इतक्या लांबचा प्रदेश व या किल्ल्याचे मध्यवर्ती स्थान लक्षात येते. किल्ल्यावरील ठरावीक अवशेष व पाण्याची टाकी पहाता या किल्ल्याचा वापर केवळ टेहळणीसाठी केला जात असावा. ११ व्या शतकात शिलाहारांच्या ताब्यात असलेला हा किल्ला इ.स.१६५६ मध्ये शिवरायांनी कल्याण,भिवंडी ,रायरीपर्यंतचा सारा मुलूख घेतला त्यात हा गडही मराठ्यांच्या ताब्यात आला असावा. संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर इ.स.१६८९ साली मातब्बर खान या मुघल सरदाराने कल्याण,मलंगगड या किल्ल्याबरोबर चंदेरी किल्ला ताब्यात घेतला. -------सुरेश निंबाळकर