बाणकोट

जिल्हा -रत्नागिरी  
श्रेणी  - सोपी 
दुर्गप्रकार-सागरी किल्ला

रत्नागिरी जिल्हयातील उत्तरेकडचे शेवटचे टोक म्हणजे बाणकोट. येथे सावित्री नदीच्या दक्षिण तीरावर खाडीच्या मुखाशी असलेल्या टेकडीवर बाणकोटचा किल्ला बांधलेला आहे. किल्ला अजूनही चांगल्या स्थितीत आहे. सावित्री नदीच्या मुखाशी बांधलेला हा किल्ला म्हणजे त्याकाळचे एक महत्वाचे नाविक ठाणे होते. गडाच्या पायथ्याशी गणपती मंदिर व एक विहीर आहे. बाणकोट गावातून थेट किल्ल्यांपर्यंत जाणारा पक्का रस्ता असल्याने थेट किल्ल्याच्या दरवाजात जाता येते. किल्ल्याच्या तटबंदीजवळ सहजपणे जाता येऊ नये यासाठी जमिनीच्या बाजूला तटबंदीलगत खंदक खणलेला आहे परंतु दगड- माती व झाडेझुडपे यांनी तो आता बुजत चालला आहे. साधारण आयताकृती आकार असणाऱ्या या किल्ल्याचे क्षेत्रफळ १ एकरपेक्षा कमी असुन गडाच्या तटबंदीत एकुण सात बुरुज आहेत. किल्ल्याची तटबंदी ८ फुट रूंद व ३० फुट उंच असून किल्ल्याचे उत्तराभिमुख प्रवेशद्वार पश्चिमेस समुद्राच्या बाजूला दोन बुरुजांमध्ये बांधलेले आहे. गडाच्या दरवाजातच एक तोफ समुद्राकडे तोंड करून ठेवली आहे. प्रवेशद्वारातून नदीच्या पलीकडच्या तीरावर सुरूच्या बनामागे दिसणारा महादेवाच्या पिंडीच्या आकाराचा डोंगर म्हणजे हरीहरेश्वर. गडाचा दरवाजा सुंदर दगडी महिरपींनी सुशोभित केलेला असुन आजही प्रवेशद्वाराची कमान रेखीव व सुस्थितीत आहे. कमानीवर मध्यभागी गणेशपट्टी आहे पण त्यावर गणेश प्रतिमा दिसत नाही. चि-याचे आयताकृती दगड तासून चुनखडीच्या लेपावर एकावर एक बसवून तटबंदी व बुरूज उभारलेले आहेत. गडाच्या आत प्रवेश केल्यानंतर प्रवेशव्दाराच्या आत उजव्या व डाव्या बाजूस पहारेकऱ्यासाठी गोलाकार प्रशस्त देवडया दिसतात. उजव्या बाजूच्या देवडीत छोटी भिंत उभारून सहा छोटे हौद बांधलेले दिसतात. ह्या टाक्यांचे काम पाहता ती अलीकडील काळातील असावी असे वाटते. प्रवेशदाराच्या उजव्या बाजुला तटात एक शौचकुप असुन समोरच प्रशस्त मोकळे आवार आहे. आवारात बरेच उद्ध्वस्त अवशेष असुन काही ठिकाणी शेंदूर फासलेले दगड रचून ठेवलेले आहेत. या ठिकाणी एखादे मंदिर असावे कारण रचलेल्या दगडात एक मारुतीची मूर्ती दिसते. बाकी इतरत्र इमारतींची फक्त जोतीचे शिल्लक आहेत. त्यावर आंबा आणि इतर मोठी झाडे वाढली आहेत. दरवाजाच्या आतील बाजुने तटावर चढण्यासाठी डाव्या हाताला प्रशस्त दगडी जिना आहे. या जिन्याने वर आल्यावर दरवाजाच्या वरील भागातुन सावित्री नदी व सागराचा संगम आणि आजुबजुचा प्रदेश आपल्या दृष्टीक्षेपात येतो. किल्ल्याच्या तटावर चढण्यासाठी पूर्व-पश्चिम बाजूस अजुन २ ठिकाणी पायऱ्या आहेत. प्रत्येक बुरुजांवर तोफांसाठी मोठमोठय़ा जंग्या व झरोके ठेवलेले आहेत पण दरवाजातील एक तोफ वगळता तोफा मात्र नजरेस पडत नाहीत. किल्ल्याच्या तटबंदीला व बुरुजांना झाडांच्या मुळांचा विळखा पडलेला आहे त्यांची वेळीच छाटणी करायला हवी. गडाच्या दक्षिण दिशेच्या तटबंदीत गडाचा दुसरा छोटा दरवाजा पाहण्यास मिळतो. तटातील या दरवाजाने तटाबाहेरील बुरूजावर जाता येते. या दरवाजातून खाली उतरण्यास पाय-या आहेत. हया बुरूजात एक खोल विहीर असुन ती आता बुजत चालली आहे. पश्चिमेकडील या बुरूजाच्या अंतर्गत भागात पहारेकऱ्यासाठी खोली अथवा दारुगोळा कोठार आहे. हया कोठाराशेजारी या बुरूजातून बाहेर पडण्यासाठी एक दिंडी म्हणजे छोटा दरवाजा बाहे. त्यातून बाहेर पडल्यावर उजव्या बाजूला उतारावर खालच्या बाजूस दिसणारी स्मारके म्हणजे त्यावेळची ब्रिटिश दफनभूमी आहे. येथे आपली गडफेरी पुर्ण होते. गडाचा विस्तार लहान असल्याने गड पहायला एक तास पुरेसा होतो. सागरी हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशा जागी असलेल्या ह्या किल्ल्यावरून हर्णे-मुरूडपासून हरिहरेश्र्वर-श्रीवर्धनपर्यंतचा परिसर न्याहाळता येतो. ह्या किल्ल्याशी व सावित्री नदीच्या खाडीशी एक वेगळी घटना निगडीत आहे. इ.स.१८०० च्या सुमारास मुंबईहून समुद्रमार्गे महाबळेश्वरला जाण्यासाठी बाणकोट व तेथून सावित्री नदीच्या खाडीतून जावे लागे. पुण्याचे राज्यपाल सर चार्ल्स मॅलेट यांचा मुलगा ऑर्थर मॅलेट १७९१मधे मुंबईहून महाबळेश्वरला या मार्गाने जायला निघाले. त्यावेळी त्याची २५ वर्षांची पत्नी सोफीया व अवघ्या ३२ दिवसांची मुलगी एलेन व्हॅरिएट यांना घेऊन जाणारी बोट १३ खलांशांसह बाणकोट खाडीत बुडाली. त्यांच्या दफनविधी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या स्मशानभूमीत करण्यात आला व त्यांच्या नावे स्मारक बांधण्यात आले. किल्ल्याच्या दफनभूमित त्यांचे स्मारक आजही आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तेथे दगडी चौथरा व त्यावर दगडी स्तंभ उभारलेला असून त्यावर त्यांची नावे कोरलेली होती. या प्रसंगानंतर महाबळेश्वरला गेलेला आर्थर मॅलेट सावित्री नदीच्या उगमापाशी उंच कडयावर जाऊन आपली प्रिय पत्नी व मुलगी याच नदीच्या दुस-या टोकाशी चिरविश्रांती घेत आहेत या भावनेने एकांती बसत असे त्या ठिकाणी चौथरा बांधण्यात आला आहे. आजचा महाबळेश्वरचा प्रसिध्द पाँईंट आर्थर सीट तो हाच. आर्थर सीट नाव ह्याच ऑर्थर मॅलेटवरून ठेवलेले आहे. बाणकोट खाडीमार्गे पूर्वी व्यापार चालत असे. ह्या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी सावित्री नदीच्या मुखावर हा किल्ला बांधण्यात आला.बाणकोट किल्ल्यापासुन ३५ किमी अंतरावर असलेला मंडणगड किल्ला आणि द़ासगावची लेणी आजही या जुन्या व्यापारी मार्गाची साक्ष देत उभी आहेत. महाबळेश्वरला उगम पावणारी सावित्री नदी अरबी समुद्राला जिथे मिळते त्या बाणकोट खाडीचे रक्षण करत बाणकोटचा किल्ला शतकानुशतक उभा आहे. ग्रीक इतिहासकार पिल्नी याने इ.स. पहिल्या शतकात ह्या किल्ल्याचा उल्लेख मांडगोर किंवा मंदागिरी असा केला आहे. त्यानंतर इ.स. १५४८ पर्यंतचा या किल्ल्याचा इतिहास उपलब्ध नाही. पण ह्याचा सलग इतिहास पंधराव्या शतकापासून मिळतो. विजापूरकरांपासून १५४८मध्ये हा किल्ला पोर्तुगिजांकडे आला व नंतर १६ व्या शतकाच्या मध्यात मराठयांकडे आला. शिवकाळात हा गड आदिलशाहीत होता. नंतरच्या काळात कान्हेजी आंग्रे यांनी हा गड काबिज करून त्यास हिम्मतगड असे नाव दिले. संभाजी महाराजांच्या वधानंतर बाणकोट व मंडणगड जंजिरेकर सिद्दीने जिंकून घेतलं. पेशव्यांनी सिद्दीविरुद्ध मोहीम उघडेपर्यंत सन १७३३ पर्यंत हा गड सिद्दीच्या ताब्यात होता. पुढे सन १७३३ मध्ये पेशव्यांचे सरदार बंकाजी महाडिकने बाणकोट सिद्दीकडून काबीज केला पण दोन वर्षानी सिद्दीने हल्ला करून १७३५ मध्ये बाणकोट पुन्हा जिंकून घेतला. पुढे पेशव्यांचे शूर सरदार पिलाजीराव जाधवांनी १७३६ला बाणकोट जिंकून घेतला. मराठय़ांनी या छोटय़ा गडाचे महत्त्व लक्षात घेऊन गडाच्या संरक्षणासाठी ८०० लोकांची नेमणूक करून घेतली. पुढे बाणकोट आग्य्रांच्या ताब्यात आला. तुळाजी आंग्रे आणि पेशवे यांच्यातील वितुष्टानंतर पेशवे व इंग्रज यांच्या संयुक्त सैन्याने कमांडर जेम्सच्या नेतृत्वाखाली बाणकोट किल्ला जिंकला. त्याने या गडाला फोर्ट व्हिक्टोरीया नाव दिले. कमांडर जेम्स याने १७५५ मध्ये किल्ला ताब्यात घेतल्यावर परिसरातील ९ गावे इंग्रजांच्या ताब्यात गेली. व्यापाराच्या दृष्टीने बाणकोट किल्ला व बंदर फायदयाचे होत नसल्याने इंग्रजांनी हा किल्ला पेशव्यांना परत केला. पुढे डिसेंबर १८१७ मध्ये सिद्दीची मदत घेऊन इंग्रजांनी हिम्मतगड ऊर्फ बाणकोट मराठय़ांकडून कायमचा जिंकून घेतला. ब्रिटीशांच्या काळातही जलवाहतुकीच्या दृष्टीने बाणकोट किल्ला व खाडीचे महत्त्व होते. या काळात बाणकोटला व्यापार आणि भौगोलिक स्थानामुळे राजकीय महत्त्व प्राप्त झाले आणि ते जिल्हा कचेरीचे मुख्य स्थान झाले. मात्र दळणवळणाच्या गैरसोयींमुळे नंतरच्या काळात जिल्हा कचेरी रत्नागिरीस आणली गेली व बाणकोटचे महत्व कमी झाले. बाणकोट किल्ल्यावरून खाली उतरून मुख्य रस्त्याला लागल्यांनतर वेळासकडे जाताना उजव्या हाताला एक छोट बुरूजासारखे पडके बांधकाम दिसते. याला पाणबुरूज म्हणतात. बाणकोट किल्ल्याच्या संरक्षण यंत्रणेला बळकट करण्यासाठी सिद्दीने हा बुरूज बांधला. पूर्वीच्या काळी येणारे मचवे, पडाव, होडया येथेच लागत असत. किनाऱ्यालगतच्या या रस्त्यानं जाताना बाणकोट किल्ला बाजूच्याच डोंगरावर दिसतो तर पाणबुरूज रस्ता व समुद्र यांच्यामध्ये सपाटीवर आहे.---------सुरेश निंबाळकर

DIRECTION