​जिल्हा - पुणे  
श्रेणी  - सोपी 
दुर्गप्रकार-भुईकोट  

तळेगाव - चाकण रस्त्यावर तळेगाव पासून ४ किमी अंतरावर इंदुरी गाव आहे. या गावात इंद्रायणी नदीच्या काठी एक गढीवजा किल्ला आहे. या गढीलाच इंदुरीचा किल्ला म्हणून ओळखले जाते. तळेगाव -चाकण रस्त्यावर तळेगाव पासून ३ किमीवरील इंदुरी गावात जाणाऱ्या वाटेवर इंद्रायणी नदीवरील पुलावरूनच आपल्याला इंदुरीचा किल्ला दिसतो. पुलावरूनच डाव्या बाजूला इंद्रायणी नदीकाठी किल्ल्याची भक्कम तटबंदी व बुरुज पहायला मिळतात. या वाटेने तटबंदीच्या कडेनेच आपला इंदुरी गावात प्रवेश होतो आणि डाव्या बाजुस किल्ल्याचे पुर्वाभिमुख देखणे व भव्य प्रवेशव्दार दिसते. गडाच्या प्रवेशद्वाराच्या मानाने किल्ल्याची बांधणी अगदीच साधी वाटते. दगडी प्रवेशव्दाराच्या दोनही बाजूस भव्य बुरुज असुन कमानीवर दोनही बाजूस शरभ व मध्यभागी गणपती कोरलेला आहे. प्रवेशव्दाराच्या वरील बाजूस मातीच्या वीटा वापरुन नगारखाना बांधलेला आहे. बुरुजांचा फांजीपर्यंतचा भाग दगडांनी बांधलेला असून त्यावरील भाग वीटांनी बांधलेला आहे.तटबंदी व बुरुजांमध्ये जागोजागी जंग्यांची रचना केलेली आहे. प्रवेशव्दाराच्या आतील बाजूस पहारेकऱ्यासाठी देवड्या असुन इथुन आत शिरल्यावर उजव्या बाजुने दरवाजाच्या वरील बाजूस जाता येते. बाहेरून नगारखान्यासारखा दिसणारा हा भाग आतुन महालासारखा असुन याच्या छतावर व भिंतीवर चुन्यामध्ये सुंदर कोरीव काम केलेले आहे. दरवाजाच्या उजव्या बाजुस तटामध्ये भिंतीत कोनाडे असणारी एक साठवणीची खोली आहे. अशीच अजुन एक खोली दक्षिणेकडील तटातील बुरुजाखाली आहे. किल्ल्याच्या उत्तरेकडील तटात एक लहान दरवाजा असुन येथुन इंद्रायणी नदीच्या पात्राकडे उतरता येते. किल्ल्ल्यावर कडजाई देवीचे मंदिर असुन मंदिराच्या आवारात स्मृतीशिळा व विरगळ दिसून येतात. याशिवाय पश्चिम दिशेला तटबंदीवर एका छोटयाशा घुमटीत शेंदुर फासलेला दगड दिसून येतो. किल्ल्याच्या आतला परिसर खाजगी मालकीचा असुन काही ठिकाणी अलीकडच्या काळात झालेले बांधकाम दिसून येते. किल्ला दुर्लक्षीत असल्याने सर्वत्र बोरी व बाभळीच्या झाडाचे रान माजले आहे त्यामुळे काही ठिकाणी तटबंदीवर देखील जाणे अवघड आहे. किल्ल्याला एकुण अकरा बुरुज असुन तटबंदीची रूंदी १० फूट आहे पण तटबंदी आतील बाजुस बऱ्याच ठिकाणी कोसळलेली असल्याने तटबंदीवरून सलग फेरी मारता येत नाही. किल्ल्याच्या पश्चिमेकडील बुरुजावरून खालून वाहणारी इंद्रायणी नदी व दुरवरचा प्रदेश दिसतो. गडाच्या बाहेर इंद्रायणी नदीकिनारी शंकराचे पुरातन मंदिर असुन या बाजुने किल्ल्याचा उत्तरेकडील दरवाजा व अखंड तटबंदी बुरुजासाहित नजरेस पडते. शिवाजी महाराजांचे अंगरक्षक येसाजी दाभाडे यांचे थोरले पुत्र खंडेराव दाभाडे यांनी इ.स.१७०५ ते १७१७ मध्ये गुजरात प्रांतात धडक मारुन बडोदेपर्यंत मुलुख काबिज केला. यावर शाहू महाराजांनी ११ जानेवारी १७१७ मध्ये खंडेराव दाभाडे यांची मराठा साम्राज्याचे सरसेनापती म्हणुन नेमणुक केली व तळेगाव वतन म्हणुन बहाल केले हे वतन नंतर तळेगाव दाभाडे या नावाने ओळखले जाऊ लागले. इ.स.१७२०-२१ च्या सुमारास खंडेराव दाभाडे यांना इंदुरीची गढी बांधली. खंडेराव दाभाडे यांचे निधन २७ सप्टेंबर १७२९ मध्ये तळेगावच्या जुन्या राजवाड्यात झाले. त्यांची समाधी इंद्रायणी नदीकाठी बनेश्वर मंदिराजवळ आहे. ------------------------सुरेश निंबाळकर

इंदुरी भुईकोट