कोल्हापुर जिल्ह्यातील दुर्गभटकंती मधील माझा शेवटचा किल्ला म्हणजे मुडागड. माझी कोल्हापुर जिल्ह्यातील १३ किल्ल्यांपैकी १२ किल्ल्यांची भटकंती पुर्ण झाली होती पण मुडागड पहाण्याचा योग काही येत नव्हता. अनेकदा योजना करून देखील काहीतरी अडथळे येत होते. याचे मुख्य कारण म्हणजे वाटाड्या सोबत असल्याशिवाय किल्ल्यावर जाऊ नये हि महत्वाची सुचना. जेव्हा मी मुडागडला भेट दिली त्यावेळी हि सुचना किती महत्वाची आहे हे पटले. मुडागड म्हणजे घनदाट जंगलात हरवलेला किल्ला. मुळात मुडागड नावाचा किल्ला आहे हे पडसाळी गाव वगळता परिसरातील लोकांना देखील ठाऊक नाही. पन्हाळा तालुक्याच्या पश्चिमेला सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर असलेला हा किल्ला म्हणजे काजीर्डा घाटाचा रखवालदार. गडाच्या आसपास घनदाट जंगल असुन पुर्व पायथ्याशी पडसाळी हे २०-२२ उंबऱ्याचे गाव वसले आहे तर पश्चिमेला खोल दरीत रत्नागिरी जिल्ह्यातील राजापुर तालुका येतो. कोल्हापूरहून कोकणात जाण्यासाठी पुर्वी काजीर्डा घाटाचा वापर केला जात असे. ह्या काजीर्डा घाटाच्या संरक्षणासाठी घाटाजवळच मुडागड बांधण्यात आला. मुडागडला जाण्यासाठी कोदे व पडसाळी या दोन गावातुन वाटा असुन कोदे गावातून वाटाड्या मिळणे कठीण असल्याने बहुतांशी गडप्रेमी पडसाळी गावातुन गडावर जातात. त्यामुळे हि वाट सोयीची आहे. पडसाळी गाव कोल्हापुरहुन ५३ कि.मी. अंतरावर असुन कोल्हापूर-कळे-बाजारभोगावे-किसरूळ-काळजावडे-–पडसाळी असा गाडीमार्ग आहे. गड घनदाट जंगलात असल्याने पायवाटा व त्यावर असलेल्या गडमार्ग दाखविणाऱ्या खुणा पानगळीमुळे पुर्णपणे झाकुन जातात. एखादे वळण जरी चुकले तरी जंगलात भरकटण्याची शक्यता आहे त्यामुळे गडावर जाताना सोबत वाटाड्या असणे अत्यावश्यक आहे. पडसाळी गाव आता कॅम्पिंग डेस्टिनेशन झाल्याने गावात पर्यटनाचे वारे ? वाहू लागले आहेत. गड दाखवण्यासाठी वाटाडे अवाच्यासव्वा मागणी करतात. गरज नसताना एका सोबत दुसरा माणूस येतो व तोदेखील पैशाची मागणी करतो व आल्यानंतर वाद घालतात. त्यामुळे वाटाडे कितीही गोड बोलले तरी गडावर जाण्याआधीच पैशाचे नक्की करावे. पडसाळी गावातुन पश्चिमेला असलेल्या मुडागडचे दर्शन होते. गावातुन एक कच्चा रस्ता काजिर्डा घाटाच्या दिशेने जातो. या रस्त्याने जाताना काही अंतरावर एक ओढा पार करावा लागतो. कुंभी नदीला मिळणाऱ्या या ओढ्यात पडसाळी धरणाचे पाणी सोडले असल्याने वर्षभर पाणी असते. पुढे झऱ्यावर मिळणारे पाणी बेभरवशाचे असल्याने येथेच पाणी भरुन घ्यावे. ओढा ओलांडून थोडंसं पूढे आल्यावर एक पायवाट रस्ता सोडून डावीकडे शेतात शिरते तर सरळ जाणारा रस्ता कार्जिर्डा घाटाकडे जातो. माळरानावरून थोडे चालल्यानंतर वाट उजवीकडे वळून झाडीत शिरते. याठिकाणी वनखात्याची हद्द दर्शविणारा दगडांचा ढीग आहे. या झाडीतुन आत शिरल्यावर आपण डोंगरचढाला लागतो. हा चढ चढून १५ ते २० मिनीटांत या डोंगराच्या मध्यावर येतो. येथुन मागे वळून पाहिल्यावर डोंगराच्या कुशीत वसलेले पडसाळी गाव व पडसाळी धरण नजरेस पडले. येथेच डोंगर कपारीत बारमाही झरा आहे. किल्ल्यावर जाताना वाटेत असलेला हा पाण्याचा शेवटचा स्त्रोत आहे. येथुन पुढे किल्ल्यावर जाणारी वाट घनदाट जंगलातुन जाते. जंगल इतके दाट आहे कि आपल्याला गडाखालचा कोणताही परीसर दिसत नाही व दिशाही समजून येत नाही. २-३ ठिकाणी शेदीडशे फुटांचे मोकळे रान लागते पण ते चहुबाजूनी जंगलाने वेढलेले आहे. साधारण तासाभरात दोन लहान डोंगरावरील चढाव चढत आपण किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचतो. जंगलामुळे हा चढ आपल्याला जाणवत नाही. वाटेवर अनेक ठिकाणी वाट दर्शविणारे बाण रंगवले आहेत पण या खुणा पुसट झाल्या असुन बऱ्याचदा पानाखाली लपलेल्या आहेत. गडावरील आपला प्रवेश डोंगरमाथ्यावर पडलेल्या तटबुरुजांच्या घडीव दगडांमधुन होतो. पडसाळी गावातुन इथवर येण्यास २ तास लागतात. मुडागड समुद्रसपाटीपासुन ३१९० फुट उंचावर आहे. किल्ल्यावर वाढलेल्या जंगलाने किल्ल्याचा घास घेतला असुन किल्ला पुर्णपणे उध्वस्त झाला आहे. गडाचे सर्व बांधकाम ढासळले असुन त्यात मोठमोठी झाडे वाढली आहेत. या झाडीतुन फिरत किल्ल्याचे तटबुरुज पहाणे फारच कठीण आहे. किल्ल्याचा माथा अतिशय लहान असुन १५ ते २० फुटांची तटबंदी वगळता कोणताही अवशेष सलगपणे दिसुन येत नाही. झाडीतुन वाट करत फिरल्यास या अवशेषात ३ बुरुज व त्यांना जोडणारी काही प्रमाणात शिल्लक असलेली तटबंदी दिसुन येते. माथ्याच्या मध्यभागी थोडीफार मोकळी जागा असुन तेथे उखळाचा लहानसा दगड ठेवलेला आहे. मुडागड हा टेहळणीसाठी बांधलेला ४००x१५० फुट लांबीरुंदीचा लहानसा चौकोनी आकाराचा चौबुर्जी कोट असावा. किल्ला बांधताना येथील जंगल पुर्वीपासून असावे व त्याच्या आधारेच हा वनदुर्ग बांधला गेला असावा. माथ्यावरील जंगल इतके दाट वाढले आहे कि कोणत्याही बाजुने आसपासचा परीसर दिसत नाही. गडाच्या परीसरात फिरताना कातळात कोरलेले पाण्याचे कोरडे टाके दिसते. पण हे टाके नसुन गड बांधताना चिरे काढल्यामुळे पडलेला खड्डा आहे कारण जांभ्या दगडात पाणी टिकत नाही. याशिवाय कोदे गावाच्या दिशेने जाणाऱ्या पायवाटेवर एक चर पहायला मिळतो. जंगलातील प्राणी खाली गावात जाऊ नये यासाठी शाहू महाराजांनी हा चर खोदवला असे सांगीतले जाते पण ते तितकेसे समर्पक वाटत नाही. या ठिकाणी आपली गडफेरी पुर्ण होते. गड फिरण्यास अर्धा तास पुरेसा होतो. मुडागड नेमका कोणी व केव्हा बांधला हे माहित नसले तरी नानासाहेब पेशव्यानी इ.स. १७४२ ते १७४७ या दरम्यान करवीरकरांच्या प्रदेशाजवळ मुडागड बांधला असावा. १७४८ च्या पेशव्यांच्या कागदपत्रात याचा उल्लेख आढळतो. नानासाहेब पेशवे व तुळाजी आंग्रे यांच्यात वितुष्ट आल्यावर तुळाजी आंग्रेनी सावंत व करवीरकरांच्या प्रदेशावर हल्ले करण्यास सुरवात केली. पेशवे दफ्तरातील एका पत्रात रामचंद्र बावाजी पेशव्याना मुडागडचा वेढा व लढाई संदर्भात लिहीतात पहिले मुडागड स्वामीनी वसविला होता. त्यावर तुळाजी आंग्रेनी गड बांधून वसिगत केली. तेथून स्वाऱ्या करून तमाम पनाले प्रांताची जागा मारली. त्यावर सावंतवाडीकर,बावडेवाले (करवीरकर) व येसाजी आंग्रे हे सर्व एकत्र होउन चार-पाचशे स्वार व सात-आठ हजार पायदळानिशी मुडागड घेतला आणि राजापुरापासून संगमेश्वर पावतो तमाम मुलुख जालून पस्त केला. भगवंतराव व सावंत यांनी मुडागडास वेढा घातला आहे. आंग्रेना मदत येत होती त्यावरी याणी जाउन शेदिडसे माणूस मारिले. दोन चारशे हत्यारे दारूगोली सापडली. मुड्यावरील लोकही अवसान खात आहेत. येसाजी आंग्रे व सावंतवाडीकर यांनी एकत्रितपणे मुडागडाला वेढा घातला व गड जिंकून घेतला. पुढे १८३९ च्या एका पत्रात मुडागडच्या सुरक्षेकरता काजिर्डा घाटात जोत्याजीराव चव्हाण यांचे १० लोक बंदोबस्तासाठी ठेवल्याची नोंद आहे. करवीरचे शाहू महाराजांनी या परिसराला शिवारण्य घोषित करून येथे हत्ती सोडले होते. पडसाळी गावात रहायचे असल्यास शाळेच्या व्हरांड्यात १०-१२ जणांची मुक्कामाची सोय होऊ शकते.-------सुरेश निंबाळकर

मुडागड

जिल्हा - कोल्हापुर

श्रेणी  -  मध्यम

दुर्गप्रकार- गिरीदुर्ग