मढ कोट

जिल्हा -मुंबई  
श्रेणी  - सोपी 
दुर्गप्रकार-सागरी किल्ला

पश्चिम रेल्वेवर असलेल्या मढ-मार्वे समुद्रकिनारा मुंबईकरांना तसा माहित आहे. मढ हे गाव मालाड रेल्वे स्थानकापासून पश्चिमेला सुमारे बारा किलोमीटर अंतरावर समुद्रकिनारी वसलेलं आहे. नारळी-पोफळीच्या बागा तेथील बंगले आणि एकंदर वातावरण पाहून जणू गोव्यातच आलो आहे असं वाटतं. मढ परीसरात एकुण मढ कोट, मढ किल्ला, एरंगल बुरूज व अंबोवा बेटावरील बुरुज असे ४ कोट असुन स्थानिक लोक या कोटाविषयी सांगताना जागेची गल्लत करतात व दुसरा कोट म्हणजे मढचा किल्ला जो गावाबाहेर समुद्रकिनारी आहे तो किल्ला सांगतात. कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याने व स्थानिक लोकांना जास्त माहिती नसल्याने तिथे जाण्यापूर्वी पुर्ण माहिती घेऊनच जावे. मालाडहुन मढला जाताना गावात शिरल्यावर उजव्या बाजूला व अंधेरीवरून बोटीने आल्यास डाव्या बाजूला कोळीवाड्यात समुद्रकिनाऱ्याकडे असलेल्या खडकाळ टेकडावर मढ कोटाची इमारत नजरेस पडते. खडकाळ टेकडीवर असणारा हा कोट नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. स्थानिक लोक मढ कोटास माडी म्हणुन ओळखतात. सध्या या कोटाचा वापर स्थानिकांकडून शौचालय म्हणून करण्यात येत असल्याने किल्ला पाहणे म्हणजे एक आव्हानच आहे. सदर कोटातील उपलब्ध अवशेष पाहता सदर कोट एक वखारच असुन याच्या सभोवतालच्या संरक्षक भिंती पडून गेल्याने याचे स्वरूप बदललेले आहे. मढ परिसरात जलमार्गाने आलेल्या मालाची साठवण करण्यासाठी या वास्तूची निर्मिती करण्यात आलेली असावी. कोटाची सध्याची उंची २० फुट असुन त्याची मूळ उंची ३० फुटापर्यंत असावी असे कोटाच्या भिंतीवर लाकडी वाशाकरिता असलेल्या खोबण्या वरून लक्षात येते. सद्यस्थितीत ८० x १४० आकारातील २० फुट उंच दिसणाऱ्या या कोटाच्या बांधणीसाठी ओबडधोबड दगड, चिखलमाती, शंखशिंपले यांचा वापर करण्यात आला आहे तर कोपऱ्यावरील बांधकामात घडीव दगडांचा वापर केलेला दिसतो. या किल्ल्याच्या बांधकामात आढळणारी विशेष बाब म्हणजे खोबणीयुक्त विभाग वा दालन. याच्या अंतर्गत भागात भिंतीला समांतर अशी बैठकीची व्यवस्था आहे व इतर भागात मालाची साठवण करण्याकरिता मोकळी जागा आहे. कोटाच्या आतील भागात राहण्याची वा पाण्याची कोणतीही सोय आढळत नाही. याच्या एकंदरीत रचनेवरून हा लढवय्या कोट नाही. या कोटाचा उपयोग केवळ जकात वसुलीसाठी अथवा मालाची साठवण करण्यासाठी केला जात असावा. कोटाची सध्याची अवस्था फारच दयनीय झाली असुन भिंतीवर झाडे उगवली आहेत. कोट पाहण्यास १० मिनिटे पुरेशी होतात. एके काळी पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या उत्तर कोकण प्रदेशात या परिसराचा समावेश होत होता. हा परिसर मराठी भाषेत फिरंगाण या नावाने ओळखला जात असे. फिरंगाणातील बहुसंख्य किल्ले हे पोर्तुगीजांनी उभारलेले आहेत. या किल्ल्यांची काही खास स्थापत्यशैली होती. फिरंगाणाचा इतिहास लक्षात घेता किल्ल्यांचे जे प्रयोजन होते तेच साध्य करण्यासाठी काही ठिकाणी एका बुरुजांची तर काही ठिकाणी चौक्यांची योजना पोर्तुगीजांनी केल्याचे लक्षात येते. साधारण १६व्या शतकात मढ भागातील इतर गढीकोटाबरोबर हा कोटही पोर्तुगिजांनी बांधला. पोर्तुगीजानी उभारलेल्या या वखारी व टेहळणीवजा कोटांचा मुख्य उपयोग या प्रांतातील लहान मोठया कोटाना आवश्यक रसद पुरविणे हा होता. हे सगळे लहान आकाराचे कोट, टेहळणी बुरूज व लांब पल्ल्याच्या तोफा यांचा वापर करत पोर्तुगीजांनी उत्तर कोकणात आपले साम्राज्य वसवले. इ.स.१७३९च्या वसई मोहिमेत हा परिसर मराठ्यांच्या ताब्यात आला आणि पोर्तुगीजाचे या भागातुन उच्चाटन झाले. किल्ला पाहण्याच्या हेतुने येणाऱ्याचा येथे हिरमोड होण्याची शक्यता आहे पण पोर्तुगीजांची वखार वा टेहळणी चौकी व तिचे भौगोलिक महत्व पाहायचे असेल त्याने या स्थानास अवश्य भेट द्यावी. याशिवाय मढ गावात दुसऱ्या एका टेकडीवर हरबादेवीचे मंदिर असुन त्यातील काही पुरातन मुर्ती प्रेक्षणीय आहेत. ---------------सुरेश निंबाळकर