जिल्हा - पुणे

श्रेणी  -  मध्यम

दुर्गप्रकार- गिरीदुर्ग

घाटवाट तेथे किल्ला हे प्राचीन काळापासून रूढ झालेले एक समीकरण आहे. कोकणातील रायगड व घाटमाथ्यावरील पुणे यांना जोडणारा महत्वाचा घाटमार्ग म्हणजे वरंधा घाट. प्राचीन काळापासून वापरात असलेल्या या वरंधा घाटाच्या रक्षणाकरता व टेहळणीसाठी कावळा, मोहनगड यासारखे किल्ले बांधले गेले. यातील पुर्णपणे विस्मरणात गेलेला मोहनगड उर्फ जसलोडगड म्हणजेच दुर्गाडी/जननीचा डोंगर असल्याचे पुण्याच्या सचिन जोशीं यांनी २००८ साली प्रकाशात आणले. परीसरात अथवा गावात किल्ल्याचा पत्ता विचारताना दुर्गाडी किल्ला अथवा जननीचा डोंगर असा उल्लेख करावा कारण कागदोपत्री असलेले किल्ल्याचे मोहनगड हे नाव या भागात आजही प्रचलित नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५९ मध्ये बाजी प्रभू देशपांडे ह्यांना लिहिलेल्या पत्रात हिरडस मावळातील मोहनगड किल्ल्याचा उल्लेख आहे. पण या किल्ल्याची स्थाननिश्चिती झाली नव्हती. त्यामुळे कावळ्या किल्ला हाच मोहनगड उर्फ जासलोडगड असल्याचे मानले जात होते. (काही अभ्यासकांचे हे मत आजही कायम आहे.) सचिन जोशीच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी जननीचा डोंगर येथे उपलब्ध असलेल्या अवशेषांचा अभ्यास करून व दुर्गस्थापत्याचे निकष लावून मोहनगड हा किल्ला वरंधा घाटातील जननी देवीच्या डोंगरवर होता असा शोधनिबंध ' भारत इतिहास संशोधक मंडळात सादर केला. मुंबईहुन मोहनगड/जसलोडगड किल्ल्यास भेट देण्यासाठी सर्वप्रथम महाडमार्गे वरंधा घाट गाठावा लागतो. मुंबई ते वरंधा घाट हे अंतर १९२ कि.मी असुन वरंधा घाटात आल्यावर तेथुन ८ कि.मी अंतरावर शिरगाव आहे. शिरगाव पार केल्यावर पुढील वळणावर उजवीकडे दुर्गाडी गावाचा फाटा लागतो. पुण्याहुन भोरमार्गे आल्यास हा फाटा शिरगावच्या अलीकडे डाव्या बाजुस आहे. दुर्गाडी हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव शिरगाव पासुन ४.५ कि.मी. अंतरावर आहे. पुण्याहून भोरमार्गे दुर्गाडी हे अंतर १०२ कि.मी आहे पण भोरपासून वरंधा घाटाचा रस्ता अतिशय खराब आहे. दुर्गाडी गावात हनुमान मंदिराकडे आल्यावर रस्त्याच्या उजवीकडे एक कच्चा रस्ता गावामागील टेकडीवर असलेल्या जननीदेवीच्या मंदिराकडे जातो. गावकऱ्यांनी किल्ल्यावरील देवीचे मंदिर अलीकडील काळात या टेकडीवर बांधले आहे. हे अंतर साधारण १.५ कि.मी. असुन खाजगी वाहनाने आपल्याला या मंदीरापर्यंत जाता येते. यामुळे गड चढण्याचा अर्धा तास कमी होतो. मुक्कामासाठी मंदिर योग्य आहे पण पाण्याची सोय नाही. मंदिराच्या आवारात काही कोरीव मुर्ती व विरगळ पहायला मिळतात. मंदिराच्या मागील बाजुने वर चढत जाणारी वाट मोहनगडावर जाते. या वाटेने गावकऱ्यांची सतत ये-जा असल्याने वाट चांगलीच मळलेली आहे. या वाटेने थोडे वर आल्यावर समोरच दक्षिणोत्तर पसरलेला गडाचा डोंगर दिसतो. या डोंगराची एक धार पुर्वेकडे आपल्या डाव्या बाजुस असलेल्या खिंडीत उतरलेली दिसते. खिंडीत उतरलेल्या या धारेवरूनच गडावर जाण्याचा मार्ग आहे. खिंडीत आल्यावर आपल्याला येथे एक विरगळ पहायला मिळते. शिरगावातुन किल्ल्यावर येणारी वाट या खिंडीतच येते. या ठिकाणी गडावर जाण्याची दिशा बाणाने दर्शविली आहे. येथुन डोंगर चढुन दोन तीन पठारे पार करत आपण किल्ल्याच्या डोंगराखाली येतो. येथुन थेट किल्ल्यावर जाणारी वाट नसुन किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला या डोंगराला वळसा घालुन जावे लागते. हि वाट घनदाट जंगलातुन जाते. या वाटेने आपण किल्ल्याखालील डोंगराच्या दुसऱ्या टोकावर येतो. या ठिकाणी गावकऱ्यांनी लहानशी घुमटी उभारलेली आहे. शिरगावातुन गडावर येणारी दुसरी वाट या घुमटीकडे येते. येथुन गडावर जाण्यासाठी एकच वाट असुन हि वाट कड्याला लागुन पुढे जाते. या वाटेने पुढील चढाई करताना काही ठिकाणी जेमतेम पाउल मावेल अशा पावट्या खोदलेल्या असुन पुढे कातळात खोदलेल्या पायऱ्या लागतात. काही ठिकाणी वाट कातळात कोरून काढलेली आहे. या वाटेने १० मिनिटात आपण जननी मातेच्या मंदिरासमोर येतो. मंदिराच्या थोडे अलीकडे एक पायवाट डावीकडे खाली उतरताना दिसते. या वाटेने खाली उतरले असता कातळात कोरलेली पाण्याची तीन टाकी दिसतात. यातील दोन टाकी मातीने बुजलेली असुन तिसऱ्या खांबटाक्यात पिण्यायोग्य पाणी आहे. कपारीत कोरलेल्या या टाक्याच्या आतील बाजुस दोन खांब आहेत. टाकी पाहुन मागे फिरावे व जननी देवीच्या मंदिरात यावे. पायथ्यापासुन मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी दिड ते दोन तास लागतात. गडावर मुक्काम करायचा असल्यास ४-५ जण या मंदिरात राहू शकतात. मंदिरात जननी मातेची सुंदर घडीव मुर्ती असुन आवारात तुळशी वृंदावन व नंदी आहे. मंदिराच्या मागील बाजुने माथ्यावर जाण्यासाठी वाट असुन माथ्यावर गवतात लपलेला एक लहान चौथरा वगळता इतर कोणतेही अवशेष दिसुन येत नाही. माथ्यावरून हिरडस मावळ तसेच राजगड,तोरणा, मंगळगड, कावळ्या व रायरेश्वरचे पठार नजरेस पडते. गडावर सपाटी अशी नाहीच शिवाय तटबंदी, बुरुज यासारखे कोणतेही बांधकाम दिसत नाही त्यामुळे हा किल्ला असावा का? असा मनात प्रश्न आल्याशिवाय रहात नाही. डेक्कन कॉलेजातील पूरातत्त्व विभागाचे अभ्यासक सचिन जोशी यांनी शिवपूर्व काळातील जासलोडगड उर्फ मोहनगड म्हणजे जननीचा डोंगर असे मत मांडले आहे पण काही जेष्ठ इतिहास संशोधकांच्या मते जननीच्या डोंगरावर फारशी सपाटी नसल्याने सध्या कावळ्या नावाने प्रचलित असणारा किल्ला हाच जसलोडगड-मोहनगड असावा. जसलोडगड उर्फ मोहनगडाचा उल्लेख अफजलखानच्या स्वारीवेळी म्हणजेच प्रतापगड युद्धाच्या आधी शिवाजी महाराजांनी १३ मे १६५९ रोजी बाजीप्रभू देशपांडे यांना लिहिलेल्या पत्रात येतो. त्यात हिरडस मावळात ओस पडलेला जासलोडगड हा किल्ला परत वसविण्यासाठी २५ सैनिकांसह पिलाजी भोसले यांची किल्लेदार म्हणुन नेमणूक केल्याचे दिसुन येते. या पत्रात ते बाजीप्रभुना किल्ल्याचे नामकरण मोहनगड असे करून किल्लेदाराचा वाडा, सैनिकांसाठी निवारा व किल्ल्याची मजबुती करून नंतरच गड सोडण्याची सुचना करतात. -------------सुरेश निंबाळकर

मोहनगड/जसलोडगड